(घोषित दि. 15.11.2014 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार हे मौजे अंतरवाला ता.घनसावंगी जि.जालना येथील रहिवासी असून, त्यांची मौजे अंतरवाला गट नंबर 37 मध्ये 2 एकर शेत जमीन आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले सफल सिड्स या कंपनीचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 21.06.2013 रोजी दोन किलो कांद्याचे बियाणे रुपये 400/- मध्ये खरेदी केले. त्याचा पावती क्रमांक 23038 व बॅच क्रमांक 4842 असा आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास बियाणाच्या गुणवत्ते बद्दल व उत्पादना बद्दल तोंडी हमी दिली. अर्जदार यांनी सदर बियाणे आपल्या गट नंबर 37 मध्ये 20 गुंठे एवढया क्षेत्रात सदर बियाणाची लागवड करुन योग्य देखभाल व मशागत केली. परंतू ठरवून दिलेल्या कालावधीत कांद्याची वाढ झाली नाही व कांद्यास ढेंगळे आले आणि त्यास फुलवरा आला. त्यामुळे अर्जदार यास अपेक्षीत उत्पादन झाले नाही. त्यामुळे अर्जदार यांचे नुकसान झाले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सदर घटनेची माहिती दिली. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. म्हणून अर्जदार यांनी कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांचेकडे दिनांक 21.12.2013 व 22.01.2014 रोजी अर्ज दिला. सदर अर्जाची दखल घेऊन कृषी अधिकारी परतूर, अध्यक्ष तालुका बिज निवारण समिती, तालुका कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, म.कृ.वि.बदनापूर, कृषी अधिकारी पंचायत समिती घनसावंगी, मंडळ कृषी अधिकारी घनसावंगी, कृषी पर्यवेक्षक घनसावंगी यांनी सदर कांदा लागवड केलेल्या क्षेत्राची पाहणी करुन पंचनामा केला. त्यामध्ये 50 टक्के कांदा खाण्यायोग्य नसल्याचा व सदोष बियाणामुळे उत्पादनात घट आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे अर्जदार यांचे रुपये 60,000/- चे नुकसान झालेले आहे. अर्जदार यांनी वकीलामार्फत दिनांक 03.03.2014 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू गैरअर्जदार 1 व 2 यांनी नोटीसचे उत्तर किंवा नुकसान भरपाई दिलेली नाही.
अर्जदार यांनी नुकसान भरपाई म्हणून रुपये 60,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- अशी मागणी केलेली आहे.
अर्जदार यांनी तक्रारी सोबत बियाणे खरेदी पावती, कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज, बिज निरीक्षण अहवाल, गैरअर्जदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, आर.पी.ए.डी च्या पावत्या अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
अर्जदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी प्रकरणामध्ये नि.11 वर त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांनी अर्जदार यांचे बहुतांश म्हणणे मान्य केले. तसेच सदर कांदा पिकाचा पंचनामा करतेवेळी त्यांना बोलाविण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. तसेच तलाठी व इतर साक्षीदारांचा पंचनामा हा अर्जदाराच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याच प्रमाणे सदरचे कांदा बियाणे हे सदोष आहे किंवा नाही ही बाब तांत्रिक असल्याने ते ठरविण्याचा अधिकार योग्य त्या प्रयोग शाळेला आहे परंतू सदर प्रकरणात कांदा बियाणे हे प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आलेले नाही तसेच सदर कांदा बियाणे सदोष आहे किंवा हे तपासण्यासाठी कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही, असे म्हटले आहे.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिຌलेली
आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी - अर्जदार हे मौजे अंतरवाला ता.घनसावंगी जि.जालना येथील रहिवासी असून, त्यांची मौजे अंतरवाला गट नंबर 37 मध्ये 2 एकर शेत जमीन आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले सफल सिड्स या कंपनीचे नाशीक ओनियन रेड हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 21.06.2013 रोजी दोन किलो कांद्याचे बियाणे रुपये 400/- मध्ये खरेदी केले. त्याचा पावती क्रमांक 23038 (शितल हायब्रीड सिड्स जालना) व बॅच क्रमांक 4842 असा आहे. ही बाब त्यांनी दाखल केलेल्या नि.4/1 वरील पावतीवरुन दिसुन येते. त्याच प्रमाणे अर्जदार यांनी सदर कांदा बियाणांची तक्रार संबंधित विविध अधिका-यांकडे केली. तसेच कांद्याला ढेंगळे आले त्याचा फुलवरा आला परंतू कांद्याची वाढ झाली नाही व अपेक्षीत उत्पन्न आले नाही अशा स्वरुपाची तक्रार केली. त्यानंतर अर्जदाराच्या दिनांक 24.12.2013 रोजीच्या तक्रारीवरुन बिज निरीक्षक तथा उप विभागीय कृषी अधिकारी, परतूर जि. जालना यांनी अर्जदाराच्या कांदा पेरणी केल्याच्या शेताचा सर्व्हे दिनांक 23.01.2014 रोजी केला.
उप विभागीय कृषी अधिकारी, परतूर जि. जालना यांनी त्यांचा निरीक्षण अहवाल नि.4/4 वर सादर केला. त्यांचे निरीक्षण अहवालातील मुद्दा क्रमांक 1 वरुन ज्यावेळी अर्जदाराच्या उपरोक्त शेतात सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी कांद्याचे पिक उभे नसल्याचे दिसुन येते. वास्तविक पाहता सदरचा सर्वे करिता असतांना तो योग्य होण्याकरिता अर्जदाराच्या शेतात कांदा बियाणाचे पिक उभे असणे आवश्यक होते. परंतू सदर सर्व्हे पिक काढल्यानंतर करण्यात आल्याने सदर सर्व्हे वास्तविकतेवर अधारीत नाही. त्याच प्रमाणे सदर कांद्याचे बियाणे सदोष असल्या बाबत प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाल्या शिवाय निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. सदर प्रकरणात कांदा बियाणे प्रयोग शाळेमध्ये पाठवून त्याचा अहवाल मागविणे आवश्यक होते. परंतू त्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसुन येत नाही. तसेच ज्यावेळी सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी अर्जदाराने त्याचे शेतातील कांदा बियाणाचे पिक काढून घेतले होते. त्यामुळे उप विभागीय कृषी अधिकारी, परतूर जि. जालना यांचा अहवाल सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरता येऊ शकत नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन विद्यमान मंच अर्जदाराची तक्रार नामंजूर करीत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.