(मा.सदस्या अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना 11 वी प्रवेशाकामी भरलेले रक्कम रु.70,000/- व बस सेवेसाठी भरलेले रक्कम रु.8580/- असे एकूण रक्कम रु.78,580/- मिळावेत या रकमेवर दि.31/08/2009 पासून प्रत्यक्ष रक्कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.50,000/-मिळावेत व इतर न्यायाचे हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.18 लगत लेखी म्हणणे, पान क्र.19 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांनी युक्तीवाद केलेला नाही. सामनेवाला यांनी पान क्र.31 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला संस्थेमध्ये अँडमिशन घेतले होते व फि ची रक्कम जमा केली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत अँडमिशन फी व बस फी ची पावती दाखल केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे पान क्र.7 ची पावती यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराच्या मुलाने अटी व शर्तीं मान्य करुनच प्रवेश घेतलेला होता. प्रवेश घेतेवेळी आवश्यक असणारी सर्व फी अर्जदाराने भरणे आवश्यक होती याची कल्पना अर्जदारास होती व आहे. इतकेच नव्हे तर सदरची सर्व फी ही Non Refundable आहे याची कल्पना अर्जदार यांना आहे. अर्जदाराच्या मुलाने 11 वीत प्रवेश घेतल्यानंतर दि.24/11/2009 पावेतो शाळेत आलेला आहे व सदर काळात बस सेवा पुरवली आहे व बससेवेचा उपभोग केलेला आहे. अर्जदार यांच्या मुलाला शैक्षणीक सुखसुविधा साधने उपलब्ध करुन दिली आहेत. त्यात कुठलाही निष्काळजीपणा केलेला नाही व त्याबाबत अर्जदाराच्या मुलाने कुठलीही तक्रार कधीही केलेली नव्हती व नाही. तसेच अर्जदाराने दि.05/11/2009 रोजी सामनेवाला यांना अर्ज देवून त्यांना 11 वी सी.बी.एस.सी.चा कोर्स यापुढे कायम करावयाचा नाही असे स्वतःहून कळविले आहे. अर्जदाराने दि.23/11/2009 रोजी मुलाला एस एस सी बोर्डाला प्रवेश घ्यावयाचा असून XI CBSC Board कायम करावयाचे नसून ते बदलावयाचे आहे व त्यामुळे त्याबाबत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावे असा अर्ज शाळेला दिलेला आहे. दि.05/11/2009 व दि.23/11/2009 रोजीच्या अर्जांच्या अनुषंगाने सामनेवाला यांनी दि.24/11/2009 रोजी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलेले आहे. अर्जदाराने स्वतःहून शाळा व कोर्स बदलण्याबाबत सामनेवाला यांना कळविलेले आहे. सदरची बाब जाणूनबुजून मे.कोर्टापासून लपवून ठेवली आहे. सबब अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला ही शैक्षणीक संस्था असून सदर संस्थेत अर्जदार यांनी त्यांच्या मुलाचे अँडमिशन घेतले व त्यास आवश्यक फी व बस फी भरलेली आहे असे दिसून येत आहे. सदर फी भरल्याची बाब सामनेवाला यांनीही मान्य आहे. परंतु अर्जदाराने स्वतःहून शाळा व कोर्स बदलण्याबाबत सामनेवाला यांना कळविलेले आहे. याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.27 लगत दि.05/11/2009 रोजीचे अर्जदार यांचे पत्र व पान क्र.28 लगत दि.23/11/2009 रोजीचे अर्जदार यांचे पत्र दाखल केलेले आहे. पान क्र.27 व पान क्र.28 चा विचार होता अर्जदाराने स्वतःहून शाळा व कोर्स बदलण्याबाबत सामनेवाला यांना कळविलेले आहे ही बाब स्पष्ट होते.
तसेच या कामी सामनेवाला पान क्र.33 च्या दस्तऐवज यादीसोबत स्टुडंटस् डायरीची मुळ अस्सल नमुना प्रत दाखल केलेली आहे. सदर डायरीतील पान क्र.8 वरील Payment of Fees and Transport Fees मधील अ.नं.1 मध्ये Pupils seeking admission or leaving during the middle of the term must pay the fees for the full term. Fees once paid is not refundable. व अ.नं.2 मध्ये School bus fees has to be paid for the twelve months, failing which the student will not be allowed to avail the transport and transport fees once paid is not refundable, adjustable or transferable असा स्पष्ट उल्लेख आहे.
पान क्र.33 चे दस्तऐवज यादीसोबत दाखल स्टुडंटस् डायरीमधील पान क्र.8 वरील अ.नं.1 व 2 मध्ये नमूद अटी व शर्तींचा विचार होता, अर्जदार यांनी भरलेली फी व बस फी ही परत देण्यासाठी नाही (not refundable) आहे असा स्पष्ट उल्लेख दिसून येत आहे.
पान क्र.33 चे दस्तऐवज यादीसोबत दाखल स्टुडंट डायरीमधील पान क्र.8 वरील अ.नं.1 व 2 मध्ये फी ही परत देण्यासाठी नाही (नॉट रिफंडेबल) असे स्पष्टपणे दिसून येत आहे. अर्जदार यांनी स्वतःहून पान क्र.28 चे पत्राप्रमाणे दि.23/11/2009 रोजी पत्र देवून प्रवेश रद्द केलेला आहे म्हणजेच पहिले शैक्षणीक सत्र संपत आल्यानंतर अर्जदार यांनी स्वतःहून प्रवेश रद्द केलेला आहे असे स्पष्ट होत आहे. पान क्र.33 चे डायरीमधील पान क्र.8 वरील नियम क्र.1 व 2 नुसार अर्जदार यांना फी परत मागता येत नाही.
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे फी बाबत पान क्र.33 लगतचे सामनेवाला यांचे नियमानुसार योग्य तीच कारवाई केलेली आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे