निकालपत्र :- (दि.20/11/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार यांना किडनी इंफेक्शनचा आजार असल्याचे समजल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये दि.26/01/003रोजी उपचाराकरिता दाखल झाल्या होत्या. त्यांना मधुमेह व ब्लडप्रेशरचाही आजार होता. सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये तक्रारदार या उपचाराकरिता दाखल झाल्यानंतर दि.31/01/2003 पर्यंत तक्रारदार यांना त्यांचे आजारामध्ये काहीही सुधारणा झाली नाही. उलट शारिरीक वेदनांचे प्रमाण वाढले. शरीरातील साखरेचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढले त्यामुळे सामनेवाला यांनी वेळोवेळी सुचविलेप्रमाणे सोनोग्राफी,एक्स-रे वगैरे सर्व टेस्ट पूर्ण झाल्या. परंतु साखर वाढूनही तक्रारदार यांचे हॉस्पिटलमधील संबंधीत डॉक्टर्सनी औषधोपचारामध्ये काहीही बदल केले नाहीत. प्रस्तुत तक्रारदार हे मधुमेह व ब्लडप्रेशर या आजाराने आजारी होते व त्याचा परिणाम किडनीवर होऊन प्राण देखील जाऊ शकतो हे डॉक्टर्सनां माहित होते व आहे. असे असूनदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांकडे दुर्लक्ष केले. सदर सामनेवाला यांचे हलगर्जीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे प्रस्तुत तक्रारदार यांचेवरचे रोगनिदान हे अपूर्ण स्वरुपाचे व उलट प्राणास मुकावे लागेल असे झाले होते. (02) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार यांना सामनेवाला हॉस्पिटलमधील डॉक्टर अश्विनी पेंढारकर यांनी आहाराबाबत ज्या लेखी सुचना दिल्या होत्या त्यामध्ये असे पदार्थ होते की ज्याचेमुळे पेशंटच्या शरीरामधील साखरेचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढेल व त्या सुचनादेखील आश्चर्यकारक अशाच होत्या. एवढेच नाही तर सामनेवाला यांनी औषधाचे डोस देणेचे प्रमाणही योग्य ठेवले नाही व इन्सुलीनमध्ये आवश्यक बदल केले नाहीत. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवालांकडे वेळोवेळी विचारणा केली असता थातूर मातूर व हस्यास्पद अशी उत्तरे देऊन टाळाटाळ केली. त्यामुळे अशा अयोग्य व सदोष उपचारामुळे तक्रारदार यांना असहाय्य शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल व्हावे लागले. सदर हॉस्पिटलमध्ये शुगर व रक्तदाब यांचे नियंत्रण झाल्यावर एक अत्यावश्यक शस्त्रक्रिया करावी लागली. सदरची शस्त्रक्रिया ही सामनेवाला यांनी केलेल्या चुकीचा व अयोग्य उपचारामुळेच करावी लागली व त्याकरिता महागडी औषधे ही परदेशातून मागवून घ्यावी लागतील असे सांगितले गेले. परंतु पैशाचे अभावी ती औषधे मागवता आली नाहीत. इतका हॉस्पिटलचा खर्च व औषधांचा खर्च हा तक्रारदाराचे आर्थिक कुवतीबाहेर गेल्याने तक्रारदाराला कर्जबाजारी व्हावे लागले आहे व अजुनही तक्रारदारांना औषध उपचार सुरु आहे. सामनेवाला यांनी पूर्वी त्यांचे हॉस्पिटलमध्ये केलेल्या सदोष व अयोग्य अशा उपचारामुळे तक्रारदार यांना सदरचा खर्च करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये दि.26/01/2003 ते 31/01/2003 या कालावधीत उपचार घेतलेले होते. सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये सर्व साधनसुविधा आहेत व सर्व तपासण्या एकाच ठिकाणी होतील अशा विश्वासाने व अपेक्षेने तक्रारदार हे सामनेवाला यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. परंतु सामनेवाला यांचे अयोग्य, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे उपचारामुळे तक्रारदार यांचा आजार आणखीन वाढून तक्रारदार यांना निष्कारण शारिरीक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.09/01/2004 रोजी त्यांचे वकीलांमार्फत पोष्टाने रजि.ए.डी.ने नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला यांना दि.12/01/2004 रोजी पोहोचूनसुध्दा त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सदरची तक्रार मे;मंचामध्ये दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर होऊन तक्रारदाराच्या नुकसानी दाखल रक्कम रु.11,00,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च व इतर खर्च सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे सर्टीफिकेट, लॅब सर्व्हीसचे बील, सामनेवाला यांनी दिलेले औषधाचे टिप्पण, डॉ.अश्विनी पेंढारकर यांनी तक्रारदार यांना दिलेले आहाराचे टिप्पण,सोनोग्राफी रिपोर्ट,पॅथोलॉजी विभागाचे रिपोर्ट, तक्रारदाराचा इलेक्ट्रोकार्डीओग्राम, डिस्चार्ज कार्ड, हॉस्पिटलचे बील, बील समरी, डॉ.विश्वनाथ मगदूम यांनी दिलेले औषधोपचाराचे टिप्पण, महादेव मेडिकल यांचेकडून औषध घेतलेच्या पावत्या, ऋतिका पॅथोलॉजी लॅबचे रिपोर्ट, जीवन पॅथोलॉजी लॅबचे रिपोर्ट, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, त्याची पोष्टाची रजि. ए.डी.ची पावती व पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.30/10/2010 रोजी डॉ.मगदूम यांनी तक्रारदारांना दिलेले डिस्चार्ज कार्ड, डॉ.मगदूम यांनी सी फॉर्ममध्ये उपचार व निदानाबाबत दिली माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांनी डॉ.मगदूम यांनी केलेल्या उपचाराची पडताळणी केलेबाबत, डॉ.मगदूम यांचे बील व सर्टीफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी प्रेरणा हॉस्पिटलमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्याकडून उपचार घेतलेले आहेत. त्यामुळे तक्रारदाराने हॉस्पिटलला पक्षकार केलेले नाही. तर तेथे काम करणा-या डॉक्टरांना पक्षकार केले आहे व नुकसान भरपाई मात्र हॉस्पिटलकडून मागत आहेत. त्यामुळे सदरची तक्रार मे.मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदार सामनेवाला हॉस्पिटलमध्ये दि.26/01/2003 रोजी अॅडमिट झाले. त्यावेळी तक्रारदाराची फास्टींग शुगर मार्जिनल जास्त होती. तरीही लहान प्रमाणात इन्सुलीनचा डोस सुरु केला. शुगर वाढली तसा डोस वाढवला. डॉ.पेंढारकर यांचे डाएटमध्ये साखर अजिबात बंद केली आहे. डायबेटीस व किडनी विकार लक्षात घेऊन डाएट दिले आहे. सामनेवाला डॉक्टर व हॉस्पिटलने तक्रारदाराचे विकार लक्षात घेऊन योग्य तीच ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने मागितलेल्या नुकसानभरपाईच्या आकडयाबद्दल कुठलाही पुरावा किंवा कारण दिलेले नाही. सामनेवाला यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नुकसान भरपाई रक्कम रु.1,11,000/- इतकी मागितली तर तक्रारीत तीच रक्कम रु.11,00,000/- इतकी मागितली आहे. सदर तफावतीबद्दल तक्रारदाराने कुठलेही योग्य कारण दिलेले नाही. तसेच डायबेटीस हा रोग उपचाराव्दारे नियंत्रीत करु शकतो. परंतु तो पूर्णपणे बरा करु शकत नाही. सदर रोगावर आहाराव्दारे व ताणतणावाव्दारे नियंत्रण करु शकतो. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करुन तक्रारदारास रक्कम रु.10,000/- दंड करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) तक्रारदाराच्या तक्रारीचे मुख्य कारण सामनेवालांच्या हॉस्पिटलमध्ये तक्रारदारावर जे उपचार केले त्यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केला हे आहे. त्याबद्दल मा. जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर यांच्याकडे तज्ञ डॉक्टरांचा अहवालाकरिता प्रस्तुत मंचाच्या आदेशावरुन सर्व संबंधीत कागदपत्रांसह दि.05/12/2007 रोजी पाठविण्यात आले. मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यासाठी सदर विषयावरील तज्ञ डॉ.बनसोडे, डॉ.हिरुगडे व डॉ.राठोड यांची समिती गठीत केली. तक्रारदार यांचे सर्व केसपेपर्स तपासून सदर तज्ञ समितीने आपला अहवाल दि.25/03/2008 रोजी दिला. सदर अहवालात तक्रारदाराच्या सर्व शारिरीक तपासण्यांवरुन रोगाचे निदान करुन औषधोपचार चालू केला व तो ‘’ औषधोपचार वरील सर्व अहवाल विचारात घेता त्यासाठी लागणारा सुसंगत असल्याचे दिसून येते. सदर रुग्णास आहार तज्ञाने सल्ला दिलेले बीट, रताळे, बटाटे हे पूर्णपणे डायबेटीसच्या रुग्णास वर्ज्य नाहीत. त्याचा वापर कधीकधी सॅलड म्हणून होऊ शकतो. सबब सकृतदर्शनी रुग्णाचा आधार रुग्णालयातील कमी वास्तव्याचा कालावधी व रोगाचे स्वरुप लक्षात घेता रुग्णास संबंधीतांनी केलेले उपचार हानिकारक व अयोग्य असल्याचे दिसून येत नाहीत.’’ असा सुस्पष्ट अहवाल उपरोक्त समितीने दिला आहे. (06) तक्रारदाराने त्यावर आपले म्हणणे देताना सदर अहवाल चुकीचा व पूर्वग्रह दुषीत हेतुने दिला असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्यामधील वाद निपटून काढण्यासाठी मिरज मिशन हॉस्पिटल, अथवा सिव्हील हॉस्पिटल, सांगली यांचेकडून रिपोर्ट मागवून घ्यावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली. तक्रारदाराच्या उपरोक्त अर्जावर प्रस्तुत मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकूण घेतला व न्यायाच्या दृष्टीकोनातून प्रस्तुत प्रकरणी निष्पक्ष वैद्यकीय अहवाल येण्याकरिता सिव्हील हॉस्पिटल,सांगली यांचेकडील वैद्यकीय मंडळाकडून तज्ञ मतांचा अहवाल मागवण्यात यावा असा आदेश दि.11/11/2009 रोजी दिला. (07) आम्ही दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र काळजीपूर्वक तपासले. (08) तक्रारदार दि.26/01/2003 रोजी सामनेवाला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या त्यावेळी किडनी इन्फक्शनसाठी उपचार घेण्यासाठी त्या दाखल झाल्या होत्या. परंतु त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचाही आजार होता. उपचारानंरतही आजारात सुधारणा झाली नाही. वेदना वाढल्या तसेच मधुमेहींना ज्या गोष्टी खाण्यात वर्ज्य असतात त्या जास्ती खाण्यास सांगितल्यामुळे त्यांची शुगर वाढली. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या रकतातील साखरेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे व इन्सुलीनच्या प्रमाणात बदल केला नाही. सामनेवाला हॉस्पिटलच्या डॉक्टरांन आपल्यावर योग्य उपचार केले नाही, आपल्या आजारांचा गंभीरपणा त्यांच्या लक्षात आला नाही व त्यांच्या या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे आपले प्राणही धोक्यात आले आहेत म्हणून अखेर तक्रारदाराने सामनेवालांच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन त्या दुस-या (डॉ.मगदूम यांच्या ) हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. डॉ. मगदूम यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर सामनेवालांच्या चुकीच्या व अयोग्य उपचारामुळे तक्रारदारावर शस्त्रक्रिया करावी लागली. या सर्व औषधोपचार व शस्त्रक्रियेच्या खर्चामुळे तक्रारदारांना कर्जबाजारी व्हावे लागले. अशा त-हेने सामनेवालांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे तक्रारदारास जो शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्यासाठी नुकसानभरपाई मागण्यासठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार मे.मंचात दाखल केली आहे. (09) तक्रारदार डॉ. मगदूम यांच्या हॉस्पिटलमध्ये सामनेवाला यांचे हॉस्पिटलमधील चुकीच्या ट्रीटमेंटमुळे शस्त्रक्रिया करावी लागली. तसेच महागडी परदेशी औषधे दयावी लागली. त्यामुळे तक्रारदारावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. याबद्दल तक्रारदाराने कुठलाही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे त्याविषयीचे विधान हे मंच ग्राहय धरत नाही. (10) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली यांनी सर्व केसपेपर्स व इतर कागदपत्रांची तपासणी करुन उपरोक्त तज्ञ समितीने दि.11/10/2010 रोजी आपला अहवाल सादर केला. सदर तज्ञ समितीत डॉ. व्ही.ए.कु-हेकर, डॉ;मोरे, डॉ.पी.डी.गुरव, डॉ.भागवत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.सी.महाजन यांचा समावेश होता. सदर समितीने आपल्या अहवालात पुढीलप्रमाणे तज्ञ मत दिले आहे. ‘’ उपरोक्त विषयास अनुसरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,कोल्हापूर यांनी सदर प्रकरणात सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकनावरुन डॉ.निलांबरी रमेश मंडपे वय वर्षे 42 रा.726/7, ए वॉर्ड, कोल्हापूर हया आधार नर्सिंग होम,कोल्हापूर या रुग्णालयात दि.26/01/2003 रोजी दुपारी 12.30 वाजता अॅडमिट झालेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या रोगाचे निदान Diabetes Mellitus-2 with Hyperptension with Bilataral Pylonephritis असे करण्यात आलेले होते. सदरच्या रुग्णास डायबेटीसमुळे किडनीचे इन्फेक्शन झाले असल्या कारणाने वरचेवर हायग्रेड फिव्हर येत होता व त्यासाठीच सदर रुग्णाचे अॅडमिशन आवश्यक होते.(आंतररुग्ण म्हणून दाखल करणे आवश्यक होते) सदर रुग्ण हा दि.26/01/2003 ते 31/01/2003 या कालावधीत आधार नर्सिंग होम, कोल्हापूर येथे अॅडमिट असल्याचे निदर्शनास येते. वरील कालावधीत रुग्णाच्या लघवीची तपासणी व रक्तातील साखरेची तपासणी व पोटाच्या अल्ट्रासोनोग्राफीक रिपोर्टवरुन सदर रुग्णाचे केलेले निदान बरोबर केले असल्याचे दिसून येते. डायबेटिसमध्ये इन्फेक्शन झाले असता रक्तातील साखरेचे प्रमाण सारखे कमीजास्त होत असते व याच कारणास्तव त्यावर लागणारे औषध इंजेक्शन इन्सुलिनचा डोस हा कमी जास्त करावा लागतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण पूर्णपणे नॉर्मल होण्यास विलंब लागू शकतो. तसेच इन्फेक्शनमुळे रुग्णास ताप येतो व तोही पूर्णपणे बरा होण्यास वेळ लागू शकतो कारण सदरच्या रुग्णास किडणीचे इन्फेक्शन झाले आहे व ते पूर्णपणे बरे होण्यास विलंब लागतो असे वैद्यकीय शास्त्रानुसार आहे. सदरच्या रुग्णांस उपस्थित कालावधीत रोज दिवसातून दोनदा झालेली तपासणी व त्याला मिळणारे अॅन्टीबायोटिक, इन्सुलिन व ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मिळणारी औषधे तसेच आहारतज्ञांनी आहाराबद्दल दिलेला सल्ला(चार्ट) हेही वैद्यकीय शास्त्रानुसार दिलेली आढळतात. रुग्णांचे स्वत:हून दि.31/01/003 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असल्याचे कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. वरील सर्व माहितीवरुन समितीवरील सर्व सदस्यांचे एकमताने असे म्हणणे आहे की, डॉ.निलांबरी रमेश मंडपे, यांचेवर आधार नर्सिंग होम कोल्हापूर येथे दि.26/01/2003 ते 31/01/2003 या कालावधीत झालेल्या उपचारात कोणताही वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला आढळून येत नाही.’’ (11) कोल्हापूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक व सांगली येथील जिल्हा शल्सचिकित्सक यांनी दिलेल्या अहवालांचे परिशीलन काळजीपूर्वक केल्यानंतर तसेच प्रस्तुत तक्रारी दाखल झालेले सर्व कागदपत्र व उभय वकीलांचे युक्तीवाद लक्षात घेता हे मंच अशा स्पष्ट निष्कर्षाप्रत येत आहे की, तक्रारदार यांच्या उपचाराबाबत सामनेवाला प्रेरणा हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी केलेल्या उपचारात कोणताही निष्काळजीपणा झालेला आढळून येत नाही. सदर निष्कर्षाप्रमाणे सामनेवाला प्रेरणा हॉस्पिटल व तेथील डॉक्टर यांच्या सेवेत कुठलीही सेवात्रुटी झाल्याचे तक्रारदारांना सिध्द करता आले नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाविषयी काहीही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |