जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –125/2010 तक्रार दाखल तारीख –02/08/2010
भागवत पि. विश्वनाथ भोसकर
वय 31 वर्षे धंदा शेती व मजुरी .तक्रारदार
रा.लिंबारुई ता. जि.बीड
विरुध्द
1. प्रो.प्रा.व्यकंटेश मशिनरी स्टोअर्स .सामनेवाला
हिरालाल चौक, बीड ता.जि. बीड
2. सोनालिका अँग्रो इंडस्ट्रीज कार्पोरेशन
जांलधर रोड, होशियारपुर पंजाब
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.एम.कुलकर्णी
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.आर.बी.बहीर
सामनेवाले क्र.2 तर्फे ः-अँड.बी.एस.जाजु.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार शेतकरी व मजूरी करुन आपला व कूटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात.तक्रारदाराचे एकत्रित कूटूंब असून शेती द्वारे मिळणारे उत्पन्नातून कूटूंबाचा खर्च भागत नसल्यामुळे शेती सोबत पुरक व्यवसाय करण्यासाठी तक्रारदारांनी दि.18.10.2009 रोजी सामनेवालाकडून सोनालिका या कंपनीचे 7.5 अश्वशक्तीचे मळणी यंत्र रक्क्म रुृ31,800/- रोख देऊन खरेदी केले.
तक्रारदारांनी सदर मळणी यंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता यंत्र योग्य रितीने कार्य करीत नसल्याचे तक्रारदारांना आढळून आले. मळणी यंत्रातून बाहेर पडणा-या धान्यामध्ये मोठयाप्रमाणावर कचरा येत असून धान्याची फुट देखील मोठयाप्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे सदर मळणी यंत्राचा पंखा हवा ओढण्याचे काम करीत नाही व त्यामुळेच धान्यामध्ये घाणयेत असून धान्य स्वच्छ स्वरुपात बाहेर येत नाही. मळणी यंत्रामधून बाजरीचे पिक काढत असतांना बाजरी पुढे कच-यामध्ये जात आहे. त्यामुळे शेतक-याचे नुकसान होते. त्याचप्रमाणे गव्हू काढत असतांना त्यामध्ये काडया, कचरा जास्त येतो व त्यामध्ये बारीक भुसकट येते. त्यामुळे शेतक-याचे नुकसान होत आहे व पर्यायाने शेतकरी तक्रारदाराचे मळणीयंत्र वापरण्यास टाळाटाळ करीत आहेत व त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान होत आहे.
तक्रारदारांनी सामनेवालाकडे वारंवार यंत्राचे वरील दोषा बाबत तक्रार केली असता कंपनीचे इंजिनिअर उपलब्ध झाल्यानंतर यंत्र दूरुस्त करण्याची हमी सामनेवाला यांनी दिली. मात्र अद्यापही एकदाही कंपनीचे इंजिनिअर अथवा तंत्रज्ञ यांना मळणी यंत्रातील दोष दुर करण्याचा प्रयत्न केला नाही. यंत्र बंद अवस्थेत आहे. वेगवेगळे कारण सांगून यंत्र बदलून देण्यास टाळटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराचे मोठयाप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून भविष्यात सदर यंत्रामुळे अंदाजे प्रतिमहिना रु.5,000/- ते रु.6,000/- रोजगार बूडाला त्यामुळे प्रंचड मानसिक आर्थिक शारीरिक त्रास झाला.
दि.23.06.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी उत्तरे दिली. मागणी नाकारली. सामनेवाला यांनी जाणूनबूजून केलेल्या फसवणूकीमूळे तक्रारदाराचे रक्कम रु.31,500/- यंत्रापासून मिळणारे उत्पन्न रु.5,000/- प्रतिमहिना याप्रमाणे सहा महिन्याचे रु.30,000/- चे आर्थिक नूकसान झाले. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहेत.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे यंत्राची किंमत रु.31,500/- परत देण्याबाबत आदेश व्हावेत, नूकसान रक्कम रु.30,000/- मानसिक त्रासाची व तक्रार खर्चाची रक्कम रु.15,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत, रक्कम वसूल होईपर्यत 18 टकके व्याज देण्या बाबतचे आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा नि.9 वर दि.02.11.2010 रोजी दाखल कले. खुलाशात तक्रारतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. मळणी यंत्रामध्ये वेगवेगळे धान्य काढण्यासाठी वेगवेगळी सेटींग असते त्याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास यंत्र खरेदी वेळी माहीती दिली. बाजरी किंवा गहू यंत्रातून काढताना मालाची तूट होणे, कचरा येणे या दोषास सामनेवाले जबाबदार नाहीत. यंत्र कसे चालवावे यांचे ज्ञान किंवा तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे सदर त्रूटी यंत्रात तक्रारदारास दिसत असाव्यात. यंत्र उच्च दर्जाचे कंपनीने उत्पादीत केलेले असून त्यात दोष असूच शकत नाही.
यंत्रा बाबत कोणतीही हमी, गॅरंटी वॉरंटी दिलेली नाही. त्यामुळे यंत्र दूरुस्त करुन देण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली आहे.
दि.18.10.2009 रोजी सामनेवाला कडे आले त्यांनी तक्रारदारास सांगितले की, व्यावसायीक दृष्टीकोनातून सोनालिका कंपनीचे मळणी यंत्र खरेदी करावयाचे आहे. त्यावेळी त्यांनी सामनेवाला यांना सांगितले की, त्यांचे मित्राकडे सूध्दा यांच कंपनीचे मळणी यंत्र असून त्यांस यंत्रा बाबत पूर्ण माहीती आहे. त्यावरुन त्यांने योग्य ती किंमत देऊन सदर मशीन सामनेवालाकडून विकत घेतलेली आहे.
एकदाही कंपनीचे इंजिनिअर अथवा तंत्रज्ञ यांनी यंत्राचा दोष दूरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला नाही. यंत्र केव्हाही बंद नव्हते व आजही बंद नाही. यंत्रात कोणताही दोष नाही. यंत्र तक्रारदाराने खरेदी करतेवेळी कंपनीचे मेकॅनिक दूकानातील अनूभवी माणसाने स्पॉटवर जाऊन ते चालू करुन दिले. वापरण्या संबंधी संपूर्ण माहीती दिली. माहीती मशीनवर देखील चिटकवलेली आहे. माहीतीप्रमाणे वापर करण्याची जबाबदारी तक्रारदार मालकावर आहे.
सोनालिका मशीनमध्ये प्रत्येक मालाच्या धान्याच्या प्रतिवारीनुसार प्रकारानुसार झुल्याची सेंटीग मोठया ड्रममधील चाळणीमधील बदल खालच्या चाळणी मधील बदल मशीनमध्ये असलेल्या हवेच्या प्रेशरमधील बदल, खालच्या पंख्यावर असलेल्या पंख्याची सेंटीग या सर्व तांत्रिक बाबीचा पूर्तता मशीन व्यवस्थीत चालण्यासाठी करावी लागते.सदर कंपनीचे प्रत्येक वेळी या मॉडेलची हजारो मळणी यंत्र उत्पादीत होतात. पूर्ण भारतभर त्यांची विक्री होते. मशीनमध्ये दोष असता तर असा उठाव राहिला नसता.
विनंती की, तक्रार खर्चासह रदद करुन सामनेवाला यांना खर्चाबददल रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.12.08.2011 रोजी दाखल केला. सदरचा खुलासा हा सामनेवाला क्र.1 च्या खुलासा सारखा आहे. तक्रारतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. श्री.परमजितसिंग हा सामनेवाला क्र.2 चा टेक्नीशियन यांनी तक्रारदाराच्या यंत्राची पाहणी केली. त्यावेळी आढळूल आले की, तक्रारदारांनी ड्रम जाळी व्यवस्थीत बसवली नव्हती. तक्रारदार त्यांस दोष समजत होते. वास्तविक सदर यंत्रात कोणताही उत्पादित दोष नाही. त्यावेळी ड्रम जाळी व्यवस्थीत बसवल्यानंतर तक्रारदाराचे समाधान झाले. सामनेवाला क्र.1 चे कर्मचारी आणि मेकॅनिक यांनी जागेवर जाऊन यंत्राची पाहणी केली. तक्रारदारांना यंत्र देण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
विनंती की, तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र,सामनेवाला क्र.1 चा खुलासा,सामनेवाला क्र.2 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.एन.एम.कूलकर्णी सामनेवाला क्र.1 चे विद्वान वकील श्री.बहीर, सामनेवला क्र.2 चे प्रतिनिधी व वकील श्री.जाजू यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून दि.18.10.2009 रोजी सोनालिका मळणी यंत्र 7.5 अश्वशक्ती रक्कम रु.31,500/- विकत घेतले आहे व त्या बाबत सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना पावती दिलेली आहे. सदरची बाब सामनेवाला क्र.1 व2 यांना मान्य आहे.
मशीन खरेदी केल्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी त्याचे टेक्नीशियन जागेवर जाऊन मशीन कसे चालते या बाबत संपूर्ण माहीती तक्रारदारांना दिल्याचे सामनेवाला यांनी म्हटले आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.1 व 2 चे खुलाशात यांचा आशय आहे. मशीनमध्ये दोष नसून वेगवेगळे पिकाची मळणी करीत असताना त्यावर वेगवेगळे यंत्रात सेंटीग करावी लागतात व त्यांचा ड्रम व जाळया बदलाव्या लागतात. व तसेच हवेचे प्रेशर कमी जास्त करावे लागते ते व्यवस्थीत न झाल्यास तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काडया कचरा येणे, धान्याची फूट होणे इत्यादी बाबी होऊ शकतात. परंतु यासर्व बाबी मशीन चालविणा-या व्यक्तीवर अवंलबून आहेत. यांला उत्पादीत दोष म्हणता येणार नाही.
या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाला कडे तक्रार दाखल केल्यानंतर सामनेवाला क्र.1 च्या खुलाशात जरी त्यांनी वॉरेटी व गँरटी दिली नसल्यामुळे सेवा देण्याचा प्रश्न येत नाही असे म्हटले असले तरी सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे खुलाशात नमूद केले की त्यांचे टेक्निशियन श्री.परमजितसिंग हा तक्रारदाराचा यंत्राच्या जागेवर जाऊन पाहणी करुन आला. त्यांला सदर यंत्राची वरील सेंटीग योग्य नसल्याचे आढळले व त्यांने सदरची सेंटीग कशी करावी लागते या बाबत तक्रारदारांना माहीती दिली. अशा त-हेने सामनेवाला क्र.1 व 2 यांचे खुलाशात विसंगती आहे. तसेच सामनेवाला क्र.1 चे कर्मचारी व टेक्निशियन तक्रारदाराकडे जाऊन त्यांनी मशीनची पाहणी केल्याचे सामनेवाला क्र.2 च्या खुलाशात नमूद आहे व सामनेवाला क्र.1 चे खुलाशात वरीलप्रमाणे आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी खरी परिस्थिती उघड केल्याचे दिसत नाही. उत्पादक कंपनी ज्यावेळी वरीलप्रमाणे विधान करते त्यावेळी निश्चितच त्या संदर्भात वॉरंटी कंपनीने दिलेली आहे. या बाबत शंका उपस्थित होण्याचे कोणतेही कारण नाही. वॉरंटी कालावधी तक्रारदाराच्या तथाकथित दोषा संदर्भातले समाधान करण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 व 2 यांची आहे. सामनेवाले क्र.1 चे वकीलांनी दोष दूरुस्त करुन देण्या बाबत जिल्हा मंचा समोर हमी दिली आहे.
सद्यपरिस्थितीत सामनेवाला यांचे खुलासा विचारात घेता तक्रारदारांना तक्रार दाखल केल्यानंतर तथाकथित दोष दूरुस्त करुन देण्या संदर्भात सामनेवाला यांनी सेवा दिलेली आहे. त्यामुळे सेवेत कसूर असल्याची बाब स्पष्ट होत नाही. परंतु सदरचा तक्राराच्या मशीनमधील दोष सामनेवाला क्र.1 यांनी दूर करुन देण्यास तयार असल्याचे युक्तीवादात सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1.
2. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीत नमूद मशीनमधील दोष आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत दूर करुन दयावेत.
2.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड