निकालपत्र :-(दि.23.09.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 425 | 15000/- | 16.06.2000 | 16.09.2004 | 30000/- | 2. | 455 | 19000/- | 16.07.2000 | 16.04.2005 | 38000/- |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार लेखी व तोंडी मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. सामनेवाला यांचेकडून रककम मिळणेची कोणतीही खात्री राहिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व त्यांचे सर्व कुटुंबिय म्हणजे द्वारकानाथ कुंभार, सौ.मंगल द्वारकानाथ कुंभार, अभिजीत द्वारकानाथ कुंभार, अमोल द्वारकानाथ कुंभार या सर्वांनी सामनेवाला संस्थेकडे एकूण रक्कम रुपये 1,83,000/- इतक्या रक्कमेच्या ठेवी डिपॉझिट म्हणून ठेवल्या होत्या. तक्रारदारांनी श्री.रंगराव गणपती पाटील व सौ.मंगल रंगराव पाटील यांना स्वत:ची एम्.एच्.09 एस्.7180 ही मिनी बस गाडी विकणेचे ठरविले. त्यासाठी त्या दोघांना स्थावर तारण व वाहन तारण कर्जे देणेसाठी सामनेवाला संस्थेकडे शिफारस केली. सदर कर्जास जादा जामीन म्हणून त्यांच्या ठेवी ठेवणेचे कबूल केले. सदरची दोन्ही कर्जे थकित झालेमुळे संस्थेने दि.21.01.2002 रोजी अॅड.सुभाष एस्. पाटील यांचेतर्फे नोटीस पाठवून सर्व ठेव रक्कमा सौ.मंगल रंगराव पाटील यांचे कर्जखातेस जमा करुन घेत असलेबाबत कळविले. तदनंतर, तक्रारदारांनी स्वत:च्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व ठेवीच्या रक्कमा व्याजासहित सौ.मंगल रंगराव पाटील यांचे कर्जखातेस जमा/ट्रान्स्फर करणेसाठी लेखी संम्मती दि.11.03.2002 रोजी दिली आहे. सदरची वस्तुस्थिती लपवून तक्रारदारांनी दि.28.09.2002 रोजी अॅड.जी.एस्.भावके यांचेतर्फे लेखी नोटीस पाठवून ठेव रक्कमांची मागणी केली, त्यास सामनेवाला संस्थेतर्फे अॅड.अशोक एच्.पाटील यांनी रितसर उत्तर दिले आहे. तसेच, तक्रारदारांनी दिलेल्या लेखी संम्मतीनुसार वसुली अधिका-यांनी म.स.संस्था नियम 107 मधील तरतुदीनुसार दि.07.09.2002 रोजीच्या आदेशाने जप्त केलेल्या आहेत. सदर परिस्थितीची कल्पना असतानाही तक्रारदारांनी दि.23.04.2007 रोजी अॅड.उदय जाधव यांचे मार्फत नोटीस पाठविली, सदर नोटीसीस सामनेवाला यांनी दि.03.05.2007 रोजी अॅड.पी.एस्.देशपांडे यांचेमार्फत उत्तर दिले आहे. सदर नोटीसीस तक्रारदारांनी आठ दिवसांत उत्तर दिले नसल्याने त्यांच्या ठेव रक्कमा सौ.मंगल रंगराव पाटील यांचे कर्जखातेस जमा केलेल्या आहेत. तसेच, तक्रार मुदतीत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना रुपये 15,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांनी लिहून दिलेले संम्मतीपत्र, तक्रारदारांनी अॅड.उदय जाधव यांचेमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीस सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. (8) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. (9) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी दि.11.03.2002 रोजी दिलेल्या लेखी संम्मतीनुसार त्यांच्या जादा जामीन म्हणून ठेवलेल्या ठेव रक्कमा सौ.मंगल रंगराव पाटील यांचे कर्ज खात्यास जमा केल्या असलेने तक्रारदारांच्या ठेव रक्कमा परत करता येणार नाहीत असे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारांनी लिहून दिलेले संम्मतीपत्र, तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस व सदर नोटीसीस सामनेवाला यांची उत्तरी नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर पैकी तक्रारदारांनी लिहून दिलेल्या संम्मतीपत्राचे अवलोकन केले असता सदर पत्रावर असलेली सही ही प्रस्तुत तक्रारीवर तक्रारदारांनी केलेल्या सहीपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे सदरचे संम्मती पत्र तक्रारदारांनी दिले नसलेचे स्पष्ट होते. तसेच, तक्रारदारांनी त्यांच्या प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांच्या सदर कथनाचे शपथेवर स्पष्टपणे खंडन केले आहे. मंगल पाटील यांच्या कर्जाशी काहीही संबंध नाही व सदर कर्जास जामीन नाही तसेच प्रॉमिसरी नोटीसुध्दा तक्रारदारांनी दिलेली नाही, त्यांच्या ठेव पावत्या सदर कर्जास जमा करुन घ्या असे कळविलेले नाही, दि.11.03.2002 रोजीचा अर्ज तक्रारदारांचे नांव टाकून खोटी सही केली आहे इत्यादी कथने तक्रारदारांनी त्यांच्या प्रतिउत्तरामध्ये केलेली आहेत. वादाकरिता जरी तक्रारदार हे मंगल पाटील यांच्या कर्जास जामीन आहेत व त्यांच्या ठेवी सदर कर्जास तारण आहेत आहे असे गृहित धरले तरी सामनेवाला यांनी सौ.मंगल पाटील यांच्या कर्जासंबंधीची कोणतीही कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली नाहीत. सदरच्या कागदपत्रांवरुन तक्रादार व त्यांच्या ठेवीसंदर्भातील वस्तुस्थिती या मंचासमोर येणेस मदत झाली असती. तसेच, दि.21.01.2002 रोजीची अॅड.सुभाष एस्. पाटील यांचेमार्फत तक्रारदारांच्या ठेव रक्कमा सौ.मंगल पाटील यांच्या कर्जास जमा करुन घेतलेबाबतची पाठविलेली नोटीस तसेच वसुली अधिका-यांनी दि.07.09.2002 रोजी तक्रारदारांची ठेव रक्कम जप्त केलेबाबतचे आदेश इत्यादीच्या प्रतीही सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नाहीत. सामनेवाला यांनी सदर कागदपत्रे व सौ.मंगल पाटील यांच्या कर्जासंदर्भातील कागदपत्रे दाखल करणेस कोणतीही अडचण नव्हती. सामनेवाला यांचे सदरचे कथन हे मंच फेटाळत आहे. इत्यादी विवेचनाचा विचार करता तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर कोष्टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | मुदतपूर्ण देय रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 425 | 30000/- | 16.09.2004 | 2. | 455 | 38000/- | 16.04.2005 |
(3) सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |