जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 177/2012 तक्रार दाखल तारीख – 18/10/2012
तक्रार निकाल तारीख– 08/05/2013
प्रभाकर पि.केशवराव पांडव
वय 45 वर्षे, धंदा नौकरी,
रा.दत्तनगर,बीड ता.जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
प्रो.प्रा.सौदागर पि.विठठलराव पांचाळ
वय 40 वर्ष, धंदा सुतारकी ...गैरअर्जदार
रा.ओंकार फर्निचर वर्क्स,पिंगळे कॉम्प्लेक्स समोर,
धानोरा रोड,बीड.ता.जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.पी.एस.राजापुरकर
गैरअर्जदारा तर्फे – एकतर्फा.
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार बीड येथे नोकरी करत असून त्यांचे दत्त नगर बीड येथे स्वतःचे घर आहे. गैरअर्जदार यांचे ओंकार फर्निचर वर्क्स नांवाने धानोरा रोड,बीड येथे दुकान आहे व ते दरवाजे खिडक्या व इतर फर्निचर तयार करुन विकतात.
तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे मार्च 2012 मध्ये त्यांचे घराचे दरवाजे व खिडक्या बसवण्याचे काम दिले होते. त्याकामी दरवाजांसाठी दर प्रति दरवाजा रु.4000/- व खिडक्यांचा दर रु.155/- चौरस फुट याप्रमाणे ठरला होता. तक्रारदाराने गैरअर्जदारावर विश्वास ठेऊन दरवाजा बसवण्यासाठी रु.4,000/- व खिडक्यांसाठी रु.8,000/- आगाऊ दिले होते. गैरअर्जदाराने काम दोन आठवडयात पुर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले होते. गैरअर्जदाराने स्विच स्विकारले परंतु तात्काळ सुरु केले नाही. तक्रारदारांनी अर्जदारांकडे वारंवार खेपा घातल्या.तेव्हा महिनाभराने गैरअर्जदाराच्या घरातील दरवाजे कसे बसे पुर्ण केले परंतु खिडक्याचे काम अपूर्णच ठेवले. तक्रारदाराने वारंवार गैरअर्जदाराकडे खेपा मारुन काम पुर्ण करण्याची विनंती केली. परंतु तक्रारदाराने उडवा-उडवीची उत्तरे दिली. शेवटी त्या कामाच्या साहित्याने तक्रारदार व त्यांच्या कुटूंबियांना त्रास होऊ लागला म्हणून सदरचे काम त्यांनी दुस-या कारागिराकडून करवून घेतले.
तक्रारदाराने गैरअर्जदाराला दि..11.5.2012 रोजी दरवाजे व खिडक्या बसवण्याचे काम मुदतीत पुर्ण करण्याबददल नोटीस ही पाठवली होती.सदरची नोटीस गैरअर्जदाराला दि.16.5.2012 रोजी मिळाली तरी देखील त्यांनी खिडक्यांचे काम पुर्ण केले नाही अथवा नोटीशीला उत्तरही दिले नाही.
सबब, गैरअर्जदाराने तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला व त्याबददल त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- खिडक्याच्या कामापोटी दिलेली आगाऊ रक्कम रु.8,000/- व सदर तक्रारीचा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.23,000/- ची मागणी तक्रारदार सदर तक्रारीद्वारे करत आहेत.
गैरअर्जदारांना मंचाची नोटीस मिळून देखील ते मंचासमोर हजर झाले नाहीत. सबब तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालवण्यात आली.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पळसोकर यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी विठठल उमेशराव कुलकर्णी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. ज्या अंतर्गत ते म्हणतात की ते तक्रारदार व गैरअर्जदार यांना ओळखतात व तक्रारदाराने गैरअर्जदारांना दरवाजे बसवण्यासाठी रु.4,000/- व खिडक्या बसवण्यासाठी रु.155/- प्रति चौरस फुट या दराने आगाऊ रक्कम रु.8,000/- दिले होते परतु गैरअर्जदाराने तक्रारदारांनी वारंवार खेपा घातल्यानंतर दरवाज्यांचे काम फक्त पुर्ण केले. मात्र खिडक्यांचे काम अपुर्णच ठेवले होते. त्यांनी त्यांच्या युक्तीवादात पुढे सांगितले की, गैरअर्जदारांनी पैसे घेतल्याची पावती त्यांना दिलेली नव्हती. परंतु गैरअर्जदारांना तक्रारदारांनी कायदेशीर नोटीस पाठवली ती प्राप्त होऊनही गैरअर्जदारांनी त्याला उत्तर दिले नाही तसेच सदर तक्रारीबाबत मंचाची नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत. सबब, त्यांचे विरुध्दची तक्रार पुर्णतः मंजूर करण्यात यावी. गैरअर्जदार संधी देऊनही मंचासमोंर हजर झाले नाहीत. त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे खोडून काढले नाही. सबब तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवर व पुरावा म्हणून दिलेल्या श्री.विठठल कूलकर्णी यांच्या शपथपत्रावर मंचाला विसंबून रहावे लागेल.
अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून रु.8,000/- आगाऊ रक्कम घेऊनही त्यांच्या घराच्या खिडक्यांचे काम पुर्ण केले नाही ही गोष्ट तक्रारदाराने सिध्द केली आहे. ही सेवेतील कमतरता आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब, गैरअर्जदाराने खिडक्यांचे काम करण्यासाठी घेतलेली आगाऊ रक्कम रु.8,000/- देणे न्याय ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदाराला तक्रार खर्चापोटी रक्कम रु.1,000/- देणे उचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांना हूकूम देण्यात येतो की, तक्रारदारांना रक्कम रु.8,000/-
आदेश प्राप्त झाल्यापासून तिस दिवसांचे आंत द्यावेत.
3. गैरअर्जदार यांना हूकूम देण्यात येतो की, रक्कम विहीत मुदतीत अदा न
केल्यास रक्कम देय असलेल्या दिवसापासून 9 टक्के व्याज दराने रक्कम
देण्यात यावी.
4. गैरअर्जदार यांना हूकूम देण्यात येतो की, तक्रारदारांना तक्रारीचा खर्च
रु.1000/- द्यावा.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड