::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 29.12.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 व 14 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराचे वडील नामे घनश्याम चंपत पुडके हे पेपर मील, बल्लारपूर येथे मजुर म्हणून कार्यरत होते, त्याचा दुर्दैवाने मृत्यु दि.8.2.2010 रोजी झाला. मय्यत घनश्याम पुडके यांनी, गैरअर्जदार क्र.2 टाटा एआयजी लाईफ इन्श्युरंस कंपनी लि. यांचे चंद्रपूर येथील कार्यालयातून पॉलिसी नं.यु136738518, रुपये 1,00,000/- काढली होती. त्याअनुषंगाने, अर्जदाराने सर्व दस्ताऐवज उपरोक्त नमूद पॉलिसी क्लेम मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 च्या कार्यालयात अर्ज सादर केला होता. अर्जदाराने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने गैरअर्जदार क्र.1 यांनी पञान्वये दि.13 एप्रिल 2010 ला उत्तर पाठविले. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यात नमूद केल्याप्रमाणे पॉलिसी धारक हे हायपरटेंशन सेवर अनिमिया रिनल फेल्युअर सेफली सीवीआ आणि हायपर लिविया या आजाराने ग्रस्त होते. ही बाब अर्जात नमूद केली नाही, त्यामुळे अर्जदाराचा पॉलिसी क्लेम रद्द करण्यात येत असल्याचे खोटे कारण नमूद केले. गैरअर्जदाराने दि.31 मार्च 2010 चे पञाव्दारे रुपये 9845.91 चेक क्र.581649 दिला. मय्यत घनश्याम पुडके याचा मृत्यु हा गैरअर्जदाराने दाखविलेल्या आजारामुळे झाला नाही व मय्यत हा त्या रोगाने कधीही ग्रसीत नव्हता. गैरअर्जदार क्र.1 ने असे म्हटले की, स्टेप -6 मेडिकल डिक्लेरेशन प्रमाणे त्या-त्या रोगाने ग्रसीत असलेल्या माणसाला पॉलिसी क्लेम मिळत नाही. परंतु, अर्जदाराने मय्यत घनश्याम पुडके यांना दाखविलेले आजार त्या स्टेप-6 मध्ये नमूद नाही व गैरअर्जदाराकडे कोणताही पुरावा नाही. गैरअर्जदाराने जाणून-बुजून अर्जदाराचा क्लेम न देण्यासाठी खोटे कारण दाखविलेले आहे. अर्जदाराने दि.29.8.2010 रोजी आपल्या वकीलामार्फत नोटीस पाठवून क्लेम देण्यास सांगितले. परंतु, गैरअर्जदाराने आजपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. गैरअर्जदारांनी ग्राहकांना सेवा देताना चुकीच्या मार्गाचा अवलंब केला व ग्राहकांना सेवा देवून गैरव्यवहार करीत आहेत. त्यामुळे, गैरअर्जदारांनी पॉलिसी क्लेम रुपये 1,00,000/- द्यावे. तसेच, अर्जदारास झालेल्या शारीरीक, मानसिक, व आर्थिक ञासापोटी रुपये 10,000/-, दावा खर्च रुपये 2,000/-, नोटीस खर्च रुपये 1000/- अर्जदारास द्यावे, अशी मागणी केली आहे. 2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.14 नुसार 6 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. 3. गै.अ.यांनी लेखी उत्तरात तक्रार खोटी, बनावटी असल्याने प्रथमतः खारीज करण्याची विनंती केली. मृतक गै.अ.कंपनीकडे येवून विमा काढण्याकरीता एजंट मार्फत दि.22.7.09 ला प्रस्ताव क्र.यु 01123 सादर केला. मृतक विमाधारकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर गै.अ.यांनी पॉलिसी क्र.यु 136738518 नुसार पॉलिसी देण्यात आली. पॉलिसी ही रुपये 1,00,000/- करीता देण्यात आली. 4. अर्जदाराचा विमा दावा नाकारला आहे हे मान्य केले आहे. विमा दावा नाकारल्याचे पञ दि.13.4.2010 ला देण्यात आले. त्यानुसार, मृतक विमा पॉलिसीचा प्रस्ताव सादर करण्याचे पूर्वी हायपर टेंशन सेवर इनेमिया रिनल फेल्युअर सेफ्टी सिमीया व हायपोनाट्रेसिया हा आजार होता, परंतु त्यांनी प्रस्तावात सांगितले नाही. मृतक, विमा धारक यांनी कराराच्या विश्वार्हतेचा उल्लंघन करुन खोटी माहिती प्रस्तावात दिली, त्यामुळे करार मुळातच गैरकायदेशिर (void ab-initio) आहे. गै.अ.यांनी विमा दावा नाकारण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य असून, कायद्याचे चाकोरीत घेतलेला आहे. अर्जदाराची तक्रार ही बनावटी, खोटी गैरकायदेशीर लाभ मिळण्याकरीता दाखल केली आहे. अर्जदार कोणतीही मागणी मिळण्यास पाञ नाही. 5. पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार झालेला करार हा बंधनकारक असून, तो एक करार विश्वासावर केलेला आहे. अर्जदार यास कोणताही मानसिक, शारीरीक ञास झालेला नाही, तसेच तक्रार दाखल करण्यास या मंचाचे अधिकारक्षेञात कारण घडले हे नाकबूल आहे. 6. गै.अ.ने लेखी उत्तरातील विशेष कथनात असे कथन केले की, मृतक यांनी खोटी माहिती प्रस्तावात देवून खोट्या माहितीच्या आधारावर स्वास्था बद्दल खोटी माहिती सादर करुन पॉलिसी घेतली. पॉलिसी करार हा विश्वासावर केलेला असून, मृतकाने खोटी माहिती दिल्यामुळे कोणत्याही विमा दाव्याची रक्कम देण्यास गै.अ. जबाबदार नाही. मृतक विमाधारक यांनी खोटी माहिती हेतुपुरस्पर देवून विमा पॉलिसी घेतली, तरी विमा पॉलिसी व्यवसायाच्या इथीक म्हणून रुपये 9845.91 चा धनादेश पाठविला व तो अर्जदाराने स्विकारला आहे. अर्जदाराने व्देषबुध्दीने जास्तीचा फायदा घेण्याकरीता गै.अ.कंपनीकडून लाभ मिळण्याकरीता ही खोटी केस दाखल केली आहे. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदार यांनी खोटी तक्रार दाखल करुन कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 26 नुसार रुपये 10,000/- खर्च अर्जदारावर लादून खारीज करण्यांत यावे. 7. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ पुरावा शपथपञ नि.17 नुसार दाखल केला. तसेच, गै.अ.क्र.1 व 2 यांनी पुरावा शपथपञ विनोद घनश्यामदास उधवाणी यांनी नि.क्र.16 नुसार गै.अ.क्र.1 व 2 तर्फे शपथपञ दाखल केला. अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, तसेच गै.अ.यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, आणि उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर 1) गै.अ.यांनी विमा दावा बेकायदेशिरपणे नाकारला : होय. आहे काय ? 2) गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? : होय. 3) तक्रार मंजूर करण्यांस पाञ आहे काय ? : होय. 4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 ते 3: 8. गै.अ.यांनी लेखी उत्तरात अर्जदाराचे वडीलांनी त्याचे हयातीत विमा पॉलिसी काढली होती. अर्जदाराने मृतक/विमाधारक यांचे नावाने असलेल्या पॉलिसीचा क्लेम मिळण्याकरीता गै.अ.कडे प्रस्ताव सादर केला होता व तो प्रस्ताव गै.अ.यांनी नाकारला व व्यावसायीक नैतीकता (Business Ethic) म्हणून रुपये 9845.91 चा धनादेश दि.31 मार्च 2010 चा दिला, यात वाद नाही. गैरअर्जदाराने, सदर विमा दावा, महत्वाची माहिती, विमा पॉलिसी घेतेवेळी प्रस्तावात सादर केली नाही, म्हणून नाकारलेला आहे. गै.अ.यांनी लेखी उत्तरात असे म्हणणे सादर केले आहे की, विमाधारक घनश्याम चंपत पुडके यांनी त्याला असलेल्या पूर्वीच्या आजाराबाबत माहिती लपविली त्यामुळे विमा करार हा मुळातच बेकायदेशीर आहे, असा आक्षेप घेतला आहे. गै.अ.यांनी आपले लेखी बयानासोबत नि.क्र.14 नुसार 6 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले, त्यामध्ये विमा प्रस्तावाची प्रत, विमा क्लेमची प्रत, आणि डॉ.सुरेंद्र एम. पाटील, नागपूर यांचेकडे घेतलेल्या उपचाराचे दस्ताऐवज दाखल केले आहेत. 9. गै.अ.यांनी दाखल केलेल्या प्रस्ताव फार्म ब-1 चे अवलोकन केले असता, स्टेप 6 मध्ये मेडिकल डिक्लेरेशन दिले आहे, त्यानुसार विमा प्रस्तावात विमा धारकाने चुकीची व खोटी माहिती देवून पॉलिसी घेतली हे सिध्द होत नाही. गै.अ.यांनी नि.क्र.14 च्या यादीनुसार डॉ.सुरेंद्र एम.पाटील, रामदास पेठ, नागपूर यांचे उपचाराचे दस्ताऐवज ब-4 वर दाखल केले आहे. सदर दस्ताचे अवलोकन केले असता, घनश्याम पुडके हे दि.13.7.09 ते 21.7.09 पर्यंत उपचाराकरीता भरती होते. सदर दस्ताऐवज हे झेरॉक्स दस्ताऐवज असून गै.अ.यांनी दस्ताऐवजाचा सत्यतेबाबत संबंधीत डॉक्टरांचा पुरावा शपथपञ सादर केला नाही, त्यामुळे ते दस्ताऐवज पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराचे वकीलांनी युक्तीवादात असे सांगीतले की, गै.अ.यांनी दाखल केलेले दस्ताऐवज पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये, याबाबत मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली आणि मा.राज्य आयोग यांनी दिलेल्या निकालाचे दाखले दिले, ते खालील प्रमाणे. (1) Life Insurance Corpn. Of India & Anr.-Vs.- Ashok Manocha, 2011(3) CPR 23 (NC) (2) Surinder Kaur & Ors. –Vs.- LIC of India & Ors., II (2005) CPJ 32 (NC) (3) P. Shinivasulu Chetty –Vs.- Diners Club International, 2010 NCJ 679 (NC) (4) LIC of India –Vs.- Smt.Tejalben Kananbhai Patel, 2007(1) CPR 249(NC) (5) National Insurance Co.Ltd. –Vs.- Swaraj Jain (Smt.), II (2008) CPJ 59 (6) Life Insurance Corporation of India –Vs.- Sheetla Devi, I(2011) CPJ 128 वरील न्यायनिवाडयात दिलेल्या मतानुसार वैद्यकीय तपासणीचे कागदपञ पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये असे मत दिले आहे. प्रस्तुत प्रकरणातही डॉ.मेश्राम यांचे वैद्यकीय तपासणीचे झेरॉक्स कागदपञ विना शपथपञाशिवाय ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही. 10. गै.अ.यांनी नि.क्र.14 नुसार सादर केलेल्या दस्ताऐवजानुसार मृतक घनश्याम पुडके यांनी महत्वाची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. वास्तविक, विमा प्रस्ताव हा दि.22.7.09 ला गै.अ.क्र.2 च्या कार्यालयात सादर करण्यात आला. जेंव्हा की, डॉ.मेश्राम यांच्या निदान पञानुसार घनश्याम पुडके यांचा 21.7.09 ला दवाखान्यातून सुटका करण्यात आली. (Date of discharge) यावरुन, दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर दुसरेच दिवशी विमा प्रस्ताव सादर करण्यांत आला. परंतु, सदर प्रस्ताव हा विमा प्रतीनिधीने आधीच तयार करुन ठेवला आणि दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर सादर करण्यांत आला, असाच निष्कर्ष निघतो. 11. गै.अ.यांनी, अर्जदारास दि.13.4.2010 चे पञ देवून विमा दावा नाकारुन फक्त रुपये 9845.91 ची विमा जोखीम स्विकारुन तेवढया रुपयाचा चेक अर्जदारास दिला. यावरुन, गै.अ.यांनी विमा दावा पूर्णपणे नाकारला नाही, किंवा पूर्ण क्लेमची रक्कम दिली नाही. गै.अ.यांचे दि.13.4.2010 चे पञात स्टेप 6 मेडिकल डिक्लेरेशन मधील कारणानुसार विमाधारकास विमा प्रस्तावाचे पूर्वीपासून हायपरटेंशन सेवर एनिमियॉ, रिनल फेल्युअर, सेफ्टीसिमीयॉ असे आजार होते, तरी त्यांनी विमा प्रस्तावात नमूद केले नाही व खोटी माहिती सादर केली. या कारणावरुन, विमा दावा पूर्णपणे दिला नाही. परंतु, विमा प्रस्तावातील स्टेप 6 चे अवलोकन केले असता, गै.अ.यांनी चुकीचे कारणाने विमा दावा नाकारलेला आहे. वास्तविक, सदर स्टेप मध्ये दिलेल्या प्रश्नाचे उत्तर हे नकारार्थी दिले असे नमूद नाही, आणि फक्त डॉ.मेश्राम यांच्याकडे भरती होता व त्यांनी हायपरटेंशन सेवर एनिमियॉ, रिनल फेल्युअर हे आजाराचे निदान काढले म्हणून विमा दावा नाकारला. परंतु, वास्तविक, विमाधारक हा त्या आजाराने ग्रस्त होता हे डॉ.मेश्रामच्या निदानाच्या दस्ताऐवजावरुन ग्राह्य धरण्यास पाञ नाही. डॉ.मेश्राम यांचेकडे विमाधारक हा दि.13.7.09 ला भरती झाला आणि 21.7.09 ला दवाखान्यातून सुटका झाली. हा जर कालावधी पकडला तर तो फक्त 9 दिवस होता. जेंव्हा की, गै.अ.यांनी स्टेप 6 च्या मेडिकल डिक्लेरेशनमध्ये असे नमूद केलेला काही भाग खालील प्रमाणे. I do not currently have not have been admitted to Hospital/Nursing Home for treatment for any symptoms medical condition or disabilities. I have not been absent from work due to illness or injury for a continuous period of more than 10 days during the last 03 years. वरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात असून, सामान्यपणे वाचनीय नाही. अश्या बारीक अक्षरात कराराचे अटी नमूद करुन, गै.अ. अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहे. वरील बाबीवरुन मागील 3 वर्षात 10 दिवसापेक्षा जास्त दिवस वैद्यकीय उपचाराकरीता भरती असल्यास त्याची माहिती देणे अपेक्षीत आहे. परंतु, प्रस्तूत प्रकरणात मृतक विमा धारक हा 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस वैद्यकीय उपचाराकरीता दवाखान्यात/नर्सींग होममध्ये भरती होता, असा पुरावा गै.अ.यांनी आणलेला नाही आणि नि.क्र.14 नुसार डॉ.मेश्राम यांचा दवाखान्याचे दस्ताऐवज दाखल केले, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरला तरी 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस उपचाराकरीता दवाखान्यात भरती होता हे सिध्द होत नाही. गै.अ.च्या स्टेप 6 मधील डिक्लेरेशन नुसार विमाधारक हा 10 दिवसापेक्षा कमी दिवस उपचार घेतला असे गृहीत धरले तरी स्टेप 6 मधील वैद्यकीय घोषणेचे उल्लंघन होत नाही, तरी गै.अ.यांनी बेकायदेशीरपणे अर्जदाराचा विमा दावा नाकारला, असेच दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. यावरुन, गै.अ.यांनी चुकीचा निष्कर्ष काढून बेकायदेशिरपणे विमा दावा नाकारुन सेवा देण्यात न्युनता केली, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 12. गै.अ.चे वकीलांनी मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी पारीत केलेल्या आदेशाच्या दोन निकालाचा हवाला दिला. (1) Kokilaben Narendrabhai Patel –Vs.- Life Insurance Corporation of India, IV (2010) CPJ 86(NC) (2) Neelam Gupta –Vs.- Reliance Life Insurance & Anr., I(2011) CPJ 241(NC) वरील न्यायनिवाडयात दिलेली बाब या प्रकरणातील बाबीला लागू पडत नाही. एन्ट्रीक फ्युअर 11 महिन्यापासून होता तरी प्रस्तावात सादर केले नाही अशी बाब आहे. परंतु, प्रस्तूत प्रकरणांत विमाधारक हा 10 दिवसापेक्षा कमी म्हणजे 9 दिवस उपचार घेतला आणि त्याची दवाखान्यातून सुटका झाली. डॉ.मेश्राम यांनी डिसचार्ज कार्डवर सुटका झाल्याचे नमूद केले आहे व तो पूर्णपणे बरा झाल्यावर सुटका झाली असेच स्पष्ट होतो. कारण की, विमाधारकाने स्वतःहून सुटका मागीतली असे त्यात कुठेही नमूद केलेले नाही, त्यामुळे तो पूर्णतः 9 दिवसांत स्वस्थ झाल्यामुळेच सुटका झाली, असाच निष्कर्ष निघतो आणि त्यानंतर विमाधारकाचा मृत्यु हा दि.8.2.2010 ला झालेला आहे. त्यामुळे, तो हायपरटेंशन सेवर एनिमियॉ याच आजारानेच मृत्यु झाला हे सिध्द होत नाही. 13. एकंदरीत, गै.अ.यांनी स्टेप 6 चा अर्थ चुकीचा काढून बेकायदेशिरपणे विमा दावा नाकारला, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार मंजूर करण्यांस पाञ आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. 14. गै.अ.यांनी अर्जदारास रुपये 9845.91 चा धनादेश दि.13.4.2010 च्या पञासोबत दिला, त्या धनादेशाची प्रत अर्जदाराने अ-3 वर दाखल केली आहे. गै.अ.यांनी व्यावसायीक इथीक म्हणून सदर रक्कम दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. परंतु, गै.अ.यांनी, बेकायदेशिरपणे विमा पॉलिसी यु 136738518 विमा मुल्य रुपये 1,00,000/- चुकीच्या कारणाने नाकारला असल्याने, अर्जदार विमा पॉलिसीची रक्कम दि.13.4.2010 पासून मिळण्यास पाञ आहे. तसेच, मानसिक, शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई देण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत असल्याने मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र.4 : 15. वरील मुद्दा क्र. 1 ते 3 च्या विवेचने वरुन, तक्रार अंशतः मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत आले असल्याने, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या विमा पॉलिसी क्र. यु 136738518 विमाधारक घनश्याम पुडके याचे विमादाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.13.4.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने, आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी, वरील मुद्दा क्र.2 चे पालन विहित मुदतीत न केल्यास वरील रक्कम 12 टक्के व्याजाने रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत देय राहील. (5) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 29/12/2011. |