जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –38/2011 तक्रार दाखल तारीख –10/02/2011
सागर पि. नंदलाल पांडे
वय 23 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.द्वारा,सानप निवास, च-हाटा फाटा,
नगर रोड,बीड ता. जि.बीड
विरुध्द
प्रोफेशनल कुरिअर
जोगदंड कॉम्प्लेक्स, सुभाष रोड .सामनेवाला
बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.व्ही.देशमुख
सामनेवाला तर्फे :- अँड.ए.पी.पळसोकर
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार नुझीवेड प्रा.लि. मध्ये मागील एक वर्षापासून नौकरीस आहेत.सदर व्यापारात बि-बियाणे खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे तक्रारदारांना बि-बियाणे विषयी माहीती आहे. तक्रारदाराचा मित्र पुणे येथे राहत असून तो सुध्दा सनराईज अँग्रो या नांवाने बियाणाचे दुकान चालवितो.
तक्रारदाराचा मित्र सुभाष राजपुत यांस ढोबळी मिरचीच्या बियाण्याची आवश्यक असल्याबददल त्यांने कळविले व तातडीने पाठविण्याची विनंती केली. त्यामुळे तक्रारदाराने 750 ग्रँम ढोबळी मिरचीचे बियाणे किंमत रु.26,250/- खरेदी केले. सदरचे बियाण्याचे पार्सल कूरिअरने बीड येथील सुभाष रोडवरील जोगदंड कॉम्प्लेक्स मध्ये प्रोफेशनल कूरिअर यांचेकडे पाठविण्यात बाबत चौकशी केली.पार्सल पूणे येथे पाठविण्याची त्यांनी तयारी दर्शवली व पार्सल दोन दिवसात मिळेल यांची हमी दिली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.01.02.2010 रोजी कूरिअर पार्सल पोहचते करण्यासंबंधी रक्कम रु.50/- दिली. त्यांची पावती घेतली. पार्सल सामनेवालाकडे दिले.
तिन दिवसाचंहे कालावधीनंतर बियाण्याचे पार्सल न मिळाल्याकारणाने त्याचे मित्राने त्याबददल फोनवरती चौकशी केली असता तक्रारदारांना आश्यर्च वाटले. तक्रारदारांनी सामनेवालाकडे लगेच चौकशी केली असता माहीती घेऊन कळवतो असे त्यांनी सांगितले.
सात-आठ दिवसाचे कालावधीनंतर सामनेवाला यांचेशी संपर्क केला असता कोणतेही समाधानकारक कारणे समजले नाही. त्यानंतर दि.20.09.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून पार्सलविषयी सत्य परिस्थिती व माहीती देण्याविषयी सुचित केले. दि.07.10.2010 रोजी सामनेवाला यांनी पार्सल हरवल्या संदर्भात पोलिस स्टेशन पूणे येथे तक्रार दाखल केली. सामनेवाला यांनी अत्यंत निष्काळजीपणाने तक्रारदारांना सेवा देण्याचे संदर्भात कसूर केलेला आहे.त्यामुळे तक्रारदार खालील प्रमाणे नूकसान भरपाईची मागणी करीत आहे.
1. बियांची किंमत रु.26,500/-
2. बियांचे नुकसानीपोटी रु.65,000/-
3. मानसिक त्रासापोटी रु.5,000/-
4. तक्रारीचे खर्चापोटी रु.3500/-
---------------------
एकूण रु.1,00,000/-
----------------------
विनंती की, तक्रारदारांना सामनेवालाकडून रक्कम रु.1,00,000/- 12 टक्के व्याजासह तक्रार दाखल दिनांकापासून देण्यात यावे.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.07.05.2011 रोजी नि.11 वर दाखल केलेला आहे.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. दि.01.09.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला कडे नामात्र फि रु.50/- जमा करुन पूणे येथे टपाल पाठविले आहे हददीपर्यत बरोबर आहे. टपालाचे वजन 20 ग्रँम चे आंत होते. तक्रारीतील तक्रारदाराचे कथन कूरिअर मार्फत बियाणे पाठविले परंतु सदरचे बियाणे किती दिनांकाला कोणाकडून खरेदी केले या बाबतचा उल्लेख नाही. तसेच अंदाजे 750 ग्रँम वजनाचे बियाणे टपालात असल्याची सूचना येथे सामनेवालास तक्रारदारांनी टपालपाठविण्याचे वेळी केली नाही. या बाबत नोंद ही नाही.
सामनेवाला कूरिअर नांमाकित कंपनी असून दरदिवशी हजारो टपाले कंपनी मार्फत विविध ठिकाणी पाठविले जातात व स्विकारली जातात. या सर्व दैनदिंन कामकाजातून एखादे टपाल अचूक पत्त्याचे अभावी चूकीचे पत्यावर जाणेची अथवा गहाळ होणेची शक्यताही नाकारता येत नाही. या दरम्यान पाठविण्यात आलेले दैनदिन सर्व टपाले संबंधीतास प्राप्त झाली का नाही यांची खात्री करण्यात येते. तक्रारदाराचे टपाल या सामनेवाला यांचे वतीने पूणे येथे पाठविले. सदरचे टपाल अथवा अन्य इतर टपाल संबंधीतास वाटप झाले का नाही यांची चौकशी संबंधीत कार्यालयाचे शाखेमध्ये नोंद ठेवण्यात येते. एखादे टपाल संबंधीतास नजरचूकीने वाटप न झाले त्या बाबतची त्या दिवसांतील एकूण सर्व टपाले किती प्राप्त झाली.टपालातील पावतीतील क्रमांक तो कोणत्या गांवी कोणत्या कुरिअर कंपनीचे शाखेकडे वाटपासाठी पाठविले होते. टपाल वाटप न होण्याचे कारण, या सर्व बाबीची शहानिशा होणेस थोडासा अवधी लागतो. शहानिशा झालेनंतरचे फिर्याद अथवा योग्य ती कार्यवाही करण्यात येते. तपासाचे वेळी अथवा त्यानंतरही सदरचे टपालाचा शोध लागलेस तात्काळ टपाल संबंधीतास देणेत येते. म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती चौकशीची कारवाई चालू असल्याबददलची माहीती तकारदारांना देण्यात आली. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कोणताही हेतूपूरस्कर निष्काळजीपणा केलेला नव्हता. सेवा न पूरविण्याचा सामनेवाला यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता म्हणे. वेळोवेळी परिस्थितीनूरुप योग्य उत्कृष्ट सेवा देत आहेत. कूरिअर पाठविताना पार्सलमध्ये बियाणे बाबत योग्य ती सूचना देण्याची जबाबदारी पूर्णत तक्रारदाराची असल्याने तक्रारदार कोणतीही नूकसान भरपाई मागण्यास हक्कदार व अधिकार नाही. किंवा करारा आधारे सदरची नूकसान भरपाईची रक्कम जास्तीत जास्त रु.100/- असल्याने सदरची नूकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
विनंती की, तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.जी.बी.कूलकर्णी व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.पळसोकर यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी त्याचे मित्राला पूणे येथे मिरची बियाण्याचे पाकीट पाठविल्याचे तक्रारदाराचे विधान आहे. या संदर्भात तक्रारीत मिरचीबियाणे विकत घेतल्या बददलची पावती दाखल केलेली नाही.
तक्रारदारांनी पार्सल पाठविण्यासाठी रु.50/- सामनेवाला यांना दिलेले आहेत व त्या बबात सामनेवाला यांनी तक्रारदारांना पावती नंबर 140635 ची दि.01.09.2010 ची दिलेली आहे. त्यावरुन तक्रारदारांनी पार्सल पाठविण्यासाठी दिली होती ही बाब स्पष्ट होते. परंतु सदरचे पार्सल हे मिरचीचे बियाण्याचे पाकीट असल्याची बाब स्पष्ट होत नाही.
सदरचे पार्सल तक्रारदारांच्या मित्राला मिळाले नसल्याने त्या बाबत त्याचेकडून माहीती मिळाल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी चालू असल्याचे सांगितले. दि.20.09.2010 रोजी तक्रारदारांनी त्या संदर्भात जो अर्ज दिला. तक्रारदारांनी ऑकरन्स रिपोर्ट समर्थ पोलिस स्टेशन पूणे पोलिसाचे चौकीचा दाखल केलेला आहे. त्यात तक्रारदाराच्या वरील पावतीचा उल्लेख आहे. सदरचे टपाल गहाळ झाल्याचा सदरचा रिपोर्ट आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी त्यांचे मित्राचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे त्या मित्राला सदर बियाण्याच्या पार्सलची किती आवश्यकता होती यांचा बोध होत नाही. तसेच वरील कागदपत्रे पाहता सामनेवाला यांचे पूणे शाखेचे माणसाने टपाल गहाळ झाल्याबददल पोलिस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या मित्राला वरील पार्सल मिळाले नसल्याची बाब स्पष्ट होते. सदरचे पार्सल हे प्रवासातच वितरणाचे वेळी गहाळ झाल्याचे दिसते. वरील सर्व परिस्थितीवरुन सामनेवाला यांनी बिड येथून पार्सल पाठविल्यानंतर पूणे येथे पार्सल गहाळ झाल्याने सामनेवाला यांचे पूण्याचे शाखेला तक्रारदारांनी पार्टी केलेले नाही. तथापि पूणे शाखेची देखील गहाळ झालेल्या टपालाचे बाबत लगेचच पोलिस फीर्याद केलेली आहे. या वस्तूस्थितीवरुन सर्वसाधारण विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांनी ज्या उददेशाने पार्सल पाठवले तक्रारदाराचा तो उददेश सफल झाला नाही. तसेच पार्सल न पोहचल्याने ते गहाळ झाल्याने सामनेवालेनी कराराप्रमाणे सेवा दिलेली नाही. म्हणून सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते.
या संदर्भात तक्रारदाराची मागणी बाबत बियाण्याची किमत रु.26,500/- या बाबत तक्रारदाराचा कोणताही पूरावा नाही. बियाण्याचे नूकसानीपोटी रु.65,000/- या बाबतही कोणताही पूरावा नाही. मानसिक त्रास रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3500/- या मागणी बाबत विचार करता तक्रारदारांनी पार्सल पाठविले ते गहाळ झाले. पार्सल कशाचे होते ही बाबच स्पष्ट झालेली नाही. व तसेच या संदर्भात पार्सल तक्रारदारांना मिळणार नव्हते ते ज्या व्यक्तीला पाठविल्याचे होते त्या व्यक्तीला मिळाणार होते पंरतु ते त्यांना मिळाले नाही. त्यांना काय त्रास झाला या संदर्भात बाबत तक्रारदारांना मानसिक त्रास झाला हे विधान तितकेसे पटणारे नाही. स्वाभाविकपणे कूरिअर पार्सल न मिळाल्याने तक्रारदारांना त्या बाबत चौकशी केली व या संदर्भात तक्रारदारांना जो काही त्रास झाला त्या बाबत रक्कम रु.200/- व तसेच पार्सलचे संदर्भात कराराप्रमाणे रु.100/- व तसेच तक्रारीचा खर्च रु.200/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्याचे म्हणण्याचे समर्थनार्थ खालील न्यायनिवाडा दाखल केलेला आहे.
मा.राष्ट्रीय आयोब मूळ अर्ज क्र.66/92 मे. टाटा केमिकल्स लि. विरुध्द स्कायपाक कूरिअर प्रा.लि.
वरील न्यायनिवाडयाचे सखोल वाचन केले असता तो सामनेवाला यांचे समर्थनार्थ लागू होतो असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना पार्सल गहाळ
झाल्याची नूकसानीची रक्कम रु.100/-(अक्षरी रु.शंभर फक्त)
आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम
रु.200/-(अक्षरी रु.दोनशे फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रककम
रु.200/-(अक्षरी रु.दोनशे फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड