श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 14 जून, 2017)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार अशी आहे की, वि.प.क्र. 2 व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लि. ही कंपनी गॅस वॉटर हिटरची निर्मिती करीत असून सदर वॉटर हिटरच्या विक्रीसाठी भंडारा येथे विक्रेता म्हणून वि.प.क्र. 1 महालक्ष्मी इलेक्ट्रानिक्स यांना नियुक्त केले आहे.
तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून वि.प.क्र. 2 निर्मित व्ही-गार्ड गॅस वॉटर हिटर दि.21.12.2014 रोजी रु.5,000/- मध्ये विकत घेतला असून त्यास खरेदी तारखेपासून एक वर्षाची वारंटी राहिल असे वि.प.क्र. 1 ने सांगितले.
वि.प.क्र. 1 च्या मेकॅनिकने दि.21.12.2014 रोजी सदर वॉटर हिटर तक्रारकर्त्याच्या स्वयंपाक खोलीत लावून दिला. सदर वॉटर हिटरने फक्त एक महिना चांगले गरम पाणी मिळाले व त्यानंतर आवश्यक गरम पाणी मिळणे बंद झाले. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडे त्याबाबत तक्रार केल्यावर त्यांनी 2-3 वेळा मेकॅनिक पाठवून दुरुस्तीचा प्रयत्न केला. मात्र सदर दुरुस्ती नंतरही वॉटर हिटरमधून आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी येत नव्हते. दि.04.12.2015 रोजी सदर मेकॅनिकने वॉटर हिटरमधील अंतर्गत भागात (पार्ट) बिघाड झाल्याने तो योग्यप्रकारे काम करीत नसल्याचे सांगितले. परंतू तक्रारकर्त्याने विनंती करुनही वि.प.क्र. 1 ने बिघाड झालेला अंतर्गत भाग बदलवून न देता गॅस वॉटर हिटर निर्मात्या कंपनीला म्हणजे वि.प.क्र. 2 ला सदर बिघाडाबाबत कळवितो आणि 21.12.2015 च्या आंत नादुरुस्त भाग वारंटीमध्ये विनामुल्य बदलवून देऊन हिटरमधील दोष दूर करतो असे सांगितले. परंतू 18.12.2015 पर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारकर्त्याने दि.19.12.2015 रोजी (वारंटी कालावधी संपण्यापूर्वी) वि.प.क्र. 1 व 2 ला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. परंतू वि.प.क्र. 1 व 2 यांनी नोटीसची पूर्तता केली नाही. सदरची बाब ग्राहकाप्रती सेवेतील नूयनता असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.ने तक्रारकर्त्यास विकलेल्या गॅस वॉटर हिटरमधील नादुरुस्त भाग वारंटीमध्ये विनामुल्य बदलवून हिटर दुरुस्त करुन द्यावा किंवा सदोष वॉटर हिटर बदलवून नविन निर्दोष वॉटर हिटर लावून द्यावा किंवा सदोष वॉटर हिटरची किंमत रु.5,000/- दि.21.12.2014 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावी असा आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- मिळावी.
- नेाटीस खर्च रु.2,500/- आणि तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा.
तक्रारीचे पुष्ट्यर्थ तक्रारकर्त्याने वॉटर हिटर घेतल्याचे बिल, वारंटी कार्ड, रजि. नोटीस आणि पोस्टाची पावती व पोचपावती दाखल केलेली आहे.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे.
वि.प.क्र. 1 ने आपल्या लेखी जवाबात तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेला वि.प.क्र. 2 निर्मित गॅस वॉटर हिटर त्यांच्या दुकानातून रु.5,000/- किंमतीस दि.21.12.2014 रोजी वारंटी कार्डवर नमूद शर्ती व अटीस अनुसरुन खरेदी केल्याचे मान्य केले आहे.
तक्रारकर्त्याच्या घरी गॅस वॉटर हिटर बसवून देण्यांत आला, तेव्हा तो व्यवस्थित कार्य करीत होता. तक्रारकर्त्याने जेव्हा वॉटर हिटर कामकरीत नसल्याची तक्रार केली तेव्हा सदर तक्रार कंपनीकडे (वि.प.क्र. 2) पाठविली आणि कंपनीच्या मेकॅनिकने सदर तक्रारीचे निवारण केले. कंपनीकडे त्याबाबत विचारणा केली असता गॅस गिझरमध्ये दोष नसून तक्रारकर्त्याच्या वापरात कमतरता असल्याचे कंपनीने कळविले.
दि.21.12.2015 रोजीची नोटीस प्राप्त झाल्यावर सदर नोटीस कंपनीला पाठविली असता कंपनीने आपला मेकॅनिक व प्रतिनिधी तक्रारकर्त्याच्या घरी पाठविला व नविन गॅस गिझर लावून देण्याचे कबूल केले. परंतु तक्रारकर्त्याने नविन गॅस गिझरसोबत अवास्तव रकमेची मागणी केल्याचे कंपनीने कळविले.
कंपनीचे गॅस गिझरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास वारंटीच्या अटी व शर्तीप्रमाणे बिघाड दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी निर्मात्या कंपनीची आहे. त्यासाठी वि.प.क्र. 1 जबाबदार नसल्याने त्यांना तक्रारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.
3. वि.प.क्र.2 ने आपल्या लेखी जवाबात नमुद केले आहे की, वारंटीप्रमाणे वि.प.क्र.2 ने तक्रारकर्त्यास विनामुल्य योग्य सेवा दिलेली आहे. दि.22.06.2015 रोजी वि.प.क्र.2 च्या मेकॅनिकने वॉटर हिटरची पाहणी केल्यावर सांगितले की, वॉटर हिटरमध्ये कोणताही दोष नसून उंदराने वायर कुरतडल्यामुळे पाणी गरम होत नव्हते असे आढळून आल्यावर वारंटीमध्ये वायरींग विनामुल्य बदलवून दिली. वॉटर हिटरमध्ये कोणताही दोष नाही, जो दोष निर्माण झाला होता त्यास तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा कारणीभूत होता. वि.प.ला त्रास देऊन पैसे उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती दंडासह खारीज करावी.
4. तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारण खालीलप्रमाणे –
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार अंशतः मंजूर. |
- कारणमिमांसा –
4. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून वि.प.क्र. 2 निर्मित गॅस गिझर दि.21.12.2014 रोजी रु.5,000/- मध्ये खरेदी केल्याबाबत पावती दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केली असून सदर बाब उभय पक्षांना मान्य आहे.
दस्तऐवज क्र. 2 वर वारंटी कार्डची प्रत दाखल असून वि.प.क्र. 1 व 2 यांनी सदर गॅस गिझरची खरेदी तारखेपासून 24 महिन्याची वारंटी दिली असल्याचे सिध्द होते. वारंटी काळात सदर गॅस गिझरमध्ये बिघाड झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडे तक्रार केल्यावर त्याने मेकॅनिक पाठवून 2-3 वेळा दुरुस्तीचा प्रयत्न केला परंतू तो दुरुस्त झाला नाही, म्हणून वि.प.क्र. 1 ने सदर तक्रार वि.प.क्र. 2 कडे पाठविल्याचे लेखी जवाबात नमूद आहे. वि.प.क्र. 2 चे म्हणणे असे की, 21.12.2015 रोजीची नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 2 चे मेकॅनिक व प्रतिनीधींनी तक्रारकर्त्यास नविन गॅस गिझरसोबत तक्रारकर्त्याने अवास्तव रकमेची मागणी केल्याचे वि.प.क्र. 2 ने त्यांना कळविले. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या घरी लावलेल्या गिझरमध्ये दोष निर्माण झाला असल्यामुळेच तो बदलवून देण्याची आवश्यकता होती. नविन गॅस गिझर बसवून देण्याची तयारी वि.प.क्र. 2 ने दर्शविली असता तक्रारकर्त्याने नविन गिझर सोबतच पैशाची मागणी केल्याबाबत विधीग्राह्य पुरावा वि.प.क्र. 2 ने सादर केलेला नाही. आपल्या लेखी जवाबात देखिल सदोष गॅस गिझरऐवजी नविन गॅस गिझर बसवून देण्याची वि.प.क्र. 2 ने तयारी दर्शविली. असता तक्रारकर्त्याने पैशाची मागणी केल्याचे कथन केलेले नाही. वि.प.ने दि.19.12.2015 रोजीच्या नोटीसला दि.14.01.2016 रोजी पाठविलेल्या उत्तराची जी प्रत दाखल केली आहे ती नोटीस अधिवक्ता श्री. एम.जी.हरडे यांना प्रत्यक्षात पाठविल्याबाबत पोस्टाची पावती किंवा पोचदेखिल दाखल केलेली नाही. यावरुन वि.प.नी तक्रारकर्त्यास विकलेल्या गॅस गिझरमध्ये वारंटी काळात दोष निर्माण झाला असतांना देखिल सदर दोष वि.प.क्र. 1 व 2 यांनी दूर केला नाही किंवा सदोष गिझर बदलवून नविन गॅस गिझर बसवून दिला नाही. मात्र तक्रार दाखल केल्यावर वि.प.क्र. 1 वारंटीप्रमाणे गिझर बदलवून देण्यास तयार होता. मात्र तक्रारकर्त्याने त्यासोबतच पैशाची मागणी केल्याने तो बदलवून दिला नसल्याचा खोटा बचाव (after thought) घेतल्याचे दिसून येते. सदरची कृती निश्चितच ग्राहकास द्यावयाच्या सेवेबाबत न्युनतापूर्ण व्यवहार आहे, म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्यास विकलेला वि.प.क्र. 2 निर्मित गॅस गिझर वारंटी काळात बिघडला असल्याने वारंटीच्या अटी व शर्तीप्रमाणे तो विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास किंवा बदलवून नविन गिझर मिळण्यास किंवा सदोष गॅस गिझरची किंमत रु.5,000/- दि.21.12.2014 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-आदेश-
1. तक्रारकर्त्याचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2. वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याच्या घरी असलेला गॅस गिझर पुढील दोन वर्षाच्या वारंटीसह विनामुल्य दुरुस्त करुन द्यावा किंवा नविन गॅस गिझर तक्रारकर्त्याला द्यावा किंवा सदोष गॅस गिझरची किंमत रु.5,000/- दि.21.12.2014 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी.
3. वि.प. क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्च रु.2,000/- द्यावा.
4. वि.प. क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य देण्यांत यावी.
6. प्रकरणाची ब व क फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.