::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, अधि. किर्ती गाडगीळ (वैद्य) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 20.06.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने दि. 01/08/09 पासून दि. 18/12/09 त्याच्या बचत खाते क्रं. 072 मध्ये एकूण रक्कम 2,340/- गैरअर्जदाराच्या पतसंस्थेत जमा केली आहे सदर रक्कम एक वर्षाच्या मुदतीत देय होती. सदर रकमेचा कालावधी संपल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराच्या संस्थेची संपर्क साधून रकमेची मागणी परंतु गैरअर्जदार संस्थेनी अर्जदाराची रक्कम परत केली नाही म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 4/7/11 रोजी व दि. 19/8/11 रोजी लेखी पञ पाठवून खात्यामधील रक्कम लाभासह अर्जदाराना देण्याची मागणी सामुहीक रितीने केली. परंतु गैरअर्जदाराने त्या पञाचे कोणतेही उत्तर दिले नाही व अर्जदाराची रक्कम देण्यास टाळमटाळ करीत राहीले. अर्जदार यांना गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्कम वेळेवर नाही दिली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति सेवेत न्युनता देवून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. सबब अर्जदाराने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदार याचे खाते क्रं. यांच्यात जमा केलेली रक्कम रु. 2,340/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होवून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले नाही म्हणून नि. क्रं. 1 वर दि. 18/7/13 रोजी गैरअर्जदाराविरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
- अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? होय
- आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. अर्जदाराने दि. 01/08/09 पासून दि. 18/12/09 त्याच्या बचत खाते क्रं. 072मध्ये एकूण रक्कम 2,340/- गैरअर्जदाराच्या पतसंस्थेत जमा केली आहे सदर रक्कम एक वर्षाच्या मुदतीत देय होती. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. अ- 1 पासबुक मधून सिध्द होत आहे म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते हे सिध्द होत आहे म्हणून मुद्दा क्रं. 1 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वरील नेमलेली अवधी करीता त्याच्या खात्यात रक्कम जमा केली होती वत्यानंतर गैरअर्जदाराने ती रक्कम अर्जदाराला परत केली नाही याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नि. क्रं. 5 दस्त क्रं. 2 व 4 मध्ये दाखल पञावरुन सिध्द होत आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदाराला नोटीस मिळून सुध्दा ते मंचासमक्ष हजर राहीलेनाही व अर्जदाराने पाठविलेले वरील पञाचा कोणतेही उत्तर दिले नाही त्यावरुन हे सिध्द होते गैरअर्जदारानी अर्जदाराप्रति सेवेत न्युनता करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब मुद्दा क्रं. 2 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
6. गैरअर्जदारानी अर्जदाराप्रति सेवेत न्युनता करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे.ही बाब वरील मुदयावरुन सिध्द झाल्यामुळे अर्जदाराने हा तक्रारीत केलेल्या मागणी प्रमाणे पाञ आहे. म्हणून मुद्दा क्रं. 3 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- अर्जदारा याचे खाते क्रं. 072 मध्ये जमा असलेली रक्कम रु. 2,340/- 10 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने अर्जदाराला आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत दयावी.
- अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च 2,500/- रु. गैरअर्जदाराने अर्जदाराला आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत दयावी.
- आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
चंद्रपूर
दिनांक - 20/06/2014
(श्री.विजय चं.प्रेमचंदानी)
मा.अध्यक्ष.
( अधि. कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैद्य) )
मा.सदस्या. मा. सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.