नि.53 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 153/2009 तक्रार दाखल झाल्याचा दि.27/11/2009 तक्रार निकाली झाल्याचा दि.21/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या 1. श्री.सुनिल आत्माराम सुर्वे 2. सौ.स्निला सुनिल सुर्वे दोन्ही रा.हेरंब रेसिडेन्सी, सन्मित्र नगर, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.प्रविण नारायण लाड प्रोप्रा.पी.एन.लाड कन्स्ट्रक्शन रा.ए 02, अथर्व पार्क, एस व्ही रोड मारुती मंदिर, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ कु.नीलम शेवडे सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.एम.बी.भाटवडेकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी बिल्टअप बंगला व मोकळी जागा या संदर्भात देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली म्हणून दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून सन्मित्र नगर, रत्नागिरी येथे हेरंब रेसिडेन्सी यापैकी रो-बंगला नं.2 रक्कम रु.16,50,000/- किंमतीला विकत घेण्याचा नोंदणीकृत करार दि.25/03/2009 रोजी केला. सदर बंगल्याचा ताबा सामनेवाला यांनी विलंबाने तक्रारदार यांना दिला, ताबा घेतल्यानंतर तक्रारदार यांना सदर बंगल्याच्या जागेच्या क्षेत्रफळाबाबत शंका आल्यामुळे त्यांनी सामनेवाला यांच्या समक्ष जागेची मोजणी केली असताना सामनेवाला यांनी कमी क्षेत्रफळ दिल्याचे दिसून आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून करारात नमूद केल्याप्रमाणे 185.13 चौ.मी.मोकळया जागेचा कब्जा मिळावा व बंगल्याचे बांधकाम क्षेत्र कमी दिल्यामुळे कमी क्षेत्राची रक्कम रु.3,36,000/- सामनेवाला यांचेकडून परत मिळावी तसेच सामनेवाला यांनी करारात नमूद केल्याप्रमाणे पाण्याची टाकी जमिनीवर मंजूर नकाशाप्रमाणे बांधून द्यावी, बंगल्यामध्ये बसविलेले कमी दर्जाचे स्टॉपर, कडया, बिजागर बदलून चांगल्या दर्जाचे लावून द्यावी, कमी दर्जाचे सिलींग फॅन काढून आय.एस.आय. मार्कचे सिलींग फॅन बसवून द्यावेत, सामनेवाला यांचेकडून बंगला व जागेचे खरेदीखत नोंदणीकृत करुन मिळावे, बंगल्याचा ताबा विलंबाने दिल्यामुळे नुकसान भरपाईपोटी रु.10,000/-, मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावेत व मंच मंजूर करेल त्या रकमेवर रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.12% व्याज मंजूर करण्यात यावे. अशा प्रकारे तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत व तक्रारदार यांच्या विविध मागण्यांबाबत सामनेवालाविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी नि.1 वरील तक्रारीच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.4 वरच्या यादीप्रमाणे नि.4/1 ते नि.4/7 वर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 3. सामनेवाला यांनी नि.11 वर आपले म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारीतील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये करार झाला होता हे त्यांनी मान्य केलेले आहे. कराराप्रमाणे तक्रारदार यांना 1418 चौ.फूट (131.78 चौ.मि.) बिल्टअप क्षेत्र असलेला रो-बंगला बांधून देण्याचे ठरले होते ही बाब मान्य केली आहे. परंतु 1992 चौ.फूट (185.13 चौ.मि.) मोकळी जागा देण्याचे ठरले होते हे अमान्य केले आहे. 1992 चौ.फूट मोकळया जागेमध्ये रो-बंगल्याच्या बांधकामाने व्यापलेले क्षेत्र 1418 चौ.फूट क्षेत्रफळाचा समावेश असून बंगल्याखालील क्षेत्रफळासह 1992 चौ.फूट एकूण देण्याचे ठरले होते असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी कराराप्रमाणे मोबदल्याची रक्कम अदा केलेली नाही. रत्नागिरी नगर परिषदेने पाण्याचे कनेक्शन प्रयत्न करुनही दिले नव्हते म्हणून तक्रारदार यांना दि.31/05/2009 पर्यंत ताबा देणे शक्य झाले नाही असे सामनेवाला यांनी म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना करारात ठरल्यापेक्षा जादा क्षेत्र दिले आहे तसेच करारात नमूद नसताना आय.एस.आय.दर्जाचे सिलींग फॅन बसवून दिले आहेत व अन्य सामानही उत्कृष्ट दर्जाचे वापरले आहे. तसेच कराराबाहेर जावून तक्रारदार यांना सुविधा पुरविल्या आहेत. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे ट्रान्सफॉर्मर, पाणीमिटर डिपॉझिट व जोडणीचा खर्च दिला नाही असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तसेच तीन्ही रो-बंगल्यांचा व त्या सभोवतालच्या मोकळया जागेचा सातबारा एकच असून त्या सातबारा उता-यावर तीन्ही रो-बंगलाधारक/मालकांची नावे सामाईकात नमूद होणारी आहेत असे सामनेवाला यांनी म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. शेवटी तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी मंचासमोर सामनेवाला यांनी विनंती केली आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.12 वर शपथपत्र, नि.13 च्या यादीअन्वये नि.13/1 वर दावा मिळकतीचा नकाशा दाखल केला आहे. 4. तक्रारदार यांनी नि.15 वर प्रतिउत्तर दिले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना इमारत व जागा यांचे क्षेत्रफळाची जागा नोंदणीकृत कराराने स्वतंत्रपणे नमूद करुन दिलेली आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे बहुतांश म्हणणे नाकारलेले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तराच्या पृष्ठयर्थ नि.16 वर शपथपत्र दाखल केलेले आहे. 5. तक्रारदार यांनी नि.17 वर कोर्ट कमिशनर नियुक्तीचा अर्ज दिलेला आहे. कोर्ट कमिशनर यांनी नि.36 वर कोर्ट कमिशन अहवाल सादर केलेला आहे. तक्रारदार यांनी नि.41 वर व सामनेवाला यांनी नि.40 वर कोर्ट कमिशन अहवालावर म्हणणे दिलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.47 च्या अर्जान्वये व नि.48 च्या यादीने नि.48/1 वर कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी नि.44 वर व सामनेवाला यांनी नि.43 वर लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे. 6. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे आपल्या मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः होय. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 7. मुद्दा क्र.1 व 2 एकत्रितपणे - तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात कमी बांधकाम क्षेत्र मिळाले तसेच 185.13 चौ.मि. मोकळया जागेचा कब्जा मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेल्या कराराची प्रत नि.4/1 वर दाखल आहे. तसेच कोर्ट कमिशनर यांनी सादर केलेला अहवाल नि.36 वर दाखल आहे. करारपत्राचे अवलोकन केले असता करारपत्रामध्ये तक्रारदार यांना 131.78 चौ.मि. बिल्टअप एरिया देण्याचे ठरले होते. तसेच 185.13 चौ.मि. मोकळी जागा त्यामध्ये बांधकाम क्षेत्र समाविष्ट आहे. बंगल्यासाठीचा दर रु.5,500/- प्रति चौ.मि. व त्याखालील व सभोवतालच्या मोकळया जागेसाठी रु.1,700/- प्रति चौ.मि. असा दर लावलेला आहे. कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये जे बांधकाम क्षेत्र दाखवले आहे ते ओपन टेरेसचे क्षेत्र 9.02 चौ.मि.याबाबत तक्रारदार यांनी अहवालाबाबत नि.41 वर दिलेल्या म्हणण्यामध्ये आक्षेप घेतला आहे. ओपन टेरेसची मोजमापे ही बिल्टअप होत नाहीत असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांचे विधिज्ञांनी त्याबाबत नि.4/1 वर असलेल्या कराराकडे लक्ष वेधले. सदर करारामधील पान नं.14 वर सदर बंगल्याचा मोजमापासह नकाशा जोडलेला आहे. सदर नकाशाचे अवलोकन केले असता सदर नकाशामध्ये पहिल्या मजल्यावरील ओपन टेरेसची मोजमापे धरण्यात आलेली नाहीत जी कोर्ट कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये नमूद केली आहेत. सदर ओपन टेरेसचे मोजमाप बिल्टअप एरियामध्ये धरता येणार नाही या तक्रारदारांच्या कथनामध्ये तथ्य दिसून येते. कोर्ट कमिशनर यांनी तळ मजल्याचे बांधकाम क्षेत्र 64.66 चौ.मि. तर पहिल्या मजल्याचे बांधकाम क्षेत्र 64.76 चौ.मि.असे दर्शवले आहे म्हणजे एकूण 129.42 चौ.मि. बांधकाम क्षेत्र आहे असे दिसून येते. तक्रारदारास सामनेवाला यांनी 131.78 चौ.मि.बांधकाम क्षेत्र द्यावयाचे कबूल केले होते व त्याप्रमाणे रक्कम आकारण्यात आली आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये 131.78 – 129.42 = 2.36 चौ.मि. क्षेत्र कमी दिसते तसेच कोर्ट कमिशनर यांनी ओपन टेरेसचे दाखविलेले क्षेत्र 9.02 जादा दाखवले आहे ते वजा केले असता तक्रारदार यांना एकूण 11.38 चौ.मि. क्षेत्र कमी दिल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांना सामनेवाला यांनी 11.38 चौ.मि. क्षेत्र दिल्याने त्यापोटीची घेतलेली रक्कम प्रती चौ.मि. रु.5,500/- प्रमाणे रक्कम रु.62,590/- परत मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. मोकळया जागेचे क्षेत्र हे कोर्ट कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये 181.23 चौ.मि. आहे असे दर्शविले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना 185.13 चौ.मि. क्षेत्र देण्याचे कबूल केले होते परंतु प्रत्यक्षात मात्र 3.9 चौ.मि. क्षेत्र कमी दिले आहे त्याचा लावलेला दर प्रती चौ.मि. रु.1,700/- प्रमाणे रु.6,630/- परत मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारदार यांनी आपल्या विनंती कलम “क”मध्ये पाण्याची टाकी मंजूर नकाशाप्रमाणे बांधून द्यावी अशी विनंती केली आहे. कोर्ट कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये पाण्याची टाकी व सेफटीक टँक यातील अंतर 4.15 मिटर आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी मंजूर नकाशाची प्रत याकामी दाखल केलेली नाही अगर आपल्या मागणीच्या अनुषंगाने तसा पुरावा मंचासमोर आणलेला नाही त्यामुळे तक्रारदारची सदरची मागणी नामंजूर करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी आपल्या विनंती कलम “ड” व “इ”मध्ये कमी दर्जाचे स्टॉपर, कडया, बिजागरे तसेच सिलींग फॅन बदलून द्यावेत अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांनी आय.एस.आय. दर्जाचे फॅन बसवून द्यावेत अशी मागणी केली आहे. कोर्ट कमिशनर यांनी आपल्या अहवालामध्ये मुख्य दरवाजाचे फिटींग ब्रासचे आहे व इतर दरवाजाचे फिटींग स्टेनलेस स्टिलचे आहे असे नमूद केले आहे तसेच काही स्टॉपर, बिजाग-या गंजलेल्या आहेत असे नमूद केले आहे. तसेच पंख्यावर आय.एस.आय.मार्क दिसून आला नाही असे नमूद केले आहे. सामनेवाला यांचे विधिज्ञांनी कराराकडे मंचाचे लक्ष वेधले असता सदर करारामध्ये तक्रारदार यांना आय.एस.आय.मार्क असलेले पंखे बसवून द्यायचे आहेत असे नमूद केलेले नाही. तसेच बिजाग-या व स्टॉपर या कमी दर्जाच्या आहेत असे कमिशन अहवालावरुन स्पष्ट होत नाही त्यामुळे तक्रारदार यांची सदरची मागणी नामंजूर करण्यात येत आहे. 9. तक्रारदार यांनी आपल्या विनंतीमध्ये बंगल्याचे नोंदणीकृत खरेदीखत करुन द्यावे अशी मागणी केलेली आहे. तसेच सामनेवाला यांना उर्वरीत रक्कम रु.25,000/- देण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,000/- स्विकारुन तक्रारदारच्या खर्चाने नोंदणीकृत खरेदीखत तक्रारदार यांना करुन द्यावे असा आदेश करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. 10. तक्रारदार यांनी नुकसानभरपाईपोटी रु.10,000/- व शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.25,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदार यांना झालेला शारिरिक, मानसिक त्रास विचारात घेता व त्यासाठी त्यांना करावा लागलेला तक्रार अर्ज यासाठी येणारा खर्च विचारात घेता त्यापोटी रक्कम रु.5,000/- मंजूर करण्यात येत आहेत. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,000/- (रु.पंचवीस हजार मात्र) स्विकारुन तक्रारदाराचे खर्चाने बंगला व त्याखालील व सभोवतालच्या जागेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन द्यावे असा आदेश करण्यात येतो. 3. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कमी क्षेत्रफळ दिल्यामुळे घेतलेली जादा रक्कम रु.69,220/- (रु.एक्कोणसत्तर हजार दोनशे वीस मात्र) परत करावी असा आदेश करण्यात येतो. 4. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) द्यावेत असा आदेश करण्यात येतो. 5. सामनेवाला यांनी सदर आदेशाची पूर्तता दि.31/08/2010 पर्यंत करण्याची आहे. 6. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 21/07/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| HONABLE MRS. Smita Desai, MEMBER | HONABLE MR. Anil Y. Godse, PRESIDENT | , | |