::: आदेश ::
( पारित दिनांक : 29/01/2018 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये तक्रारकर्त्याने ही तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द त्रुटीपूर्ण सेवा व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दिनांक 21/12/2015 रोजी Gionee M4 कंपनीचा मोबाईल वारंटी कार्डसह रोख रुपये 12,200/- मध्ये विकत घेतला. त्यानंतर, सदर मोबाईलमध्ये तीन ते चार महिण्यामध्येच, वारंवार बंद पडणे, कव्हरेज क्षेत्र असतांना बाहेरुन कॉल न लागणे, अशाप्रकारे तक्रारी जाणवू लागल्या. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना त्याबाबत माहिती दिली व विरुध्द पक्ष क्र. 1 च्या सांगण्यावरुन, तक्रारकर्त्याने वेळोवेळी मोबाईल दुरुस्तीकरिता विरुध्द पक्ष क्र. 2 कडे दिल्यानंतर सुध्दा, विरुध्द पक्षांनी समस्येचे निराकरण केले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास नोटीस सुध्दा पाठवली. परंतु विरुध्द पक्षाने नोटीसचे खोटे ऊत्तर दिले.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याचा अर्ज मंजूर करण्यांत यावा, दिनांक 21/12/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 कडून घेतलेला Gionee M4 किंमत रुपये 12,200/- व्याजासह देण्याचा आदेश दयावा, नुकसान भरपाई रुपये 50,000/- व शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई रुपये 25,000/- असे एकूण 87,200/- देण्याचा आदेश पारित करावा. इतर योग्य व न्यायोचित दाद द्यावी.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल केला व त्यामध्ये नमूद केले की, विरुध्द पक्षाकडून दिनांक 21/12/2015 रोजी Gionee M4 हा भ्रमणध्वनी संच रुपये 12,200/- मध्ये विकत घेतला, बिल व वॉरंटी कार्ड बाबत वाद नाही. हे म्हणणे चुकीचे आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास चांगली सेवा पुरविली नाही. तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसचे सविस्तर ऊत्तर विरुध्द पक्षाने दिलेले आहे. सदरची तक्रार चालू शकत नाही. मोबाईलमध्ये बिघाड झाल्यास स्वतः सर्विस सेंटरवर जाण्याबाबत व दुरस्त करुन घेण्याबाबत तसेच वॉरंटी उत्पादक कंपनीच्या नियमानुसार राहील व मोबाईल हँण्डसेट पाण्यात भिजल्यास, तुटफुट झाल्यास गॅरंटी/वॉरंटी मिळत नाही. अशा बाबी अटी व शर्तीच्या स्वरुपात नमूद केलेल्या आहेत. त्यावरुन, तक्रारकर्त्याची तक्रार निराधार स्वरुपाची आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास अत्यंत चांगली सेवा दिलेली आहे. दिनांक 03/10/2016 च्या कार्डप्रमाणे, पी.बी.ए. मदरबोर्ड विनामुल्य बदलून दिला होता व नविन टाकून दिला. दिनांक 22/08/2016 च्या च्या सर्विस कार्डवर टॉवर रेंजची तक्रार होती, ती सुध्दा पुर्णपणे दुरुस्त करुन दिली. त्यानंतर दि. 24/09/2016 ची तक्रार होती, त्याप्रमाणे सेन्सर नेटवर्क तक्रारसुध्दा दूर केली. वास्तविक तक्रारकर्त्याने सदर मोबाईलची कंपनी जिओनी यांना प्रतिपक्ष केले नाही. त्यामुळे सदर तक्रार विरुध्द पक्षांविरुध्द चालू शकत नाही व ती खारिज करण्यात यावी.
3. कारणे व निष्कर्ष ः-
तक्रारकर्ता यांची तक्रार व दाखल सर्व दस्त, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब व तक्रारकर्त्याचे प्रतिऊत्तर तसेच उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दिनांक 21/12/2015 रोजी Gionee M4 हा मोबाईल हँन्डसेट रोख रक्कम रुपये 12,200/- मध्ये विकत घेतला व त्याची पावती तक्रारीमध्ये दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 चा ग्राहक आहे. तसेच दाखल जॉबशिट व सर्व्हिस कार्ड यावरुन, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 कडे सदर मोबाईल हँन्डसेट वॉरंटी कालावधीत दुरुस्तीला टाकला होता, असे दिसते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 2 चा देखील ग्राहक होतो, या निष्कर्षावर मंच आले आहे.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर मोबाईल हँन्डसेटमध्ये तीन ते चार महिण्यामध्येच, वारंवार बंद पडणे, कव्हरेज क्षेत्र असतांना बाहेरुन कॉल न लागणे, अशाप्रकारे तक्रारी जाणवू लागल्या. त्यामुळे दिनांक 22/08/2016, दिनांक 24/09/2016 व दिनांक 03/10/2016 ला विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीला दिला. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदर तारखेला मोबाईल हा वॉरंटी कालावधीत असल्याने निःशुल्क दुरुस्त करुन दिलेला आहे, असे दाखल दस्तावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्ता यांनी, तक्रारीतील प्रार्थना क्र. (अ) रक्कम रुपये 12,200/- व्याजासह परत देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी जी मोबाईल निर्माता कंपनी आहे, त्यांना तक्रारीत पार्टी केलेले नाही, त्यामुळे सदर विनंती, मान्य करता येणार नाही. कारण विरुध्द पक्ष क्र. 1 हा विक्रेता आहे व विरुध्द पक्ष क्र. 2 हे सर्व्हीस सेंटर आहे आणि विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी वेळोवेळी तक्रारकर्त्याचा मोबाईल निःशुल्क दुरुस्त करुन दिलेला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कोणतीही सेवेतील न्युनता केलेली, दिसून येत नाही. त्यामुळे सदर तक्रार ही खारिज करण्यायोग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री.कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri