::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/12/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा पुरविल्याचे नमूद करुन, दाखल केलेली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 2 चा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, विरुध्द पक्ष क्र. 2 चा पुरावा, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्ष क्र. 2 चा तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन करुन खालीलप्रमाणे निर्णय पारित केला.
2) सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द ‘ विना लेखी जबाब ’ असा आदेश मंचाने पारित केला.
3) तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त विरुध्द पक्ष क्र. 1 कडील वाहन खरेदी बील यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 कडून, विरुध्द पक्ष क्र. 2 निर्मीत वाहन शक्तीमान मॉडेल नं. 540 हा ट्रॅक्टर, दिनांक 18/02/2013 रोजी खरेदी केला आहे. म्हणून तक्रारकर्ते, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
4) तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, सदर वाहन खरेदी करतांना विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 चे या वाहनाबद्दलचे माहितीपत्रक दाखविले होते. त्यात ट्रॅक्टरची गॅरंटी पाच वर्षाची आहे व हया दरम्यान ट्रॅक्टरला काही झाले तर दुरुस्ती अथवा बदलून देण्याची हमी दर्शविली आहे. तसेच पाच वर्षापर्यंत मोफत सर्व्हिसिंग होईल, ईतर सुटे पार्टस विरुध्द पक्ष क्र. 1 कडेच मिळतील, अशी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी हमी घेतली होती. पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स व ईतर वाहना संबंधीत कर, आर.टी.ओ. पासींग-रजिष्ट्रेशन इ. खर्च विरुध्द पक्ष क्र. 1 करतील, हा खर्च ट्रॅक्टरच्या किंमती- मध्ये समाविष्ठ आहे, असे विरुध्द पक्षाने सांगितले होते. विरुध्द पक्षाने स्थानिक प्रतिनिधीला बोलावून ट्रॅक्टर घेण्यासाठी फायनान्स देण्याचे मान्य करुन, त्याबद्दलची कागदी कार्यवाही, सहया तक्रारकर्त्याकडून करुन घेतल्या होत्या. परंतु त्याचे दस्त तक्रारकर्त्यास पुरवले नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी ट्रॅक्टरच्या किंमती व्यतिरीक्त व्हॅट कर, तक्रारकर्त्याकडून आकारला आहे.
5) तक्रारकर्त्याच्या हया युक्तिवादावर विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे कोणतेही नकारार्थी कथन रेकॉर्डवर उपलब्ध नाही. तसेच याबाबत विरुध्द पक्ष क्र. 2 चा युक्तिवाद असा आहे की, ते सदर वाहनाचे ऊत्पादक आहे, विरुध्द पक्ष क्र. 1 हे त्यांचे वाशिम जिल््हयासाठीचे डिलर आहेत. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदर ट्रॅक्टर ऊत्पादीत करुन, विरुध्द पक्ष क्र. 1 ला विकले आहे. सदर ट्रॅक्टरच्या मॅन्युअल बुक मध्ये वाहनाची वॉरंटीबद्दल अटी, शर्ती नमूद आहे. त्यानुसार वॉरंटी ही, दिड वर्ष किंवा 1500 Hours whichever is earlier from the date of sale, अशी आहे. वॉरंटी कालावधी limited to 24 months from the month of manufacturing, अशी आहे. त्याचप्रमाणे सदरहु वॉरंटी मध्ये ट्रॅक्टरची दुरुस्ती, सुटे भाग बदलून देणे, जर सदरहु सुटे भाग दोषयुक्त असतील तर, निःशुल्क दुरुस्ती होते. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी ट्रॅक्टर विकतांना तक्रारकर्ते यांना जे आश्वासन दिले असतील ते विरुध्द पक्ष क्र. 1 वरच बंधनकारक आहे कारण याबद्दल विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 मध्ये कोणताही करार झालेला नाही. मोटर वाहन नियमानुसार, मालकाने वाहन हे संबंधिताकडे नोंदवून, वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. तसेच वाहन खरेदी करतांना व्हॅट हे तक्रारकर्त्यालाच भरावे लागते.
6) यावर मंचाचे असे मत आहे की, उभय पक्षाने सदर वाहनाचे ऑपरेटर मॅन्युअल हे दस्त रेकॉर्डवर दाखल केले नाही व तक्रारकर्ते यांची याबद्दल तक्रारच अशी आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी वरील आक्षेपाबद्दलचे, वाहन खरेदी करतांना, तोंडी आश्वासन दिले होते. त्यामुळे तक्रारकर्ते यांचे वरील आक्षेप सिध्दतेअभावी विचारात घेता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्ते यांचे पुढे असे कथन आहे की, सदर ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर ताब्यात घेतला व जातांनाच तो दोन वेळा बंद पडला, इंजिनमधून आवाज व धूर निघत होता, त्याचे पार्टस् खिळखिळे होते. त्यामुळे तो विरुध्द पक्षाकडे दुरुस्तीसाठी 3-4 दिवस जमा ठेवावा लागला, त्यापोटी दुरुस्तीचे बिल तक्रारकर्त्याने रुपये 1,750/- दिले. परंतु त्यानंतरही ट्रॅक्टरमध्ये पुन्हा दोष ऊत्पन्न झाला व एप्रिल महिण्याच्या शेवटी पुन्हा दुरुस्तीसाठी विरुध्द पक्षाकडे आणावा लागला. मे-2013 मध्ये पुन्हा ट्रॅक्टर दुरुस्तीला विरुध्द पक्षाकडे आणला असता, त्यांनी सर्व्हिस सेंटर बंद झाल्याचे सांगितले व विक्री नंतरची सेवा पुरविली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी उपयोगी पडला नाही व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दोषयुक्त ट्रॅक्टर, तक्रारकर्त्याला विकला. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासींग व रजिष्ट्रेशन, इन्शुरन्स बाबत कोणतीही माहिती व त्याबद्दलचे दस्त न दिल्यामुळे ट्रॅक्टर गावाच्या बाहेर आणता येत नाही, म्हणून तक्रारकर्त्याचे नुकसान होत आहे.
यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते यांनी सदर ट्रॅक्टर कधी व कोणत्या तक्रारीमुळे विरुध्द पक्षाकडे दुरुस्तीसाठी टाकले, याबद्दलचे दस्त रेकॉर्डवर दाखल नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 यांना सदर प्रकरणाची नोटीस प्राप्त होवूनही ते मंचासमोर आवश्यक ते दस्त घेवून हजर झाले नाही, त्यामुळे याचा विरुध्द अर्थ मंचाने काढला आहे. मात्र सदर ट्रॅक्टर दोषयुक्त आहे, याबद्दल तक्रारकर्त्याने कोणतेही तज्ञ मत रेकॉर्डवर दाखल केले नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर ट्रॅक्टर वॉरंटी कालावधीत निःशुल्क दुरुस्त करुन दिले नाही, असे गृहीत धरुन, त्यापोटीची नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळून रक्कम रुपये 8,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास अदा केल्यास, ते न्यायोचित होईल, या निष्कर्षावर मंच आले आहे. मात्र विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्याबद्दलचे आक्षेप सबळ पुराव्याअभावी नामंजूर करण्यात येतात. सबब पुढीलप्रमाणे, अंतिम आदेश पारित करण्यात येतात.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकतर्यास, सेवा न्युनतेमुळे शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह रक्कम रुपये 8,000/- ( अक्षरी रुपये आठ हजार फक्त ) द्यावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri