ग्राहक तक्रार क्र. 110/2013
अर्ज दाखल तारीख : 09/08/2013
अर्ज निकाल तारीख: 16/02/2015
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) मोतीराम पि. कारभारी बोबडे,
वय-67 वर्षे, धंदा – शेती,
रा.करंजकल्ला, ता. कळंब, जि.उस्मानाबाद.
2) बळीराम पि. मोतीराम बोबडे,
वय-40 वर्षे, धंदा शेती,
रा. करंजकल्ला, ता. कळंब जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रेमा भास्कर माळी,
प्रो. प्रा. संदिप कृषि सेवा केंद्र,
लोहटा (पुर्व) ता. कळंब, जि. उस्मानाबाद
2. डॉ. शलीग्राम डी. वानखेडे,
व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र स्टेट सिडस कार्पारेशन लि.,
महाबीज भवन, कृषि नगर, अकोला-444104 ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.कोंडेकर,
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.जी.एस.कस्पटे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1) अर्जदार मोतीराम कारभारी बोबडे बळीराम मोतीराम बोबडे हे मौजे करंजकल्ला ता. कळंब जि.उस्मानाबाद येथील रहीवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदार क्र.1 व 2 यांना करंजकल्ला ता. कळंब येथे जमीन गट क्र.81 क्षेत्र 1 हे. 34.50 आर ऐवढी जमीन असून सदर जमिनीत सन 2013 मध्ये सोयाबीन या पिकाची लागवड करावयाची असल्याने दि.09/06/2013 रोजी विप क्र.1 यांचे कडून विप क्र.2 यांच्या कंपनीचे 5 पिशव्या सोयाबीनचे बियाणे घेतले.
3) सदर बियाणे शेताची चांगल्या प्रकारची पुर्व मशागत करुन 4 पिशव्या दि.26/06/2013 रोजी पुर्ण क्षेत्रात पेरणी केली. उत्कृष्ठ देखभाल केली परंतु बियाणे उगवून आलेले नाहीत.
4) अर्जदार यांनी तालूका कृषी अधिकारी पंचायत समिती यांना दि.03/07/2013 रोजी जाय मोक्यावर येऊन स्वत: पाहणी करणेची विनंती केली. त्यानुसार दि.09/07/2013 रोजी स्थळपाहणी केली व सोयाबीन उगवून आले नसल्याचे निदर्शनास आल्याने तसा अहवाल पंचासमक्ष पंचनामा तयार केला व बियाणाची उगवण 50 टक्के आहे असा निष्कर्ष काढला.
5) अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, सोयाबीनचा भाव सरासरी प्रती क्विंटल रक्कम रु.4,000/- असल्याने एकरी रक्कम रु.60,00/- प्रमाणे रु.2,01,750/- एवढे उत्पन्न मिळाले असते परंतु विप क्र.1 व 2 यांनी सेदोष बियाणे पुरवठा केल्याने शेतामध्ये केवळ 50 टक्के उगवण झालेली आहे. त्यामुळे अर्जदारास नाहक मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. विप क्र.1 व 2 यांनी चांगली सेवा दिलेली नाही. सेवेत त्रुटी केलेली आहे त्यामुळे अर्जदारास विप क्र.1 व 2 यांचेकडून बियाणापोटी रु.2,01,750/- शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- तक्रार खर्चापोटी रु.5,000/- असे एकूण रु.2,31,750/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने देण्याचा हुकुम व्हावा अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
ब) 1) विप क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. त्याचे म्हणण्यानुसार तक्रार खर्चासह खारीज करावी. अर्जदाराच्या तक्रारी बददल काहीही माहीती नाही. तक्रारीचा मजकुर हा खोटा व काल्पनिक असून इन्कार केलेला आहे.
2) विप क्र.1 यांचे असे ही म्हणणे आहे की, अर्जदार क्र.2 यांना सदर विप क्र.2 यांचे बियाणे चांगले आहे व तेच बियाणे मला दया मी त्याची चौकशी करुन आलेलो आहे असे अर्जदार म्हणाला परंतु सदर बियाणाबददल अर्जदार क्र.2 यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. अर्जदार यांने 121 लॉट मधील फक्त 4 बॅगची खरेदी केली. 125 चे लॉट मधील बॅगबाबत कोणाचीही तक्रार आलेली नाही यावरुन अर्जदाराच्या मशागतीमध्ये व पेरणीमध्ये दोष असल्याचे दिसुन येते. पेरणी करतांना पुर्व मशागत केलेली नाही. योग्य अंतर सोडलेले नाही. साल 2013 चे जुन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला होता. अर्जदाराने बियाणे घेतेवेळी व पेरणीनंतर पाणी देण्याची चोकशी केलेली नव्हती. दि.03/07/2013 रोजी अर्ज दिला याबाबत अर्जदार यांना कोणतीही कल्पना नव्हती. दि.09/07/2013 रोजी जायमोक्यावर तालूका कृषी अधिकारी कळंब व पंचासमक्ष गेलेले होते. लोकांच्या तक्रारीमुळे सदर विप क्र.2 यांना लॉट क्रमांक 121 च्या बॅगा मधील बियाणतील दोष असल्याबाबत कळले होते व सदर बाब ही विप क्र.2 यांना कळवली होती सदर लॉट मधील 146 बॅगा विप यांचे दुकानामध्ये कंपनीकडून विक्री करण्याकरीता आल्या होत्या.
3) विप क्र.2 यांनी बॅगा परत मागण्यापुर्वी सदर विप यांनी तालूका कृषी अधिकारी कळंब यांना कळवले होते व विक्री केलेल्या लोकांची यादी देखील दाखल केलेली होती. विप क्र.2 यांनी सदर बॅगाचे मोबदल्यात दुस-या बॅगा ग्राहकांना दया असे कळवले होते त्यानुसार सदर विप यांनी जेवढया लोकांनी लॉट क्र.121 मधील बॅग खरेदी केलेल्या आहेत. तेवढया दुस-या बॅगा घेऊन जाण्याबाबत कळवले होती व अर्जदारासही कळवले होते त्यामुळे विप क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी निर्माण केल्याचे दिसुन येत नाही.
4) दि.09/07/2013 रोजी अर्जदार यांनी कृषी अधिका-याशी संगनमत करुन उगवण क्षमेतेचे 50 टक्के नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. अर्जदार यांनी बॅग खरेदी पुर्वी सर्व चौकशी करुन खरेदी केलेली आहे. त्यानुसार सदर बॅगवर उगवण क्षमा 70 टक्के आहे. अर्जदार यांच्या क्षेत्रास 50 टक्के उगवण झाल्याचे दिसुन येते. अर्जदारास बियाणे उगवले नसल्याने आर्थिक नुकसान झाले. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला हे विप यांना मान्य नाही त्यामुळे विप क्र.1 यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. विप क्र.1 यांना विनाकारण गुंतविण्यात आलेले आहे तरी तक्रार नामंजूर करावी व तक्रार विप क्र.1 च्या हददीपर्यंत नामंजूर करण्यात यावी अशी विनंती विप क्र.1 यांनी केलेली आहे.
क) 1) विप क्र.2 यांनी त्यांचे लेखी निवेदन अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार ग्राहक नाही त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा.
2) अर्जदाराचे मालकीच्या जमिनीचे गट क्रमांकामध्ये तफावत दिसुन येते. पिक पेरापत्र दुस-या व्यक्तिच्या नावे असल्याने अर्ज फेटाळण्यात यावा. लागवडीबाबत कथने मोघम असल्याने अमान्य आहेत अर्जदार क्र.2 व मोतीराम कारभारी बोबडे हे विभक्त असल्याने मोतीराम कारभारी यांचे मिळकतीत बियाणे पेरणी करण्याचे काही एक कारण नाही. अर्जदाराने जमीनीत महाबीजचे जे.एड.335 वानाचे बी पेरल्याचे दिसुन येत नाही. जर गट क्र.81 चे मालकाने बाजारातील सोयाबीन पेरले असेल तर त्यांना नुकसान भरपाई मागता येत नाही.
3) सोयाबीन चे बियाणे हे अतीनाजूक व संवेदनशील असते त्याची हाताळणी, पेरणी कुशल व प्रशिक्षीत व्यक्तिने केली पाहिजे. अयोग्य पध्दतीने जर बियाणे हाताळले तर उगवण क्षमतेवर परीमाम होतो.पूरेसा ओलावा नसल्यास ही उगवण चोगल्या प्रकारे होऊ शकत नाही. तसेच बियाणे 2.50 सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास ही उगवण क्षमतेवर परीमाणाम होतो. जुन, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने जर बियाणे पेरले असल्यास अवर्षणामुळे कमी उगवण होऊन नुकसान झालेले दिसते.
4) कृषी अधिकारी यांच्या अहवालात ओलाव्याबाबत कसलेही विधान नाही. कलम 6 मधील नुकसानीचा निष्कर्ष खोटा व अशास्त्रीय असल्याने अमान्य आहे. बियाणांची उगवण क्षमता ही प्रयोग शाळेतून पेरलेले बियाणांचा नमूना घेऊन अहवाल घेतल्याखेरीज उगवण क्षमता कमी आहे हे म्हणता येत नाही. तसा अधिकार तालूका कृषि अधिकारी यांना नाहीत. प्रयोग शाळेतील तज्ञांचा अहवाल नसल्याने या विप ची त्यास हरकत आहे असे म्हंटले आहे. सरासरी भाव व एकरी उत्पन्न या दराचा विचार करता अतीरंजीत आहे, तक्रारदारास नाहक मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले. इ. मजकुर खोटा आहे. जमिनीत ओलावा व पुरेसा पाणी पुरवठा नसल्याचे सिध्द होते. अर्जदाराचे व बियाणे पेरणा-या शेतक-याचे वैयक्तिक चुकीमुळे नुकसान झालेले दिसते यात विप ची जबादारी येत नाही.
5) महामंडळाचे जे एस 335 लॉट क्र.121 वाणाचे बियाणे राज्य वीज प्रमाणिकरण यंत्रणेने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार 72 टक्के उगवण क्षमता असलेले आहे व वीज प्रमाणीकरण यंत्रणेने मुक्तता अहवाल दिल्यानंतरच बियाणे विक्रीस उपलब्ध केलेले आहे. अर्जदाराने मागितलेली नुकसान भरपाई अवास्तव मनघडत असल्याने मान्य नाही. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती विप क्र.2 यांनी केलेली आहे.
ड) अर्जदाराने तक्रारी सोबत, पीकपेरा प्रमाणपत्र, कृषी अधिका-यांना दि.03/07/2013 अर्ज दि.03/07/2013 चा दिलेला अर्ज, तालूका कृषी अधिकारी यांचे पत्र, समीतीचा क्षेत्रिय भेटीचा अहवाल व पंचनामा, संदिप कृषी सेवा केंद्राचे कृषी अधिकारी यांस पत्र, पावती न करता येण्यायोग्य पीकपेरा प्रमाणपत्र व पावत्या, लेखी म्हणणे यांचे सुक्ष्म अवलोकन केलेले लेखी युक्तिवाद वाचला अर्जदाराचा विधीज्ञांचा तोंडी चुक्तीवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत विप यांनी त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
इ) मुद्दा क्र. 1 व 2
इ)1) अर्जदारानी बियाणे पेरले व उगवून आले नाही व नुकसान झाले ही अर्जदाराची प्रमुख तक्रार आहे.
2) अर्जदाराने 1 हे.60 आर. आर. मध्ये सोयाबीन बियाणांची लागवड केलेली होती असे समीतीचे अहवालावरुन स्पष्ट होते. सोयाबीनची उगवण क्षमता ही 70 टक्के अशी आहे व बियाणे उगवून आले फक्त 50 टक्के.
3) विप क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की प्रयोगशाळेत बियाणे चाचणीसाठी देऊन तज्ञांचा अहवाल घेणे गरजेचे होते. उलटपक्षी विप क्र.2 यांनी त्याच लॉटचे बियाणे प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवून त्यांनी उत्पादित केलेले बियाणे कसे सदोष नाही हे सिध्द करणे गरजेचे होते. परंतु विप क्र.2 यांनी चाचणी प्रयोग केलेला नाही व त्याचे बियाणे सदोष नाही हे सिध्द केलेले नाही उलट काहीतरी तांत्रीक कारण पुढे करुन अर्जदाराची चुक निदर्शनास आणून स्व:ची जबाबदारी झटकून नुकसान भरपाई देण्याचे टाळले आहे.
4) अर्जदाराने एकरी 15 क्विंटल पोती प्रमाणे एकरी रु.60,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. अर्जदाराने 1 हे. 60 आर. क्षेत्रात पेरणी केलेली आहे. म्हणजे 3 एकर 20 आर एवढया क्षेत्रात पेरणी केली व 50 टक्के उगवण झाली व 20 नुकसान झाले हे ग्राहय धरावे लागेल.
5) आमच्या मते एक एकरामध्ये 10 पोते असे 3 एकर 20 आर. मध्ये 35 पोते व 2013 साली एका क्विंटलला रु.3,500/- असा भाव धरता तर रु.1,22,500/- पैकी 50 टक्के उगवण झाल्याचे समीतीने निष्कर्ष दिलेला आहे त्यामुळे अर्जदाराचे 20 टक्के नुकसान झाले हे सिध्द होते. त्यामुळे अर्जदार क्र.1 व 2 हे रु.24,500/- नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.
6) विप क्र.1 यांनी त्यांचे लेखी निवेदनात असे म्हंटले आहे की लॉट क्र.121 मधील बॅग खरेदी केलेल्या आहेत तेवढया लोकांना दुस-या बॅगा घेऊन जाण्याबाबत कळवले होते व तक्रारदार यांनाही कळविले होते. म्हणजेच विप क्र.1 यांना हे मान्य आहे की त्यांनी विक्री केलेले बियाणे सदोष होते.
7) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की विप. यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) विप क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरीत्या व एकत्रीतरीत्या अर्जदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.24,500/- (रुपये चोविस हजार पाचशे) दि.08/08/2013 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
2) अर्जदारास विप यांनी एकत्रित व संयुक्तिरीत्या पेरणीपोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
3) अर्जदारास विप यांनी एकत्रीत व संयुक्तिकरित्या तक्रारीचा खर्च रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.