(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा मयत गिरीजाबाई भ्र.दौलतराव गाडेगावकर यांचा मुलगा आहे. गैरअर्जदार क्र. 1 ही सावित्रीबाई महिला विकास मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महिला बचत गट यांची अध्यक्ष असून गैरअर्जदार क्र. 2 ही सचिव व गैरअर्जदार क्र. 3 ही मंडळाची व्यवसाय प्रतिनिधी आहे. अर्जदाराची आई, गैरअर्जदार व 9 स्त्रिया यांनी मिळून दिनांक 05.01.2010 रोजी स्वामी विवेकानंद महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटातील पुर्ण गटाचा विमा काढण्यात यावा म्हणून गैरअर्जदार क्र. 3 यांनी सर्वांना बोलावून विमा काढणेस सांगितले. सर्वांनी भारतीय स्टेट बँक नवा मोंढा,नांदेड यांचेकडे एस.बी.आय.लाईफ स्वधन(गृप) ही विमा पॉलिसी काढली. विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.9011/- इतका होता. पॉलिसीचा कालावधी दिनांक 01.07.2011 ते 01.07.2021 असा आहे. गैरअर्जदार क्र. 3 ही प्रतिनिधी असल्याने रक्कम भरणेस ती जबाबदार आहे. दिनांक 19.11.2012 रोजी अर्जदाराची आई गिरीजाबाई हीला कँसरचा आजार होऊन मृत्यु झाला. अर्जदार यांनी आईच्या मृत्यु नंतर दिनांक 22.01.2013 रोजी भारतीय स्टेट बँक नवा मोंढा,नांदेड यांचेकडे क्लेम दाखल केला. भारतीय स्टेट बँक नवा मोंढा,नांदेड यांनी अर्जदारास असे सांगितले की, आमच्या कार्यालयात मयताचे नाव असलेली विमा पॉलिसीचा हप्ता न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झालेली आहे. त्यामुळे क्लेम देऊ शकत नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेकडे चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या विमा रक्कमेचे पैसे आम्ही खर्च केले,तुम्हास विमा रक्कम देऊ असे आश्वासन दिले. परंतु रक्कम दिलेली नाही. अर्जदार यांनी वेळोवेळी विनंती करुन सुध्दा आजपर्यंत गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम अर्जदारास दिलेली नाही व शेवटी रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलिसीनुसार रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह मिळावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 ही सावित्रीबाई महिला विकास मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. गैरअर्जदार क्र. 2 ही सचिव नाही व गैरअर्जदार क्र. 3 ही सुध्दा व्यवसाय प्रतिनिधी नाही. दिनांक 04.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व त्यांच्या सोबतच्या महिलांनी मिळून स्वामी विवेकानंद महिला बचत गटाची स्थापना केली. सदर बचत गटासाठी दरमहिन्यास मिळून सर्वांनी मासिक हप्ता रक्कम रु.100/- व सावित्रीबाई महिला विकास मंडळाचे रक्कम रु.50/- असे एकूण रक्कम रु.150/- प्रतिमाह भरुन जमा करणे व जमा झालेला पैसा गरजवंतांना देऊन बचत गटाचे उत्पन्न वाढविणे हाच एकमेव उद्देश होता. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदरील बचत गटास मार्गदर्शन करुन भारतीय स्टेट बँक नवा मोंढा,नांदेड येथे खाते उघडण्यास सहकार्य केले. बॅकेकडून बचत गटांना कर्जाची मागणी केली असता बँकेने दिनांक 11.08.2010 रोजी रक्कम रु.70,000/-चे कर्ज मंजूर केले. सदरील कर्जाची परतफेड करणेसाठी व सुरक्षिततेसाठी म्हणून बँकेने महिला बचत गटातील सर्व सभासदांचा एस.बी.आय.लाईफ स्वधन(गृप) ही विमा पॉलिसी काढली व त्यासाठी लागणारी रक्कम रु.5041/- स्वामी विवेकानंद महिला बचत गट यांचे खात्यातून दिनांक 11.08.2010 रोजी डेबीट करुन इंशुरन्स हप्ता भरला. तसेच महिला बचत गटाचे सर्व सभासद व वयोमानानुसार येणारा हप्ता एकत्रित अथवा ते स्वतः त्याचेपुरते भरु शकतात असे बँकेने स्पष्टपणे सांगितले. गैरअर्जदार क्र. 3 यांनी कोणत्याही सभासदाकडून कसलीही रक्कम घेतलेली नाही व बँकेत भरण्याची जबाबदारी नाही. अर्जदाराची आईने फॉर्म भरतेवेळेस बँकेचे अधिकारी यांनी सभासदास असे निर्देश दिलेले आहेत की, हप्ता सभासद भरतील किंवा बचत गटाच्या खात्यातून विमा रक्कम जमा करुन सदरील पावती बचत गटास अथवा सभासदांना देण्यात येईल. अर्जदाराची आईस कँसर केव्हापासून आहे व कधी उपचार घेतला याबद्दल कागदपत्रे अर्जदार यांनी यांनी दाखल केलेली नाहीत. अर्जदाराची आई व बचत गटातील सर्व सभासदांची पॉलिसी बॅकेकडे काढलेली असल्याने गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराने नुकसान भरपाई मागणेचा अधिकार नाही. बचत गटातील सर्व सभासदांना दिनांक 24.10.2011 रोजी रक्कम रु.1,50,000/- व दिनांक 09.11.2012 रोजी रक्कम रु.तीन लाखाचे कर्ज बँकेने मंजूर केलेले आहे. सदरील कर्ज सभासदांनी उचलून घेतलेले आहे. परंतु इंशुरन्सचा हप्ता येण्या अगोदरच सभासदांनी सर्व रक्कम उचलून घेऊन आपआपसात वाटून घेतलेली आहे. त्यांनी दिनांक 11.08.2010 पासून कोणत्याही इंशुरन्सचा हप्ता भरलेला नाही. म्हणून सदरील गटातील सर्व सभासदांचा विमा बंद झालेला आहे. अर्जदाराची तक्रार ही बिनबुडाची आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हया प्रतिष्ठित घरच्या महिला असून वेगवेगळया सामाजिक उपक्रम राबवितात, गोरगरीबांना,दिनदलितांना चांगले जीवन जगण्याचे व यशस्वी उद्योग,गट चालविण्याचे काम करतात. अशा महिलांविरुध्द पैसे उकळण्याच्या उद्येशाने अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6 अर्जदाराची आई मयत गिरीजाबाई ही सावित्रीबाई महिला विकास मंडळ संचलीत स्वामी विवेकानंद महिला बचत गटाची सभासद असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या सभासद पुस्तिकेवरुन ही बाब स्पष्ट होते. मयत गिरीजाबाई यांनी बचत गटामार्फत भारतीय स्टेट बँक नवा मोंढा,नांदेड यांचेकडून एस.बी.आय.लाईफ स्वधन(गृप) ही विमा पॉलिसी घेतली असल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीवरुन दिसून येते. सदरील पॉलिसी विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.901/- इतका असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 01.07.2011 ते 01.07.2021 असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराची प्रमुख तक्रार अशी आहे की, अर्जदाराची मयत आई ही गैरअर्जदार यांच्या बचत गटाची सभासद आहे. बचत गटातील सर्व सभासदांचा विमा गैरअर्जदार यांनी घेतलेला होता. परंतु दिनांक 19.11.2012 रोजी अर्जदाराची आई गिरीजाबाई हीचा कँसरचा आजार होऊन मृत्यु झालेला असल्याने विमा पॉलिसीच्या अंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज केला असता बचत गटाने पॉलिसीचा हप्ता भरलेला नसल्यामुळे पॉलिसी बंद पडलेली आहे. त्यामुळे विमा रक्कम देता येणार नाही असे सांगितले. गैरअर्जदार यांनी महिला बचत गटातील सभासदांचा हप्ता जाणिवपुर्वक विमा कंपनीकडे भरलेला नसल्यामुळे अर्जदारास आईचे मृत्यु पश्चात विमा रक्कमेपासून वंचित राहावे लागलेले आहे अशी प्रमुख तक्रार आहे. यासाठी अर्जदार यांनी विमा पॉलिसीची प्रत तसेच मयत गिरीजाबाईचे मृत्यु प्रमाणपत्र, गैरअर्जदार यांचे बचत गटाचे सभासद असल्याची सभासद पुस्तिका दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये मयत गिरीजाबाई ही बचत गटाची सभासद असल्याचे मान्य केलेले आहे. तसेच बचत गटाने बँकेकडे कर्ज मागीतले असता दिनांक 11.08.2010 रोजी बॅकेने रक्कम रु.70,000/- कर्ज मंजूर केले व कर्जाचे सुरक्षिततेसाठी बचत गटातील सर्व सभासदांची पॉलिसी काढली व त्यासाठी लागणारी हप्त्याची रक्कम ही बचत गटाच्या खात्यातून डेबीट केलेली आहे ही बाब गैरअर्जदार यांनी लेखी जबाबामध्ये मान्य केलेली आहे. तसेच लेखी जबाबामधील परिच्छेद क्रमांक 7 मध्ये गैरअर्जदार यांनी बँकेकडून दिनांक 24.10.2011 रोजी रक्कम रु.1,50,000/- व दिनांक 09.11.2012 रोजी रक्कम रु.तीन लाखाचे कर्ज बँकेने मंजूर केलेले असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच सदरील कर्ज सभासदांनी उचलून घेतलेले आहे. परंतु इंशुरन्सचा हप्ता येण्या अगोदरच सभासदांनी सर्व रक्कम उचलून घेऊन आपआपसात वाटून घेतलेली आहे. गैरअर्जदार यांनी बँकेकडून सभासदांची पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीचा हप्ता नियमीतपणे भरणे बंधनकारक होते. गैरअर्जदार यांनी पॉलिसी घेतल्यानंतर सलग दोन वर्ष बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची उचल करण्यापुर्वी गैरअर्जदार यांनी पॉलिसीचा हप्ता भरणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदार यांनी पॉलिसीचा हप्ता भरलेला नाही. याउलट लेखी जबाबामध्ये कर्जाची रक्कम संपूर्णपणे काढून घेऊन आपसात वाटून घेतलेली आहे ही बाब मान्य केलेली आहे.
महिला बचत गटातील सर्व सभासदांच्या हितासाठीच सदरील पॉलिसी बचत गटाने काढलेली होती. विमा कंपनीचा हप्ता नियमीतपणे भरणे हे गैरअर्जदार महिला बचत गटाचे कर्तव्य होते. परंतु महिला बचत गटाने जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले असल्याचे दिसून येते. कारण बँकेने बचत गटाला सन 2011 व सन 2012 यासाठी कर्जाची रक्कम मंजूर केजली होती व सदरील कर्जाची सर्व रक्कम संबंधीत सभासदांनी उचलून घेतलेली आहे. सदरील कर्जाची रक्कम उचलून घेतांना महिला बचत गटातील सर्व सभासदांनी विमा हप्त्याची रक्कम भरलेली नाही. गैरअर्जदार यांनी बचत गटातील सर्व सभासदांची एकत्रीत शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरील शपथपत्रामध्ये विमा हप्ता बँकेकडे जमा केलेला नसुन पॉलिसी बंद पडलेली असल्याची माहिती सर्व सभासदांना आहे असे नमुद केलेले आहे. सदरील शपथपत्र देतांना बचत गटातील सर्व सभासद हया सोयिस्कररीत्या हप्ता भरण्याचे विसरलेल्या असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता बचत गटातील सर्व सभासदांच्या हितासाठी पॉलिसी घेतलेली होती. अर्जदाराची आईचा मृत्यु झाल्यानंतर सदरील विमा रक्कम ही विमा कंपनीतर्फे अर्जदारास मिळणार होती. परंतु गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे सदर रक्कम मिळणेपासून अर्जदार वंचित राहिलेला असल्याचे गैरअर्जदार यांचे लेखी जबाबावरुन सिध्द होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास पॉलिसीचा हप्ता बचत गटाने बँकेकडे भरलेला नाही ही बाब अर्जदाराच्या आईच्या मृत्यु होईपर्यंत कळविलेली नव्हती. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास विमा रक्कम देणेस बांधील आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.50,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. खर्चाबाबत आदेश नाहीत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.