::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-२४/०८/२०१७)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्ता हे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. विरूध्द पक्ष क्र.1 ‘परियोग इन्फ्रास्ट्रक्चर’ ही रहिवासी व व्यावसायीक संकूल बांधणारी व्यावसायीक फर्म आहे. विरूध्द पक्ष क्र.2 ते 4 हे विरूध्द पक्ष क्र.1 यांचे पार्टनर असून विरूध्द पक्ष क्र.1 चे कामं बघतात. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.1 यांच्या मालकीच्या मौजा दाताळा, चंद्रपूर येथील सर्व्हे क्र.156/1-ए, प्लॉट क्र.1 वरील प्रस्तावीत नंदनवन विंग 1 हया फ्लॅटस्कीममधील फ्लॅट क्र एफ एफ 05, आराजी 716.11 चौ.फुट फ्लॅट व प्लॉट क्र.1, मधील आराजी 26.85 चौ.मी. अविभाजीत हिस्स्यासह बुक केला. फ्लॅटची एकूण किंमत रू.13,01,000/- ठरली होती. तक्रारकर्त्याने बुकींग रकमेपोटी दिनांक 25/12/2012 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 यांना रू.1,90,000/- धनादेशाद्वारे अदा केले. त्यानंतर अनुक्रमे दिनांक 15/06/2013 रोजी रू.50,000/- व दिनांक 20/6/2014 रोजी रू.25,000/- व दिनांक 21/4/2015 रोजी रू.1 लाख विरूध्द पक्ष क्र.1 यांना रोख दिले व याबाबत विरूध्द पक्ष यांनी रीतसर पावत्या तक्रारकर्त्यांस दिल्या. असे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला एकूण रू. 3,65,000/- अदा केले. तक्रारकर्त्याने सदर रक्कम विरूध्द पक्षाकडे जमा केल्यानंतर विरूध्द पक्ष यांना सदर फ्लॅटबाबत करारनामा करून मागितला असता त्यांनी टाळाटाळ केली. व नंतर दिनांक 28/4/2015 रोजी करारनामा करून दिला. सदर करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार विरूध्द पक्षाने सदर सदनिकेचे बांधकाम पूर्ण करून तक्रारकर्त्याकडून उर्वरीत किमतीची रक्कम स्विकारून तक्रारकर्त्याला डिसेंबर 2015 पर्यंत फ्लॅटचे विक्रीपत्र करून द्यायचे होते. परंतु विरूध्द पक्ष यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे कृती केली नाही व वचनाचा भंग केला. विरूद्ध पक्ष यांनी फ्लॅटस्कीमचे बांधकाम पुर्ण केले नाही व पुढील दोन वर्षे बांधकाम पूर्ण होईल याची खात्री नव्हती. त्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्त्यामार्फत दिनांक 6/2/2016 रोजी विरूध्द पक्ष यांना पंजीबध्द नोदंणीकृत डाकेद्वारें नोटीस पाठवून त्याचे फ्लॅटचे बुकींग रद्द केल्याचे कळवून, त्याने अदा केलेली रक्कम रू.3,65,000/- ची व्याजासह मागणी केली. परंतु विरूध्द पक्ष क्र.1,3 व 4 यांना नोटीस प्राप्त होवूनही त्यांनी पुर्तता केली नाही तर विरूध्द पक्ष क्र.2 यांनी नोटीस स्विकारण्यांस नकार दिला. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदारांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला, फ्लॅट करीता घेतलेली अग्रीम रक्कम रू.3,65,000/- तक्रारकर्त्याला परत करावे, बुकींगची दिनांक 25/12/2012 पासून दिनांक 25/3/2016 पर्यंत 18 टक्के व्याज रू.2,13,525/- असे एकूण रू.5,78,525/- परत करावे तसेच मार्च, 2016 पासून पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज द्यावे त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसीक व शारिरीक त्रास तसेच आर्थीक नुकसानापोटी नुकसान-भरपाई रू.4,00,000/- व तक्रारीचा खर्च रू.30,000/- विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांला द्यावे असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष यांच्याविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून विरूध्द पक्ष क्र.1 परियोग इन्फ्रास्ट्रक्चर ही रहिवासी व व्यावसायीक संकूल बांधणारी व्यावसायीक फर्म असून विरूध्द पक्ष क्र.2 ते 4 हे विरूध्द पक्ष क्र.1 यांचे पार्टनर असून विरूध्द पक्ष क्र.1 चे कामं बघतात. विरूध्द पक्ष क्र.1 यांच्या मालकीचे मौजा दाताळा, चंद्रपूर, सर्व्हे क्र.156/1-ए प्लॉट क्र.1, एकूण आराजी 10405.73 चौ.फुट जागा असून त्यावर विरूध्द पक्ष क्र.1 तर्फे नंदनवन विंग 1 ही रहिवासी फ्लॅटस्कीम उभारण्यांत आली असून तक्रारकर्त्याने सदर फ्लॅटस्कीममधील फ्लॅट क्र एफ एफ 05, आराजी 716.11 चौ.फुट व सर्व्हे क्र.156/1-ए, प्लॉट क्र.1 मधील आराजी 26.85 चौ.मी. अविभाजीत हिस्स्यासह बुक केला. फ्लॅटची एकूण किंमत रू.13,01,000/- ठरली होती. तक्रारकर्त्याने बुकींग रकमेपोटी दिनांक 25/12/2012 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 यांना रू.1,90,000/- धनादेशाद्वारे अदा केले. व याबाबत विरूध्द पक्ष यांनी रीतसर पावती तक्रारकर्त्यांस दिली ही बाब विरूध्द पक्षाने मान्य केली आहे परंतु त्यानंतर तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिनांक 15/06/2013 रोजी रू.50,000/-, दिनांक 20/6/2014 रोजी रू.25,000/- व दिनांक 21/4/2015 रोजी रू.1 लाख विरूध्द पक्ष क्र.1 यांना रोख दिले व एकूण रू. 3,65,000/- विरूध्द पक्षांस अदा केले., ही बाब विरूध्द पक्षाने अमान्य केली आहे. विशेष कथनात त्यांनी नमूद केले की, तक्रारकर्त्याने स्वतः कबूल केले आहे की, त्याने विरूध्द पक्ष यांना फ्लॅटची संपूर्णरक्कम दिलेली नाही. त्यामुळे विरूध्द पक्षाने त्याला फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, करारानुसार त्यांनी फ्लॅटस्कीमचे बांधकाम केले होते व आजच्या तारखेत तक्रारकर्त्याने त्यांना उर्वरीत रक्कम रू.9,36,000/- व विक्रीपत्राकरीता लागणारा खर्च व टॅक्सची रक्कम विरूध्द पक्षास अदा केल्यांस तक्रारकर्त्याला फ्लॅटचे विक्रीपत्र करून ताबा देता येईल. विरूध्दपक्ष तक्रारकर्त्याला फ्लॅटचे विक्रीपत्र करून ताबा देण्यांस सदैव तयार होते व आहेत. सदर तक्रार दाखल करण्याकरीता कोणतेही कारण उद्भवले नसून तक्रारकर्त्याने नमूद केलेली सर्व कारणे खोटी आहेत. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांस कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसून अर्जदाराप्रती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विरूध्द पक्ष यांनी विनंती केलेली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, रिजॉईंडर उभय पक्षांचा लेखी तसेच तोंडी युक्तीवाद आणी तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.1 ते 4 चा ग्राहक आहे काय ? होय
2) प्रस्तूत तक्रारीतील वाद हा ग्राहक वाद या संज्ञेत मोडतो काय ? नाही
3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. तक्रारदारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्या नंदनवन विंग 1 हया फ्लॅटस्कीममधील फ्लॅट क्र एफ एफ 05, सर्व्हे क्र.156/1-ए, प्लॉट क्र.1, मधील आराजी 26.85 चौ.मी. अविभाजीत हिस्स्यासह बुक केला. फ्लॅटची एकूण किंमत रू.13,01,000/- ठरली होती. तक्रारकर्त्याने बुकींग रकमेपोटी दिनांक 25/12/2012 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 यांना रू.1,90,000/- धनादेशाद्वारे अदा केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिनांक 15/06/2013 रोजी रू.50,000/-, दिनांक 20/6/2014 रोजी रू.25,000/- व दिनांक 21/4/2015 रोजी रू.1 लाख विरूध्द पक्ष क्र.1 यांना रोख दिले. याबाबत तक्रारकर्त्याने पावत्या प्रकरणात दाखल केल्या आहेत. यावरून तक्रारकर्त्याने एकूण रू. 3,65,000/- विरूध्द पक्ष यांना अदा केले असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 ः-
6. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की, वर नमूद फ्लॅट विकत घेण्याकरीता तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये दिनांक 28/4/2015 रोजी लेखी करारनामा झाला. सदर करारनाम्यामध्ये वरील फ्लॅटची तसेच प्लॉटमधील अविभाजीत हिस्स्याची एकूण किंमत रू.13,1000/- ठरली होती व वरील फ्लॅटचे विक्रीपत्र करून ताबा हस्तांतरीत करण्याची मुदत दिनांक 30/4/2016 पावेतो ठरविण्यांत आली होती. परंतु तक्रारकर्त्याने या मुदतीपूर्वीच दिनांक 6/2/2016 रोजी अधिवक्त्यामार्फत विरूध्द पक्ष यांना नोटीस पाठवून सदर सदनिकेची नोंदणी स्वतःच रद्द करून भरलेली संपूर्ण रक्कम रू.3,65,000/-,त्यावर दिनांक 25/12/2012 पासून 18 टक्के व्याजासह विरूध्द पक्षांकडे मागणी केली,असे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. प्रस्तूत तक्रारअर्जातदेखील तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम भरणा करून विरूध्द पक्ष यांचेकडून सदनिकेचे विक्रीपत्र करून घेवून ताबा मिळणेबाबत विनंती केली नसून केवळ भरलेल्या रकमेचा व्याजासह परतावा मागितलेला आहे. त्यामुळे प्रस्तूत वाद हा वसुली दावा (Mony Claim) असून तो ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ‘ग्राहकवाद’ या संज्ञेत मोडत नाही. त्यामुळे सदर वाद हा ग्राहक वाद नसल्याने मंचास या वादावर निर्वाळा देण्याचे अधिकारक्षेत्र नाही व तक्रारकर्त्याला उचीत न्यायासनासमोर सदर वादावर दाद मागण्याची मुभा आहे, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 द २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.42/2016 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रारखर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 24/08/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष