(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 28/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 23.12.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांच्या ‘फॉन्ड, आयआयटी’ (फ्युचर व्हिस्टा) या नावाचे शैक्षणिक संस्थेत आयआयटी-जेईई व इतर कॉम्प्युटर कोर्सेस शिकवीले जातात, अशा दिलेल्या जाहीरातीवरुन प्रवेश घेतला. त्यामध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थांस होस्टेल सेवा पुरविण्यांत येईल असे नमुद होते. तक्रारकर्त्याने रु.10,000/- भरुन सदर संस्थेच्या फॉऊंडेशन कोर्स करीता प्रवेश घेतला, तसेच तक्रारकर्ता 10, मे-2009 ते 16, मे-2009 पर्यंतच्या फॉऊंडेशन कोर्स करीता हजर राहीला व या कालावधीत तक्रारकर्त्याचे गैरअर्जदारांचे होस्टेलमध्ये वास्तव्य होते. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, फॉऊंडेशन कोर्समधे उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील 2 वर्षांच्या आयआयटी कोर्सकरीता पहील्या वर्षाच्या 3 महिन्यांकरीता रु.11,000/- होस्टेल खर्च व रु.45,000/- सत्र फी म्हणून भरावयाचे होते. त्यानुसार तक्रारकर्त्यांनी रु.11,000/- दि.23.05.2009 रोजी व तक्रार क्र.804/2009 मधील तक्रारकर्त्याने रु.45,000/- दि.23.05.2009 रोजी भरल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रार क्र.805/2009 मधील तक्रारकर्त्याने रु.40,000/- दि.23.05.2009 रोजी व रु.5,000/- दि.02.06.2009 रोजी भरल्याचे नमुद केलेले आहे. अशी एकूण रु.66,000/- एवढी रक्कम तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे जमा केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. 3. तक्रारकर्त्यांनी पुढे असे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांचे संस्थेतील शिक्षकांना शिकविण्याचे सखोल ज्ञान नव्हते व ते अकार्यक्षम होते. तसेच फॉऊंडेशन कोर्सच्या काळात होस्टेलमध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या त्यामधे गैरअर्जदारांनी बदल करुन निकृष्ठ दर्जाचे जेवण तक्रारकर्त्यांना दिले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतिवर परिणाम झाला, तसेच होस्टेल मधील वातावरण धोकादायक होते, तेथील कर्मचारी दारु पिऊन येत असत. तक्रारकर्त्यांनी असे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांच्या सदोष सेवेमुळे त्यांनी प्रवेश रद्द करण्याबाबत गैरअर्जदारांना कळविले, त्यानुसार दि.14.07.2009 रोजी प्रवेश रद्द करण्या विषयी अर्ज सादर केला. परंतु तक्रारकर्त्यांचे पैसे गैरअर्जदारांनी परत केले नाही व सेवेत त्रुटी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचात दाखल केली असुन ती व्दारे त्यांनी गैरअर्जदारांकडे भरलेले प्रत्येकी रु.66,000/- परत मागितलेले आहे. तसेच गैरअर्जदारांचे सदोष सेवेमुळे तक्रारकर्त्यांच्या प्रकृतिवर जो वाईट परिणाम झाला त्याकरीता रु.50,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केले असुन त्यांनी आपल्या उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्त्यांनी त्यांचेकडे प्रवेश घेतला होता व फाऊंडेशन प्रोग्राम शिकविला. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांनी 2 वर्षांचे आयआयटी कोर्सकरीता इतर रक्कम भरल्याचे सुध्दा आपल्या उत्तरात मान्य केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्यांचे इतर म्हणणे नाकारले असुन आजही संस्थेमध्ये 35 ते 40 विद्यार्थी शिकत आहेत व त्यांनी शिक्षकांबद्दल किंवा होस्टेलबद्दल कोणतीही तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 5. सदर तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.18.02.2011 रोजी आली असता गैरअर्जदारांचे वकीलांनी प्रतिज्ञालेख दाखल केला व मंचाने त्यांचा युक्तिवाद वकीला मार्फत ऐकला. तक्रारकर्त्यांना युक्तिवादाकरीता अंतिम संधी दिली होती परंतु ते गैरहजर असल्यामुळे प्रकरण गुवणवत्तेवरील निकालाकरीता राखीव ठेवण्यांत आले. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांच्या ‘फॉन्ड, आयआयटी’ (फ्युचर व्हिस्टा) या नावाचे शैक्षणिक संस्थेत आयआयटी-जेईई व इतर कॉम्प्युटर कोर्सेस करीता प्रवेश घेतला होता ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ‘ग्राहक’ ठरतात, असे मंचाचे मत आहे. 7. सदर प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांनी फाऊंडेशन प्रोग्राम करीता प्रत्येकी रु.10,000/- भरले होते ही बाब सुध्दा उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्यांनी फाऊंडेशन प्रोग्राम पूर्ण केला होता व त्यामधे ते उत्तीर्ण झाले असुन त्या कालावधीत ते गैरअर्जदारांचे होस्टेलमध्ये 7 दिवस राहीले ही बाब सुध्दा उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी पुढील 2 वर्षांच्या आयआयटी कोर्सकरीता गैरअर्जदारांकडे प्रवेश घेतला होता व त्याकरीता प्रत्येकी रु.11,000/- होस्टेलचा खर्च व प्रत्येकी रु.45,000/- सत्र फी दिल्याची बाब सुध्दा त्यांचे कथनावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्यांनी तक्रारीत आक्षेप घेतला आहे की, गैरअर्जदारांकडे शिकविण्याकरीता उपलब्ध असलेले शिक्षक हे कार्यक्षम नव्हते व ते योग्य प्रकारे शिकवीत नव्हते. तसेच गैरअर्जदारांचे होस्टेलमधील अन्नाचा दर्जा हा निकृष्ठ होता व योग्य सुखसोयी नव्हत्या. त्यामुळे तक्रारकर्त्यांचे प्रकृतिवर फार परिणाम झाला. याबाबी सिध्द करण्याकरीता तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दस्तावेज क्र.7 वर डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. सदर प्रमाणपत्रावरुन तक्रारकर्त्यांना Amoebil Colitis झाला होता हे स्पष्ट होते. सदर आजार हा निकृष्ठ दर्जाचे अन्न अथवा पाणी ग्रहण केल्याने होतो. या उलट गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरासोबत संस्थेच्या होस्टेलमध्ये योग्य सुविधा ठेवली जाते असे नमुद केले असुन तेथील शिक्षक सुध्दा चांगल्या प्रतिचे असल्याचा उल्लेख केलेला आहे. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरासोबत ‘कोटा श्रीनिवास’ यांचे प्रमाणपत्र पान क्र.70 वर दाखल केलेले आहे. तसेच सदर संस्थेचा विद्यार्थी ‘तनुज हरी डोये’ यांचे प्रमाणपत्र पान क्र.72 वर दाखल केले आहे. दोन्ही प्रमाणपत्रांचे अवलोकन केले असता त्यातील मजकूरात स्पष्ट नमुद आहे की, होस्टेलमधे चांगल्या सुखसोई आहेत व योग्य शिक्षक गैरअर्जदारांकडे आहेत. परंतु सदर प्रतिज्ञापत्राला किंवा प्रतिज्ञार्थींना तपासण्याची कोणतीही कारवाई सदर प्रकरणात तक्रारकर्त्यांनी केलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत केलेले आक्षेप हे मान्य करण्यांत येत नाही. 8. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे प्रवेश घेतल्यानंतर तेथे योग्य सोयी नसल्यामुळे व तेथील वातावरण योग्य नसल्यामुळे प्रवेश रद्द करण्या विषयी गैरअर्जदारांना अर्ज दिला नाही. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे दि.14.07.2009 रोजीचे पत्रावरुन दि.23.05.2009 रोजी प्रवेश घेतला होता ही बाब तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात असे कथन केले आहे की, जर प्रवेश 7 दिवसांचे आंत रद्द केला तर फी परत मिळण्याचा अधिकार विद्यार्थास राहील. परंतु सदर प्रकरणांत तक्रारकर्त्यांनी 7 दिवसानंतर प्रवेश रद्द केलेला असल्यामुळे फी परत मिळण्यांचा अधिकार राहत नाही. गैरअर्जदारांनी असा बचावात्मक पवित्रा घेतला असता त्या पृष्ठयर्थ कोणतेही प्रॉस्पेक्टर्स किंवा प्रवेश घेण्यापूर्वीचे कोणतेही माहिती पत्रक दाखल केले नाही की, ज्यामधे सदर अटी व शर्तींचा उल्लेख आहे. याउलट तक्रारकर्त्यांनी तक्रारीत पान क्र.43 वर जाहीरात दाखल केलेली आहे, सदर जाहीरातीमध्ये जर प्रवेश घेतल्यानंतर 7 दिवसांमध्ये रद्द केला नाही तर प्रवेश फी परत मिळणार नाही असा कुठलाही उल्लेख नाही. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरासोबत पान क्र.60 वर पावती दाखल केलेली आहे, त्या पावतीच्या मागील बाजूस अटी व शर्तींचा उल्लेख आहे व त्यामधे एनरॉनमेंटच्या 7 दिवसांचे आंत जर प्रवेश रद्द केला तर 50% रक्कम परत देण्यांत येईल असे नमुद आहे. सदर अटी व शर्तीं या पावतीच्या मागील बाजूस आहे, याचाच अर्थ पैसे स्विकारल्यानंतर त्यावर सही करणे हे तक्रारकर्त्यांस किंवा विद्यार्थांस किंवा त्यांचे पालकास बाध्य करण्या सारखे आहे. गैरअर्जदारांनी आपल्या माहितीपत्रकात किंवा जाहीरातीमधे अशा अटी व शर्तींचा उल्लेख केला नाही की, ज्या अटी व शर्ती मान्य असल्यानंतरच प्रवेश देण्यांत येईल. तसेच गैरअर्जदारांनी सदर प्रकरणात तक्रारकर्त्यांचे कोणतेही प्रवेशपत्र दाखल केले नाही की, ज्यामधे अटी व शर्तींचा उल्लेख आहे. त्यामुळ पावतीवर लिहीलेल्या अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे समजता येत नाही. कारण तत्पूर्वीच विद्यार्थांचा प्रवेश सुनिश्चित झाला होता व त्याला अनुसरुनच त्यांनी पैसे भरले. 9. गैरअर्जदारांनी मंचासमक्ष मा. राष्ट्रीय आयोगाचा,’ ब्रिलीयंट क्लासेस –विरुध्द- श्री. ऍसबेल सॅम’ हा न्याय निवाडा पान क्र.86 वर दाखल केलेला आहे सदर न्याय निवाडयामधे प्रवेश घेणा-या विद्यार्थांमधे व संस्थेमधे करार झालेला आहे. तसेच प्रवेशाचे वेळेस अटी व शर्ती या कोर्स फी स्विकारण्यापुर्वीच तक्रारकर्त्याला/विद्यार्थाला सांगण्यांत आलेल्या आहे, अश्या परिस्थिती या प्रकरणात नसल्यामुळे सदर न्याय निवाडा सदर प्रकरणास लागू होत नाही, असे मंचाचे मत आहे. 10. सदर प्रकरणात जर तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे स्पष्ट होत नसल्यामुळे विद्यार्थी/ तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे सुविधेवर अतृत्प असल्यामुळे प्रवेश रद्द करण्याकरीता दि.14.07.2009 रोजी अर्ज दिला होता ही बाब स्पष्ट होते. व त्यानुसार कोणत्याही अटी व शर्तीं सदर संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी तक्रारकर्त्यांना सांगितल्या होत्या किंवा त्या तक्रारकर्त्यांना मान्य होत्या असे स्पष्ट होत नसल्यामुळे तक्रारकर्ते हे फॉऊंडेशन कोर्सची फी सोडून उर्वरित रक्कम प्रत्येकी रु.56,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदारांनी सदर प्रकरणी तक्रारकर्त्यांच्या जागेवर दुस-या कोणत्याही विद्यार्थांना प्रवेश दिला नसुन त्यांच्या जागा रिक्त होत्या ही बाब सिध्द करणारा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची कोर्स फी ची रक्कम परत केल्यामुळे गैरअर्जदारांना कोणतेही आर्थीक नुकसान होणार नाही ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी रु.56,000/- परत करावे. 12. सदर प्रकरणी तक्रारकर्त्यांनी प्रकृतित बिघाड झाल्यामुळे रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी पुराव्या अभावी अमान्य करण्यांत येते, तसेच तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरीता प्रत्येकी रु.50,000/- मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव असल्यामुळे न्यायोचित दृष्टया तक्रारकर्ते रु.5,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली फॉऊंडेशन कोर्सची फी सोडून उर्वरित रक्कम प्रत्येकी रु.56,000/- मिळण्यांस पात्र ठरतो सदर रक्कम गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत परत करावी अन्यथा सदर रकमेवर त्यानंतर द.सा.द.शे. 9% दराने व्याज देय राहील. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी रु.5,000/- शारीरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |