रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 72/2008. तक्रार दाखल दि.- 10/9/08 निकालपत्र दि. – 10/11/08.
श्री. महेंद्र सुकलाल भावसार, रा. प्लॉट 1, बल्लाळेश्वर हाऊसिंग सोसायटी, दत्तात्रेय पाटील नगर, विचंबे, पनवेल, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
1. प्रोप्रायटर, भिसे इन्फोइलेक्ट्रिक प्रा.लि., गोविंद गार्डन, हॉटेल गार्डन जवळ, पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड.
2. सिनिअर जनरल मॅनेजर, इंडस इलेक्ट्रन्स, डिव्हीजन ऑफ इलेक्ट्रॉयर्स (इंडिया) लि., 72, फलोडिया (व्हाया यलतज) अहमदाबाद, गुजरात – 382 115. ...... विरुध्दपक्ष क्र. 1 व 2. उपस्थिती – मा. श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य तक्रारदारांतर्फे – प्रतिनिधी प्रा.श्री.अविनाश ओक. विरुध्दपक्ष क्र. 1 स्वतः हजर. विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे – प्रतिनिधी - नि का ल प त्र -
द्वारा मा.सदस्य, श्री.कानिटकर. तक्रारदारांचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे पनवेल येथे रहाणारे असून त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादित केलेली व इलेक्ट्रीक वर चालणारी दुचाकी विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या पनवेल येथील शोरुम मधुन दिनांक 21/10/07 रोजी खरेदी केली होती. त्या दुचाकीची किंमत रु. 38,000/- होती. परंतु तक्रारदारांनी गाडी खरेदी केल्यावर लगेचच सदर दुचाकी बाबत फार अडचणी येऊ लागल्या. त्यात मुख्यतः गाडीचा कंट्रोल ब्रेक, हेडलाईट असेंबलीमध्ये समस्या, मागील शॉक अब्सॉर्बर अयोग्य होता, हेडलाईटचे स्विच योग्य त-हेने काम न करणे, याबाबत वारंवार अडचणी येऊ लागल्या. तक्रारदारांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करेपर्यंत त्यांना सुमारे 10 वेळा विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम मध्ये गाडी दुरुस्ती साठी न्यावी लागली. गाडी चालविताना आपोआप ब्रेक लागून गाडी अचानकपणे रस्त्यात बंद होऊ लागली. सदर दुचाकी ही पेट्रोल या इंधनावर न चालता इलेक्ट्रीक बॅटरीवर चालणारी होती त्यामुळे या गाडीचे सुटे भाग विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम खेरीज अन्यत्र कुठेही मिळत नव्हते. तसेच एका सुटया भागाला विरुध्दपक्षाकडून वेगवेगळी किंमत लावण्यात येत होती. शॉक अबसॉर्बर विरुध्दपक्ष क्र. 1 ने बदलून दिले तरीही त्याचा विशेष असा उपयोग झाला नाही. हेडलाईटचे स्वीच 2 वेळा दुरुस्त करुनही योग्य रीतीने चालत नाहीत. या दुचाचकीवरील काही डेकोरेटीव्ह पिसेस देखील निखळू लागले आहेत. त्यातील काही पिस हे धातूचे व काही पिस हे फायबरचे होते व त्यांची रंगसंगतीही विसंगत असल्याने त्यांची जोडणीही नीट होत नव्हती, ब्रेक ड्रमची पट्टी तर वारंवार तुटत होती. दि. 5/7/08 रोजी गाडीचा कंट्रोलर खराब झाला व वायरिंग शॉर्ट झाले. कंट्रोलर हा मुख्य सिस्टिमचा सर्वात महत्वाचा भाग आहे. दि. 6/7/08 रोजी साइड इंडिकेटर बंद पडला व फयूज बदलून दिला. त्यानंतर दि. 8/7/08 रोजी तोही फयूज उडाला व नवा फयूज टाकला तोही उडाला असे वारंवार होते. गाडी वॉरंटी पिरिएड मध्ये असल्यामुळे ज्या गोष्टी अटी व शर्तींमध्ये बसत होत्या त्या गोष्टी विरुध्दपक्ष वारंवार बदलून देत होते व ज्या गोष्टी बसत नव्हत्या त्याचे विरुध्दपक्षाने पैसे घेतले एकाच गोष्टीसाठी वेगवेगळी रक्कम वसूल करण्यात आली. 2. शेवटी 16/7/08 पासून वाहन नादुरुस्त झाल्यावर विरुध्दपक्ष क्र 1 च्या शोरुमवर ते तक्रारदारांनी नेऊन ठेवले आहे. आणि त्यांनी सरतेशेवटी, दुसरे दुचाकी वाहन खरेदी केले. आणि शेवटी मंचामध्ये तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी मंचास अशी विनंती केली आहे की, त्यांना विरुध्दपक्ष क्र. 2 कडून वाहनाची मूळ रक्कम खरेदी तारखेपासून 12 टक्के दराने परत करण्याचे आदेश व्हावेत व त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 30,000/- वि.प. यांचेकडून मिळावेत व न्यायिक खर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदारांनी नि. 1 अन्वये त्यांची तक्रार दाखल केली असून नि. 2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि. 3 अन्वये तक्रारदारांचे पत्नीचे नांवे कुलमुखत्यारपत्र दिले आहे. नि. 4 अन्वये प्रा.अविनाश ओक यांनी जनजागृती ग्राहक मंचातर्फे आपले अधिकारपत्र दाखल केले आहे. नि. 5 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात मुख्यतः वादग्रस्त वाहनाबाबत पाठविलेल्या पत्रांच्या प्रती, जॉबकार्ड यांचा समावेश आहे. नि. 6 अन्वये मंचाने वि.प यांना नोटीस पाठवली त्याची पोच नि. 7 व 8 अन्वये अभिलेखात उपलब्ध आहे. 4. नि. 12 अन्वये वि.प. 1 ने आपला लेखी जबाब दाखल केला आहे. वि.प. 1 हे वि.प. 2 चे अधिकृत प्रतिनि धी असून त्यांच्या शोरुम मधून या विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रीक वर चालणा-या दुचाकींचे वितरण केले जाते व विक्री नंतरची सेवा पण तेथेच दिली जाते. त्यांनी आपले लेखी जबाबात तक्रारदारांची तक्रार खोटी असून ती अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. तक्रारदारांना दुचाकी देण्यापूर्वी त्या वाहनाची तक्रारदारांनी पूर्ण तपासणी केली होती. सदर वाहनात कोणत्याही प्रकारची उत्पादनातील त्रुटी नव्हती. वेळोवेळी त्यांच्या तक्रारीचे निवारण व गाडीची दुरुस्ती योग्य त-हेने केली असून त्यांना देण्यात येणा-या सेवेत कुठल्याही प्रकारची त्रुटी ठेवली गेली नाही. त्यांनी तक्रारदारांनी गाडीचा वापर निष्काळजीपणे केला असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या जबाबात त्यांनी आतापर्यंत 450-500 अशा प्रकारची वाहने विकली असून त्यापैकी कोणाचीही वाहनाच्या बाबत तक्रार नाही. उलट, आतापर्यंत त्यांच्याकडे सर्व संतुष्ट ग्राहक असून त्यांच्या कडून दिल्या जाणा-या सेवेची ते स्तुती करतात. एकंदर त्यांच्या लेखी जबाबाप्रमाणे त्यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत काही त्रुटी नाहीत व त्यांनी विकलेल्या वाहनात कुठलाही उत्पादन दोष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 5. नि. 11 अन्वये वि.प. 2 ने त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. तक्रारदारांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. वितरकांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रांच्या प्रती तक्रारदारांनी प्राप्त केल्या असून ते त्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरुध्दपक्ष क्र. 2 ने केला आहे. उत्तम प्रकारची सेवा तक्रारदारांना देऊनही त्यांनी रु. 30,000/- एवढी प्रचंड रक्कम खर्चापोटी मागितली आहे. वस्तुतः ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत कुठल्याही त-हेची कमतरता आम्ही ठेवलेली नाही. त्यांचे अधिकृत डीलर म्हणजेच वि.प. 1 ने वि.प. 2 च्या वरिष्ठ अधिका-यांना लिहिलेल्या पत्रात एका दुस-या वाहनाच्या बाबत शंका प्रदर्शित केल्या आहेत त्याचे तक्रारदार भांडवल करुन त्यापासून लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरुध्दपक्ष क्र. 2ने त्याच्या जबाबात तक्रारदार यांनी दिलेल्या कुलअखत्यारपत्रा बाबत आक्षेप घेतला आहे. तक्रारदारांना त्यांचे वाहन दुरुस्त झाले असून ते घेऊन जाण्याविषयी 2 वेळा पत्र पाठवूनही त्यांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. तक्रारदारांचा केवळ पैसे उकळण्याचाच मानस यामागे दिसून येत आहे. तक्रारदारांची तक्रार पूर्णपणे ते फेटाळीत असल्याचे त्यात कथन केले आहे. वस्तुतः वाहनामध्ये काहीही मोठे किंवा निर्मितीदोष नाहीत. खरेतर तक्रारदारांनी वाहन अयोग्य त-हेने वापरले आहे. तक्रारदारांनी मागितलेली नुकसान भरपाई ही अवास्तव आहे. याबाबत तक्रारदारांनी 2003 (3) C.P.J. 78 National Commission व 1993 (2) C.P.J. 787 by the Hon’ble State Commission of Gujarat या निवाडयांचा आधार घेऊन तक्रारदारांची तक्रार फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. तक्रारदारांनी हेतूपुरस्सर केलेली ही खोटी तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी त्यांनी त्यांच्या लेखी जबाबात विनंती केली आहे. 6. दि. 10/11/08 रोजी तक्रारदार व त्यांचे प्रतिनिधी तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व विरुध्दपक्ष क्र. 2 चे प्रतिनिधी हजर होते. विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबावर तक्रारदारांनी आपला लेखी युक्तीवाद केला. उभयपक्षांचे युक्तीवाद ऐकण्यात आले. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, पुरावे यांचा विचार करुन मंचाने सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले. मुद्दा क्रमांक 1 - विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजूर करता येईल काय ? उत्तर - अंशतः होय. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 1 - मुद्दा क्रमांक 1 बाबत मंचाचे असे मत आहे की, सदर तक्रारीत जे वाहन खरेदी करण्यात आले होते ते विशिष्ट प्रकारचे आहे. सदर वाहन हे इलेक्ट्रीकवर चालणारे दुचाकी वाहन होते. गाडी विकत घेण्यापूर्वी आपण नवीन यंत्रणेचे वाहन विकत घेत आहोत याची जाणिव तक्रारदारांना होतीच तसेच त्यासाठी लागणारे सुटे भाग हे वितरकां व्यतिरिक्त कुठेही उपलब्ध होणार नव्हते. हे सुटे भाग वारंवार खराब होत होते याबाबत अभिलेखात जॉबकार्ड जोडलेले आहे व विरुध्दपक्षानेही हे कबूल केले आहे. विरुध्दपक्ष आपल्या लेखी जबाबामध्ये म्हणतात की, तक्रारदारांच्या तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या नसून किरकोळ स्वरुपाच्या आहेत. त्या वाहन वापरण्याच्या सदोष पदधतीमुळे उद्भवतात असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला असता त्यात विसंगती दिसून येते. गाडीची ब्रेक पट्टी तुटणे, हेडलाईट व स्विचमध्ये समस्या होणे, चालू गाडी मध्येच अचानक बंद पडणे अशा प्रकारच्या तक्रारी या वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गाडीच्या सिस्टिम मधील कंट्रोलर हा मुख्य भाग खराब झाल्याने गाडीचे वायरिंग शॉर्ट झाले. परंतु तो निर्मितीचा दोष आहे असे म्हणता येणार नाही तसेच तो दोष दुरुस्त करता येणारा आहे. या गोष्टींवरुन सकृतदर्शनी गाडीमध्ये दोष आहे असे म्हणता येत नाही असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 या दोघांनीही केलेल्या युक्तीवादा प्रमाणे असे दिसून येते की, तक्रारदारांची गाडी वापरण्याची पध्दत दोषपूर्ण आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांची दुचाकी संपूर्णपणे दुरुस्त करुन व त्याची तपासणी करुन तयार ठेवली असून त्यांनी 2 वेळा ती घेऊन जाण्याबाबत त्यांना पत्रेही पाठविली होती. विरुध्दपक्ष क्र. 2 हे त्यांच्या युक्तीवादात ठामपणे प्रतिपादन करतात की, सदर दुचाकीमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्मिती दोष नव्हता. ज्या वारंवार उद्भवणा-या तक्रारी आहेत त्या सदर दुचाकीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे उद्भवल्या आहेत. याबाबत त्यांनी 2003 (3) C.P.J. 78 (N.C.) या निवाडयाचा आधार घेतला आहे. या निवाडयाप्रमाणेच सदरच्या दुचाकी वाहना मध्ये पण निर्मिती दोष नसल्याच्या निर्णयाप्रत मंच आला आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना वारंवार विक्री नंतरची सेवा व्यवस्थितपणे पुरविल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. तसेच, विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे तक्रारदारांनीही मान्य केले आहे. तक्रारदारांनी दुसरी गाडी घेतली असल्याने त्यांना हया वादग्रस्त गाडीचे पैसे परत हवे आहेत असे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे हे म्हणणे मंचाला योग्य वाटत नाही. हा त्यांचा पश्चातबुद्धीचा निर्णय असावा असे दिसून येत आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या कथनाप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांची दुचाकी योग्य प्रकारे दुरुस्त करुन व त्याची चाचणी करुन रस्त्यावर चालण्यास योग्य परिस्थितीत ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांनी सदर दुचाकीचा ताबा त्यांचेकडे द्यावा असे मंचाचे मत आहे. याशिवाय विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर गाडीची वॉरंटीची मुदत तक्रारदारांनी सदर गाडीचा ताबा या निर्णयाप्रमाणे घेतल्यापासून एक वर्ष वाढवून द्यावी या निष्कर्षाप्रत मंच आला आहे. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 2 - एकंदरीत विचार करता रक्कम रु. 41,500/- ही रक्कम वाहन खरेदीच्या दिनांकापासून दर साल दर शेकडा 12 टक्के व्याजदराने मिळण्याची तक्रारदारांची मागणी मंचाला अवास्तव वाटते. याकामी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 14 (1) (e) प्रमाणे सदर वाहन योग्य त-हेने दुरुस्त करुन व दोषविरहित असे तक्रारदारांना घ्यावे असे मंचाचे मत आहे. तसेच सदर दुचाकीमध्ये निर्मिती दोष असल्याचे तक्रारदार सिद्ध करु शकले नाहीत. त्याचप्रमाणे वॉरंटीच्या अटी व शर्तींप्रमाणे त्या सुटया भागांचे पैसे विरुध्दपक्षाने घेतलेले नाहीत असे दिसून येते. वारंवार जात असलेल्या फयूजबद्दल योग्य त्या क्षमतेचे फयूज तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून बसवून देवून तक्रारदारांनी आपल्या वाहनाचा ताबा विरुध्दपक्ष क्र. 1 कडून वाहनाची तपासणी करुन घ्यावा. तरीसुध्दा तक्रारदारांना वारंवार आपल्या दुचाकी मध्ये येणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 च्या शोरुम मध्ये जावे लागले. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास निश्चितच झाला आहे त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रु. 2,000/- द्यावेत तसेच त्यांच्या तक्रारीची दखल विरुध्दपक्षाने घेतली नाही व म्हणून त्यांना मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी रु. 1,000/- न्यायिक खर्च द्यावा असे मंचाचे मत आहे. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, - अंतिम आदेश - विरुध्दपक्षाने खाली नमूद केलेल्या आदेशाचे पालन 45 दिवसांत करावे. 1. विरुध्दपक्षाने तक्रारदारांना तक्रारी मध्ये नमूद केलेल्या वाहनात असलेल्या सर्व दोषांचे संपूर्ण निराकरण करावे व तसे केले असल्याचे तक्रारदारांना लेखी कळवावे. तक्रारदारांनी संबंधित पत्र मिळाल्यावर समक्ष विरुध्दपक्ष क्र. 1 चे शोरुम मध्ये जाऊन वाहन योग्य रीतीने दुरुस्त झाले असल्याची खात्री करुन वाहन ताब्यात घ्यावे. 2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना वॉरंटीचा कालावधी त्यांनी वाहन ताब्यात घेतल्यापासून एक वर्षांच्या कालावधीसाठी वाढवावा. 3. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारदारांना मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 2,000/- (रु.दोन हजार मात्र) द्यावेत. 4. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी न्यायिक खर्चापोटी रक्कम रु. 1,000/-(रु. एक हजार मात्र) द्यावेत. उपरोक्त आदेशाचे पालन विहीत मुदतीत विरुध्दपक्ष क्र. 2 ने न केल्यास वरील कलम 3 मधील रक्कम दर साल दर शेकडा 5 % दराने व्याजासह वसूल करण्याचा अधिकार तक्रारदार यांना राहील. दिनांक – 10/11/2008. ठिकाण – रायगड – अलिबाग. (बी.एम.कानिटकर ) ( आर.डी.म्हेत्रस ) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |