(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती किर्ती प्रकाश गाडगीळ (वैद्य), अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 26 डिसेंबर 2013)
अर्जदाराने प्रस्तुत ग्राहक तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत दाखल केली आहे.
1. संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, तक्रारदार हा गडचिरोली येथील रहीवासी असून, गैरअर्जदार क्र.1 हे सी.आर.आय. कंपनीचा अधिकृत पंप विक्रेता आहे व गैरअर्जदार क्र.2 हा सदर कंपनी एरीया मॅनेजर असून, गैरअर्जदार क्र.3 हे मुख्य कार्यालय आहे. तक्रारकर्त्याचे घरी पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याने देशमुख बोअरवेल्स अॅन्ड मश्निनरी यांचेकडून दि.22.2.2012 रोजी बोअरवेल 150 फुट खोदकाम केले व त्यात 80 फुट केसींग पाईप टाकण्यात आला. तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.1 चा जुना ग्राहक असल्यामुळे त्यानी गैरअर्जदार क्र.1 कडून बरेच साहीत्य खरेदी केले होते. तसेच, त्यांचेमध्ये उधारीमध्ये ही व्यवहार चालायचा. अर्जदार ह्यांनी दि.26.2.2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे जेट पंप घेण्याकरीता गेले असता, गैरअर्जदार क्र.1 यांनी जेटपंप घेण्याऐवजी सबमर्सिबल पंप घेण्याचा सल्ला अर्जदारास दिला, तसेच त्यांनी सांगीतले की, जमिनीत ही मशीन जितकी खोल राहील तितका पाण्याचा फोर्स-प्रेशर जास्त राहील आणि काही अडचण आल्यास सबमर्सिबल पंप काढण्याचे साहीत्य म्हणजे चैनफुली व्दारे पंप बोअरवेल मधून काढून देतील. ह्यांनी अशी निश्चित हमी दिल्यावर अर्जदार यांनी दि.26.2.2012 रोजी सी.आर.आय. क्र.10311 एफ 19558 मॉडल 84 एच-1 एफ/07 बिल क्र.784 सर्व सामान फिटींगसह रुपये 13910/- चा एक वर्ष हमीपञ कालावधी असलेला सबमर्सिबल पंप घेतला. सदर पंप लावल्यानंतर दि.21.7.2012 दोन-तीन दिवस गढूळ पाणी येते होते, त्याबद्दल गैरअर्जदार क्र.1 यांना विचारणा केल्यास नवीन पंप असल्यास असे होते म्हणून त्यांनी सांगीतले. त्यानंतर, बरोबर एक महीन्याने दि.15.8.2012 नंतर सदर पंप बंद पडून त्यातून पाणी येणे बंद झाले. तक्रारकर्त्याने त्याबद्दल गैरअर्जदार क्र.1 यांना सांगीतले त्यावर त्यांनी कारागीर पाठवीतो असे सांगीतले, परंतु कारागीर पाठविला नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेशी फोनवर संपर्क साधल्यावर गैरअर्जदार क्र.1 कारागीर पाठवून पंप बंद असल्याची खाञी केली. परंतु, तो दुरुस्त केला नाही. त्यानंतर दि.13.9.2012 रोजी अर्जदार स्वतः जाऊन गैरअर्जदार यांना त्याचेकडे असलेली चैनफुली वापरुन पंप काढून दुरुस्त करुन देण्याची विनंती केली, परंतु गैरअर्जदार यांनी त्यातही टाळाटाळ केली. अर्जदाराचे म्हणणे असे की, पंप हा वॉरंटी पिरेडमध्ये असल्यामुळे गैरअर्जदार यांनी जबाबदारी स्विकारुन पंप दुरुस्त करुन दिला पाहीजे.
2. अर्जदार यांनी आपल्या कथना पुढे म्हटले आहे की, एक ग्राहक नामे श्री नागसेन खोब्रागडे, रा. गडचिरोली यांचाही जेंव्हा पंप बिघडलेला होता, तेंव्हा गैरअर्जदार क्र.1 यांनी तो पंप चैनफुली व्दारा काढण्याचा प्रयत्न केला होता. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी हमी करार अवधीचा व विश्वासाचा भंग केला आहे. म्हणून दि.28.1.2013 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना लेखी नोटीस गैरअर्जदार क्र.1 यांनी खोट्या आशयाचा नोटीस पाठवून अर्जदाराची बोअरवेल खचली असा आरोप केला. त्यामुळे, गैरअर्जदा क्र.1 यांनी दि.7.2.2013 रोजी मुख्य ऑफीस कोईम्बतूर, तामिळनाडू येथे फोन करुन माहीती दिली. तेथील व्यक्तीनी नागपूर येथे फोन करण्यास सांगीतले असता, अर्जदार यांनी नागपूर येथेही कळविले. परंतु, तेथूनही काहीही उत्तर आले नाही म्हणून अर्जदार यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागली.
3. अर्जदार यांची मागणी अशी की, हमी अवधीमध्ये पंप बंद पडल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी तो पंप काढून दुरुस्त करुन द्यावा, तसेच बोअरवेल खोदण्यासाठी रुपये 26,500/- खर्च व पंप मिळून रुपये 40,410/- यांनी अर्जदारास द्यावे. तसेच, सबमर्सिबल पंप दुरुस्त करणे शक्य नसल्यास तो नवीन द्यावा. अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाई म्हणून रुपये 5000/- प्रकरणाचा खर्च रुपये 50,000/- ची मागणी केली आहे. तसेच, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- मिळण्याची मागणी अर्जदार यांनी केली आहे.
4. अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजाच्या यादी नि.क्र.2 सोबत दस्त क्र. 1 पासून अ-8 पर्यंत जोडलेले आहेत. तसेच, अर्जदार यांनी नि.क्र.30 वर त्याचा युक्तिवाद दाखल केला आहे.
5. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी नि.क्र.11 प्रमाणे लेखी बयान दाखल करुन, अर्जदाराची मागणी नाकारली आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी ही खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 कडून दि.26.2.2012 रोजी सी.आर.आय. सबमर्सिबल पंप, सामान व फिटींगसह एकूण खर्च रुपये 13,910/- बिल क्र.784 नुसार ाखरेदी केला त्याचा हमीपञाचा कालावधी 1 वर्षाचा होता आणि या कालावधीमध्ये जर पंप बंद पउल्यास गैरअर्जदार हे तो पंप दुरुस्त करण्यास तयार आहे. तसेच त्यांनी नोटीस मध्ये नमूद केले आहे. परंतु, खचलेल्या बोअरवेल मधून पंप काढून आणण्याची जवाबदारी ही अर्जदाराची आहे. तसेच, त्याचे पुढे म्हणणे असे की, त्यांनी अर्जदाराला सबमर्सिबल पंप विकत घेण्याचा सल्ला दिलेला नव्हता, कोणत्याही ग्राहकाला त्याच्या स्वतःच्या पसंतीप्रमाणे वस्तु विकत देणे हे त्यांना देण्याची जवाबदारी त्याची आहे. तसेच, त्यांनी अर्जदार यांना अशी कोणतीही तोंडी हमी दिली नव्हती की, काही अडचण आल्यास ते अर्जदार यांचेकडे माणूस पाठवून पंप दुरुस्त करुन देतील. त्याचे पुढे असे म्हणणे की, बोअर खचली आहे असे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना सागीतले. अशा पारिस्थितीत, खचलेल्या बोअरवेल मधून पंप काढण्याची जवाबदारी ही त्यांची नाही. तक्रारकर्त्याने त्याचेकडून विकत घेतलेल्या पंपात जर काही बिघाड झाल्यास त्या तांञिक बिघाडाशी संबंधीत काही असल्यास ते आजही पंप दुरुस्त करुन द्यायला तयार आहेत.
6. गैरअर्जदार यांचे पुढे म्हणणे असे की, ह्यांनी अर्जदार याचेवर विश्वास ठेवून त्यांच्या घरास लागणारे नळ फिटींगचे रुपये 12,159/- चे सामान उधारीवर दिले आहेत. सदर उधारी बुडविण्याचे हेतुने अर्जदार यांनी सदर खोट्या मजकुराची केस गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली आहे आणि ती खर्चासहीत खारीज करावी.
7. गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांनी नि.क्र.11 वर त्याचे लेखी बयान दाखल केले, तसेच नि.क्र.21, 22 व 23 वर गैरअर्जदार यांचे साक्षीदाराचे शपथपञ, तसेच नि.क्र.24 वर गैरअर्जदार क्र.1 चे शपथपञ दाखल करुन नि.क्र.25 वर गैरअर्जदार क्र.1 ते 3 लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
8. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : उत्तर
(1) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदाराप्रती सेवेत न्युनता : नाही
केली आहे काय ?
(2) गैरअर्जदार यांनी अनुचीत व्यापर पध्दतीचा वापर केला : नाही
आहे काय ?
(3) मागणीप्रमाणे अर्जदाराला बोअरवेल मधून पंप काढून : नाही
गैरअर्जदार यांनी दुरुस्त करुन द्यावा, किंवा नवीन पंप
गैरअर्जदाराने द्यावा या मागणीस पाञ आहे काय
(4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
अर्ज खारीज
मुद्दा क्र.1, 2 व 3 :-
9. या प्रकरणात अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सी.आर.आय. सबमर्सिबल पंप क्र.10311 एफ 19558 मॉडल क्र. 84 एच-1 एफ/07 बिल क्र. 784 सर्व सामान फिटींगसह एकूण खर्च रुपये 13,910/- खरेदी केला. त्यासोबत गैरअर्जदार यांनी हमीपञ अर्जदाराला दिले व त्याची हमीपञाचा कालावधी दि.26.2.2012 ते 26.2.2013 पर्यंत होता. त्याप्रमाणे अर्जदाराने नि.क्र.2 च्या यादी सोबत पंपाचे बिल दस्त क्र.3 वर तसेच, हमीपञ दस्त क्र.4 वर दाखल केले आहे. ही बाब, गैरअर्जदार यांनी नाकबूल केलेली नाही. म्हणून ही गोष्ट निर्विवाद आहे की, सदर नवीन सबमर्सिबल पंप अर्जदाराने दि.26.2.2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विकत घेतला. दि.21.7.2012 रोजी पंप नियमित चालु असतांना त्यातून गढूळ पाणी येऊ लागले म्हणून अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना विचारपुस केली असता, त्यांनी नवीन पंप असल्यामुळे असे होते असे सांगीतले. यावरुन असे समजते की, अर्जदाराने दि.26.2.2012 पासून पंप विकत घेतल्यावर दि.15.8.2012 पर्यंत सबमर्सिबल पंप हा व्यवस्थित चालु होता व अर्जदाराची त्याबाबतची काहीही तक्रार नव्हती. परंतु, दि.15.8.2012 रोजी अर्जदार यांनी लावलेला सबमर्सिबल पंप बंद पडून त्यातून पाणी येणे बंद झाले. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांना कळविले असता, गैरअर्जदार यांनी कारागीर पाठवितो असे सांगीतले, परंतु कारागीर हा अर्जदाराकड पंप दुरुस्त करण्यास आला नाही, म्हणून पुन्हा अर्जदार यांनी फोनवर संपर्क साधल्यावर गैरअर्जदार यांनी कारागीर पाठवून पंपाची पाहणी केली असता पंप बंद आहे समजले, परंतु बोअरवेल मधून पंप काढून दुरुस्त करुन देण्याची जवाबदारी गैरअर्जदार क्र.1 यांनी नाकारली.
10. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथनाप्रमाणे अर्जदाराची बोअरवेल खचल्याचे गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदार यांनी सांगीतले. गैरअर्जदार क्र.1 यांनी विकलेला सबमर्सिबल बिघडण्याचे तांञिक कारण नाही. बोअर खचल्याने अर्जदाराच पंप जमिनीत सापडला आहे, त्यामुळे त्या पंपाला काढण्याची गैरअर्जदाराची जबाबदारी नाही. गैरअर्जदार यांनी त्याच्या लेखी बयानात हे ही मान्य केले आहे की, दि.26.2.2012 ते 26.2.2013 च्या हमीपञाच्या कालावधीत जर पंप वॉरंटी पिरेडमध्ये नादुरस्त झाला असता तर दुरुस्त करण्याची जवाबदारी ही त्याची असती आणि तो त्यांनी विनामुल्य दुरुस्त करुन दिला असता.
11. अर्जदार यांनी त्याचे शपथपञात गैरअर्जदार यांचेशी सलोख्याचे संबंध होते व नेहमी त्याचा व्यवहार त्याचेशी चालायचा व त्यात ते गैरअर्जदार क्र. 1 कडून सामान उधारीवरही आणायचे असे म्हटले आहे व सदरच्या व्यवहारातही अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दि.7.2.2012 रोजी घरास लागणारे नळ फिटींगचे सामान रुपये 12,159/- उधारीवर आणलेले आहे असे मान्य केलेले आहे व तसेच हे ही म्हटले की, गैरअर्जदार क्र.1 यांनी पंप काढून दुरुस्त करुन दिल्यास अर्जदार हे उधारीची रक्कम द्यायला तयार आहेत. अर्जदार यांनी नि.क्र.16 वर त्याचे साक्षीदार श्री किशोर देवाजी जांभुळकर यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. वरील साक्षीदार देऊन अर्जदार ह्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना तोंडी सांगीतले की, बिघडलेले पंप चैनफुलीव्दारे काढता येतात. परंतु गैरअर्जदार यांनी तसे अर्जदार यास कुठेही लेखी लिहून दिले नाही. अर्जदार यांनी त्याचा नि.क्र.17 वर श्री नागसेन खोब्रागडे यांचे शपथपञ दाखल केले, परंतु त्यांनी त्यांच्या घराचा पंप बिघडला असता गैरअर्जदार यांनी चैनफुली व्दारे पंप काढता येतो असे सांगून लगेच स्वतःच्या मालकीचा चैनफली आणून पंप काढण्याचा प्रयत्न केला असे शपथपञात सांगीतले. परंतु त्यांनी आणलेल्या चैनफुलीच्या आणि मजुराचे मजुरी कोणी दिली हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे अर्जदार यांनी दाखल केलेल्या दोन्ही साक्षीदाराची साक्ष विश्वासग्राह्य धरता येणार नाही.
12. याउलट, गैरअर्जदार यांनी त्याचे शपथपञ नि.क्र.24 दाखल करुन हमीपञानुसार वॉरंटी पिरेड मधला पंप दुरुस्त करुन द्यायला तयार आहे. परंतु खचलेल्या बोअर मधून पंप काढण्याची जवाबदारी त्याची नाही तो पंप अर्जदार यांनी काढून आणावा तो दुरुस्त करण्यास तयार आहे असे नोंदविले ही गोष्ट तक्रारकर्त्याला नोटीस मध्येही सांगीतली होती असे ही त्यांनी शपथपञात नोंदविले. तसेच, तक्रारकर्ता हा गडचिरोली येथील रहीवासी असून त्याचेवर विश्वास ठेवून मी त्यांना उधारीवर सामान दिले, ती उधारी बुडविण्याचा उद्देश असल्यामुळे ही खोटी तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे असे गैरअर्जदार यांनी शपथपञात नोंदविले. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नोटीसचे उत्तर पाठविले, तेंव्हाही अर्जदाराने गैरअर्जदार विकत घेतलेला पंप हा वॉरंटी पिरेड मध्येच होता. वास्तविक पाहता तेंव्हाच त्यांनी पंप हा गैरअर्जदार यांचेकडे नेवून तो दुरुस्त करुन घ्यायला हवा होता ती अर्जदाराची जवाबदारी होती. गैरअर्जदार यांनी त्याचे साक्षीदाराचे बयान नि.क्र.21, 22 व 23 प्रमाणे दाखल केलेले आहे.
13. गैरअर्जदार क्र.1 हे गणराज एजन्सीच्या नावाने व्यापारी प्रतिष्ठान असून सी.आर.आय. पंप विकणारे अधिकृत विक्रेता आहेत. पंप किंवा कोणतीही त्याच्या दुकानातील वस्तु वॉरंटी पिरेड मध्ये असतांना बदलवून देणे ही त्याची जवाबदारी आहे आणि ती ते मुदतीत पार पाडायला तयार होते. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून विकत घेतलेल्या पंपाची जर वॉरंटी पिरेड मध्ये दुरुस्ती असेल तर ती दुरुस्त करुन घेण्याचा अधिकार अर्जदाराला होता. परंतु अर्जदार यांनी तो अधिकार जेंव्हा पंप वॉरंटी पिरेड मध्ये होता तेंव्हा पूर्ण केला नाही. तसेच ज्या वस्तुचा गैरअर्जदार व अर्जदार यांच्या घेण्याचा करारही झाला नाही किंवा ज्या गोष्टीसाठी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात काही लेखी ठरले नाही अशा गोष्टीवर अडून राहून बोअरवेल मधून चैनफुलीव्दारे पंप काढून द्यावा व तो दुरुस्त करुन द्यावा हा हट्ट ग्राहक म्हणून अर्जदार यांचा अधिकार ठरत नाही.
14. अर्जदार तक्रार दाखल करुन बोअरवेल खोदण्यापासून पंप बसविण्यापर्यंत रुपये 40,410/- गैरअर्जदाराकडून मिळावे अशी मागणी केली आहे आणि तसेच, शारिरीक व मानसिक ञासाबद्दलही मागणी केली आहे.
15. वास्तविक, पाहता अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण विचार करता, गैरअर्जदाराकडे अर्जदार गेला असता अर्जदाराला जेटपंप ऐवजी गैरअर्जदाराने सबमर्सिबल पंप घेण्याचा सल्ला दिला, तसेच केसींग पाईप 80 फुटाऐवजी 130 फुट घेण्याविषयी सांगीतले असे स्वतः अर्जदार यांनी त्याच्या तक्रारीत नमुद केले आहे. परंतु, अर्जदार यांनीच दाखल केलेल्या दस्ताऐवजानुसार क्र.2 नुसार देशमुख बोअरवेल यांनी बोअरवेल खोदल्याचे बिल तक्रारीत दाखल आहे, त्यानुसार 80 फुट केसींग पाईप विकत घेऊन 150 फुट प्रती खोदकाम करुन तेवढाच खोदकाम अर्जदार यांनी केल्याचे दिसून येते. जेंव्हा की, अर्जदार यांचे तक्रारीनुसार गैरअर्जदार यांनी त्यांना सांगीतले की, जेवढा पंप जमिनीत खोल राहील तेवढा मशीनचा फोर्स जास्त राहील.
16. वास्तविक पाहता वरील गैरअर्जदार यांचे म्हणणे हे तोंडी असून अर्जदारास हा त्याचा सल्ला होता. त्याच प्रमाणे गैरअर्जदार यांनी त्याचेकडे चैनफुली आहे व त्याव्दारे आम्ही मशीन काढून देऊ या गैरअर्जदाराच्या म्हणण्याला अर्जदाराकडे काहीही पुरावा नाही.
17. सदर प्रकरणात अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून विकत घेतलेला सबमर्सिबल पंप हा हमीपञ कालावधीत बिघडला परंतु तो ते काढून गैरअर्जदार यांचेकडे नेऊन दुरुस्त करुन घेऊ शकले नाही आणि सदर पंप बोअरवेल मधून काढून देण्याची जवाबदारी ही अधिकृत विक्रेत्याची नसून ती अर्जदारानेच स्वतः काढून ती गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे घेऊन जायला हवा होता. या मुदतीत पंप गैरअर्जदार यांचेकडे न नेऊन अर्जदार यांनी स्वतःचा अधिकार गमावलेला आहे. अर्जदाराची या कृतीमुळे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनता केली हे ठरत नाही.
18. अर्जदाराने, गैरअर्जदार यांनी सदर पंप बोअरवेल मधून काढून दुरुस्त करुन द्यावा ही मागणी सर्वथा अनुचीत आहे म्हणून अर्जदाराची सर्व मागणी नाकारुन अर्जदाराप्रती गैरअर्जदार यांनी सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब ठरत नसल्याने, अर्जदाराने मागणी केलेली अन्य नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ नाही.
19. म्हणून वरील कारणामुळे मुद्दा क्र.1, 2 व 3 वरिल निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आंदेश -
(1) अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येत आहे.
अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून उधारीवर घेतलेले सामानाची रक्कम रुपये 12,159/- गैरअर्जदारास आदेशाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आंत परत करावी.
(2) तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
(3) सदर आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 26/12/2013