जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –05/2011 तक्रार दाखल तारीख –06/01/2011
श्रीकृष्ण पि. दत्तात्रय जाधव
वय – 39 वर्षे, धंदा – नौकरी,
रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड
ह.मु.अंबिका चौक, बीड ता.जि.बीड ...तक्रारदार
विरुध्द
1. प्रो.प्रा.रुक्मीणी ट्रेडर्स,ग्रा.पं.शॉपींग सेंटर,
बार्शि रोड, पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड
2. प्रो.प्रा.शिवाजी रेफ्रिजेरेशन, गाळा क्रं.38,
सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड, बीड
ता.जि.बीड
3. सर्व्हीस ऑफिसर, व्हर्लपूल इंडिया लि.,
ऑबेरॉय गार्डन ईस्टेट, 1071-1075,बी-विंग,
पहिला मजला चांदवली स्टूडीओच्या बाजूला,
अंधेरी (पूर्व), मुंबई 400 072 ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- वकिल – आर.बी.धांडे,
सामनेवाले 1 तर्फ :- वकिल – स्वतः,
सामनेवाले 2 तर्फ :- वकिल – एकतर्फा आदेश,
सामनेवाले 3 तर्फ :- वकिल – व्ही.आर.वडमारे,
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी 2010 मध्ये उन्हाळा चालू होण्याच्या कालावधीतमध्ये ता.16.03.2010 रोजी घरगुती वापराकरीता व्हर्लपुल कंपनीचा 180 लिटरचा फ्रिज सामनेवाले नं;1 यांचेकडून खरेदी केला. फ्रिजवर एक वर्षाची वॉरंटी असल्याचे सामनेवाले नं.1 यांनी सांगीतले.
फ्रिजचा वापर सुरु केला लगेच एक महिन्यांनी आपोआप बंद झाला. त्यांनतर तक्रारदारांनी पाटोदा येथील सामनेवाले नं;1 यांना सांगीतले, सामनेवाले नं.1 यांनी सांगीतले की, सामनेवाले नं.2 कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर चालवितात.
तक्रारदारांनी ता.18.4.2010 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडे पाटोदा येथुन बीडला जीपमध्ये टाकुन आणले. दुरुस्त करुन परत पाटोदा येथे घेवून गेले. ता.6.6.2010 रोजी पाटोदा येथून फ्रिज बंद पडल्यामुळे सामनेवाले नं.2 कडे फ्रिज घेवून आले. त्यावेळी सदर फ्रिजमध्ये कुलिंग होत नव्हती. कॉम्प्रेसर गरम होत होते. यावेळेस तक्रारदार बीड येथे रहावयास आले.
ता.7.6.2010 रोजी सामनेवाले नं.2 कडे फ्रिज दुरुस्ती करण्या करीता जमा केला. त्यानंतर तब्बल दिड महिन्यानी म्हणजेच ता.30.7.2010 रोजी तक्रारदारास फ्रिजचा कॉम्प्रेसर दिला व गॅस बदलून दिला. या कालावधीमध्ये तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 कडे वारंवार फोन करुन सांगीतले होते की, त्यांनी तक्रारदारांना सदोष फ्रिज विक्री केला आहे. सदरचा फ्रिज बदलून द्यावा, किंवा फ्रिज परत घेवून फ्रिजची किंमत परत द्यावी. त्यास सामनेवाले नं.3 ने स्पष्ट नकार दिला.
सदर फ्रिज तकारदार घरी घेवून आले. त्यावेळी फ्रिज कसाबसा चालत होते परंतु क्षमतेने चालत नव्हते. त्यानंतर ता.20.11.2010 पर्यन्त फ्रिज कसेबसे चालून पूर्णपणे बंद पडले. तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 ला फोन करुन तक्रार केली. सदर तक्रारीचा नं.पीए-1110009907 आहे.
सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदारांना सामनेवाले नं.2 कडे फ्रिज दाखविण्यास सांगीतले. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 यांना सांगीतले की, आतापर्यन्त चार वेळा फ्रिजचे सर्व पार्ट बदलेले तरीही फ्रिज दुरुस्त झाला नाही. सध्या फ्रिज बंद अवस्थेत घरी पडून आहे. कंपनी फ्रिज परत घेवून तक्रारदाराची रक्कम परत द्यावी. सानेवाले नं.3 तक्रार न ऐकता आपणास काय करावयाचे ते करुन घ्या, असे आर्वच्छ भाषेत सांगीतले.
वरील सर्व प्रकाराला वैतागुन तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 व 2 यांनी विकलेला फ्रिज परत घेवून रक्कम द्यावी. परंतु सामनेवाले नं.1 व 2 यांनी त्यांचे कांहीही एक संबंध नाही. त्यांनी सामनेवाले नं.3 कडे तक्रार करण्यास सूचविले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वारंवार फ्रिज बदलून देण्या विषयी अथवा फ्रिजची रक्कम परत देण्या विषयी विनंती केली. तक्रारदाराचे सामनेवाले यांचेकडून येणे रक्कम खालील प्रमाणे आहे.
फ्रिजची किंमत रु. 8,600/-
मानसिक व शारिरीक त्रास नुकसान भपाई पोटी रक्कम रु.10,000/-
तक्रारीचा खर्च रु. 3,000/-
एकुण रु.21,600/-
विनंती की, वरील रक्कम सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदारांना वैयक्तीक अथवा संयुक्तीक देण्याचा आदेश व्हावा. सदरील रक्कमेवर तक्रार दाखल तारेखपासुन द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले नं.1 यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.8.3.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारदाराचे आक्षेप नाकारले आहेत. फ्रिजची किंमत रु.8,600/- सोबत एक स्टँड रु.150/- असे एकुण रु.8,750/- पैकी सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना रोख रु.6,250/- घेवून रु.1,500/- तक्रारदाराकडे बाकी राहिली आहे. फ्रिज बाबत कांही बिघाड झाल्यास लागणारा खर्च म्हणुन सामनेवाले नं.1 यांनी रु.1,500/- तक्रारदाराकडे ठेवले होते. पंरतु प्रत्येक्ष पावती प्रमाणे रुपये पोच झाले असे पावतीत तक्रारदार व सामनेवाले नं.1 यांचेत विश्वासाचे संबंध असल्यामुळे संपूर्ण रक्कम मिळाल्याची पावती, कागदपत्र तक्रारदारांना सामनेवाले नं.1 यांनी ता.16.3.2010 रोजी दिले आहे.
तक्रारदारांनी सदर फ्रिज दुरुस्तीचा कारागीर नसल्याने सामनेवाले नं.1 ते 3 यांचेशी भेट न घेता स्वत: खोलल्यामुळे फ्रिजमध्ये तक्रारदाराकडून बिघाड झाला आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांना फ्रिज बाबत कधीही विनंती केली नाही, उलट फोनवर उध्दटपणाची भाषा केली. तरीही सामनेवाले नं.1 हे केवळ फर्निचर कुलर, टी.व्ही इत्यादी वस्तीची विक्री करत असल्यामुळे जरी वस्तुचा बिघाड झाला अथवा खराब झाला, वस्तुचे वॉरंटीनुसार तो बदलून अथवा दुरुस्त करुन देण्यास सामनेवाले नं.2 व 3 यांची कायदयाने आहे.
विनंती की, सामनेवाले नं.1 यांचे हद्दी पर्यन्त तक्रार नामंजूर करावी.
सामनेवाले नं.2 यांनी न्यायमंचाची नोटीस स्वीकारली परंतु न्यायमंचात हजर नाहीत अथवा त्यांचा खुलासा मुदतीत दाखल नाही म्हणून ता.8.3.2011 रोजी एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला.
सामनेवाले नं.3 यांनी त्यांचा खुलासा ता.29.3.2011 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व अक्षेप त्यांनी नाकारलेले आहे. तक्रारदाराची आपली तक्रार ता.16.4.2010 ला दिल्यानंतर ता.18.4.2010 ला तक्रारदाराचे घरी मौ.पाटोदा येथे सामनेवाले नं.2 तर्फे मेकॅनिक पाठवून काम करुन दिले, त्यावेळी फ्रिजमध्ये नॉरमल प्रॉब्लम होता. म्हणजेच फ्रिजची कुलींग तक्रारदारांनी कमी करुन टाकली होती ती मेकॅनिकने स्पीड वाढवून दिली व याबाबत तक्रारदारांना माहिती दिली व जॉबकार्डवर प्रॉब्लेम सोडविला म्हणुन सही घेतली. अशा त-हेने ता.16.4.2010 रोजीची तक्रार संपुष्टात आली.
तक्रारदारांनी ता.5.6.2010 रोजी तक्रार दिली त्यानुसार पाटोदा येथे तक्रारदाराचे घरी जावून शहानिशा केले असता, तक्रारदार पाटोदा येथे राहत नसल्याचे समजले. बीड येथे पांगरीरोड, शाहुनगर भागात राहत असल्याचे समजले वरुन ता.6.6.2010 रोजी शाहुनगर येथील घरी मेकॅनीक पाठविला फ्रिजची पाहनी केली असता, फ्रिजमध्ये लागणारे होल्टेज कमी होते त्यामुळे फ्ल्यूज सारखे खराब होत असे. फ्रिजला होल्टेज 180 लागते असे तक्रारदारांस सांगीतले त्यानंतर तक्रारदारांना स्टॅबीलायझर वापरा अशी सुचना केली होती. तक्रारदारांनी स्टेबीलायझरचा वापर केला नाही. सांगीतलेल्या गोष्टीकडे तक्रारदारांनी जानीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सामनेवाले नं.2 यांनी त्या ठिकाणी फ्रिजमधील दोन पार्ट प्रति रु.400/- किमतीचे बदलून दिले. तसेच ओपीएल कंपनीचे वॉरंटीमध्ये पार्ट बदलून दिले. तक्रारदाराची जॉबकार्डवर सही घेतली.
ता.20.11.2010 ला तक्रारदारांनी तक्रार दिली. त्यावेळी सुध्दा व्होल्टेज कमी असल्यामुळे फ्रिजचे कॉम्प्रेसर जाण्याची शक्यता आहे, व स्टॅबीलायझर वापरण्याची सूचना दिली होती. तक्रारदारांनी सूचनेकडे दुर्लक्ष केले. उलट कंपनीकडे फ्रिज बदलून देण्यास तक्रार दाखल केली.
ता.27.7.2010 ला तसरी तक्रार दाखल केली त्यावेळी सामनेवाले नं.2 ने फ्रिजचे मेन कॉम्प्रेसर पार्टची किंमत रु.3,500/- खराब झाल्याचे दिसून आले. सदर पार्ट बदलून देण्यासाठी फ्रिज सर्व्हिस सेंटरला पाठवून देण्यास विनंती केल्यामुळे ता.30.7.2010 ला त्यांनी फ्रिज पाठवून दिला. त्यावेळी कॉम्प्रेसर फ्रिजमध्ये बदलून त्याच दिवशी कुठलाही चार्ज न घेता फ्रिज त्यांना दिला. त्यावेळी सुध्दा तक्रारदारांना फ्रिजला व्होल्टेज कमी आहे त्यामुळे फ्रिजमध्ये प्रॉब्लेम तुमचे निष्काळजीपणामुळे होतात असे वारंवार सांगुनही दखल घेतली नाही व स्टॅबीलायझर वापरला नाही. त्यावेळी सुध्दा जाबकार्डवर सही घेतली आहे.
तक्रारदारांनी वांरवार तक्रार दाखल केली परंतु तक्रारी तक्रारदारांचे चुकीमुळे निर्माण झाल्या आहे. त्यात फ्रिजचा दोष नाही, असे स्पष्ट दिसून येते. तक्रार केवळ खोटया स्वरुपाची व फ्रिज घेतल्यापासुन प्रकरण दाखल करेपर्यन्त सर्व्हिस सेंटर मधुन सर्व्हिस दिलेली आहे. त्यामुळे सामनेवाले नं.3 हे या सर्व बाबीस जिमेदार आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले नं.2 यांचा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं.3 यांचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकिल आर.बी.धांडे, सामनेवाले नं.3 चे विद्वान वकील आर.व्ही.वडमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून व्हर्लफुल 180 लिटरचा फ्रिज विकत घेतला, ही बाब सामनेवाले नं.1 ते 3 यांना मान्य आहे.
सदर फ्रिज विकत घेतेवेळी फ्रिजसाठी स्टॅबीलयझरची आवश्यकता नाही त्याबाबतच सामनेवाले यांनी दिलेले माहिती पत्र तक्रादारांनी दाखल केले आहे. सामनेवाले नं.3 हे फ्रीज उत्पादक कंपनी आहे. त्यांनी फ्रिज जाहीरातीत नो-स्टॅबीलायझर रिक्वायर अशी जाहिरात केली व त्या संदर्भात ग्राहकास माहिती दिली आहे. त्या माहिती आधारे तक्रारदारांने सदर फ्रिजला पसंती दिली आहे व विकत घेतला आहे.
अशा परिस्थितीत व्होल्टेजमुळे फ्रिज वारंवार नादुरुस्त होते व त्यासंदर्भात तक्रारादारांनी ज्या-ज्या वेळी तक्रारी केल्या आहे त्या-त्या वेळी तक्रारीचे सामनेवाले यांनी निराकरण केल्याचे सामनेवाले त्यांचे खुलाशावरुन स्पष्ट होते. परंतु सामनेवाले यांचे खुलाशातील विधान हे तक्रारदारांना व्होल्टेज कायम राहण्यासाठी स्टॅबीलायझर घेण्याचे सांगीतले होते परंतु तक्रारदाराने सदरचे स्टॅबीलायझर घेतले नाही, त्यामुळे तक्रारदाराचा फ्रिज वारंवार ना दुरुस्त होता. त्यात फ्रिजचा दोष नाही हे विधान ग्राहय धरणे उचित होणार नाही, कारण वरील विधाना प्रमाणे फ्रिजला स्टॅबीलायझरची गरज नाही असे विधान उत्पादक कंपनी करते त्यामुळे उत्पादक कंपनीने त्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवली असल्यामुळे स्टॅबीलायझरची गरज पडणार नाही असे तंत्रज्ञान विकसीत केलेले आहे असे निश्चितच विश्वास ग्राहकाचा होता. सदरची वस्तु निश्चितच ग्राहक घेण्यास पसंती देतो हे बाजार अनुभव लक्षात घेवून सामनेवाले यांनी एकीकडे स्टॅबीलायझरची आवश्यकता नाही अशी जाहीरात करावयाची व त्याच्या उत्पादनाच्या संदर्भात माहिती द्यावयाची व दुसरीकडे स्टॅबीलायझर खरेदीची सुचना ग्राहकाला करावयाची सदर दोन्ही विधाने निश्चितच विरोधाभास करणारी आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या चुकीने तक्रारदारानी स्टॅबीलायझर विकत न घेतल्याने फ्रिज ना दुरुस्त होते हे विधान या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदाराचा फ्रिज बंद आहे. तो दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी सामनेवाले नं.1 व 2 यांची आहे. सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदाराचा फ्रिजमध्ये कुलींग होत नाही ही तक्रार, हे दाष कुठलाही मोबदला न घेता योग्य स्थितीत दुरुस्त करुन देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदाराने तक्रारीत नमुद तक्रारीचे सामनेवाले यांनी निराकरण करुन दिले आहे. त्यामुळे तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत कसूरी केली आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत मागणी केल्या प्रमाणे तक्रारदारांना मानसिक शारिरीक व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश करीत आहे.
।। आदेश ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराचा फ्रिजमध्ये कुलींग न होण्याचा दोष कोणताही मोबदला न घेता दुरुस्त करुन आदेश मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावा.
3. खर्चा बाबत आदेश नाही, तक्रारदार व सामनेवाले आपआपला खर्च सोसावा.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड