जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 94/2015.
तक्रार दाखल दिनांक : 04/02/2015.
तक्रार आदेश दिनांक : 14/09/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 07 महिने 10 दिवस
विठ्ठल मारुती पवार, वय 60 वर्षे,
व्यवसाय : निवृत्तीवेतनधारक,
रा. उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रोप्रा. इलेक्ट्रो वर्ल्ड, सुपर मल्टीब्रॅन्ड मोबाईल शोरुम,
ढंगेकर कॉम्प्लेक्स, मोबाईल मार्केट, नवी पेठ, चौपाड, सोलापूर.
(2) व्यवस्थापक तथा संबंधीत अधिकारी,
मे. व्यंकटेश इंटरप्रायजेस, पवार कॉम्प्लेक्स,
आंबेडकर चौक, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(3) व्यवस्थापक तथा संबंधीत अधिकारी, मायक्रोमॅक्स
इन्फॉर्मेटीक्स लि., 21/14, ए फेस, 2, नरीमन इंडस्ट्रीयल
एरिया, दिल्ली – 100 028. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.व्ही. तांबे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एस. मुंढे
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी दि.3/5/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल मॉडेल नं.Micromax A-177 ज्याचा IMEI No. 91136265106547 व Battery No. V 027751402300154523 हँडसेट रु.8,600/- किंमतीस खरेदी केला आहे. मोबाईल खरेदी केल्यापासून 65 दिवसानंतर मोबाईल आपोआप बंद पडणे, हँग होणे, आवाज व्यवस्थित न येणे, चार्जींगवेळी खुप गरम होणे, ब-याचवेळा चार्ज न होणे इ. तक्रारी निर्माण झाल्या. त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांना माहिती दिली असता विरुध्द पक्ष क्र.2 सेवा केंद्राकडून मोबाईल हँडसेट दुरुस्ती करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून वॉरंटीमध्ये मोबाईल हँडसेट दुरुस्त केला असता त्यांच्याकडून बील वसूल केले. तसेच दि.1/10/2014 रोजी मोबाईल आपोआप बंद झाला आणि विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दुरुस्तीकरिता दिला असता तो कंपनीकडे पाठवावा लागेल, या कारणास्तव 15 दिवस ठेवून घेतला. त्यानंतर तक्रारकर्ता मोबाईल परत घेण्यासाठी गेले असता तो दुरुस्त होऊ शकत नाही आणि त्यातील बरेच पार्ट खराब झाल्यामुळे नवीन सॉफ्टवेअर टाकावे लागणार असून त्याकरिता तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. मोबाईल हँडसेट वॉरंटीमध्ये असल्यामुळे विनामुल्य दुरुस्त करुन देण्याची विनंती केली असता टाळाटाळ करण्यात आली. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांना मोबाईल हँडसेट बदलून मागितला असता त्यांनी विक्रेते असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळली. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवूनही मोबाईल हँडसेट बदलून देण्याकरिता कार्यवाही न केल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादविषयक नादुरुस्त मोबाईल हँडसेट विनामुल्य बदलून देण्यासह मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना या जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते जिल्हा मंचापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण केली.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर काल्पनिक असल्याच्या कारणास्तव अमान्य केली आहेत. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता हे दि.1/10/2014 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्याकडे आले होते. तक्रारकर्ता यांच्या मोबाईल हँडसेटची तपासणी केली असता हँडसेट पूर्वी दुरुस्तीकरिता इतरत्र दाखवल्याचे व पाण्यात पडल्यामुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले. मोबाईल हँडसेट वॉरंटीमध्ये दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे नवीन सॉफ्टवेअर टाकण्याकरिता रु.350/- खर्च येईल, असे तक्रारकर्ता यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांचा मोबाईल हँडसेट स्वीकारुन रु.350/- रकमेची पावती देण्यात आली. परंतु तक्रारकर्ता हे त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता दारु पिऊन त्यांच्याकडे आले आणि अर्वाच्च भाषा वापरुन व मुळ पावती परत करुन मोबाईल हँडसेट परत नेला. त्यांनी तक्रारकर्ता यांच्याकडून मोबदला घेतलेला नाही आणि खोटी तक्रार दाखल केल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केलेली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- विरुध्द पक्ष क्र.3 यांचेद्वारे उत्पादीत केलेला व प्रस्तुत प्रकरणात वादविषयक असणारा मोबाईल हँडसेट तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून रु.8,600/- किंमतीस खरेदी केल्याचे दि.3/5/2014 रोजीच्या खरेदी पावतीवरुन निदर्शनास येते. प्रामुख्याने मोबाईल खरेदीपासून 65 दिवसानंतर मोबाईल आपोआप बंद पडणे, हँग होणे, आवाज व्यवस्थित न येणे, चार्जींगवेळी खुप गरम होणे, ब-याचवेळा चार्ज न होणे इ. तक्रारी निर्माण झाल्या आणि त्याचे निराकरण विरुध्द पक्ष यांनी करुन दिलेले नाही, असा तक्रारकर्ता यांचा मुख्य वादविषय आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या व्यतिरिक्त विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी लेखी उत्तर दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा मंचापुढे दाखल करण्यापूर्वी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवलेली होती. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ता यांची नोटीस किंवा जिल्हा मंचाच्या नोटीसकरिता उत्तर दाखल केले नाही किंवा वादविषयासह पुराव्याचे खंडन केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांचा वादविषय त्यांना मान्य आहे, असे स्पष्ट अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
6. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या वाद-प्रतिवादाची दखल घेतली असता विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.3 यांचे दुरुस्ती सेवा केंद्र असल्याचे निदर्शनास येते आणि त्याबाबत उभयतांमध्ये दुमत नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी उत्तर पाहता मायक्रोमॅक्स मोबाईल हँडसेटची वॉरंटीमध्ये दुरुस्ती करुन देण्याकरिता ते सेवा केंद्र असल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांच्या वादकथनाप्रमाणे सर्वप्रथम मोबाईल आपोआप बंद पडणे, हँग होणे, आवाज व्यवस्थित न येणे, चार्जींगवेळी खुप गरम होणे, ब-याचवेळा चार्ज न होणे इ. तक्रारी निर्माण झाल्या आणि दि.1/10/2014 रोजी त्यांचा मोबाईल हँडसेट आपोआप पूर्णत: बंद पडला. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी तो हँडसेट विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता हे दि.1/10/2014 रोजी त्यांच्याकडे आल्यानंतर मोबाईल हँडसेटची त्यांनी तपासणी केली असता हँडसेट दुरुस्तीकरिता इतरत्र दाखवल्याचे व पाण्यात पडल्यामुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले. तसेच मोबाईल हँडसेट वॉरंटीमध्ये दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे नवीन सॉफ्टवेअर टाकण्याकरिता रु.350/- खर्च येईल, असेही तक्रारकर्ता यांना सांगितल्याचे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी नमूद केलेले आहे. उपरोक्त बाबी पाहता तक्रारकर्ता यांचा मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीमध्ये बंद पडलेला होता, हे सिध्द होते.
7. त्यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की, तक्रारकर्ता यांच्या मोबाईल हँडसेटमधील दोष वॉरंटीनुसार दुरुस्तीस पात्र ठरतो काय ? आणि विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्या दोषाचे निराकरण न करुन देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? हे प्रश्न विचारात घेतले असता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्त्याच्या मोबाईल हँडसेटची तपासणी केल्यानंतर तो दुरुस्तीकरिता इतरत्र दाखवल्याचे व पाण्यात पडल्यामुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले. परंतु तक्रारकर्ता यांचेतर्फे युक्तिवादामध्ये त्या कथनाचे स्पष्ट खंडन करण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे वादविषयक मोबाईल हँडसेट दुरुस्तीकरिता दिल्याबद्दल दि.1/10/2014 ची पावती अभिलेखावर दाखल आहे. त्या पावतीमध्ये मोबाईल हँडसेट ‘डेड’ असा शेरा लिहून रु.350/- येणे असे नमूद आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनाप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांच्याकडून दुरुस्तीकरिता रक्कम वसूल केलेली आहे. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता दारु पिऊन येऊन अर्वाच्च भाषा वापरुन व मुळ पावती परत करुन मोबाईल हँडसेट परत नेला आहे. या ठिकाणी असेही निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी मोबाईल हँडसेट परत घेत असताना मुळ पावती परत केल्याचे विरुध्द पक्ष क्र.2 यांचे स्पष्ट कथन असताना ती मुळ पावती त्यांनी अभिलेखावर दाखल केलेली नाही. काहीही असले तरी तक्रारकर्ता यांचा मोबाईल हँडसेट विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून ताब्यात घेत असताना तो पूर्णत: बंद (मृत) अवस्थेत होता, ही बाब कोणीही नाकारत नाहीत. यदाकदाचित तक्रारकर्ता यांनी दि.1/10/2014 रोजी सांयकाळी मोबाईल हँडसेट परत घेतल्याचे काही क्षणाकरिता ग्राह्य धरले तरी 15 दिवस मोबाईल हँडसेट स्वत:कडे ठेवून तो दुरुस्त होऊ शकत नसल्याचे कथन करणारी नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 यांना पाठवलेली होती. ती नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 यांना मिळाल्याबाबत पोस्टाचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. त्या नोटीसचे उत्तर देऊन तक्रारकर्ता यांच्या कथनाचे खंडन करण्याची उचित संधी होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष त्यांचे झालेले दुर्लक्ष व मुळ पावती दाखल न केल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मोबाईल हँडसेट 15 दिवस स्वत:कडे ठेवला आणि त्यानंतर अतिरिक्त खर्च सांगून परत केल्याचे ग्राह्य धरावे लागते.
8. या ठिकाणी तक्रारकर्ता यांचा मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीमध्ये बंद पडल्यामध्ये उभयतांमध्ये दुमत नाही. विरुध्द पक्षातर्फे अभिलेखावर एक कोरे वॉरंटी कार्ड दाखल केलेले असून त्यातील कलम 6 चा आधार घेतलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांच्यातर्फे लातूर येथील मोबाईल लिंक अथोराईज्ड् सर्व्हीस सेंटरचा वादविषयक मोबाईलमधील दोषाबाबत खुलासा करणारा अहवाल दाखल केला आहे. त्यामध्ये हँडसेट Liquid Damage असल्यामुळे दुरुस्त करता येणार नाही आणि तो Non-repairable असल्याचे नमूद केलेले आहे. तो अहवाल हा दि.15/6/2016 रोजीच्या पत्राद्वारे देण्यात आलेला आहे.
9. आता वादविषयक मोबाईल हँडसेटमधील दोषाबाबत उपस्थित प्रश्नाचे अनुषंगाने ज्यावेळी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे हँडसेट दुरुस्तीसाठी दिला, त्यावेळी रु.350/- कशाबद्दल आकारणी केले गेले ? याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेले नाही. आमच्या मते ज्यावेळी विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रु.350/- दुरुस्ती खर्चाची आकारणी केली, त्यावेळी तो दोष दुरुस्त करण्यायोग्य होता, असे ग्राह्य धरावे लागते. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी मोबाईल हँडसेट पाण्यात पडल्याबाबत व तो इतरत्र दाखवल्याबाबत नोंद करुन स्वीकारला होता. जर तशी वस्तुस्थिती असती तरी तक्रारकर्ता यांना दिलेल्या पावतीवर Water Damage / Physical Damage / Out side repaired या तिन्हीपैकी एकाही बाबीवर विरुध्द पक्ष क्र.2 यांनी खुण का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे मोबाईल हँडसेट दुरुस्तीकरिता देत असताना तो Water Damage / Physical Damage / Out side repaired नव्हता, असेच एकमेव अनुमान निघते.
10. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे हँडसेटमध्ये उत्पादकीय दोष होता काय ? तक्रारकर्ता यांचा हँडसेट दि.1/10/2014 पासून बंद (मृत) अवस्थेत आहे. लातूर येथील मोबाईल लिंक अथोराईज्ड् सर्व्हीस सेंटरच्या अहवालाप्रमाणे हँडसेट Liquid Damage असल्यामुळे Non-repairable आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मोबाईल हँडसेट स्वीकारल्यानंतर 15 दिवस ठेवून परत केलेला असून त्यांचे कथनाप्रमाणे हँडसेटमधील दोषाचे निराकरण होणे शक्य होते. तसेच हँडसेट परत करताना दोषाचे निराकरण कोणत्या बाबीमुळे होऊ शकले नाही, याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी प्रस्तुत प्रकरणात वादविषयक हँडसेटमध्ये निर्माण झालेल्या दोषाबाबत तज्ञ अहवाल घेऊन त्यांचे दायित्व नाकारण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. उलटपक्षी तक्रारकर्ता यांनी जिल्हा मंचापुढे तज्ञ अहवाल दाखल केलेला आहे. आमच्या मते जर तक्रारकर्ता यांच्याकडून खरोखरच पाण्यामध्ये मोबाईल पडल्यामुळे Liquid Damage झाला असता तर त्यांनी तज्ञ अहवाल घेण्याचे निश्चितच टाळले असते. आमच्या मते विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मोबाईल हँडसेट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून Liquid Damage झाल्याचे एकमेव शक्यता स्वीकारार्ह आहे. या ठिकाणी असेही निदर्शनास येते की, अहवालाप्रमाणे हँडसेट Liquid Damage असल्यामुळे Non-repairable आहे. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या प्रतिवादाप्रमाणे हँडसेट पाण्यात पडल्यामुळे बंद पडलेला आहे. त्या अनुषंगाने दखल घेता अहवालाप्रमाणे Liquid Damage नमूद असले तरी तो Water Damage असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. ब-याचवेळा मोबाईल हँडसेटची दुरुस्ती करताना Liquid चाही वापर करण्यात येत असतो. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून हँडसेटमध्ये Liquid Damage झाल्याच्या अनुमानास बळकटी मिळते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा केंद्र या नात्याने देय सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना नवीन ‘मायक्रोमॅक्स ए-177’ हँडसेट द्यावा. प्रस्तुत आदेशाची पूर्तता करणे अशक्य असल्यास वैकल्पिकरित्या विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वादविषयक मोबाईल हँडसेटकरिता स्वीकारलेली किंमत रु.8,600/- दि.1/10/2014 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने परत करावी.
2. उपरोक्त आदेश क्र.1 ची अंमलबजावणी झाल्यानंतर तक्रारकर्ता यांनी तात्काळ विरुध्द पक्ष यांना वादविषयक मोबाईल हँडसेट परत करावा.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
4. उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/6916)