श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 06 ऑक्टोबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. वि.प. जयदुर्गा ग्रामिण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित सिल्ली ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत पंजिकृत सहकारी संस्था आहे. सदर संस्था लोकांकडून ठेवी स्विकारुन त्यातून सभासदांना व्याजाने कर्ज वाटपाचा व्यवसाय करते.
तक्रारकर्तीने वि.प. संस्थेत खालीलप्रमाणे मुदती ठेव व बचत खात्यात रकमा ठेवलेल्या आहेत.
खात्याचा तपशिल | ठेव रक्कम | कालावधी | मुदत पूर्तीची तारीख | मुदत पुर्तीची रक्कम |
मुदत ठेव खाते क्र. 337/38, पावती क्र. 031, | रु.20,000/- | ठेवीची तारीख 02.01.2007 (6 वर्षे) | 03.01.2013 | रु.40,000/- |
खाते क्र. 342/38, पावती क्र. 038, | रु.7,000/- | ठेवीची तारीख 17.02.2007 (6 वर्षे) | 18.02.2013 | रु.14,000/- |
बचत ठेव खाते क्र. 707/8, | 21.09.2012 रोजीची शिल्लक रु.16,265/- | खाते उघडल्याची तारीख 02.02.2005 (6 वर्षे) | | दि.30.03.2012 पर्यंतच्या व्याजासह. |
तक्रारकर्तीने मुदत ठेवीच्या मुदतपूर्वीनंतर देय झालेली ठेवीची रक्कम तसेच बचत खात्यातील रक्कम परत करण्याची वारंवार मागणी केली असता अध्यक्ष व व्यवस्थापकांनी ती परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रारकर्तीची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने तिला तिच्या वि.प. संस्थेकडून देय असलेल्या रकमेची नितांत गरज आहे. परंतू वि.प.ने ती न दिल्याने तिला मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे.
तक्रारकर्तीने दि.13.04.2015 रोजी अधिवक्ता पशिने यांचेमार्फत नोटीस पाठवून ठेवीच्या रकमेची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.ने तक्रारकर्तीची रक्कम परत केली नाही म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारकर्तीला मुदत ठेवीची देय असलेली मुदत पूर्तीची रक्कम अनुक्रमे रु.40,000/- आणि रु.14,000/- मुदत पुर्तीचे तारखेपासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.ला आदेश व्हावा.
- बचत खात्यात शिल्लक रक्कम रु.16,265/- दि.01.04.2012 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.ला आदेश वहावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- मिळावी.
- तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत खात्याचे पासबुक, मुदत ठेवींचे प्रमाणपत्र, नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी दि.22.01.2016 रोजी संयुक्त लेखी जवाब दाखल केला असून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीच्या मुदत ठेवीची व बचत ठेवींची रक्कम देणे असल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यांचे म्हणणे असे की, संस्थेने मोठ्या प्रमाणावर वाटप केलेले कर्ज थकीत असल्याने तक्रारकर्तीचे देणे रक्कम एकमुस्त देणे शक्य होणार नाही. परंतू जसजशी कर्जाची रक्कम वसुल होईल तसतशी तक्रारकर्तीला ठेवीची रक्कम अदा करण्यांस वि.प. संस्था तयार आहे. तसेच संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत बचत खात्याचे प्रचलित दरानुसार व्याज देण्यास वि.प. तयार आहे. म्हणून तक्रारकर्तीची व्याजासह रक्कम भरण्यास पुढील महिन्याची मुदत द्यावी.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
4. मुद्दा क्र. 1 बाबत – तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीची दि.03.01.2013 रोजी देय झालेली मुदत ठेवीची मुदत पूर्तीची रक्कम रु.40,000/- आणि दि.18.02.2013 रोजी देय झालेली मुदत ठेवीची मुदत पूर्तीची रक्कम रु.14,000/- आणि 30.03.2012 पर्यंतच्या व्याजासह दि.21.09.2012 रोजी देय असलेली बचत खात्यातील रक्कम रु.16,265/- वि.प.नी मान्य केले आहे. तसेच संस्थेची कर्ज वसुली होत नसल्याने सदर रक्कम तक्रारकर्तीने मागणी करुनही देऊ शकले नसल्याचे कबूल केले आहे. बँकिंग व्यवहार करणा-या संस्थेने ठेवीदाराची मुदत पूर्तीची रक्कम तसेच बचत खात्यातील शिल्लक रक्कम मागणी करुनही न देणे ही निश्चितच ठेवीदार ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – दि.03.01.2013 आणि दि.18.02.2013 रोजी मुदत ठेवीची मुदत पूर्तीचे देय असलेली रक्कम अनुक्रमे रु.40,000/- आणि रु.14,000/- वि.प.ने अनाधिकाराने स्वतःजवळ ठेवली आहे. म्हणून तक्रारकर्ती सदर रकमेवर मुदत पूर्तीच्या तारखेपासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. तसेच बचत खात्यात असलेली शिल्लक रु.16,265/- दि.21.09.2012 पासून (सदर तारखेस रु.14,700/- जमा केलेले आहेत.) प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारकर्तीपात्र आहे.
याशिवाय, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ने तक्रारकर्तीस मुदत खाते क्र. 337/38 ठेव पावती क्र. 031 ची दि.03.01.2013 रोजी देय झालेली मुदत पूर्तीची रक्कम रु.40,000/- दि.03.01.2013 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी.
2) मुदत ठेव खाते क्र. 342/38 ठेव पावती क्र. 038 ची दि.18.02.2013 रोजी देय झालेली मुदत पूर्तीची रक्कम रु.14,000/- दि.18.02.2013 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह वि.प.ने तक्रारकर्तीस द्यावी.
3) शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.3,000/- वि.प.नी तक्रारकर्तीस द्यावा.
4) वि.प.क्र. 1 व 2 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत संयुक्तपणे किंवा वैयक्तीकरीत्या करावी.
5) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.