::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा. कार्य.अध्यक्षा)
(पारीत दिनांक :- 30/12/2016)
1. अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतकरी असून त्याने गैरअर्जदाराकडून शेतीसाठी ट्रॅक्टर विकत घेतला म्हणून तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. गैरअर्जदाराचा ट्रॅक्टर विक्रीचा व्यवसाय असून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 24/10/2012 रोजी शेती व्यवसायाकरीता महिंद्रा कंपनीचा सरपंच 475 हया मॉडेलचा ट्रॅक्टर रू.5,80,000/- किमतीला विकत घेतला. त्यात आर.टी.ओ टॅक्स रू.10,000/- आणि इतर शेतीला लागणारे इतर अवजारं रू.1,03,000/- अशी एकंदर किंमत रू.6,93,000/- इतकी झाली. त्याबदल्यात अर्जदाराने गैरअर्जदाराला त्याच्याकडे असलेला जुना ट्रॅक्टर ज्याची किंमत गैरअर्जदाराने रू.2,60,000/- एवढी लावली, तो दिला आणी बाकी रक्कम रू.6,93,000/- पैकी रू.4,33,000/- अर्जदाराने गैरअर्जदारांस देणे होते. अर्जदाराने वरील रक्कम देण्याकरीता स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा सावरी यांच्याकडून कर्ज घेऊन गैरअर्जदाराला स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा सावरी यांचा डि.डि. नं. 198834, दिनांक17/1/2013 चा रू.4,50,000/- रकमेचा दिला तेंव्हा गैरअर्जदाराने अर्जदारांस सांगितले की जी रू.17,000/- जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे ती गैरअर्जदार डि.डि.चे रोखीकरण झाल्यावर अर्जदारांस देईल. गैरअर्जदाराने अर्जदारांस हया सगळया व्यवहाराचे बिल तयार करून दिले ते सदर अर्जात जोडलेले असून ते 24/10/2012 चे आहे, त्यात अर्जदाराचे नाव लिहीले आहे व त्यांनी गैरअर्जदाराकडून घेतलेल्या 475 सरपंच ट्रॅक्टरची किंमत रू.5,80,000/- लिहीली आहे. आर.टी.ओ.टॅक्स रू.10,000/- आणि अवजाराची किंमत रू.1,03,000/- अशी एकंदर किंमत रू.6,93,000/- एवढी व त्यातून अर्जदाराकडून परत घेतलेल्या ट्रॅक्टरची किंमत रू.2,60,000/- एवढीकमी करून रू.4,33,000/- एवढे घेणे बाकी होते. त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराला स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा सावरी हयांनी मंजूर केलेल्या रकमेचा डि.डि. रू.4,50,000/- दिला. आता अर्जदाराला गैरअर्जदाराकडून रू.17,000/- घेणे बाकी आहे. अर्जदाराने सदर रकमेची वेळोवेळी मागणी गैरअर्जदाराकडे केली, परंतु गैरअर्जदाराने ती आश्वासन देऊनही दिली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराला रजिस्टर्ड पोस्टाने दिनांक 24/6/2013 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविला.परंतु गैरअर्जदाराने तो नोटीस घेतला नाही. सबब गैरअर्जदाराविरूध्द अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली आहे.
3. अर्जदाराची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराने जी जास्तीची रक्कम रू.17,000/- घेतली आहे ती अर्जदारांस द.सा.द.शे. 17 टक्के दिनांक 17/1/2013 पासूनचे वरील रकमेवर व्याज देण्याचे आदेश व्हावा. अर्जदारास गैरअर्जदाराकडून जो मानसीक त्रास झाला त्यापोटी रू.5000/- व तक्रारीचा खर्च रू.5000/- गैरअर्जदाराकडून देण्यांत यावे.
4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 6 वर आपले लेखीउत्तर दाखल करून अर्जदाराने केलेले कथन अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सदर ट्रॅक्टर रू.5,65,000/- व त्यासोबत असलेली अॅसेसरीज रू.15,000/- असे एकूण 5,80,000/- मध्ये दि.26/10/2012 रोजी उधारीवर विकत घेतला. सदर ट्रॅक्टरसाठी इंशुरंन्सचे रू.12,000/- व महिंद्रा कंपनीचा झायरोवॅटर (1.45 मी.) चे रू.1,03,000/- उधारीवर घेतला होता तसेच रिवर्सिबल प्लो एकूण किंमत रू.60,000/- चे उधारीवर घेतले होते. अशी एकुण रू.7,55,000/- गैरअर्जदाराला अर्जदाराकडून घेणे निघत होते.
त्यापैकी अर्जदाराने त्याचा जूना ट्रॅक्टर गैरअर्जदाराला रू.2,60,000/- च्या मोबदल्यात दिला व नगदी रू.45,000/- अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. गैरअर्जदाराला अर्जदाराकडून रू.7,55,000/- मधूनरू.3,05,000/- वजा जाता रू.4,50,000/- घेणे निघत होते. सबब अर्जदाराने गैरअर्जदाराला रू.17,000/- जास्तीची रक्कम दिली हे म्हणणे अमान्य असून उलट अर्जदाराकडूनच रू.4,50,000/- वर तीन महिन्याचे व्याज निघत आहे ते गैर अर्जदाराला देण्यांत यावे. अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द खोटी तक्रार दाखल केल्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, लेखी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? आहे
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रतिस अनुचित व्यापार नाही
पध्दतीचा अवलंब केला आहे काय ?
(3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून शेती व्यवसायाकरीता महिंद्रा कंपनीचा सरपंच 475 हया मॉडेलचा ट्रॅक्टर रू.5,80,000/- किमतीला विकत घेतला ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. अर्जदाराने त्याच्या तक्रारीत कथन केले आाहे की, त्यांनी उपरोक्त नमूद ट्रॅक्टर रू.5,80,000/- किमतीला विकत घेतला. त्यात आर.टी.ओ टॅक्स रू.10,000/- आणि इतर शेतीला लागणारे इतर अवजारं रू.1,03,000/- किमतीची घेतली व त्याबदल्यात अर्जदाराने त्याच्याकडे असलेला जुना ट्रॅक्टर गैरअर्जदाराला रू.2,60,000/- ला विकला व बाकी रक्कम रू.6,93,000/- पैकी रू.4,33,000/- अर्जदाराने गैरअर्जदारांस देणे होते. त्यामुळे अर्जदाराने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा सावरी यांचा दिनांक 17/1/2013 चा रू.4,50,000/- रकमेचा डि.डि. गैरअर्जदाराला दिला व सदर व्यवहारात जास्तीची रक्कम रू.17,000/- अदा करण्यात आली आहे ती गैरअर्जदार डि.डि.चे रोखीकरण झाल्यावर अर्जदारांस परत करण्याचे आश्वासन गैरअर्जदाराने दिले, परंतु रक्कम परत केली नाही असे अर्जदाराचे कथन आहे. अर्जदाराच्या तक्रारीचे तसेच दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता अर्जदाराने तक्रारीतील व्यवहाराचे कोणतेही बिल तक्रारीत दाखल केलेले नाही. अर्जदाराने तक्रारीत नि.क्र.3 वर दस्त क्र.3 वर जे दस्तावेज दाखल केलेले आहे व ते अर्जदार तक्रारीत बिल म्हणून नमूद करीत आहे, त्या दस्ताऐवजाची पडताळणी करतांना असे दिसून आले की सदर दस्ताऐवजात कुठेही गैरअर्जदाराचे नांव नमूद नसून त्यावर गैरअर्जदाराची त्यावर कुठेही स्टॅम्प किंवा सही नमूद नाही. तसेच सदर दस्ताऐवज हे अस्पष्ट असून वाचनीय नाही. तसेच अर्जदाराची त्या दस्तावेजावर, सत्यप्रत म्हणून स्वाक्षरी नाही. सबब अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याचे रू.17,000/- घेणे बाकी आहे हे तक्रारीतील कथन दाखल दस्ताऐवजांवरून ग्राहय धरण्यासारखे नाही. सबब मंचाच्या मते गैरअर्जदाराने अर्जदारांस कोणतीही न्युनतापूर्ण सेवा किंवा अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 30/12/2016