1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे 1986 चे कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे आहे. 2 अर्जदार चंद्रपूर येथिल रहिवासी आहे. गै.अ. यांच्याकडे खाता क्रं. 829 नुसार रक्क्म जमा केली आहे. म्हणून अर्जदार हा गै.अ. चा ग्राहक आहे. 3 अर्जदाराने दि. 5/1/10 रोजी गै.अ. कडे खाते क्रं. 829 अन्वये बचत खाते सुरु केले. त्यामध्ये 5/1/10 पासुन 11/6/10 पर्यत रु. 5900/- खात्यामध्ये जमा आहे. अर्जदाराने गै.अ. च्या कार्यालयामध्ये जावून रु 5900/ची मागणी दि. 6/1/2011 ला केली. गै.अ. यांनी तपासणी करण्याचे कारण सांगून व आर्थिक परिस्थिती बरी नसल्याची सांगून अर्जदारास परत पाठविले गै.अ. यांनी पञ येईल असे सांगीतले परंतु आजपावेतो रक्क्म घेण्यासाठी लेखीपञ आले नाही. बराच कालावधी लोटल्यानंतर दि. 7/1/2011 व 17/1/2011 ला लेखीपञ पाठवून खात्यामधील रक्क्मेची मागणी केली, परंतु गै.अ. यांनी रक्कम न देता खोटया स्वरुपाचे पञ पतसंस्थेकडून पाठविण्यात आले. गै.अ. रक्क्म देण्यास टाळाटाळ करीत आहे. गै.अ. कडे जमा असलेली रक्क्म वेळेवर न देणे, चकरा मारायला लावणे ही बाब सेवेतील न्युनता आहे व अनुचित प्रथा सुध्दा आहे. गै.अ. यांच्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास ञास झाला आहे. मानसीक, शारीरीक ञास सुध्दा झाला आहे. अर्जदाराने दैनिक बचत खाते उघडून ठेव ठेवली गै.अ. यांनी रक्कम वेळेवर न देवून अर्जदाराचा विश्वासघात केला. गै.अ. विनाकारणाचे कारण सांगून रक्क्म अडवून ठेवली आहे. त्यामुळे अर्जदाराची रक्कम रु.5900/- 12 टक्के व्याजासह आणि शारीरीक, मानसिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु. 5,000/- अशी सर्व रक्कम गै.अ. यांनी अर्जदारास दयावी असा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. 4 अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 5 नुसार 5 झेरॉक्स व अस्सल दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आले. गै.अ. यांनी नि. 14 नुसार लेखीउत्तर दाखल केले. 5 गै.अ. यांनी लेखीउत्त्रात हे म्हणणे अमान्य व खोटे आहे की, अर्जदार हे चंद्रपूर चे रहिवासी आहेत व तरी त्यांनी गै.अ. कडे बचत खाते उघडून रक्क्म जमा केली आहे. हे म्हणणे खोटे असून अमान्य आहे की, अर्जदार हे गै.अ. चे ग्राहक आहेत अथवा सदस्य आहेत. गै.अ. यांनी तक्रारीतील परिच्छेद 2 मधील मजकुर अंशतः खोटा व अशंतः बरोबर आहे. गै.अ. यांना याबद्दल माहीती नाही की, अर्जदाराचे खाते क्र. 829 मध्ये 5900/- रु. गै.अ. कडे जमा केलेले आहेत. अर्जदार हे गै.अ. चे ग्राहक झाले नसल्यामुळे न्युनतापूर्ण सेवा देण्याचे प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने केलेल्या सर्व मागण्या चुकीच्या व खोटया असुन या गै.अ. ला मान्य नाही. सोबत अर्जदाराचा अर्ज या गै.अ. च्या खर्चासह खारीज करण्यात यावे. 6 गै.अ. यांनी अतिरिक्त बयान मध्ये असे कथन केले की, अर्जदार श्री.अजय जगदिशराव धोटे अभिकर्ता संकेत क्र. 1 मध्ये अभिकर्ता श्री. वसंत कांबळे यांचे मार्फत गै.अ. संस्थेत तथाकथित खाते क्र. 829 मध्ये जमा करीत होता. अर्जदार म्हणजेच तथाकथित व ठेवीदाराचा संस्थेशी कोणताही संपर्क व संबंध नाही व नव्हता. अभिकर्ता स्वतःचे खात्यात तथाकथित खातेदार व ठेवीदार यांची आवर्त जमा रक्क्म जमा करीत होता. व वेळोवेळी त्याचे आहरण करीत होता. 7 गै.अ.चे संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य सप्टेंबर 2010 मध्ये बदलविले व नविन कार्यकारणी व संचालक मंडळ अस्तित्वात आले व त्यांनी सोसायटीचे काम दि. 8/9/2010 पासुन अशंतः आणि 3/11/2010 पासुन पूर्णतः हाती घेतले. पूर्वीच्या संचालक मंडळाने लेखापरिक्षक श्री.डाखोरे यांना प्रमाणित केले होते. त्याच्या संगणकातील अभिलेखातुन तपासणीचे काम केले. नवीन संचालक मंडळाने काम सुरु केल्यावर असे लक्ष्यात आले की, अभिलेखात, खात्यात, दैनिक आवर्तचे खाते, बचत खाते यामध्ये अतिशय जास्त अनियमितता व विसंगती आढळून आली. ताळेबंदीतील शिल्लक संस्थेतील लेखे व प्रत्यक्ष दावेदार यामध्ये जास्त फरक होता. 8 नवीन संचालक मंडळास अभिलेखाच्या सत्यतेबद्दल पूर्णपणे समाधान होत नाही तेव्हा पर्यंत सदर खातेदारांना ठेव परत करणे शक्य नाही. श्री.एम.ए.रशिद प्रमाणित लेखापरिक्षक यांची दि. 5/3/2011 रोजी नियुक्ती करुन स्वाधीन करण्यात आलेल्या रेकॉर्डचे सखोल लेखा परिक्षण मार्च 2011 च्या दुस-या आठवडयापासून सुरु करण्यात आले. लेखा परिक्षक यांनी दि. 30/3/2011 रोजी लेखी सुचना दिली, कोणत्याही ठेवीदाराची रक्कम लेखा परिक्षण झाल्याशिवाय देण्यात येवू नये अशी लेखी सुचना दिली. 9 प्रमाणित लेखापरिक्षक श्री.एम.ए.रशिद यांनी दि. 11/10/2011 रोजी दिलेल्या अहवाला वरुन असे स्पष्ट झाले की, अर्जदाराचा अभिकर्ता श्री वसंत कांबळे याच्या खात्यात रक्क्म रु.1,23,778/- चा तोटा आहे.(कमी आहे). अभिकर्ता वसंत कांबळे यांनी रक्कमेची अफरातफर करुन अपहार केला आहे, व ही रक्क्म देण्यास अभिकर्ता श्री वसंत कांबळे हा स्वतः जबाबदार राहील. गै.अ.संस्था रु.5,900/- चा जास्तीचा चुकारा देण्यास कायदेशीर रित्या जबाबदार नाही. अभिकर्ता वसंत कांबळे यांचे कडून वैयक्तिक स्वरुपात रु.1,23,778/- ची भरपाई करुन दिल्यास गै.अ. संस्था अर्जदार व त्या सारखे इतर 12 ठेवीदाराच्या ठेवी परत करण्यास जबाबदार राहील. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार बिनबुडाची व दिशाभूल व तथ्यहिन आहे. गै.अ.विनम्रपणे कळवितो की, त्याने कोणत्याही ठेवीदाराची रक्क्म जाणूनबुझुन व हेतुपुरस्सर अडवून ठेवलेली नाही. गै.अ. यास झालेल्या बदनामीबद्दल जबाबदार ठरवुन त्याचे कडून नुकसान भरपाई म्हणून रु. 20,000/- देण्याचे आदेश पारीत व्हावे. 10 गै.अ. यांनी लेखीउत्तरा सोबत 8 दस्तऐवज दाखल केले. अर्जदाराने तक्ररीच्या कथना पृष्ठार्थ नि. 18 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. गै.अ. यांनी नि. 17 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. 11 अर्जदार व गै.अ.यांनी दाखल केलेले दस्तऐवज व शपथपञ आणि उभय पक्षाच्या वकिलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुददे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1) अर्जदार दैनिक बचत खात्याची रक्कम रु. 5,900/- मिळण्यास पाञ आहे काय ? होय. 2) गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? होय. 3) तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? होय. 4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 ते 3 : 12 अर्जदाराने गै.अ. सहयोग नागरी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर रजि. क्र. 394 (यापुढे संक्षिप्त ‘’पंतसंस्था’’) मध्ये दैनिक बचत खाता क्र. 829 नुसार काढला होता. व त्या खात्यात दि. 5/1/2010 पासुन दि.11/6/2010 पर्यत अभिकर्ता श्री वसंत कांबळे याचे मार्फत जमा केले आहे. गै.अ.यांनी लेखी उत्तरात परिच्छेद क्र. 2 मधील मजकुर अंशतः खोटा व अंशतः बरोबर आहे असे म्हटले आहे. गै.अ.पतसंस्थेने अर्जदाराचा खाता क्र. 829 मध्ये 5,900/- रु. गै.अ.कडे जमा केले आहेत याबद्दल माहिती नाही असे कथन करुन अर्जदाराने ज्या अभिकर्त्या मार्फत दैनिक रक्क्म जमा केली त्याच्या खात्यात देणे असलेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कम असल्याचे लेखा परिक्षक श्री.एम.ए. रशिद यांनी दाखविले आहे. त्यामुळे अभिकर्ता श्री वसंत कांबळे यानी रक्क्मेची अफरातफर करुन अपहार केलेला आहे यामुळे अर्जदाराची रक्कम देण्यास अभिकर्ता जबाबदार आहे. गै.अ. यांनी हा घेतलेला बचाव पूर्णपणे निरर्थक असून महाराष्ट्र सहकार कायदा 1960 च्या तरतुदी नुसार व पतसंस्थेच्या उपविधी नुसार संयुक्तिक नाही. वास्तविक दैनिक बचत खातेदाराच्या खात्याची रक्क्म ही पतसंस्थे मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यामध्येच जमा व्हायला पाहिजे. परंतु असे दिसुन येते की, अभिकर्त्याच्या नावाने असलेल्या खात्यामध्ये दैनंदिन बचत खात्याची जमा केलेली रक्क्म त्याचे खात्यात जमा करण्यात येत असल्याचे दिसुन येते. ठेविदाराने जमा केलेली रक्क्म ही त्याचे पतसंस्थेतल्या खात्यातच जमा करायला पाहिजे आणि पतसंस्थेत असलेल्या खात्यावरील रक्कम आणि खातेदाराला देण्यात आलेल्या पासबुकावरील रक्क्म ही एक सारखी किंवा ताळमेळ असणे आवश्यक आहे. गै.अ.पतसंस्थेनी लेखीउत्तरासोबत अभिकर्त्याच्या खात्याच्या उताराची प्रत दाखल केलेली आहे. परंतु अर्जदाराच्या दैनिक बचत खात्याचे उताराची प्रत दाखल केलेली नाही. अर्जदाराने त्याच्या दैनिक पासबुकाचे खात्याची प्रत अ- 1 वर दाखल केली आहे. सदर प्रतिचे अवलोकन केले असता जुन 2010 पर्यत 5,900/- जमा असुन त्यावर पतसंस्थेचा शिक्का व सही आहे. गै.अ. यांनी अर्जदारास लेखीपञ दिले त्यापञाची प्रत अ-5 वर दाखल आहे. त्यात अनुक्रमांक 5 वर असे नमुद केले आहे की, ‘’बँक (पतसंस्था) आपल्या खात्यातील राशी रु. 5,900/- देय आहे व राहील हया बद्दल वाद नाही.’’ या गै.अ.च्या कथनावरुन एक बाब सिध्द होतो की, अर्जदाराचे दैनिक बचत खात्यात रु.5,900/- जमा आहेत व त्याची मुदत 5/1/2011 ला संपल्यानंतर अर्जदाराने मागणी करुनही नविन व जुन्या संचालक मंडळात फेरबदल झाल्यामुळे देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदार मिळणा-या रक्क्मेपासुन वंचीत राहीला तसेच मानसिक शारीरीक ञास सहन करावा लागला. ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होतो. 13 अर्जदार याचे प्रतिनिधी यांनी युक्तीवादात असे सांगीतले की, गै.अ. यांनी दैनिक बचत खात्याचे पासबुक अर्जदारास दिले. गै.अ. यांच्या व्यवस्थापकाने पडताळणी करुन सिल शिक्का लावलेला आहे. गै.अ. यांनी खात्यात रक्कम जमा करण्याकरीता अभिकर्ता नियुक्त केला आहे त्यामुळे त्याच्या कार्याकरीता गै.अ. पतसंस्था जबाबदार आहे. याबाबत मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण मुंबई, यांनी अपील क्र. 40 ते 44/2000 आदेश दि. 2 जुलै 2001, अध्यक्ष चंद्रपूर नागरी पतसंस्था लिमिटेड चंद्रपूर मार्फत पी ए एक्स श्री.एम.टी.नाकशिने लोन मॅनेजर विरुध्द मधुकर भिवाजी वैरागडे व इतर 4 या प्रकरणाचा दाखला दिला. सदर न्यायनिवाडयात मा. राज्य आयोग, मुंबई यांनी दिलेले मत या प्रकरणातील बाबीला पूर्णपणे लागु पडतो. 14 गै.अ. पतसंस्था करीता नित्यनिधीचे पैसे गोळा करण्यासाठी अभिकर्ता नियुक्त केला. गै.अ. यांच्या अभिकर्त्याने नियुक्ती नुसार काम करीता असतांना अपहार या धोखाधडी केले असल्यास सेवकाच्या कृत्याकरीता मालकाची प्रतिनिधी जबाबदारी (Vicarious liability) म्हणून धरण्यात येतो त्यामुळे गै.अ. पतसंस्था अभिकर्त्याच्या कृत्यारिता जबाबदार असूनही रक्कम दिली नाही ही सेवेतील न्युनता असुन अर्जदारास तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे दैनिक खात्यातील रक्कम देण्यास जबाबदार आहे. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी HARIYANA GRAMIN BANK (EARLIER KNOWN AS AMBATA KURUKESHTRA GRAMIN BANK) & ANR. Vs. JASWINDER & ANR IV(2010) CPJ 210 (NC) या प्रकरणातील न्यायनिवाडयात पॅरा 6 व 7 मध्ये असे मत दिले आहे की, कर्मचारी एजंट याने अपहार, अफरातफर, धोखाधडी केली असल्यास त्याकरिता मालक जबाबदार असतो असा रेषो आहे. सदर निकालात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागु पडतो. पॅरा 7 मधील भाग खालील प्रमाणे. Therefore, as the fraud and embezzlement was committed by the employees of the OP-Bank in the course of employment, the State Commission has very rightly held that the OP/petitioner was vicariously liable for the action of its employees. . 15 गै.अ.यांनी लेखीउत्तरात नविन संचालक मंडळाने मागील तिन वर्षाचे लेखापरिक्षण केले असता अनियमितता, अपहार, अफरातफर झाल्याचे लेखापरिक्षक श्री.रशिद यांच्या अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे ठेवीदाराची रक्क्म देण्यात आली नाही. परंतु मा.वरिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार अभिकर्ता एजेंट यांनी केलेल्या कार्या करीता बॅक/पतसंस्था जबाबदार आहे असे मत दिले आहे. त्यानुसार जरी वसंत कांबळे यांनी अफरातफर अपहार केले असेल तरी अर्जदाराची रक्क्म पूर्णपणे व्याजासह देण्यास गै.अ.जबाबदार आहे. अर्जदाराने 7/1/2011 व 17/1/2011 ला लेखीपञ देवुन मागणी केली, तरी त्याला रक्क्म देण्यात आली नाही. आणि वसंत कांबळे यांनी अफरातफर केल्याचे सांगून टाळाटाळ केली.. गै.अ. यांनी पूर्वीच्या संचालक मंडळाने पतसंस्थेच्या लेखानुसार विसंगती व अफरातफर आढळून आली तेव्हा फौजदारी स्वरुपाची कार्यवाही केल्याचे रेकॉर्डवर दाखल केली नाही. यावरुन पतसंस्थेच्या लेखात विसंगती आहे. या कारणावरुन अर्जदाराच्या दैनिक बचत खात्याची रक्क्म रोखुन ठेवणे संयुक्तिक नाही. ही गै.अ.ची न्युनता पूर्ण सेवा असल्याने तक्रार मंजुर करण्यास पाञ असुन अर्जदार दि. 6/1/2011 पासुन रु.5,900/- पासबुक अ-1 वरील दिलेल्या व्याजदरानुसार 9 टक्के व्याजाने देण्यास पाञ आहे या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. 16 वरील मुद्दा क्र. 1 ते 3 च्या विवेचने वरुन, तक्रार अंशतः मंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गै.अ. क्र. 1 ने अर्जदाराच्या दैनिक खाते क्र.829 मध्ये जमा असलेले रु.5900/- दि.6/1/2011 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (2) गै.अ.ने अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रु.1,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (3) गै.अ यांनी मुद्दा 1 चे पालन विहीत मुदतीत न केल्यास वरील रक्कमेवर 12 टक्के व्याज रक्कम अर्जदाराच्या हातात पडे पर्यंत देय राहील (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 13/01/2012 |