तक्रार क्र. CC/ 12/ 69 दाखल दि. 28.08.2012
आदेश दि. 10.10.2014
तक्रारकर्ती :- कु.काजल तारकेश्वर पाठेकर
वय – 8 वर्षे, व्यवसाय – शिक्षण
मार्फत अज्ञान पालनकर्ता वडील
श्री तारकेश्वर धर्माजी पाठेकर
रा.खोकरला, ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. अध्यक्ष,
छत्रपती शाहु महाराज महिला सहकारी पत
संस्था, भंडारा, र.न.354/2003 कार्यालय,न.प.
कॉम्प्लेक्स गांधी चौक,भंडारा रा.शिवाजी
पुतळयाजवळ, शुक्रवारी भंडारा ता.जि.भंडारा
2. व्यवस्थापक
छत्रपती शाहु महाराज महिला सहकारी पत
संस्था, भंडारा, र.न.354/2003 कार्यालय,न.प.
कॉम्प्लेक्स गांधी चौक,भंडारा रा.गौतम बुध्द
वार्ड,भंडारा ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्तीतर्फे अॅड.जे.एम.बोरकर.
वि.प.अॅड.पशीने
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 ऑक्टोंबर 2014)
1. तक्रारकर्ती काजल तारकेश्वर पाठेकर वय 8 वर्षे (मार्फत अज्ञान पालनकर्ता वडील श्री तारकेश्वर धर्माजी पाठेकर) रा.खोकरला ता.जि.भंडारा येथे शिकत असून विरुध्द पक्षाकडे तक्रारकर्तीने मुदत ठेव खाते उघडले होते. परंतु तक्रारकर्तीला सदरहू ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतरही विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत रक्कम ठेवलेल्या खात्याचा तपशील खालीलप्रमाणे
नांव – काजल तारकेश्वर पाठेकर
कालावधी – 6 वर्षाकरीता
खाते उघडण्याची तारीख दि.7/6/2006, जमा रक्कम रुपये 12,000/-(बारा हजार)
ठेवीची मुदत संपल्याची तारीख दि.7/6/2012 (मुदत देय रक्कम 24,000/-)
मुदत ठेव प्रमाणपत्र जे पान क्र.11 वर दाखल आहे त्यावर पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व शाखा व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरी आहेत.
3. मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रक्कमेची मागणी करण्याकरीता संबंधीत पत संस्थेमध्ये वारंवार गेले असता संस्था नेहमी बंद असल्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांच्या घरी पण गेले व वारंवार मुदत ठेव रक्कमेची मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष ठेवीची मुदत देय रक्कम देण्याकरीता टाळाटाळ करीत होते व त्यांनी ठेवीची रक्कम दिली नाही.
4. तक्रारकर्त्याने त्याचे वकील अॅड.जयेश बोरकर यांच्या मार्फत दिनांक 24/7/2012 ला नोटीस पाठवली. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नोटीस घेण्याचे नाकारले व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी नोटीस घेतली नाही व मुदत ठेव रक्कम दिली नसल्यामुळे विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने ठेवीची मुदत देय रक्कम रुपये 24,000/- द.शा.द.शे.10% व्याजाने दिनांक 8/6/2012 पासून ते हातात रक्कम मिळेपर्यंत शारीरिक तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- मिळण्याकरीता सदरहू प्रकरण न्यायमंचात दाखल केले आहे.
5. मंचाने तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 28/8/2012 ला दाखल करुन, विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या. परंतु पत संस्था बंद पडली म्हणुन नोटीस परत आली, जी पान क्र.18 व 22 वर आहे. दिनांक 5/12/2012 ला परत नोटीस पाठविण्यात आली असता ती नोटीस सुध्दा परत आली, जी पान क्र.30 व 34 वर आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे वकील अॅड.पशीने यांनी दिनांक 8/3/2012 ला लेखी बयान सादर करण्याकरीता वेळ मागितला व मंचाने वेळ दिला होता.
दिनांक 5/4/2013 व दिनांक 10/5/2013 ला विरुध्द पक्षास लेखी जबाब सादर करण्यास विदयमान मंचाने वेळ दिला होता. त्यानंतर सुध्दा विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाब सादर केलेला नाही. त्यामुळे मंचाने दिनांक 11/2/2014 ला दोन्ही विरुध्द पक्षाविरुध्द विना लेखी जबाब चालविण्याचा आदेश केला.
7. तक्रारकर्त्याचे वकील अॅड.जयेश बोरकर यांनी तक्रार विदयमान मंचामध्ये दाखल केली आहे व सदर तक्रारीच्या प्रतीलाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दिनांक 8/9/2014 ला दिली.
8. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने मुदत ठेव रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने, मुदत ठेवीची रक्कम व्याजासह मिळण्यासाठी तसेच मानसिक, शारीरिक नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्याकरीता सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
9. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज व कागदपत्रे यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
10. तक्रारकर्त्याची मुलगी काजल तारकेश्वर पाठेकर हिचे नांवे मुदत ठेव खात्या अंतर्गत रुपये 12,000/- दिनांक 7/6/2006 ला जमा केले होते. मुदत ठेव प्रमाणपत्रावर छत्रपती शाहु महाराज महिला सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व शाखा व्यवस्थापक या नात्याने त्यांची स्वाक्षरी आहे. ते दस्त पान नं.11 वर दाखल केले आहे, त्यावरुन हे सिध्द् होते की तक्रारकर्त्याची मुलगी काजल तारकेश्वर पाठेकर हिचे नांवावर मुदतठेव रक्कम रुपये 12,000/- दिनांक 7/6/2006 ला जमा केले होते व मुदत ठेवी परिपक्वता तारीख 7/6/2012 ही होती.
11. तक्रारकर्त्याने त्याचे वकीलामार्फत दिनांक 24/7/2012 ला विरुध्द पक्षास नोटीस पाठविली असता विरुध्द पक्षाने नोटीस घेतली नाही. दिनांक 5/4/2013 व दिनांक 10/5/2013 ला विरुध्द पक्षास लेखी जबाब सादर करण्याकरीता मंचाने वेळ दिला होता. त्यानंतर सुध्दा विरुध्द पक्षाने लेखी जबाब सादर केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षास तक्रारकर्त्याची मागणी मान्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
12. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची मुदत ठेवीची रक्कम मुदतीनंतर परत केलेली नाही, ही विरुध्द पक्षाची कृती त्यांच्या सेवेतील त्रृटी दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात येते.
2. तक्रारकर्त्याला मुदत देय रक्कम रुपये 24,000/-हे विरुध्द पक्षाने दिनांक 8/6/2012 पासून ते संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यंत द.शा.द.शे.10% टक्के व्याजासह देण्यात यावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रासासाठी रुपये 10,000/-(दहा हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- (तीन हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाची जबाबदारी संयुक्तरित्या व वैयक्तिकरित्या राहील.
6. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
7. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.
श्रीमती गीता रा.बडवाईक श्री हेमंतकुमार पटेरिया श्री अतुल दि. आळशी
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
भंडारा