जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/318 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या संकेत पि.सुरेंद्र कुलकर्णी, वय वर्षे 27 व्यवसाय शिक्षणी, रा.द्वारा – सुरेंद्र पि.केशव कुलकर्णी, अर्जदार. 110,स्टाफ क्वाटर्स,अंधेरी क्रिडा संकूल, जे.पी.रोड,अंधेरी (पश्चिम) मुंबई -400 058. विरुध् दिगांबरराव पि.सारंगधर बुलबुले वय वर्षे 60, व्यवसाय व्यापार, गैरअर्जदार रा.पुंडलिकवाडी,महावीर चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे - अड.आर.एन.कुलकर्णी गैरअर्जदार तर्फे वकील – अड. नो से निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. अर्जदार संकेत पि.सुरेंद्र कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 नुसार ही तक्रार गैरअर्जदार दिगंबरराव पि.सारंगधर बुलबुले यांच्या विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे. 2. गैरअर्जदार हे सुखेश प्लॉट योजना, सुलभ मासीक हप्तेवारीवर कौठा, रविनगर व श्रीपादनगर जवळ नांदेडचे संचालक व प्रवर्तक आहेत. अर्जदार हे सुखेश प्लॉट योजनेचे सभासद आहेत त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. 3. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सुखेश योजनेचे नियम व अटीनुसार प्लॉटची पुर्ण किंमत समान 32 मासीक हप्ते ( रु.400 प्रमाणे) असे एकुण रु.12800/- गैरअर्जदाराकडे सन 1985 ते 96 या वर्षात भरले आहे. अर्जदाराने सदरील प्लॉटची पुर्ण किंमत भरुन देखील गैरअर्जदारांनी अर्जदाराला सुखेश प्लॉटचे नियम व अटीनुसार प्लॉट दिला नाही. अर्जदाराने अनेक वेळेला सदरील प्लॉटची मागणी केली व गैरअर्जदारांनी आज देतो उद्या देतो म्हणुन टाळाटाळ केली. त्यामुळे शेवटी अर्जदाराने त्यांच्या वकीला मार्फत दि.08/09/2010 रोजी अर्जदारास रजिस्टर पोष्टाद्वारे नोटीस पाठविली. सदरील नोटीस गैरअर्जदारास मिळून देखील त्यांनी नोटीसचे उत्तर देण्याची तसदी घेतली नाही अथवा प्लॉट किंवा प्लॉटची किंमत दिली नाही. अशाप्रकार गैरअर्जदाराने हेतूपूरस्सर अर्जदारास प्लॉट देण्याचे टाळले आहे. ज्यामुळे त्यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला. अर्जदाराने या मंचासमोर येऊन ही तक्रार दाखल केली आहे. 4. अर्जदाराचे मागणी आहे की, गैरअर्जदारांना आदेश द्यावेत की, अर्जदारास सुखेश प्लॉट योजनेच्या नियम व अटीनुसार रवीनगर अथवा श्रीपादनगर नांदेड येथे एक प्लॉट द्यावे किंवा त्या प्लॉटची सध्याची बाजारी किंमतीप्रमाणे रक्कम द्यावी. गैरअर्जदारांनी प्लॉट किंवा त्याची किंमत न देउन अर्जदारास मानसिक त्रास दिल्याबद्यल गैरअर्जदाराला मानसिक त्रासापोटी रु.50,000/- चा हुकूम व्हावा व कोर्टाचा खर्च रु.5,000/- मिळावी अशी विनंती केली आहे. 5. अर्जदार गैरअर्जदारास नोटीस मिळाल्यानंतर ते वकीला मार्फत हजर झाले अनेक वेळा त्यांनी अर्ज देऊन त्यांनी म्हणणे दाखल करण्यासाठी संधी मागून घेतली तरीही गैरअर्जदार आपले म्हणणे दाखल केलेले नाही? म्हणुन गैरअर्जदारा विरुध्द त्यांचे म्हणणे शिवाय ही तक्रार पुढे चालवावी असा हुकूम नि. 1 वर दि.03/02522011 रोजी करण्यात आला. 6. अर्जदाराने त्यांनी गैरअर्जदाराकडे मासीक हप्त्यापोटी जी रक्कम जमा केली आहे त्या रक्कमेच्या पावत्या सदरीलस योजनेच्या अटीच्या प्रती, अर्जदाराचे शपथपत्र इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदारांनी त्यांचे म्हणणेही दिले नाही अथवा कोणतेही कागदपत्र पुरावा म्हणुन दाखल केलेले नाही. 7. अर्जदाराच्या फिर्यादीतील कथन पहाता व त्यांनी कागदपत्र दाखल पुरावा पहाता जे मुद्ये उपस्थीत होतात. ते मुद्ये व त्यावरील सकारणासह उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये उत्तरे. 1. अर्जदास हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदाराने सदरील सुखेश प्लॉट योजनेच्या अटी व नियमानुसार पुर्ण हप्ते म्हणजे एकुण रु.12,800/- प्रतीवादीकडे भरल्याचे सिध्द केले आहे काय.? होय 3. अर्जदाराने संपुर्ण रक्कमेचा भरणकरुन देखील गैरअर्जदारांनी फिर्यादीस सदरील प्लॉट न देऊन किंवा त्याची किंमत न देऊन सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे का? होय. 4. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 ते 4 8. हे मुद्ये एकमेकाशी पुरक असल्यामुळे व गैरअर्जदाराने त्यांचे म्हणणे सुध्दा दाखल केले नाही व कागदपत्र दाखल केले नाही त्यामुळे सर्व मुद्ये एकत्रितपणे चर्चेला घेण्यात येत आहेत. 9.. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराने त्याचे शपथपत्र नि.2 वर दाखल केले आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सुखेश प्लॉट योजनेचे अटी व नियमाप्रमाणे एकुण 32 हप्ते ( दर महा रु.400/- प्रमाणे) भरल्याच्या पावत्या दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे अर्जदाराने जी गैरअर्जदाराला वकीला मार्फत नाटीस दि.18/09/2010 रोजी दिली होती,त्याची स्थळप्रत व त्याची स्विकृती रसीद देखी दाखल केली आहे. वरील सर्व कागदपत्र व अर्जदाराचे शपथपत्र कागदपत्र ग्राहय धरुने योग्य आहे. एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदाराने सुरुवातीलाच म्हणजे दि.28/06/1995 रोजी एकुण 15 मासीक हप्त्याची रक्कम गैरअर्जदाराचे जमा केलेली आहे. सदरील 15 मासीक हप्ते रु.400/- च्या पावत्याचा झेरॉक्स प्रती अर्जदाराने दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी व मुदतीमध्ये त्यांनी उर्वरीत मासीक हप्ता रु.400/- जमा केल्याच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. एकंदरीत पावत्या पहाता असे दिसून येते की, अर्जदाराने सदरील सुखेश प्लॉट योजनेच्या नियमाप्रमाणे संपुर्ण 32 मासीक हप्ते दर महा रु.400/- चे गैरअर्जदाराकडे नियमित व मुदतीत भरलेले आहेत. कागदपत्रावरुन असे दिसुन येते की, गैरअर्जदाराने संपुर्ण प्लॉटची रक्कम किंमत रु.12,800/- गैरअर्जदाराला मिळून देखील अर्जदाराला गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे प्लॉट दिला नाही त्यामुळे ही त्यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते. 10. सदरील नियम व अटी पहाता असे दिसते की, सदरील एकुण 32 हप्ते भरल्यानंतर गैरअर्जदार हे अर्जदारास 30x40 फुटाचा म्हणजे 1200 चौरस फुटाचा प्लॉट अर्जदारास देतील, कागदपत्रावरुन असे दिसते की, सदरील प्लॉटची रक्कम रु.12,800/- घेऊन देखील गैरअर्जदाराने अर्जदारास सदरील प्लॉट न देऊन सेवेतील त्रुटी केलेली आहे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसुन येत आहे. एवढेच नव्हे तर अनेक वेळा संधी घेऊन देखील गैरअर्जदारांनी आपले म्हणणे या मंचासमोर का दाखल केलेला नाही? त्याबद्यल काहीही समजून येत नाही. अर्जदाराच्या विदवान वकीलाचे म्हणणे प्रमाणे गैरअर्जदाराने संपुर्ण रक्कम वसुल करुन निगरगटपणे व उर्मटपणे अर्जदाराच्या नोटसीला उत्तर देखील दिले नाही व प्लॉट दिला नाही व प्लॉटची किंमत दिली नाही म्हणुन अर्जदारास विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदाराने आपले म्हणणे न दिल्यामुळे अर्जदाराची मागणी जशीच्या तशी मान्य करण्यास काहीही प्रत्यवाय नाही. म्हणुन वरील मुद्याचे उत्तर आम्ही सकारात्मक देत आहोत. 11. वरील विवेचनावरुन असे दिसते की, अर्जदाराने ताबडतोब मुदतीमध्ये प्लाटची संपुर्ण किंमत रु.12,800/- गैरअर्जदाराकडे रितसर जमा करुन पावत्या व त्यांन प्लॉटची मागणी करुन देखील गैरअर्जदारांनी प्लॉट दिला नाही. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराकडुन सदरील सुखेश प्लॉट योजनेच्या नियमाप्रमाणे व अटीप्रमाणे कौठा, रवीनगर किंवा श्रीपादनगर नांदेड येथील एक प्लॉट 30x40 म्हणणे एकुण 1200 चौरस फुटाचा फिर्यादी घेण्यास हक्कदार आहेत, जर काही कारणामुळे गैरअर्जदार सदरील प्लॉट अर्जदारास देऊ शकत नसतील तर त्यांनी सदरील प्लॉटची बाजारी किंमत द्यावी त्या तारखेला म्हणजे दि.22/12/2010 रोजी प्लॉटची जी किंमत असेल ती प्लॉटची किंमत अर्जदारास देण्यासे बाध्य राहतील. त्याचप्रमाणे काही कारण नसतांना अर्जदारास प्लॉट दिला नाही, नोटीसचे उत्तर दिले नाही अथवा त्याची रक्कम परत केली नाही त्यामुळे अर्जदारास जो मानसिक त्रास सहन करावा लागला त्याबद्यल अर्जदार गैरअर्जदाराकडुन मानसिक त्रासापोटी कमीतकमी रु.25,000/- वसुल करण्यास हक्कदार राहतील, असे आमचे मत झाले आहे. त्याचप्रमाणे या दाव्याचा खर्च मागणी केली ती मागणी म्हणजे रु.5,000/- हेही मिळण्यास अर्जदार पात्र राहतील, असे आमचे मत झाले आहे. 12. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात येते. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत सुखेश प्लॉट योनजेच्या अटी व नियमाप्रमाणे अर्जदारास कौठा, रवीनगर अथवा श्रीपादनगर नांदेड येथील एक प्लॉट 30x40 एकुण 1200 चौरस फुटाचा अर्जदारास ताबडतोब रजिस्ट्री करुन देतील तथापी रजिस्ट्रीचा खर्च अर्जदार स्वतः करतील. किंवा. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे गैरअर्जदार हे अर्जदारास सदरील प्लॉट देण्यास असमर्थ असतील तर त्यांनी सदरील प्लॉटची तक्रार दाखल तारीख दि.22/12/2010 ला जी बाजारी किंमत होईल ती पुर्ण रक्कम अर्जदारास देतील. 3. गैरअर्जदार हे अर्जदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु.25,000/- देतील व या दाव्याचा खर्च रु.5,000/- अर्जदारास देतील. 4. निकाल तारखेपासुन 30 दिवसांचे आंत जर अर्जदाराला वरील पुर्तता केली नसली तर अर्जदारास वरील संपुर्ण रक्कमेवर गैरअर्जदाराकडुन द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज वसुल करण्याचा हक्क राहील.. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघुलेखक |