::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये,श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक: 18.04.2013)
त.क.नी विरुध्द पक्षा विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीतील मजकूर थोडक्यात खालील प्रमाणे :
1. त.क. हे वयोवृध्द जेष्ठ नागरीक आहे व त्यांचा व्यवसाय शेती असून शेतीला जोडधंदा व्हावा म्हणून शेतातील काही भाग अकृषक करुन त्यामध्ये त्यांनी मंगल कार्यालय काढले व त्याचे नांव जे आर. निखाडे असे देण्यात आले. सदर मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य वि.प.यांच्या दुकानातून दि. 20.01.2012 रोजी खरेदी केले व त्यामध्ये प्रामुख्याने 4 X 12 या साईझच्या 50 टिना खरेदी केल्या. सदर टीन शीटस हया गॅलव्हनाईजड असून त्या उत्तम दर्जाच्या असल्याचे वि.प.यांनी त.क.ला सांगितले. परंतु 4-5 महिन्यातच सदर टीनला जंग लागला व त्यावर पांढरे डाग पडले, त्यामुळे त.क.यांनी वि.प. यांच्याकडे तक्रार करुन सदर खराब टीना बदलून देण्याची विनंती केली. वि.प. यांनी त.क. यांना हलक्या प्रतिच्या टिना पुरवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सदर टिना तसेच राहिल्या पावसाळयात त्यातून पाणी येण्याची शक्यता आहे. सदर जंग लागलेल्या टिना असल्यामुळे त.क. यांचे कार्यालय घेण्यास सर्व सामान्य लोक तयार होत नाही, त्यामुळे त.क. यांचे नुकसान होत आहे.
2 . त.क. यांनी दि. 18.09.2012 रोजी वि.प.यांना लेखी नोटीस पत्र देऊन सदर सदोष टिना बदलून देण्याची मागणी केली तरी ही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त.क यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हिंगणघाट शाखे मार्फत वि.प.यांना नोटीस पाठविली. त्यावर वि.प.यांनी त.क. यांच्या खराब टिनांचे फोटो काढून नेले व वि.प. यांनी दि. 25.10.2012 रोजी सदर टीन कंपनीचे उत्पादक मे. एस.आर.एस.इंडस्टीज नागपूर यांना पत्र पाठवून त.क. यांची तक्रार कळविली. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तसेच वि.प.यांनी ही वेळोवेळी त.क. यांनी पत्र व्यववहार करुन ही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सदरच्या 50 टीन बदलून द्यावे किंवा त्यासाठी आलेला खर्च रुपये 2,81,210/- मिळावे म्हणून सदरची तक्रार त.क. यांनी मंचात दाखल केलेली आहे. त.क. यांनी तक्रारी सोबत एकूण 6 दस्ताऐवज दाखल केलेले आहे.
2 सदर तक्रार पंजीबध्द करुन वि.प.यांना नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीस वि.प. यांनी न घेतल्यामुळे ही नोटीस “Not Claim “” या शे-यासह परत आली व ती नि.क्रं. 6 वर दाखल आहे. तरी ही वि.प. हे मंचासमक्ष हजर झाले नाही किंवा त्यांनी आपले तोंडी म्हणणे मंचासमक्ष मांडले नाही. त्यामुळे वि.प.यांच्या विरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
3 त.क.यांनी तक्रारी सोबत दाखल केलेले दस्ताऐवज नि.क्रं. 7 वरील शपथपत्र व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता खालील निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
4 त.क. यांनी वि.प.यांच्याकडून मंगल कार्यालयाकरिता बांधकाम साहित्य खरेदी केले होते व सदर साहित्या मध्ये 4 X 12 या साईझच्या 50 टीन शीटस खरेदी केल्या होत्या हे नि.क्रं. 4 (1) वरील खरेदी पावतीवरुन दिसून येते. सदर टीन हया गॅलव्हनाईजड असून उत्तम दर्जाच्या असल्याची खात्री वि.प.यांनी त.क. यांना दिलेली होती व त्यावर विश्वास ठेवून त.क. यांनी सदर टीन शीटस खरेदी केल्या होत्या . परंतु 4-5 महिन्यातच सदर टीनला जंग लागले व त्यावर पांढरे डाग पडू लागले. सदर टीन शीटस खराब असल्याबाबतचे नि.क्रं. 4 (6) वरील फोटोवरुन स्पष्टपणे दिसून येते. तसेच त्या खराब होत चालल्या आहे हे स्पष्ट दिसत आहे. सदर टीन खराब व निकृष्ट आहे म्हणून त.क. यांनी वि.प.यांच्याकडे तक्रार केली, त्यावेळी वि.प.यांनी सदर टीनचे फोटो सुध्दा काढून घेतले परंतु त्याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून दि. 17.09.2012 रोजी त.क. यांनी स्वतः वि.प.यांना नोटीस पाठवून सदर वस्तुस्थिती कळवून वि.प.यांनी दिलेल्या टीनस पहिल्याच पावसाळयात खराब झाल्या आहेत व त्यांची फसवणूक झाली आहे व सदर टीन बदलून द्यावे किंवा त्या पोटी होणारी रक्कम रुपये 2,81,210/- द्यावे असे कळविले. सदरची नोटीस नि.क्रं. 4(2) वर दाखल आहे. तरी ही वि.प.यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे त.क. यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या मार्फत वि.प.यांना नोटीस पाठवून खराब टीन बदलून देण्याची किंवा त्याची रक्कम देण्याची मागणी केली हे नि.क्रं. 4 (3) च्या दाखल दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. वि.प. यांनी मे. एस.आर.एस. इंडस्टीज नागपूर यांना दि. 25.10.2012 रोजी पत्राने कळविले हे नि.क्रं. 4(4) वर दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन दिसून येते. सदर पत्रानुसार वि.प.यांनी उत्पादक टीन कंपनीस ग्राहकाची तक्रार आली आहे व त्यावर योग्य तो निर्णय द्यावा असे कळविले. मात्र त्यानंतर वि.प.यांनी किंवा सदर उत्पादक टीन कंपनी यांनी कोणताही प्रतिसाद त.क. यांच्या तक्रारीला दिला नाही. त्यामुळे पुन्हा दि. 07.11.2012 रोजी त.क. यांना सदर खराब टीनस बदलून द्यावे किंवा त्याची रक्कम द्यावी म्हणून मागणी केले, तरी ही वि.प.यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. जरी सदर टिनच्या उत्पादनामध्ये वि.प.यांचा कोणताही सहभाग नसला तरी तो केवळ जरी विक्रेता असला तरी ग्राहकाच्या आलेल्या तक्रारी योग्य रितीने संबंधित उत्पादक कंपनीकडे कळविणे व त्याबाबत योग्य अशी कारवाई करणे विक्रेता या नात्याने वि.प.यांची जबाबदारी होती. मात्र वि.प.यांनी त्याबाबत फक्त एकच वेळा उत्पादक कंपनीस कळविले व त्यानंतर पुढे त.क.यांच्या तक्रारीस कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे वि.प.यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिली आहे असे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेले 50 टीन बदलून देऊन नविन टीन स्वखर्चाने त.क.यांना बसवून देण्यात यावी. अथवा सदर टीन बदलवून देणे शक्य नसेल तर त.क. यांच्या मागणीप्रमाणे टीनची होणारी रक्कम रुपये 1,80,880/- व त्यासाठी आलेला खर्च रुपये 25,000/-, वाहतूक खर्च रु.5,000/- असू एकूण होणारी रक्कम रुपये 2,10,880/- त.क.यांना द्यावे. या निर्णयाप्रत हे मंच आले आहे.
5 त.क. च्या तक्रारीप्रमाणे वि.प.यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही , त्यामुळे त.क.यांना मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. सदर तक्रारीची मंचा मार्फत पाठविलेली नोटीस वि.प.यांनी स्विकारलेली नाही त्यामुळे ती न बजाविता परत आली, यावरुन वि.प.यांची नकारात्मक वागणूक स्पष्ट दिसून येते. वि.प. यांच्या अशा कृतीमुळे त.क. यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला यासाठी त.क. रुपये 5000/- शारीरिक व मानसिक त्रासासाठी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.यांनी त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्यामुळे त.क. यांचे झालेल्या नुकसानीस वि.प.जबाबदार आहेत. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अंतिम आदेश //
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेले 50 टीन प्रस्तुत आदेश पारीत
झाल्यापासुन 30 दिवसात बदलून देऊन नविन टीन स्वखर्चाने त.क.यांना बसवून
देण्यात यावी. अथवा सदर टीन बदलवून देणे शक्य नसेल तर त.क. यांच्या
मागणीप्रमाणे टीनची होणारी रक्कम रुपये 1,80,880/- व त्यासाठी आलेला खर्च
रुपये 25,000/-, वाहतूक खर्च रु.5,000/- अशी एकूण होणारी रक्कम रुपये
2,10,880/- त.क.यांना द्यावे. जर सदर रक्कम आदेश पारीत झाल्यापासुन
30 दिवसात न दिल्यास सदर रक्कमेवर प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंतद.सा.द.शे 12% दराने
व्याज द्यावे .
3) विरुध्द पक्ष यांनी त.क.यांना मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल रुपये
5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये-2000/-
(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.