Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारीत दिनांक.19/4/2022.) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हा सावली येथील रहिवासी असून हार्डवेअर चा व्यवसाय करतो. विरुध्द पक्ष ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून त्याच्या उपविधीप्रमाणे कायद्यानुसार काम करते. विरुध्द पक्ष सोसायटी सदस्याकडून तसेच सामान्य लोकांकडून वेगवेगळ्या योजना जसे की आवर्ती ठेव योजना, दैनंदिन ठेव योजना योजना, बचत खाती, मुदत ठेव इत्यादी ठेवी गोळा करते. दिनांक 1/1/2015 रोजी विरुध्द पक्ष यांचे संकलन एजंट श्री आडपेवार यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले की, शेवटी जमा झालेल्या रकमेवर आकर्षक व्याज मिळेल. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला पासबुक असलेले खाते क्रमांक 486 जारी केले व त्यात तक्रारकर्त्याने रुपये 5000/- जमा केले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला हमी दिली की, दिनांक 2/1/2018 रोजी सोसायटी मुदतीपूर्वी एकूण रक्कम रुपये 2,10,000/- तक्रारकर्त्याला देईल. 2/1/2018 रोजी विरुध्द पक्षास संपर्क साधला असता त्यांनी तक्रारकर्त्याला रुपये 1,92,875/- दिले. त्यावर तक्रारकर्त्याने कराराप्रमाणे रुपये 2,10,000/- ची मागणी केली, विरुध्द पक्षाने ती रक्कम देण्यास नकार दिला. दिनांक 25/01/2018 तसेच दिनांक 14/2/2018 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा उर्वरित रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी उलटपक्षी तक्रारकर्त्याला खोटी नोटीस पाठविली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठवून उर्वरित रकमेची मागणी केली परंतु विरुध्द पक्ष यांनी त्यावर नोटीस पाठवून दावा नाकारला. उपरोक्त प्रकारे तक्रारकर्त्याची आवर्ती ठेव मधील उर्वरित रक्कम विरुध्द पक्ष यांनी दिली नसल्यामुळे तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता केली आहे.सबब तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्दपक्ष विरुध्द दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची आवर्तीठेव खात्यामधील उर्वरित रक्कम रुपये 17,725/- तक्रारकर्त्याच्या आवर्ती खाते क्रमांक 486 मध्ये जमा करावी तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्कम रुपये 5०००/- विरुध्द पक्ष यांनी द्यावी.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हे आयोगासमक्ष उपस्थित राहून तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढीत पुढे आपल्या विशेष कथनात नमूद केले की, विरुध्द पक्ष सोसायटी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिय, 1960 अंतर्गत नोंदणीकृत असून उपविधी प्रमाणे कार्य करते. तक्रारकर्त्याने त्यांची मुलगी कु. दिशा राकेश दंडमवार हिच्या नावाने आवर्ती खाते विरुध्द पक्ष यांचेकडे उघडल्यावर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला आवर्ती खाते पासबुक दिले. त्यावर आवर्ती खात्यात हप्त्याची रक्कम भरण्याबाबत नियमावली छापलेली आहे ती तक्रारकर्त्यास समजावून सांगितली व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आवर्ती खात्यात मासीक हफ्ता पतसंस्थेच्या कार्यालयात येवून जमा करणे अनिवार्य आहे असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रक्कम नियमीत भरण्याची हमी दिली परंतु तक्रारकर्त्याने दिनांक 1/1/2015 रोजी आवर्ती खाते उघडले. त्यानंतर एकूण ३६ महिण्यांप्रमाणे विना चुकता नियमीत हफ्ते भरणे बंधनकारक होते परंतु तक्रारकर्त्याने पतसंस्थेच्या कार्यालयात रुपये 5०००/- ची रक्कम मुदतीत कधीही हफ्ते भरले नाही. अनियमीत हफ्ते असल्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष यांनी वेळोवेळी सूचना केली की आवर्ती खात्यात पहिल्याच तारखेला मासीक हफ्ता भरणे बंधनकारक आहे परंतु तक्रारकर्ता हे हफ्ते अनियमीत भरत असल्यामुळे परिणामतः अंतिम परिपक्वतेला व्याज मिळकतीत रक्कम कमी मिळणार असल्याबाबतची माहिती तक्रारकर्त्याला होती. तक्रारकर्त्याला दिलेल्या सोसायटीच्या पासबुकचे अवलोकनकेले असता स्पष्ट दिसते की, प्रत्येक महिण्यात तक्रारकर्त्याने हफ्ता उशीरा भरल्यामुळे तक्रारकर्त्याच्या आवर्ती ठेवीची रक्कम विरुध्द पक्षाला वापरता आली नाही. तक्रारकर्त्याला अनुक्रमे दिनांक 1/6/2015 रोजी हफ्ता भरायचा होता तो त्यांनी दिनांक 10/०3/2016 रोजी भरला केला. तसेच दिनांक 1/1/2016 रोजीचा हफ्ता दिनांक 10/०3/2016 रोजी भरला. दिनांक 1/7/2016 रोजी भरण्याचा हफ्ता दिनांक 27/08/2016 रोजी भरला. दिनांक 1/1/2016 रोजीचा हफ्ता दिनांक 13/०2/2017 रोजी भरला. दिनांक 1/1/2017 रोजी भरायचा हफ्ता दिनांक 27/03/2017 रोजी भरला. दिनांक 1/8/2017 रोजी भरायचा हफ्ता दिनांक 9/11/2017 रोजी भरला.. उपरोक्त तारखेचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने त्याच्या आवर्ती ठेव खात्यात नियमीत मासीक हफ्त्याच्या रकमा भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे तक्रारकर्त्याने भरलेल्या एकूण 36 मासीक हफ्त्याच्या रकमेवर व्याज निर्माण करु शकत नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या आवर्ती ठेव खात्यात अनियमीत व विलंबाने भरलेल्या एकूण हफ्त्यामध्ये रुपये 1,80,000/- ची रक्कम व त्यावर त्याने अनियमीत हफ्ते भरल्याने निर्माण झालेली व्याजाची रक्कम रुपये 12,875/- एवढी आवर्ती खात्यावर मुदतीअंती जमा झाली. त्यामुळे तक्रारकर्ता हा एकूण रुपये 1,92,875/- मिळण्यास पाञ झाला. तक्रारकर्त्याने अनियमीत हफ्ते भरलेले असल्यामुळे विलंबीत दिवसावरील रुपये 17,525/- व्याज तक्रारकर्ता निर्माण करु शकला नाही. उपरोक्त तक्रारीतला वाद रक्कम वसूल करुन मिळण्याबाबत असल्यामुळे दिवाणी स्वरुपाची असल्याने पतसंस्थेविरुध्द दिवाणी दावा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरचा अर्ज दावा खारीज होण्यास पाञ आहे तसेच तक्रारकर्ता हा पतसंस्थेचा ग्राहक नसल्याने तक्राकरर्ता व विरुध्द पक्ष यांच्यात ग्राहकाच्याबाबत संबंध निर्माण होत नाही तसेच तक्रारकर्त्याची ही आर्थिक गुंतवणूक ही व्यावसायीक स्वरुपाची असल्यामुळे सदरचा तक्रारकर्ता हा ग्राहक या व्याख्येत बसत नाही. सदरच्या तक्रारीचा विषय खतावणी बाबत असून त्याच्या निर्धारणाकरिता तज्ज्ञ साक्षीदाराची आवश्यकता आहे. त्यामुळे सदर विषय दिवाणी स्वरुपाचा असल्यामुळे सदर वाद तक्रार अर्जाचा विषय होऊ शकत नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- अर्जदाराची तक्रार, दस्तावेज वि.प. यांचेलेखी कथन,तसेच उभय बाजूंचे लेखी युक्तीवादतसेच परस्परविरोधी कथन यांचा आयोगाने विचार केला असता खालील मुद्दे आयोगाचे विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
- तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडे आवर्ती खाते सुरू केलेले असल्यामुळे विरुद्ध पक्ष हा सेवादाता आहे.ग्राहक संरक्षण कायदा अन्वये ग्राहकाला असलेला हक्क हा अतिरिक्त व दिवाणी स्वरूपाचा कायदेशीर हक्क आहे त्यामुळे या कायद्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारीचे निवारण व आदेश देण्याचे आयोगाला आहे,सबब सदर तक्रार चालविण्याचे अधिकार नाहीत हे विरुद्ध पक्षाचे म्हणणे मान्य करण्यास योग्य नाही.
7. तक्रारकर्ती तहसील सावली जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून विरुद्ध पक्ष ह्याचे कडे तिच्या वडिलांनी तिच्या नावाने रक्कम रुपये 5000/-प्रति महिना चे आवर्त खाते 36 महिन्यांकरिता उघडले. सदर खाते उघडताना विरुद्ध पक्ष यांनी तक्रार दाराला आवर्त खात्याचे पासबुक दिले. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या पासबुकात महिन्याला कशी रक्कम भरायची त्याबद्दलची नियमावली असून ती नियमावली तक्रारदाराला विरुद्ध पक्ष यांनी समजावून सांगून महिन्याचे आवर्त खात्याची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आवर्त खात्यात स्वतः येऊन जमा करावी असे सांगितले. तक्रारदाराने विरुद्ध पक्ष यांनी दिलेले खाते क्रमांक 486 लेझर 134/3 चे पासबुक तक्रारीत दाखल केलेले आहे. सदर पासबुकचे अवलोकन केले असता फक्त पहिल्या महिन्यात रुपये 5000/- भरलेला दिसून येत आहे , त्यानंतर तक्रारदाराने 36 महिने पूर्ण हप्ते भरले,परंतु अनियमित हे सदर पासबुक वरून स्पष्ट होत आहे. तक्रारकर्त्याने यांनी मुदतीनंतर रक्कम व्याजासकट अपूर्ण दिली याबद्दल सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली,त्यावरून सहाय्यक निबंधक ह्यांनी दिनाक 12/2/2018 चे पत्रानुसार तक्रारकर्ती हिला रुपय 17,525/- का कमी याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.विरुद्ध पक्षाने त्यावर खुलासा तक्रारकर्ता व सहायक निबंधक ह्यांना दिल्यावर सहाय्यक निबंधक सावली यांनी 23/2/2018 चे पत्रानुसार तक्रारकर्त्याचा अर्ज नस्तीबाध केल्याचे दिसून येत आहे. आयोगाच्या मते तक्रारदाराने दाखल पासबुकचे व विरुद्धपक्ष उत्तरात दाखल केलेल्या आवत खात्यातील मासिक हप्त्याचे अवलोकन केले असता अनियमित व विलंबाने भरलेल्या रकमेवर विरुद्ध पक्ष ह्यांनी व्याज लावून रक्कम रुपये 1,92,875/- दिली व तक्रारकर्त्याने ती रक्कम स्वीकारली. पतसंस्थेच्या नियमावली नुसार रुपये 17,525/- ही रक्कम तक्रारकर्त्याने अनियमित व विलंबाने हप्ते भरलेले असल्यामुळे नियमानुसार कपात करून दिली आहे.तसेच तक्रारकर्त्याने सदर परिस्थिती लक्षात घेऊन 3/1/2018 रोजी कोणत्याही आक्षेपाशिवाय शिवाय परिपक्व रक्कम रुपये 1,92,875 स्वीकारली. आयोगाच्या मते विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याला मुदतीअंती योग्य रक्कम दिलेली आहे सबब तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्यूनता दिलेली नसल्यामुळे आयोग खालील आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्रमाक. 159/2018 खारीज करण्यात येते.
2. उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा 3. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे. (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे) (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर. | |