जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 12/2011 तक्रार दाखल तारीख- 15/01/2011
अर्जुन पि. बापुराव हाडूळे,
वय – 50 वर्ष, धंदा – शेती
रा.वांगी,ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. प्रो.प्रा. उत्तम अँग्रो एजन्सीज,
जुना मोंढा रोड, बीड
2. बायर क्रॉप साईन्स लि.,
बायर हाऊस सेंट्रल अँव्हेन्यू,
हिरानंदानी गार्डन्स, पवई मुंबई -76 ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – एन.एम.कुलकर्णी,
सामनेवाले1तर्फे – वकील – ए.पी.पळसोकर,
सामनेवाले2तर्फे – वकील – गणेश शिंदे,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा मौजे वांगी ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन त्यांचे एकत्रीत कुटूंबाची शेतजमीन गट नं.33 मध्ये 0.15 हेक्टर आहे. सामनेवाले नं.1 हे बीड येथे शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, रासायनीक खते, औषधे विक्रीचा व्यवसाय करतात. सामनेवाले नं.2 हे बायर रसायन किटक नाशके व विषारी औषध निर्माते आहेत.
तक्रारदाराने वरील शेतजमीन गट नं.33 मध्ये 0.15 हेक्टर क्षेत्रावर जुलै,2010 मध्ये पहिल्या आठवडयात कांदा पिक वाण-पंचगंगा सुपर ची लागवड केली. कांदा पिकाची लागवड करत असताना 23:23:00 खताची योग्य मात्रा दिली. त्यांनतर कांदयाचे पिकात अंतर मशागतीची कामे करुन डी.ए.पी (50 किलो) एक बॅग मात्रा देण्यात आली. पिकावर कांही प्रमाणात किड रोगाचा प्रार्दूभाव दिसून आला. दि.1.10.2010 रोजी सदरील पिकापैकी कांही कांदे उपटून सामनेवाले नं.1 यांना नेवून दाखविले व योग्य ती औषधी देण्याची विनंती केली.
सामनेवाले नं.1 यांनी सामनेवाले नं.2 यांनी उत्पादीत केलेले औषध एन्ट्राकॉलन प्रॉबीनेब 70WP (250 ग्रॅम) बॅच नं.852 निमार्ण तिथी 30.7.2010 व डेसीस डेल्टा मेथीन ही औषधे पावती क्रं.3130 नुसार दिली. सदरील औषधी सामनेवाले नं.1 यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे व पध्दती प्रमाणे कांदयाच्या पिकावर फवारणी केली असता, दुस-या दिवशी कांदयाचा सर्व प्लॉट संपूर्णपणे जळून चालल्याचे निदर्शनास आले. तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांचेकडे विचारणा केली असता कोणतेही सहकार्य केले नाही.
तक्रारदाराने पंचायत समिती कृषि विभागात रितसर तक्रार दिली. सदरील तक्रारीचे अनुषंगाने दि.20.10.2010 रोजी मोहिम अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांचे नियंत्रणाखालील तज्ञ समितीने कांदा पिकाचे झालेल्या नुकसानी बाबतचा पाहणी करुन अहवाल दिला.
सामनेवाले नं.2 यांनी उत्पादीत घातक औषध सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास विक्री केल्यामुळे तक्रारदाराचे कांदयाच्या पिकापासुन झालेली नुकसान भरपाई रक्कम रु.1,75,000/-, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकुण रक्कम रु.2,05,000/- सामनेवाले नं. 1 व 2 यांचेकडून मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.03.05.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराने त्यांचेकडून औषध खरेदी केले हे त्यांना मान्य आहे. परंतु आम्ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) नुसार कोणतीही सेवा देण्यास कसूर केला नाही व सदर तक्रारीत संक्षीप्तरित्या चालविता येणार नाही कारण प्रकरण किचकट असल्यामुळे साक्षीदाराची उलट तपासणी घेणे आवश्यक असुन ते या न्यायमंचास अधिकार नसल्यामुळे सदर प्रकरण चालविता येणार नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पूष्ठयार्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्हणणे दि.03.05.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांचेकडून औषधी खरेदी केल्याचे मान्य आहे. परंतु सदर प्रकरण्ं किचकट असल्यामुळे साक्षीदाराची उलट तपासणी घेणे जरुरी आहे त्यामुळे संक्षीप्तरीत्या सदर प्रकरण चालविणे शक्य नाही व सदर औषधी प्रयोगशाळेचा अहवाल औषधामध्ये दोष आहे ही बाब सिध्द करणारे तक्रारदाराने आणलेला नसल्यामुळे आम्ही उत्पादीत केलेले औषधात कोणताही दोष नाही, त्यामुळे तक्रारदारास द्यावयाचे सेवेत अथवा अनुचित व्यापारी प्रथेत कोणताही प्रकार केलेला नसल्यामुळे व आमचे प्रतिनिधी श्री भोपळे यांनी हजेरी दाखवून पंचनाम्यावर सही केली आहे. म्हणून पंचनामा आम्हास मान्य आहे असे होत नाही, म्हणून तक्रारदाराची सदरची तक्रार खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्ठयार्थ एकुण 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले नं.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सामनेवाले नं.2 यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
तक्रारदारानी दाखल केलेला जिल्हा कृषि अधिकारी समितीचा अहवाल याचे आवलोकन केले असता तक्रारदाराची तक्रार ही तथ्य असल्याचे म्हंटले आहे. तक्रारदाराने 15 गुंठयात किती उत्पन्न होते याचा कोणताही योग्य असा पुरावा आणलेला नाही. तसेच तक्रारदाराने दाखल केलेला 7/12 प्रमाणे त्यांचे गट क्रं.33 मध्ये 06 आर क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांचे नेमके किती नुकसान झाले आहे हे तक्रारदाराने सिध्द केले नाही. जिल्हा कृषि अधिकारी यांनी सदर पिकाची व औषधाची कोणतीही प्रयोगशाळेची तपासणी केल्या बाबतचा अहवाल सदर तक्रारीत दिसून येत नाही, असे सामनेवाले यांनी म्हंटले आहे. सामनेवाले नं.2 यांनी उत्पादीत केलेले औषध हे योग्य असल्या बाबतचा कोणताही पुरावा या न्यायमंचात सादर केलेला नाही. तसेच सामनेवाले नं.2 यांचे प्रतिनिधी यांनी जिल्हा कृषि अधिकारी यांचे पंचनाम्याचे वेळेस हाजर असल्या बाबतची सही केली आहे. परंतु त्यांनी सदर पंचनाम्यास कोणतेही आव्हाण प्रकरण दाखल करण्यापूर्वी दिले आहे असे या न्यायमंचात सादर केले नाही.
म्हणजेच सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत किंवा अनुचित व्यापारी प्रथा सिध्द होवू शकत नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड