निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदाराची तक्रार सामनेवाले मोबाईल कंपनीविरुध्द असून तक्रारदार हा व्यावसायिक डॉक्टर असून त्याने सामनेवाले 2 कडून तक्रारीत नमूद केलेला हॅडसेट खरेदी केला. तसेच सामनेवाले क्र.3 हे सर्व्हीस सेंटर आहे. हँडसेट खरेदी केला त्यावेळी त्याला वॉरंटी कार्डही देण्यात आले. त्याचे कथनाप्रमाणे वॉरंटी ही हँडसेटच्या सर्व दोषाबाबत होती. हँडसेट खरेदी केल्यावर एक दीड महिन्यानंतर मोबाईल फोनची सिस्टीम बिघडल्यामुळे हँडसेट चालू शकला नाही म्हणून त्याने सर्व्हीस सेंटरकडे तो दुरुस्तीसाठी दिला. सामनेवालेचे प्रतिनिधी कैलास व संतोष यांनी त्याचा प्रॉब्लम लिहून घेतला त्याबाबतीतील वर्क ऑर्डर याकामी दाखल केली आहे. सामनेवालेच्या प्रतिनिधीने तक्रारदारास असे आश्वासन दिले की, त्यांच्या सर्व्हीस स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी आवश्यक ते पार्टस नाहीत तरी आम्ही हँडसेटचे पैसे परत देऊ. त्यावेळी तक्रारदारानी त्यांना असे सांगितले की, त्याना मोबाईल हँडसेटची खूप गरज आहे व तो नसल्यामुळे त्याचे नुकसान होत आहे. तरी मला हँडसेटचे पैसे परत दया किंवा दुसरी सोय उपलब्ध करुन दया. 2. पण सामनवालेनी त्याना प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारास वेळेत पैसे न मिळाल्याने व त्याचेकडे हँडसेट नसल्यामुळे त्याचे खूप नुकसान झाले म्हणून त्याने दुसरा हँडसेट दुस-या कंपनीकडून खरेदी केला. तक्रारदार वारंवार सामनेवालेच्या मागे लागला असता त्याचेकडून त्याना प्रतिसाद मिळालेला नाही. सामनेवालेनी डिसेंबर 09 मध्ये फोनने असे कळवले की, तुमचा फोन दुरुस्त झाला असून तो घेऊन जा. तक्रारदारानी फोन मे 09 मध्ये खरेदी केला होता व त्याला 09 मध्ये सामनेवालेकडून प्रतिसाद मिळाला. तक्रारदाराने फोन घेण्यास नकार दिला. सामनेवालेच्या प्रतिनिधीने त्याला जे पैसे परतीचे आश्वासन दिले होते ते पुरे करणेस सांगितले. सामनेवालेकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, त्यानी त्यांची फसवणूक केली आहे. म्हणून त्याने ही तक्रार दाखल केली आहे. तरी त्याची विनंती की, त्याला त्याच्या हँडसेटची रक्कम रु.2,929/- 24 टक्के व्याजाने खरेदी केलेल्या तारखेपासून परत मिळावी. तक्रारीपोटी त्याला जो न्यायिक खर्च करावा लागला त्यापोटी रु.50,000/- व झालेल्या व्यावसायिक नुकसानीपोटी रु.एक लाख मिळावेत. व मानसिक त्रासापोटी रु.एक लाख मिळण्याची तिची विनंती आहे. 3. नि.2 अन्वये तिने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यानंतर अँने.1,2,3 वर तिने केलेला पत्रव्यवहार, मोबाईलची रिसीट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. 4. याकामी सामनवालेना नोटीस काढण्यात आली होती. सामनेवालेतर्फे नोटीस एम मधुसुदन व्यक्तीने घेतलेली आहे. त्यांनी 6-9-10 रोजी मंचाकडे अर्ज देऊन हँडसेट देण्याची तयारी दाखवली व मंचाकडे हजर रहाण्याचे कबूल केले. पण ते मंचाकडे हजर झाले नाहीत. सामनेवालेना नोटीस मिळाली असल्याने व त्यांनी म्हणणे न दिल्याने सामनेवाले 1 विरुध्द नो से चा आदेश व सामनेवाले 2,3 विरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित करणेत आला. 5. तक्रारीचे स्वरुप वाचले. तक्रारकर्तीने अँने.सी.3 व 4 वर केलेला पत्रव्यवहार दाखल केला आहे. त्यात सामनेवालेचे प्रतिनिधी मनीष सुर्वे यांनी असे उत्तर दिले आहे की, आम्ही आमच्या एच.ओ.ला पैसे देणेबाबत कळवले आहे. त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांचेकडून पैसे आल्यावर आम्ही ते परत देऊ. यावरुन एक बाब स्पष्ट होते की, तक्रारदारास सामनेवालेनी विकत दिलेला हॅडसेट दोषपूर्ण होता. त्याने तक्रार केल्यानतर त्याला त्यानी सर्व्हीस वेळचेवेळी दिली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जून 09 पासून डिसेंबर 09 पर्यंत त्याने त्याला कोणतीही दाद दिलेली नाही व डिसेंबर 09 मध्ये त्यांनी हँडसेट वा पैसे परत देणेचे आश्वासन दिले. पण जानेवारी 10 मध्येही त्यानी काही केले नाही. सामनेवालेंचे असे वर्तन दोषपूर्ण सेवेचे लक्षण आहे. त्यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे. 6. तक्रारदाराचा अर्ज मंजूर करावा या निष्कर्षाप्रत मंच आले आहे पण तक्रारीचे स्वरुप पहाता त्याने केलेंल्या नुकसानीची मागणी पहाता त्या खूपच अवास्तव वाटतात. रु.3,000/-च्या हँडसेटसाठी त्याने जवळजवळ रु.अडीच लाखाची नुकसानी मागितली आहे. त्याची ही मागणी चुकीची आहे. यावरुन तक्रारकर्तीची तक्रार रक्कम मिळवण्याचे हेतूने केली का असाही प्रश्न निर्माण होतो. सामनेवालेनी तक्रारकर्तीचे म्हणणे अमान्य केले नसल्यामुळे व त्यांनी दोषपूर्ण सेवा दिली असल्याने तिला हॅडसेटची घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी असे मंचाचे मत आहे. सहा महिन्याचे कालावधीत तिला जो मानसिक त्रास झाला त्याही पोटी रु.5,000/- ची रक्कम दयावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे व तिच्या व्यावसायिक नुकसानीपोटी तिला रु.5,000/- व न्यायिक खर्चापोटी रु.1,000/- दयावेत असे मंचाचे मत आहे. तिचे व्यावसायिक नुकसान किती झाले याचा पुरावा तिने दिलेला नसून मोघमात रु.एक लाख मागितले आहेत, तसे देणे योग्य होणार नाही म्हणून सर्व विचार करता मानसिक त्रासापोटी, व्यावसायिक नुकसानीपोटी व न्यायिक खर्चापोटी मिळून रु.11,000/- दयावेत या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. सामनेवाले 1 ते 3 यानी खालील आदेशाचे पालन वैयक्तिक व संयुक्तीकरित्या करावे- अ) तक्रारकर्तीच्या मोबाईल हॅंडसेटची रक्कम रु.2,929/- तिने खरेदी केलेंल्या तारखेपासून 10 टक्के व्याजाने परत करावी. ब) सामनेवालेनी तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी, व्यावसायिक नुकसानीपोटी व न्यायिक खर्चापोटी रु.11,000/- दयावेत. क) कलम ब मधील आदेशाचे पालन सामनेवालेनी विहीत मुदतीत न केल्यास ती रक्कम द.सा.द.शे.10 टक्के व्याजाने वसूल करणेचा अधिकार तक्रारकर्तीस राहील. ड) सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवणेत याव्यात. ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई. दि.3-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |