तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले ः- एकतर्फा.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 27/03/2018 रोजी घोषीत )
1. तक्रारदार हे सामनेवाले यांचे सदस्य झाले. तक्रारदाराना सदस्य करतांना सामनेवाले यांनी ज्या सुविधा व सोयी सदस्याला देण्याचे कबुल केले होते, परंतू सामनेवाले यांनी त्याबाबत शब्द न पाळल्यामूळे तक्रारदारानी त्याची सदस्यता रद्द करून, भरलेली रक्कम परत मिळण्याकरीता ही तक्रार दाखल केली. सामनेवाले यांना मंचाची नोटीस दि. 09/01/2017 ला प्राप्त झाल्याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ट्रॅक रिपोर्टवरून स्पष्ट होते. परंतू, सामनेवाले मंचात उपस्थित झाले नाही व लेखीकैफियत सुध्दा सादर केली नाही. सबब, सामनेवाले यांचेविरूध्द दि. 20/02/2017 ला एकतर्फा प्रकरण चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले यांनी तक्रारदाराना त्यांनी जिंकलेले बक्षीस प्राप्त करण्याकरीता दि. 03/01/2016 ला बोलाविले व सामनेवाले यांच्या सुट्टीकालीन असलेल्या सुविधाबाबत व व्यायाम शाळेबाबत माहिती दिली. तक्रारदाराकडून सामनेवाले यांनी रू. 1,43,000/-,व हप्त्याची अतिरीक्त रक्कम म्हणून रू. 11,833/-,प्राप्त केले. सामनेवाले यांनी तक्रारदाराना कायम सदस्यताबाबत कार्ड दिले नाही. तसेच, संलग्न असलेल्या हॉटेलबाबत यादी दिली नाही. तक्रारदारानी हॉटेलकरिता नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असता, तक्रारदार यांची सदस्यता अस्थायी असल्यामूळे त्यांना ती सुविधा उपलब्ध नाही असे कळविण्यात आले. तक्रारदारांना व्यायाम शाळेबाबत सुध्दा कार्ड पाठविण्यात आले नाही व त्यामुळे तक्रारदार त्या सुविधेचा उपभोग घेऊ शकले नाही. तक्रारदारांनी चौकशी केली असता, त्यांना सामनेवाले यांनी फसविल्याचे लक्षात आले. सबब, तक्रारदारानी त्यांनी भरलेली रक्कम परत मागीतली. त्यांनी नोटीस सुध्दा पाठविली. परंतू, सामनेवाले यांनी रक्कम परत केली नाही. सबब, ही तक्रार दाखल करून रू. 1,43,000/-,आणि रू. 11,833/-,ची मागणी केली. तसेच नुकसान भरपाईकरीता रू. 4,00,000/-,व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 50,000/-,अशी मागणी केली. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे तक्रारीसोबत सादर केली.
3. तक्रारदारानी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद सादर केला. तक्रारदार यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. तक्रारदारांनी रू. 1,43,000/-,भरल्याबाबत पावती सादर केलेली आहे. परंतू, रू. 11,833/-,भरल्याबाबत पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार दि. 03/01/2016 ला रक्कम अदा करून, सामनेवाले यांचे सदस्य झाले. तक्रारदारानी दाखल केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे हॉटेलमधील वास्तव्याकरीता प्रवासाच्या दिनांकापूर्वी 42 ते 45 दिवसा अगोदर विनंती करणे आवश्यक आहे. तसेच, व्यायाम शाळेकरीता सदस्याला कार्ड कामकाजाच्या 42 ते 45 दिवसांत प्राप्त होईल असे नमूद आहे. तक्रारदारानी त्यांची दुबई येथे दि. 23/03/2016 ला हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याकरीता दि. 06/01/2016 ला पत्र दिले. सामनेवाले यांनी त्याचदिवशी पत्राला जबाब दिला व तक्रारदारांना कळविले की, सदस्य झाल्यानंतर त्यांचे कार्ड अॅक्टीव्हेट करण्याकरीता कामकाजाचे 30 दिवस आवश्यक आहे व त्यानंतर ते हॉटेलमधील वास्तव्याकरीता विनंती करू शकतात. परंतू, सामनेवाले यांनी ही अट किंवा माहिती तक्रारदाराना दिल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. परंतू त्यामध्ये सदस्याचे कार्ड अॅक्टीव्हेट करण्याकरीता कामकाजाच्या 30 दिवसांची आवश्यकता आहे याबाबत कुठेही नमूद नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी हॉटेलमधील वास्तव्याकरीता नोंदणी करतांना आवश्यक असलेली अट किंवा माहिती तक्रारदाराना सांगीतली नाही व ही बाब दडवून ठेवली. सामनेवाले यांनी जर ही बाब तक्रारदाराना सांगीतली असती किंवा अटी व शर्तीमध्ये नमूद केली असती तर तक्रारदारानी दुबईकरीता दि. 23/03/2016 चा कार्यक्रम आखला नसता. त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.
5. सामनेवाले यांच्या अटी व शर्तीप्रमाणे व्यायाम शाळेकरीता सदस्याला कामकाजाच्या 42 ते 45 दिवसांत सुविधा उपलब्ध होते. त्याप्रमाणे तक्रारदाराना हि सुविधा दि. 03/03/2016 किंवा 09/03/2016 ला प्राप्त होणार होती. परंतू, तक्रारदारानी त्यापूर्वीच दि. 22/02/2016 ला सदस्यता रद्द करण्याबाबत नोटीस दिली. त्यामुळे आमच्या मते तक्रारदार यांची तक्रार व्यायाम शाळेबाबत कराराप्रमाणे नसल्याचे दिसून येते. त्यामुळे, या करीता ते नुकसान भरपाईस पात्र नाहीत.
6. सामनेवाले यांच्या दि. 25/02/2016 च्या पत्राप्रमाणे रिफंड शक्य आहे. त्यामुळे आमच्या मते तक्रारदार हे भरलेली रकमेपैकी काही रक्कम परत प्राप्त करण्यास पात्र आहेत. तसेच, सामनेवाले यांनी त्यांना संपूर्ण माहिती न देऊन तक्रारदार यांना झालेल्या मनस्तापाकरीता नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. तक्रारदार यांची मागणी मंजूर करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण दिसून येत नाही. सामनेवाले यांना तक्रारदाराना सदस्य करतांना प्रशासकीय हालचाली कराव्या लागल्या व आमच्या मते त्याकरीता सामनेवाले हे काही रकमेस पात्र ठरतात. आमच्या मते तक्रारदारानी भरलेल्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम सामनेवाले यांना प्रशासकीय खर्चाकरीता देणे योग्य होईल.
7. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
8. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 478/2016 ही अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी रू. 1,43,000/-,(एक लाख त्रैचाळीस हजार),मधून 10 टक्के रक्कम कपात करून, उर्वरीत रक्कम तक्रारदारांना दि. 22/02/2016 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याजासह दि. 30/04/2018 पर्यंत अदा करावी.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाकरीता रू. 20,000/-,(वीस हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-,(पाच हजार) दि.30/04/2018 पर्यंत अदा करावे.
4. उपरोक्त क्लॉज 2 व 3 मधील नमूद रक्कम दि. 30/04/2018 पर्यंत अदा न केल्यास, त्या रकमेवर दि. 01/05/2018 पासून द.सा.द.शे 15 टक्के व्याज लागु राहिल.
5. तक्रारदार यांच्या मंजूर न झालेल्या मागण्या फेटाळण्यात येतात.
6. आदेशाची प्रत उभयपपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
7. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
npk/-