निकालपत्र
तक्रार क्र.74/2015.
तक्रार दाखल दिनांक - 27/07/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 01/09/2015
तक्रार निकाल दिनांक - 17/05/2016
कालावधी 09 महिने 20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
विष्णु पि.सर्जेराव बचाटे, अर्जदार
वय ४० वर्ष धंदा चालक, अॅड.व्हि.पी.चोखट
रा.कुंभारी ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
1. प्रो.प्रा.सतिश मोटर्स प्रा.लि. गैरअर्जदार
जालना रोड, औरंगाबाद ४३१००१. अॅड.बी.आर.पेकम.
2. मा.मॅनेजर,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी,
अदालत रोड, औरंगाबाद ४३१००१.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
निकालपत्र
(निकालपत्र पारित व्दारा - श्रीमती.ए.जी.सातपुते,अध्यक्षा ) - अर्जदार हा मौजे कुंभारी ता.सेलू जि.परभणी येथील रहिवाशी असून गाडी चालक म्हणुन व्यवसाय करतो. दि.११/०४/२०१५ रोजी संध्यकाळी 8 ते ८.३० वाजताच्या सुमारास अर्जदार स्वतःचे मालकीचे टाटा ए.सी.वाहन (छोटा हत्ती) क्र.एम.एच.२२ एए ११७५ दिवसभर काम करुन उभा केल्यानंतर अचानक सदरील वाहनास कॅबीनमध्ये आग लागली त्या आगीमध्ये दोन्ही सीट,इंजीनवरील पत्रा जळुन खाक झाला. त्यानंतर अर्जदार यांनी दि.१२/०४/२०१५ रोजी पोलिस स्टेशन सेलू या ठिकाणी घटनेची नोंद करण्यात आली त्याचा जळीत नोंद क्र.४/१५ असा आहे. त्यानंतर तपासणीक अंमलदार सेलू यांनी घटनेचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला घटनास्थळमध्ये रु.१,५०,०००/- चे नुकसान झाल्याचे दर्शविलेले आहे. अर्जदार यांनी सदरील वाहनाचा विमा गैरअर्जदार क्र.१ यांच्याकडे सन २०१४-२०१५ साठी पावती क्र.७७६ व पावती क्र.७७८ नुसार गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे जमा केले होते. तसेच सन 2015 ते सन 2016 साठी पावती क्र.405 प्रमाणे जमा केलेंडर होते. सदरील रक्कम गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदर क्र.2 यांचेकडे वर्ग केला. तसेच सदरील पॉलिसी दि.12/03/2015 ते 11/03/2016 या कालावधीमध्ये असून सदरील विमा अर्जदार यांच्या वाहनासाठी कव्हर आहे. अर्जदार यांनी दि.16/04/2015 रोजी गैरअर्जदार क्र.2 कडे सदरील जळीत वाहनाची नुकसान भरपाई मिळावी याकरिता प्रस्ताव सादर केला. परंतु आजपर्यंत सदरील वाहनाची नुकसान भरपाई प्रस्तावाबाबत कुठल्याही प्रकारचा विचार गैरअर्जदार यांनी केलेला नाही. अर्जदार यांनी सन 2014-2015 मध्ये गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे व्यवस्थितरित्या प्रपोजल फॉर्म भरुन त्या प्रपोजल फॉर्म मध्ये फुल इन्शुरन्स घेतला व त्यानंतर फेब्रुवारी 2015 ते 2016 पर्यंत वरिल वर्षाची पॉलिसी पुर्ण रक्कम भरुन फुल इन्शुरन्स घेतला. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांची कुठल्याही प्रकारची संमती न घेता सदरील पॉलिसीमध्ये फेरबदल केला. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्यकडे सदरील विमा नुकसान भरपाई रक्कम मिळणेसाठी तोंडी विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना उध्दटपणे वागणूक दिली. म्हणुन अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने त्रुटी केलेली आहे. म्हणुन अर्जदाराला गैरअर्जदार क्र.2 यांना असा आदेश देण्यात यावा की, त्यांनी रक्कम रु.1,50,000/- जळीत वाहनाची नुकसान भरपाई म्हणुन द्यावी तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रक्कम रु.5,000/- देण्यात यावा.
गैरअर्जदाराने सदरील तक्रार अर्जावर दि.12/01/2016 रोजी आपले म्हणणे दिलेले आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जददार क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारची अर्जदाराला सेवा देण्यात त्रुटी केलेली नाही. तसचे सतीश मोटर्सकडुन अर्जदाराने सदरील छोटा हत्ती एम.एच.22 एए एम 1175 टाटा एसी हा घेतल्यानंतर प्रथम वर्षी स्वतःच्या गाडीचा विमा काढलेला आहे. त्याचा कालावधी दि.12/02/2014 ते 11/02/2015 आहे. त्यानंतर दुस-या वर्षी अर्जदाराने छोटा हत्ती या गाडीचा स्वतःच्या नुकसानी बाबतचा विमा काढलेला नाही व सदरची घटना ही दि.12/04/2015 ते 11/04/2016 या कालावधीचा आहे. सदरील वाहनाच्या विम्यापोटी रु.16,400/- ही रक्कम अर्जदाराने भरलेली आहे. परंतु सदरचा विमा हा स्वतः च्या नुकसानी पोटी नसून जर गाडीमध्ये प्रवासी अथवा कुणी जात असता अपघात झाला तर त्या प्रवाशाच्या जीवनाची हमी त्या विम्याद्वारे घेण्यात आलेली आहे. याचाच अर्थ गैरअर्जदाराने जो विमा अर्जदाराला दिलेला आहे तो गाडी चालवताना कुणाला धोका झाल्यास त्याची हमी घेतलेली आहे. मात्र गाडीची अथवा स्वतःची हमी विम्याद्वारे अर्जदाराने घेतलेली नाही. म्हणुन तो सदरचा विमा रक्कम रु.1,50,0000/- मागण्यास लायक नाही. अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, साक्षीचे शपथपत्र, युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी कथन, साक्षीचे शपथपत्र्, युक्तीवाद याचा बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? नाही.
3. आदेश काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 - चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदाराला देखील मान्य आहे. अर्जदाराने एम.एच २२ एए 1175 टाटा ए.एसी.ए.टी.702 सी.सी. हा विमाकृत दि.12/02/2014 ते 11/02/2015 पर्यंत रु.15,400/- देवून स्वतःचा व गाडीचा विमा काढला होता व त्यानंतरचा विमा दि.12/03/2015 ते 11/03/2016 या कालावधीचा अपघातातील गाडीस अपघात झाल्यास अपघाती व्यक्तीचा विमा अर्जदाराने काढलेला आहे.
मुद्दा क्र.2 - चे उत्तर नाही असुन अर्जदाराने घटना जी सांगितली आहे ती दि.11/04/2015 रोजी संध्याकाळी 8 ते 8.30 वाजताच्या सुमारा अर्जदार स्वतःचे मालकीचे टाटा ए.एसी. वाहन (छोटा हत्ती) क्र.एम.एच.22 एए 1175 दिवसभर काम करुन उभा केल्यानंतर अचानक सदरील वाहनास कॅबीनमध्ये आग लागली त्या आगीमध्ये दोन्ही सीट, इंजीनचा काही भाग जळुन खाक झाला. सदर घटनेनुसार प्रथम विमा पॉलिसीचा कालावधी हा दि.12/02/2014 ते 11/02/2015 होता व त्यानंतर अर्जदाराने दुसरी पालिसी दि.12/03/2015 ते 11/03/2016 या कालावधीची काढलेली आहे. या पॉलिसीनुसार अर्जदाराने स्वतःची व वाहनाची हमी घेतलेली नाही केवळ या वाहनाने कोणी तिस-या अपघाताने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची हमी विमा कंपीनीने घेतलेली आहे व त्यापोटी रु.14,594/- चा विमा हप्ता अर्जदाराने भरलेला आहे. मात्र तिस-या व्यक्तीच्या विमा पॉलिसीवर IDV मुल्य 00 देण्यात आलेले आहे. सदर केसमध्ये अर्जदाराने स्वतःसाठी व वाहनाचा विमा काढलेला नाही. म्हणजे अर्जदाराचा स्वतःची व स्वतःच्या वाहनाच्या हमीची विमा पॉलिसी काढलेली नाही यात गैरअर्जदाराने विमा रक्कम न देवून त्रुटी केलेली दिसून येत नाही. जी रक्कम विम्यापोटी अर्जदाराने भरलेलीच नाही त्या वाहनाचा विमा विमा कंपनी कशी काय देईल. म्हणुन सदर केस मध्ये अर्जदाराने जी कागदपत्रे न्यायमंचासमोर दाखल केली त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्याचे तक्रार स्पष्ट होत नाही. आम्हा उभयतांच्या मताने सदर केसमध्ये गैरअर्जदाराची अर्जदाराच्या सेवेत त्रुटी निष्पन्न होत नसल्यामुळे अर्जदाराला तक्रार अर्जात मागितलेली रक्कम देता येत नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येतो.
आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येतो.
2. दावा खर्च उभयपक्षकार यांनी आपापला सोसावा.
3. उभयपक्षकार यांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा