(निकालपत्र श्री.मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ग्रा.स.कायदा) कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, ते शेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी दयाजी कचरु जाधव यांच्याकडून मौजे कारसूळ येथील गट नं.351, 353 ही शेतजमीन खंडाने करण्यासाठी घेतलेली आहे. दि.10/6/2013 रोजी त्यांनी सामनेवाल्यांचे टोमॅटो एन एस 516 या नावाचे वाण त्यांच्या त्या शेतात लावण्यासाठी घेतले. दि.18/6/2013 ते 11/7/2013 च्या दरम्यान त्यांनी त्याची लागवड केली. मात्र, पिकाची योग्य निगा व इतर सगळया गोष्टी व्यवस्थीत करुनही टमाटे पिकाचा हंगाम संपत येईपावेतो त्यावर फळ व फुलकळी 5 ते 10% एवढीच आली. त्यामुळे टोमॅटोचे अपेक्षीत उत्पन्न मिळाले नाही. तालुका तक्रार निवारण समितीने तपासणी अंती टोमॅटो पिकावर मोठया विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात 65 ते 70% नुकसान झाल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पन्नाचे झालेले नुकसान रु.10,00,000/-, नुकसान भरपाई रु.20,000/- व अर्जाचा खर्च मिळावा, अशा मागण्या तक्रारदारांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ तक्रारदारांनी दस्तऐवज यादी नि.6 लगत 7/12 उतारा, खंडपत्राचा करारनामा, उत्पन्न घेण्याचा करारनामा, टोमॅटो बियाच्याचे बील, टोमॅटो बियाणे पॅकचे सॅम्पल, बियाणे समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाल्यांनी जबाब नि.18 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, त्यांनी तक्रारदारास विकलेले बियाणे सदोष नव्हते. त्यांनी उत्पादीत केलेले बियाणे सीड अॅक्ट, सीड रुल व सीड (कंट्रोल) ऑर्डरमधील तरतुदीप्रमाणे शेती शास्त्रातील माहितगार व्यक्तींच्या देखरेखीखाली तयार केल्यानंतर प्रयोग शाळेत चाचणी केल्यानंतर त्याची विक्री मार्केटमध्ये केली आहे. सदर टोमॅटो बियाण्याची विक्री अनेक शेतक-यांना केलेली आहे. परंतु कोणाचीही याबाबतीत तक्रार आलेली नाही. टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोग पडणार नाही अशी जाहीरात या सामनेवाल्यांनी केलेली नाही व तसे आश्वासनही दिलेले नाही. टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोग पडणे हे पुर्णपणे हवामान, तापमान, किटक, नैसर्गिक परिस्थिती, जमीनीची पोत, पाणी वगैरेवर अवलंबून असते. त्यामध्ये बियाण्याचा दोष नाही. विषाणुजन्य रोग पडण्यास बियाणे जबाबदार नसते. सदरचा रोग हा Seed Born Diesease नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास उत्कृष्ट बियाणे दिलेले आहे. कोणतीही फसवणूक केलेली नाही. सामनेवाला यांच्याकडून रक्कम मिळविता येइ्रल या गैरहेतुने सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाल्यांनी आपल्या बचावापुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.28 लगत प्रॉडक्शन सर्टिफिकेट व स्टेटमेंट 1 इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदारांचे वकील अॅड.रेखा महाजन यांचा लेखी युक्तीवाद नि.30 तसेच सामनेवाल्यांचे वकील अॅड.तिपोळे यांचा लेखी युक्तीवाद नि.31 त्यांच्या तोंडी युक्तीवादांसह विचारात घेण्यात आलेत.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास पुरविलेले
बियाणे सदोष होते किंवा नाही? नाही.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः-
8. शेतकरी ग्राहकास विकण्यात आलेल्या बियाण्यात इम्प्युरिटी किंवा दोष होता किंवा नाही ही बाब कशा रितीने शाबित करण्यात येईल याबाबत ग्रा.सं.कायदा 1986 कलम 13(1)(सी) अशी तरतूद करतो की, विकण्यात आलेल्या बियाण्याचा नमुना मंचासमोर सादर करण्यात यावा. तो योग्य रित्या सिलबंद करुन सक्षम अशा प्रयोग शाळेकडून तपासून घेण्यात यावा. प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालावर दोन्ही पक्षांना त्यांची बाजु मांडण्याची संधी दिल्यानंतर निर्णय करण्यात यावा.
9. अशा रितीने बियाण्याचा नमुना मंचासमोर सादर करणे गरजेचे आहे. मात्र तो नमुना कोणी सादर करावा व ती जबाबदारी कोणाची आहे या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल सिडस् कॉर्पोरेशन वि. एम मधुसुदन रेड्डी (2012) 2, एस सी सी 506 या न्यायनिर्णयात नमूद केलेले आहे की, विकण्यात आलेल्या बियाण्यांचा नमुना सिड्स रुलच्या, Rule 13 (3) अन्वये बियाणे उत्पादित करणा-या कंपनीने जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे साहजिकच बियाण्याचा नमुना सादर करण्याची जबाबदारी सामनेवाल्यांची आहे. सामनेवाल्यांनी ती पार पाडलेली नसल्यास तज्ञ म्हणून तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा हा एकच पुरावा बियाणे सदोष होते किंवा नाही याचा निर्णय करण्यासाठी उपलब्ध राहातो, असे नमूद केलेले आहे.
10. प्रस्तूत केसमध्ये तो अहवाल नि.6/8 ला दाखल आहे. त्यात बियाणे सदोष होते किेंवा नाही, त्यात भेसळ होती किेंवा नाही, याबाबतचा कॉलम क्र.11 मध्ये काहीही लिहीण्यात आलेले नाही. तसेच कॉलम क्र.16 यात निष्कर्ष म्हणून विषाणु जन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे उत्पादनात 65 ते 70% नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजेच बियाणे सदोष होते किंवा नाही याचा निर्णय करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुराव्यात बियाण्याच्या दोषाबाबत काहीही लिहीण्यात आलेले नाही. परिणामी विषाणुजन्य रोगामुळे पिकावर परिणाम झाला व उत्पादन घटले. त्याचा बियाण्यात दोष असण्याशी काहीही संबंध नाही, या सामनेवाल्यांचे वकील अॅड. तिपोळे यांच्या युक्तीवादाशी आम्ही सहमत आहोत. मा.राज्य आयोगाच्या औरंगाबाद परिक्रमा खंडपिठाने देखील प्रथम अपील क्र.550/2009 यात दि.10/6/2014 रोजी, प्रथम अपील क्र.1923/2006 यात दि.7/7/011 रोजी या केसेसमध्ये दिलेल्या न्यायनिर्णयात पिकांवर रोग पडल्यामुळे जर उत्पादनावर परिणाम झालेला असेल व बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालात तसे नमूद असेल तर सदरची बाब बियाणे सदोष होती म्हणून घडली असा निष्कर्ष देता येणार नाही, असा निर्वाळा दिलेला आहे. सामनेवाल्यांचे वकील अॅड.तिपोळे यांनी सदर केसेसमध्ये मा.राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले वरील निर्वाळे प्रस्तूत केसला लागु होतात, असा युक्तीवाद केलेला आहे. आम्ही त्यांच्या त्या युक्तीवादाशी सहमत आहोत. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालात सामनेवाल्यांनी तक्रारदारांना विकलेले बियाणे सदोष होते किंवा नाही याबाबत काहीही निष्कर्ष न देता विषाणुजन्य रोगामुळे उत्पादनात घट झाली, असे नमूद केलेले आहे. उत्पादनात घट होण्याची बाब सदोष बियाण्याशी जोडता येत नसल्यामुळे सामनेवाल्यांनी तक्रारदारांना सदोष बियाणे विकले, असे म्हणता येणार नाही. परिणामी तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे, असे आमचे मत आहे. प्रस्तूत केसच्या फॅक्टस विचारात घेता उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसण्याचे आदेश न्यायसंगत ठरतात. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात येते.
2. उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक.
दिनांकः27/02/2015