1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे 1986 चे कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे आहे. 2 अर्जदार क्र. 1 व 2 स्थानिक चंद्रपूर येथील रहिवासी आहे. गै.अ. यांच्याकडे बचत खाते उघडून रक्कम जमा केली आहे. म्हणून अर्जदार दोन्ही हे गै.अ. यांचे ग्राहक आहे. 3 अर्जदार क्र. 1 याने खाते क्र. 104 प्रमाणे दि. 17/11/09 पासुन दि.25/1/2010 पर्यंत 12,900/- गै.अ. कडे जमा केले आहे. तर अर्जदार क्र. 2 यांनी खाते क्रं. 972 नुसार दि.18/02/09 पासुन 12/5/10 पर्यत रु. 13,080/- गै.अ. कडे जमा केले आहे. अर्जदाराने गै.अ.च्या कार्यालयामध्ये जाऊन दि. 22/12/10 रोजी मागणी केली. गै.अ. यांनी तपासणी करण्याचे कारण सांगून व आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे सांगून अर्जदारास परत पाठविले गै.अ. यांनी पञ येईल असे सांगीतले परंतु आजपावेतो रक्कम घेण्यासाठी लेखीपञ आले नाही. बराच कालावधी लोटल्यानंतर लेखी पञ आले नाही करीता अर्जदाराने दि. 4/7/2011 व 19/8/2011 ला लेखीपञ पाठवून खात्यामधील रक्कमेची मागणी केली. गै.अ. रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. गै.अ. कडे जमा असलेली रक्कम वेळेवर न देणे, चकरा मारायला लावणे ही बाब सेवेतील न्युनता आहे व अनुचित प्रथा सुध्दा आहे. गै.अ. यांच्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास ञास झाला आहे. मानसीक, शारीरीक ञास सुध्दा झाला आहे. अर्जदाराने दैनिक बचत खाते उघडून ठेव ठेवली गै.अ. यांनी रक्कम वेळेवर न देवून अर्जदाराचा विश्वासघात केला. गै.अ. विनाकारणाचे कारण सांगून रक्कम अडवून ठेवली आहे. अर्जदार क्र. 1 चे बचत खाते क्र. 104 अन्वये रक्कम 12900 हि दि. 17/11/10 पासुन 12 टक्के व्याजाने तसेच अर्जदार क्र. 2 चे खाते क्र. 972 अन्वये रक्कम 13080/- ही दि. 12/5/2010 पासुन 12 टक्के व्याजासह गै.अ. कडून देण्याचा आदेश व्हावा तसेच अर्जदार क्र. 1 व 2 यास प्रत्येकी शारीरीक, मानसीक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु. 5,000/- अशी सर्व रक्कम गै.अ. यांनी अर्जदारास दयावी, असा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. 4 अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 6 नुसार 6 झेरॉक्स व अस्सल दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोदणी करुन गै.अ.यास नोटीस काढण्यात आले. गै.अ. यांनी नि. 15 नुसार लेखीउत्तर दाखल केले. 5 गै.अ. यांनी नि. 12 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, हे म्हणणे अमान्य व खोटे आहे की, अर्जदार हे चंद्रपूरचे जरी रहिवासी आहेत व तरी त्यांनी गै.अ. कडे बचत खाते उघडून रक्क्म जमा केली आहे. हे म्हणणे खोटे असून अमान्य आहे की, अर्जदार हे गै.अ चे ग्राहक आहेत. अर्जदासराचे प्रस्तुत मामल्यात परिच्छेद क्र. 2 मधील मजकुर अंशतः खोटा व अंशतः बरोबर आहे. गै.अ. याना याबद्दल माहीती नाही की, अर्जदार क्र. 1 खाते क्र. 104 मध्ये दि. 17/11/09 पासुन दि. 25/1/10 पर्यंत 12,900/- रु. गै.अ. कडे जमा केले आहे. तसेच हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदार क्र. 2 यांने खाते क्र. 972 नुसार दि. 18/2/09 पासुन 12/5/2010 पर्यंत रु.13,080/- गै.अ. कडे जमा केले. हे सुध्दा खोटे आहे की, अर्जदाराने दि. 22/12/10 पूर्वी सदर रक्कमेची मागणी केली. याबद्दल वाद नाही की, गै.अ. याने अर्जदारांचे दोंन्ही खाते तपासणी केल्याचे सांगीतले व त्यांना पञ पाठवून कळविण्यात येईल असे सांगीतले. अर्जदार हें गै.अ. चे ग्राहक झाले नसल्यामुळे न्युनतापूर्ण सेवा देण्याचा प्रश्न उदभवत नाही. अर्जदाराने शारीरीक व मानसीक ञासापोटी मागणी केलेली रक्कम रु. 10,000/- व तक्रार खर्चापोटी रु. 5000/- अवास्तव चुकीचे निराधार व खोटे असल्यामुळे गै.अ.यास मान्य नाही. गै.अ. ने संस्थेचा कारभार आपल्या हाती घेण्यापूर्वीचे असून कागदपञ पडताळून पाहिल्याशिवाय या विषयावर शहानिशा झाल्याशिवाय गै.अ. यांना त्या बद्दलचा निर्णय घेणे शक्य नाही. अर्जदाराने केलेल्या सर्व मागण्या चुकीच्या व खोटया असुन या गै.अ. ला मान्य नाहीत. अर्जदाराचा अर्ज खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ. च्या खर्चासह खारीज करण्यात यावे. 6 गै.अ. यांनी लेखी बयानात अतिरिक्त बयान असे कथन केले आहे की, अर्जदार क्र. 2 श्री दिपक हे दैनिक आवर्त जमा खात्याच्या अभिकर्ता म्हणून अभिकर्ता संकेत क्र. 28 नुसार गै.अ. संस्थेचे काम करीत होता. गै.अ. चे संचालक मंडळ सदस्य सप्टेंबर 2010 मध्ये बदलले व नविन कार्यकारणी अस्तित्वात आली. सोसायटी चे काम दि. 8/9/10 आणि दि.3/11/10 पासुन हाती घेतले. लेखापरिक्षक श्री.डाखोरे यांनी ताळेबंद प्रमाणित केला होता, त्याचे वरुन संगणकातील अभिलेखावरुन तपासण्याचे प्रयत्न केले असता, अभिलेखात, खात्यात, दैनिक आवर्त जमा खाते, बचत खाते मध्ये अतिशय जास्त अनियमितता व विसंगती आढळून आली. यामुळे दिलेल्या रक्कमेत ताळमेळ करता येत नव्हता, व त्या रक्कमा एकमेकाशी जुळल्या नाही. नविन संचालक मंडळाने प्रमाणित लेखापरिक्षक श्री.एम.ए.रशिद यांचे कडून मार्च 2011 च्या दुस-या आठवडयापासुन सुरुवात करण्यात आले. 7 प्रमाणित लेखापरिक्षक श्री.एम.ए. रशिद यांनी दि. 11/10/11 रोजी दिलेल्या लेखा अहवाला वरुन असे स्पष्ट झाले की, अर्जदार क्र. 2 यांच्या खात्यात रक्कम रु. 7,772/- चा तोटा आहे (कमी आहे). अर्जदार क्र. 2 अभिकर्ता म्हणून असतांना असे दिसून आले की, त्याच्या खात्यावर रु.14,838/- शिल्लक जमा आहे. पण अर्जदार क्र. 1 च्या खात्यावर अभिकत्याचे 9 खातेदारांनी एकून रु.22,610/- ची मागणी केली आहे. ही तफावत मोठी आहे. अर्जदार क्र. 2 ने संस्थेचे प्रबंधक व इतर कर्मचा-यांशी संगणमत करुन ही धोखेबाजी केल्याचे दिसते. अर्जदार क्र. 1 व 2 दोघेही जबाबदार असुन चुकीचे आर्थिक व्यवहार केल्याबद्दल व पैसे न जमा करता खोटे रेकॉर्ड तयार केल्याबद्दल जबाबदार आहेत. अर्जदार क्र. 2 चे अभिकर्ता क्र. 28 या नात्याने त्याचे बचत खाते क्र. 972 ला गोठवण्यात आले असुन रक्कम रु.7,772/- चे विसंगतीचे समाधान होई पर्यंत त्यांना व इतर संबंधितांना देण्यात येवू शकत नाही. अर्जदार क्र. 2 हा अभिकर्ता असुन त्यांनीच अर्जदार क्र. 1 कडून आवर्त रक्कम जमा केली व संस्थेत स्वतःच्या नावाने जमा करुन वेळोवेळी उचल सुध्दा केली आहे. अर्जदार क्र. 1 ला कोणतेही रक्कम घेणे असल्यास ती रक्कम अर्जदार क्र. 2 कडून घ्यावी व यासाठी अर्जदार क्र. 2 पूर्ण स्वरुपात जबाबदार आहे. अर्जदाराचा अर्ज निराधार असून कायदयाच्या चौकटीत बसणारा नाही. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार बिनबुडाची व दिशाभूल करणारी असुन तथ्यहिन आहे. गै.अ ला झालेल्या बदनामी बद्दल अर्जदार क्र. 2 ला जबाबदार ठरवून त्याचे कडून रु. 20,000/- देण्याचे आदेश व्हावे. 8 अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्टार्थ नि. 20 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. गै.अ यांनी लेखीबयाना सोबत दस्तऐवज दाखल केले. तसेच नि. 19 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ यांनी दाखल केलेले दस्तऐवज शपथपञ आणि अर्जदाराच्या प्रतिनिधीने व गै.अ च्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 9 अर्जदार क्र. 1 व 2 यानी गै.अ सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर र.नं. 384 (यापुढे संक्षिप्त पंतसंस्था) यांचे कडे खाते उघडले असुन अर्जदार क्र. 1 चा खाता क्रं. 104 दि. 17/11/09 पासुन दि.25/01/10 पर्यंत रु. 12,900/- जमा झालेले आहेत. तर अर्जदार क्र. 2 चा बचत ठेव खाता क्र. 972 दि. 18/2/09 पासुन दि. 12/5/10 पर्यंत रु. 13,080/- जमा केले आहे. गै.अ यांनी अर्जदाराचे खाते बद्दल माहीती नसल्याचे म्हटले आहे. परंतु अतिरिक्त बयानात हे मान्य केले आहे की, अर्जदार क्र. 1 चा दैनिक बचत खात्या एजंट अर्जदार क्र. 2 हा आहे. अर्जदाराने दैनिक आवर्त जमा खात्यात जमा केलेली रक्कम आणि अर्जदार क्र. 2 याच्या खात्यातील रक्कम यामध्ये तफावत असुन त्यांनी उचल केल्यामुळे रक्कम देण्यात आली नाही. अर्जदार क्र. 1 याने दस्त अ- 1 वर दैनिक बचत योजना खाते क्र. 104 चे झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. सदर पासबुकाचे पाहणी केली असता एजंट म्हणून दिपक सावध अर्जदार क्र. 2 नमुद आहे. गै.अ यांनी अर्जदार क्र. 1 ची रक्कम दिली नाही, कारण की, त्याचे कडून दैनिक जमा केलेली रक्कम ही योग्य प्रकारे अर्जदार क्र. 2 च्या खात्यात भरणा केली नाही. त्यामुळे ही रक्कम गोठवून ठेवण्यात आली आहे. परंतु गै.अ पतसंस्थने अर्जदार क्र. 2 ला अभिकर्ता म्हणून नियुक्त केले, यामुळे त्याच्या कृत्या करीता मालक (Master) प्रातिनिधीक जबाबदारी आहे. (Vicarious Liability) या प्रचलित कायदेशीर बाबी वरुन गै.अ पतसंस्था अर्जदार क्र. 1 चे खाता क्र. 104 मध्ये असलेले रक्क्म रु. 12,900/- देण्यास जबाबदार आहे. अर्जदार क्रं.1 यांनी गै.अ पतसंस्थेत जावून मागणी केली. तरी दिली नाही त्यामुळे लेखी पञ देवून मागणी केली तरी दैनिक बचत ठेव खात्याची मुदत संपण्याची दि.17/11/2010 नंतरही दिली नाही ही गै.अ पतसंस्थेची अर्जदार क्र. 1 च्या बाबतीत न्युनतापूर्ण सेवा आहे या निष्कर्षाप्रत हें न्यायमंच आले आहे. 10 गै.अ पतसंस्थेनी असे लेखी उत्तरात असे म्हणणे सादर केले की, सप्टेंबर 2010 मध्ये नविन संचालक मंडळाने कार्यभार स्विकारल्या नंतर पतसंस्थेच्या लेखात विसंगती आढळून आली. लेखा परिक्षक श्री. डाखोरे यांनी केलेल्या लेखी परिक्षणात आणि संगणकावरील अभिलेखात अनियमितता आढळून आल्यामुळे प्रमाणित लेखापरिक्षक श्री.एम.ए.रशिद यांचे कडून लेखापरिक्षण केले असता अर्जदार क्र. 2 चे खात्यातील रक्कम आणि त्यांनी ठेवीदाराकडून वसूल केलेल्या रक्कमेत रु. 7,772/- तोटा आहे. त्यामुळे अर्जदार क्र. 1 ची रक्कम देण्याची जबाबदारी त्याची आहे. आणि केलेल्या आर्थिक व्यवहारा करीता व खोटा रेकॉर्ड केल्याबद्दल तो जबाबदार आहे. गै.अ पतसंस्थेचे हे म्हणणे अर्जदार क्र. 2 च्या बाबतीत संयुक्तीक आहे. परंतु अर्जदार क्र. 1 च्या बाबतीत संयुक्तीक नाही. वास्तविक पतसंस्थेने खातेदाराकडून वसुली करण्याकरीता अभिकर्ता नियुक्त केले परंतु त्यांनी कपटाने धोखाधडीने वसुल केलेल्या ठेवीची हाताळली केले. अर्जदार क्र. 2 ने केलेले कृत्य हे फौजदारी स्वरुपाचे असुन न्युनतापूर्ण सेवा या सदरात त्याचे संदर्भात मोडत नाही. गै.अ पतसंस्थेने अर्जदार क्र. 2 च्या अभिकर्ता क्र. 28 च्या उताराची प्रत दिली आहे. त्यानुसार खाता क्र. 972 मधील रक्कम गोठवून ठेवण्यात आले. विसंगतीचे समाधान होईपर्यंत देता येणार नाही असे कथन केले आहे. अर्जदार क्र. 2 ने केलेले कृत्य हे सेवक व मालक या सदरात मोडत नाही. त्यामुळे अर्जदार क्र. 2 ने तक्रारीत केलेली मागणी मंजुर करण्यास पाञ नाही. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 11 वरील कारणे व निष्कर्षा वरुन तक्रार अर्जदार क्र. 1 चे बाबतीत अंशतः मंजुर करण्यास पाञ आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. परंतु अर्जदार क्र. 2 च्या बाबतीत तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गै.अ. पतसंस्थने अर्जदार क्र. 1 च्या दैनिक खाते क्र.104 मध्ये जमा असलेले रु.12,900/- दि.18/11/2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (2) गै.अ.पतसंस्थेने अर्जदार क्र.1 ला मानसिक, शारीरीक ञासापोटी रु.500/-आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (3) अर्जदार क्र. 2 ची तक्रार खारीज.
(4) गै.अ यांनी मुद्दा 1 चे पालन विहीत मुदतीत न केल्यास वरील रक्कमेवर 12 टक्के व्याज, अर्जदाराच्या हातात रक्कम पडे पर्यंत देय राहील. (5) अर्जदारांना व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 13/01/2012 |