- नि का ल प त्र -
(दि.03-10-2024)
व्दारा : श्री. स्वप्निल द.मेढे, सदस्य,
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना गुंतवलेल्या रक्कमेवर वार्षिक व्याज न दिल्यामुळे तक्रारदार यांना झालेल्या मानसिक,शारिरीक व आर्थिक नुकसानीपोटी प्रस्तुत तक्रार अर्ज आयोगात दाखल केला आहे.
तक्रार अर्जाचा सारांश तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे थोडक्यात असा-
तक्रारदार हे सरकारी सेवेतुन निवृत्त झालेले आहेत. निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, वृध्दापकाळात कुटूंबाचा उदरनिर्वाह तसेच औषधोपचाराचा खर्च भागावा म्हणून निवृत्ती वेतनातील बचत केलेल्या रकमेतील काही रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे मुख्य डाकघर, रत्नागिरी या ठिकाणी पाच वर्षाच्या कालावधीसाठी दि.07/04/2018 रोजी प्रत्येकी एक लाख प्रमाणे टर्म डिपॉझीटमध्ये रक्कम रु.5,00,000/- गुंतवली होती. त्याचा कालावधी दि.07/04/2023 अखेर होता. तक्रारदार यांनी सदर रक्कम गुंतवणूक करताना सामनेवालांच्या सुचनांनुसार आवश्यक ती सर्व माहिती फॉर्ममध्ये भरुन सदरची रक्कम गुंतवली होती. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | टर्म डिपॉझिट खाते क्र. | रक्क्म रुपये |
1 | 4013784896 | 1,00,000/- |
2 | 4013795557 | 1,00,000/ |
3 | 4013800695 | 1,00,000/ |
4 | 4013813060 | 1,00,000/ |
5 | 4013814425 | 1,00,000/ |
उपरोक्त टर्म डिपॉझिट अकाऊंटची मुदत दि.07/04/2023 रोजी संपल्यानंतर तक्रारदार दि.08/04/2023 रोजी सामनेवाला यांचे हेड पोष्ट ऑफिस, रत्नागिरी येथे गेले. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारास केवळ मुद्दलाची रक्कम तक्रारदाराला परत दिली. तक्रारदार यांनी व्याजाच्या रकमेबाबत सामनेवाला यांना विचारणा केली असता डिजीटल पेमेंट खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास उशिर होतो असे कारण सांगण्यात आले.त्यानंतर तक्रारदार यांनी दि.11/04/2023 रोजी व्याजाच्या रकमेबाबत सामनेवाला यांचेकडे चौकशी केली व व्याजाची रक्कम तक्रारदाराचे खातेवर जमा होणेबाबतचा विनंती अर्ज दिला. त्यानंतर दि.19/04/2023 रोजी तक्रारदाराने सामनेवालाकडे पुन्हा चौकशी केली असता तक्रारदारास सामनेवालाकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. तदनंतर तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी क्लोजर फॉर्म भरुन घेतला. त्यानंतर तक्रारदारास व्याजाची रक्कम रु.1,90,195/- दि.11/04/2023 रोजी अदा केली. सदर व्याजाची रक्कम वार्षिक स्वरुपात तक्रारदार यांचे खात्यामध्ये जमा करणे सामनेवालावर बंधनकारक होते. तक्रारदाराची व्याजाची रक्कम त्या त्या वेळी जमा केली असती तर त्या रकमेवर तक्रारदारास व्याजाची रक्कम प्राप्त झाली असती. परंतु तसे न झाल्यामुळे तक्रारदारास बचत खात्यामध्ये जमा होणा-या व्याजाच्या रकमेवर व्याज मिळाले असते. परंतु सामनेवालांच्या चुकीमुळे तक्रारदाराचा मुलभूत हक्क हिरावला गेला. परिणामत: तक्रारदाराने रक्कम रु.1,90,195/- या रक्कमेवर मिळणा-या व्याजाची रक्कम मिळण्यासाठी दि.16/05/2023 रोजी सामनेवाला क्र.1 यांना स्मरणपत्राव्दारे विनंती अर्ज दिला. त्यानंतर तक्रारदाराने दि.22/05/2023 रोजी डाक अदालतीसाठी सामनेवाला क्र.2 यांच्या कार्यालयाकडे अर्ज दिला होता. सदर अर्जावर सामनेवाला क्र.2 यांनी दि.26/05/2023 रोजीचे तक्रारदारास पत्र देऊन दि.01/06/2023 अखेर केवळ रु.625/- एवढी तटपुंजी रक्कम व्याज म्हणून देऊ केली. सदरची रक्कम मान्य नसलेने तक्रारदाराने दि.01/06/2023 रोजी लोक-अदालतीसाठी अर्ज केला.
2. वास्तविक तक्रारदाराने जेव्हा सामनेवालाकडे पाच वर्षाच्या कालावधीसाठी रक्कम गुंतविली होती त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदाराने फॉर्ममध्ये भरलेली माहिती तपासून तक्रारदाराचे मुदत ठेवीचे खाते उघडण्यात आले होते. सदर रक्कम गुंतवणूक करुन घेताना सामनेवाला यांनी Post Office saving Bank (CBC) Mannual मधील 92(b) प्रमाणे Appendix-VI फॉर्म तक्रारदाराकडून भरुन घेणे आवश्यक होते. त्याचवेळी सामनेवाला यांनी रक्कम गुंतवणूक करताना एसबी-7 चा फॉर्म भरुन दिल्यावर व्याजाची रक्कम मिळेल असे तक्रारदारास सांगितले असते तर तक्रारदाराने एसबी-7 फॉर्म त्याचवेळी भरुन दिला असता. मात्र सामनेवाला यांनी तसे केले नाही. Post Office saving Bank (CBC) Mannual मधील 16(b)(1) व 16(b)(2) नुसार जनतेला योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांचा कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. तक्रारदार यांनी दि.07/04/2018 पासून 5 वर्षाकरिता रक्कम रु.5,00,000/- गुंतवली होती. त्यावर द.सा.द.शे.7.4 दराने व्याज जमा करणे आवश्यक होते. परंतु सदरची रक्कम तक्रारदाराच्या खात्यामध्ये वेळेत जमा न केल्याने तक्रारदारास वर्षाला रक्कम रु.13,200/- प्रमाणे पाच वर्षाचे एकूण रक्कम रु.66,000/- इतक्या रक्कमेचे नुकसान झालेले आहे. तक्रारदाराने गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक स्वरुपात व्याज अदा न करता केवळ मुदतीचा कालावधी गृहीत धरुन तक्रारदारास व्याजाची रक्कम रु.1,90,195/- अदा केले आहे. अशाप्रकारे सामनेवाला यांनी केलेल्या आर्थिक नुकसानीपोटी व सेवेतील त्रुटी या कारणास्तव सदरची तक्रार दाखल केली आहे.सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करून सामनेवाला यांचेकडून तक्रारदारास दि.07/04/2018 ते 07/04/2023 या कालावधीतील व्याजावरचे व्याज रक्कम रु.66,000/- तक्रारदारास देण्याबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- सामनेवालाकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे तक्रारदाराने पोष्ट मास्तर यांचेकडे तसेच डाकघर अधिक्षक यांचेकडे केलेला दि.11/04/23 रोजीचा अर्ज, सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदाराने दिलेले दि.16/05/23 रोजीचे स्मरणपत्र, डाक अदालतसाठी अर्ज, अधिक्षक यांचे दि.26/05/23 रोजीचे पत्र व ऑर्डर, डाक अदालतसाठी दि.01/06/23 रोजीचा जोडअर्ज, डाकघर अधिक्षक यांचे दि.12/6/23 रोजीचे पत्र, व तक्रारदाराने डाकघर अधिक्षक यांना दि.16/08/23 रोजी दिलेले पत्र, डाकघर अधिक्षक यांचे दि.18/08/23 रोजीचे पत्र व निर्णय, तक्रारदाराकडील पाच टर्म डिपॉझिट खात्यांची पासबुक्स, पोष्टाचे POSB (CBS ) Mannual, पोष्टाच्या कर्मचा-याने केलेल्या कॉलचे स्क्रिनशॉट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.16 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.18 कडे अधिक सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.19 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.28 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सदर सामनेवाला क्र.1 व 2 हे त्यांचे वकीलामार्फत आयोगासमोर हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.14 कडे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 पुढे कथन करतात की, तक्रारदाराची दि.07/04/2018 रोजी सामनेवाला क्र.1 यांचे कार्यालयात रक्कम रु.1,00,000/- प्रमाणे एकूण रु.5,00,000/- ची 5TD खाती उघडली होती. त्यावेळी व्याजाचा दर द.सा.द.शे.7.4% इतका होता. 5TD खात्यावरील वार्षिक देय व्याज देण्याबाबतची नियमावली पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक (CBS)मॅन्युअल स्पेशल एडिशन-2020 मधील नियम क्र.92 (a) मध्ये नमुद केलेले आहे. त्यानुसार (i)TD वरील देय व्याज FINACLE CBS ॲप्लिकेशन व्दारे दये तारखेला मोजले जाईल आणि जर ठेवीदाराने लेखी आदेश/स्थायी सुचना (standing instruction) दिलेली असेल तर ते ग्राहकाच्या बचत खात्यात जमा केले जाईल किंवा (ii) देय तारखेला TD Sundry Office खात्यात जमा केले जाईल आणि खातेदार ज्यावेळी ते व्याज निकासी करण्यासाठी येईल त्यावेळी बचत खात्यातील रकमेची निकासी करण्यासाठीचा (SB-7) फॉर्म भरुन घेऊन व्याजाची रक्कम खातेदार यांना अदा केली जाईल. म्हणजेच TD खात्यावरील देय व्याज हे बचत खात्यात जमा करुन मिळविणे किंवा काऊंटरवर निकासी फॉर्म सादर करुन निकासी करणे ही जबाबदारी नियमानुसार पूर्णत: खातेदार यांची आहे. परंतु तक्रारदार यांनी 5TD खाती उघडण्यासाठीचे फॉर्म भरताना त्यांच्या 5TD खात्यांवरील वार्षिक व्याज त्यांच्या SB खात्यात जमा करण्यासंदर्भात खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये पॉईंट क्र.16 येथे तसेच इतर कोणत्याही ठिकाणी स्थायी सुचना (Standing Instruction) दिलेली नव्हती किेंवा तसा कोणताही वेगळा अर्ज दिलेला नव्हता अथवा पैसे काढण्याचा फॉर्म SB-7 भरुन दिलेला नव्हता. तसेच पोस्ट ऑफिस सेव्हींग बँक (CBS)मॅन्युअल, स्पेशल एडिशन-2020 च्या नियम क्र.91(3) नुसार पेमेंटसाठी देय असलेली व्याजची रक्कम खातेदार यांनी काढली नाही तर या व्याजाच्या रकमेवर कोणतेही व्याज देय असणार नाही. तसेच तक्रारदार यांना देण्यात आलेल्या 5TD च्या पासबुकावर पहिल्याच पानावर “ Yearly Interest Payable (approx) रक्कम रु.7,607/- असा तपशील नमुद आहे. तसेच पहिली दोन वर्षे तक्रारदार यांनी 5TD च्या पासबुकाची प्रिंट काढून घेतलेली आहे. त्यामध्ये व्याज जमा झालेचे नमुद आहे. सदरची बाब तक्रारदार यांना समजलेली होती मात्र तक्रारदार यांनी सदरची रक्कम काढून घेतली नाही. सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारास 5TD खात्यांवरील व्याजाची रक्कम दि.08/04/2023 रोजी खाती बंद केलेल्याच दिवशी जमा केले नाही. ती व्याजाची रक्कम दि.19/04/2023 रोजी रक्कम रु.1,90,195/- तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आले. सामनेवाला यांनी सदरची चुक मान्य करुन विलंबामुळे तक्रारदार यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाईची रक्कम रु.625/- तक्रारदाराला मंजूर करुन अदा करण्यात आली आहे. तक्रारदार यांना जर व्याज बचत खात्यात जमा व्हावे असे वाटत होते तर त्याकरिता काय कार्यवाही करावी लागेल याची माहिती तक्रारदाराने विचारुन घेणे आवश्यक होते. तसेच तक्रारदार यांच्या नावे पोस्ट ऑफिमध्ये MIS/SCSS या स्किममध्ये सुध्दा रक्कम गुंतवलेली आहे. सदर खात्यावरील व्याजाची रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बचत खात्यात व्याज रक्कम जमा करण्यासाठी तशी सूचना दयावी लागते याची माहिती तक्रारदार यांना आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी व्याजावर व्याज मिळण्यासाठी केलेली मागणी ही नियमबाहय आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 व 2 यांनी केली आहे.
5. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.15 कडे एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक (CBS) मॅन्युअल एडिशन-2020 मधील नियम क्र.92 (a) ची प्रत, तक्रारदाराचे 5TD चे उघडलेल्या एकूण 5 खात्यांचे भरलेले फॉर्म, पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक (CBS) मॅन्युअल एडिशन-2020 मधील नियम क्र.91, 91(3), 16(b)(1), 16(b)(2) ची प्रत, विभागीय कार्यालय यांचेकडील दि.26/05/2023 रोजीचे पत्र क्र.L-20/UCP Sanction/01/PSG/2023-24 ची प्रत, तक्रारदाराचे बचत खाते क्र.3846081042 ची लेजरची प्रत, पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक (CBS)मॅन्युअल एडिशन-2020 मधील नियम क्र.93 ची प्रत, विभागीय कार्यालय यांचेकडील दि.26/05/2023 रोजीचे पत्र क्र.LSB/Complaint/STD int/PSG/2023-24/ दातेड ची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.17 कडे तक्रारदार यांनी उघडलेल्या 5 वर्षीय मुदत ठेव खात्याचा तपशील दाखल केला आहे. नि.23 कडे 2 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे काढलेल्या खात्याचा तपशील, सामनेवाला यांना खातेदारासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शनची प्रत दाखल केले आहेत. नि.24 कडे सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेले म्हणणे हेच सामनेवाला क्र.2 यांचे समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल केली आहे.नि.25 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.27 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली. नि.29 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या आयोगाच्या विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यावर कारणमिमांसेसहीत नमूद निष्कर्ष खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध निर्माण होतात काय ? | होय |
2 | सामनेवालांनी तक्रारदारांना टर्म डिपॉझीटच्या रक्कमेचे व्याज वेळेत न देऊन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | सामनेवालाकडून झालेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा -
7. मुदृा क्रमांकः 1 – तक्रारदाराने नि.6/11 कडे दाखल केलेल्या पासबुकाचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.07/04/2018 रोजी प्रत्येकी रक्क्म रु.1,00,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.5,00,000/- टर्म डिपॉझीट ठेवले होते. सदर गुंतवणूकीचा कालावधी पाच वर्षाचा होता व त्याची मुदत दि.07/04/2023 रोजी संपलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेले तक्रारदाराचे पत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.11/04/2023 रोजी टर्म डिपॉझिटची मुद्दल जमा केली असून व्याजाची रक्कम जमा केली नसले बाबत कळविलेचे दिसून येते. सदरची बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून त्याबाबत उभयतांमध्ये कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब मुदृा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
8. मुदृा क्रमांक 2 : – तक्रारदार यांनी त्यांचे निवृत्ती वेतनातून सामनेवाला यांचेकडे दि.07/04/2018 रोजी टर्म डिपॉझीटचे खाते क्र.4013784896, 4013795557, 4013800695, 4013813060, 4013814425 अन्वये प्रत्येकी रक्कम रु.1,00,000/- चे एकूण रक्कम रु.5,00,000/- चे टर्म डिपॉझीटचे खाते उघडलेचे तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.6/11 कडील पासबुकाच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. सदरच्या टर्म डिपॉझीटची मुदत दि.07/04/2023 अखेर होती व सदरची खाती मुदतीनंतर दि.08/04/2023 बंद करण्यात आल्याचे दिसून येते. तसेच सदर डिपॉझिटवर द.सा.द.शे.7,608/- व्याज मिळणार असलेचे नमुद आहे. परंतु सदर ठेवींच्या मुदतीनंतर दि.08/04/2023 रोजी तक्रारदाराच्या सेव्हींग खात्यावर सदर ठेवींची मुद्दल रक्कम रु.5,00,000/- जमा केलेचे दिसून आल्याने तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.11/04/2023 रोजी पत्र पाठवून व्याजाबाबतची विचारणा केली असता, सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.19/04/2023 रोजी व्याजाची होणारी रक्कम रु.1,90,195/- अदा केलेले आहेत. तक्रारदार यांचे म्हणणेनुसार सामनेवाला यांनी सदर टर्म डिपॉझीटचे होणारे वार्षिक व्याज तक्रारदाराच्या बचत खातेवर जमा न केलेने तक्रारदारास सदर व्याजावर बचत खात्याचे व्याज मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे रक्कम रु.66,000/- इतके नुकसान झाले. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास व्याजाची रक्कम मुदत संपलेनंतर 11 दिवस उशिराने अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.3,00,000/- व व्याजाचे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.66,000/- सामनेवालाकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
9. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदाराचे टर्म डिपॉझीटच्या 5TD खात्यावरील वार्षिक देय व्याज देण्याबाबतची नियमावली पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक (CBS) मॅन्युअल स्पेशल एडिशन-2020 मधील नियम क्र.92 (a) मध्ये नमुद केले
नुसार
(i) TDवरील देय व्याज FINACLE CBS ॲप्लिकेशन व्दारे देय तारखेला मोजले जाईल आणि जर ठेवीदाराने लेखी आदेश/स्थायी सुचना (standing instruction) दिलेली असेल तर ते ग्राहकाच्या बचत खात्यात जमा केले जाईल किंवा
(ii) देय तारखेला TD Sundry Office खात्यात जमा केले जाईल आणि खातेदार ज्यावेळी ते व्याज निकासी करण्यासाठी येईल त्यावेळी बचत खात्यातील रकमेची निकासी करण्यासाठी (SB-7)फॉर्म भरुन घेऊन व्याजाची रक्कम खातेदार यांना अदा केली जाईल.
म्हणजेच TD खात्यावरील देय व्याज हे बचत खात्यात जमा करुन मिळविणे किंवा काऊंटरवर निकासी फॉर्म सादर करुन निकासी करणे ही जबाबदारी नियमानुसार पूर्णत: तक्रारदाराची होती. परंतु तक्रारदार यांनी 5TD खाती उघडण्यासाठीचे फॉर्म भरताना पॉईंट क्र.16 येथे तसेच खाते उघडण्याच्या फॉर्मवर इतर कोणत्याही ठिकाणी स्थायी सुचना (Standing Instruction) दिलेली नव्हती किेंवा तसा वेगळा अर्जही दिलेला नव्हता अथवा पैसे काढण्याचा फॉर्म SB-7 भरुन दिलेला नव्हता. त्याबाबतची माहिती तक्रारदाराने विचारुन घेणे आवश्यक होते. तसेच पोस्ट ऑफिस सेव्हींग बँक (CBS) मॅन्युअल, स्पेशल एडिशन-2020 च्या नियम क्र.91(3) नुसार पेमेंटसाठी देय असलेली व्याजची रक्कम खातेदार यांनी काढली नाही तर या व्याजाच्या रकमेवर कोणतेही व्याज देय असणार नाही. तसेच पहिली दोन वर्षे तक्रारदार यांनी 5TD च्या पासबुकाची प्रिंट काढून घेतलेली आहे. त्यामध्ये व्याज जमा झालेचे नमुद आहे. सदरची बाब तक्रारदार यांना समजलेली होती मात्र तक्रारदार यांनी सदरची रक्कम काढून घेतली नाही. सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारास 5TD खात्यांवरील व्याजाची रक्कम दि.08/04/2023 रोजी खाती बंद केलेल्या दिवशी जमा केले नाही. ती व्याजाची रक्कम दि.19/04/2023 रोजी रक्कम रु.1,90,195/- तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आले. सामनेवाला यांनी सदरची चुक मान्य करुन विलंबामुळे तक्रारदार यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाईची रक्कम रु.625/- तक्रारदाराला मंजूर करुन अदा करण्यात आली आहे.
10. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार, टर्म डिपॉझीटच्या वार्षिक व्याजाची रक्क्म बचत खात्यामध्ये जमा करणेसाठी तक्रारदाराने स्थायी सुचना (Standing Instruction) दिलेली नव्हती किेंवा तसा वेगळा अर्जही दिलेला नव्हता अथवा पैसे काढण्याचा फॉर्म SB-7 भरुन दिलेला नव्हता. परंतु तक्रारदाराचे वय 63 वर्षे विचारात घेता तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे वयोमानानुसार त्यांचेकडून स्थायी सुचना (Standing Instruction) देणेबाबत किेंवा वेगळा अर्ज देणेबाबत किेंवा पैसे काढण्याचा फॉर्म SB-7 भरुन देणेचे राहून गेले असेल. परंतु सामनेवाला यांचीही त्यांचे ग्राहकांच्या प्रती काही जबाबदारी आहेच. ती नाकारुन चालणार नाही. तसेच पोस्टाचे कर्मचारी हे शासनाचे कर्मचारी आहेत. त्यांनी ग्राहकांच्या हिताच्या गोष्टी ग्राहकांच्या निदर्शनास आणून दयायचे त्यांचे कर्तव्य होते. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास टर्म डिपॉझीटची दि.07/04/2023 रोजी मुदत संपल्यानंतर दि.08/04/2023 खाते बंद करुन तक्रारदाराचे बचत खातेवर टर्म डिपॉझीटची मुद्दल फक्त जमा केली व तक्रारदाराने व्याजाबद्दल विचारल्यावर दि.19/04/2023 रोजी व्याजाची रक्कम रु.1,90,195/- जमा केले आहेत. तसेच दि.26/05/2023 रोजीच्या सामनेवालांच्या विभागीय कार्यालयाच्या पत्र क्र.L-20/UCP Sanction/01/PSG/2023-24 चे अवलोकन करता असे दिसून येते की, सामनेवालांच्या कर्मचा-याकडून Rule 93 of POSB (CBS)Mannual Spl Edition 2020 चे तंतोतंत पालन केलेले नाही. सदरची चुक सामनेवाला यांचेकडून झालेबाबत सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून विलंबामुळे तक्रारदार यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाईची रक्कम रु.625/- मंजूर केलेचे कथन करतात. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्य ती माहिती न दिल्यामुळे व तक्रारदारास व्याजाची रक्कम विलंबाने दिल्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले ही सामनेवाला यांच्या सेवेतील त्रुटी असलेच्या या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुदृा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
11. मुदृा क्रमांक 3 : – वरील सर्व विवेचनांचा विचार करता हे आयोग या निष्कर्षाप्रत आले आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार जेव्हा टर्म डिपॉझीटची रक्कम गुंतवणेसाठी फॉर्म भरत होता त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्य ती माहिती भरुन घेणेसाठी सहकार्य करणे अपेक्षीत होते. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्य ते मार्गदर्शन केले नाही. तक्रारदाराने भरुन दिलेला फॉर्म दाखल करुन घेतला व त्यानुसार कार्यवाही केली. सामनेवाला यांनी POSB (CBS)Mannual Spl Edition 2020 मधील नियमानुसार व्याजाची आकारणी केलेली असलेने त्याच्या पलिकडे जाता येणार नाही. मात्र तक्रारदारास मुदतीनंतर डिपॉझीटची फक्त मुद्दल रक्कम अदा केली व तक्रारदाराचे मागणीनंतर 11 दिवसांनी सदर मुद्रदल रक्कमेच्या व्याजाची रक्कम तक्रारदारास अदा केली. सदर सामनेवाला यांच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारास साहजिकच मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे. परंतु तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी मागणी केलेली रक्कम रु.66,000/-व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटीची प्रत्येकी रक्कम रु.1,00,000/-ची मागणी ही अवास्तव व अवाजवी आहे. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.त्यामुळे मुदृा क्र.3चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
12. मु्दृा क्र.4:- वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
(2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना टर्म डिपॉझीटची व्याजाची रक्कम वेळेत न दिल्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-(र.रुपये वीस हजार मात्र) अदा करावेत.
(3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (र.रुपये पाच हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(5) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.