(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा. सदस्या)
(पारीत दिनांक – 15 जुलै, 2019)
01. उभय तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण बियाण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाई संबधात ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारी नुसार, तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख यांचे वडीलांचे नावे मौजा शिवनाला, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-426/1, 426/2 आणि भूमापन क्रं 427 अशी अनुक्रमे 0.51 हेक्टर आर, 0.50 हेक्टर आर आणि 0.38 हेक्टर आर असे मिळून (एकूण-139 आर, एक एकर म्हणजे 40 आर म्हणजेच साडे तीन एकर) एकूण क्षेत्र 3 एकर 19 आर म्हणजेच 1 हेक्टर 39 आर एवढे क्षेत्र या वर्णनाची शेती आहे तर तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांचे वडीलांचे नावे मौजा शिवनाला, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-186/1, क्षेत्र-0.54 हेक्टर आर आणि भूमापन क्रं-260, क्षेत्र 1.62 हेक्टर आर असे मिळून (एकूण-216 आर, एक एकर म्हणजे 40 आर) एकूण क्षेत्र 5 एकर 16 आर (जवळपास साडेपाच एकर) म्हणजेच 2 हेक्टर 16 आर या वर्णनाची शेत जमीन आहे. उभय तक्रारदारांची शेती ही एकाच मौज्यामध्ये असल्यामुळे त्यांनी प्रस्तुत तक्रार एकत्रितरित्या दाखल केलेली आहे.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की ते दरवर्षी त्यांचे शेतात पावसाळयात भाताची शेती करतात आणि त्याचे पिक निघाल्या नंतर रब्बी पिके ज्यामध्ये चना, गहू, लाखोरी, मुंग इत्यादीचे पिक काढतात. दोन्ही तक्रारदार स्वतःच शेतीची मशागत करुन उत्पन्न काढतात. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) प्रथम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड हि एक धानाचे बियाण्याचे निर्माता कंपनी आहे, तर विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र तर्फे प्रोप्रायटर श्री हिरालाल तुकाराम खोब्रागडे हे बियाणे विक्रेता आहेत. उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे विक्रेत्यांचे बोलण्यावर विश्वास ठेऊन, विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे धानाचे बियाणे विकत घेतले.
तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख याने असे नमुद केले की, सन-2016 च्या पावसाळयात त्याने धानाच्या शेती करीता लागणारे बियाणे विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र, आसगाव, तहसिल पवनी जिल्हा भंडारा या बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-05/06/2016 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-1) प्रथम बायोटेक लिमिटेड निर्मित प्रथम धानाचे बियाणे ज्याचा लॉट क्रं-RP-16-1723 असा आहे, प्रतीबॅग वजन-08 किलो प्रमाणे प्रतीबॅग किम्मत रुपये-620/-अनुसार एकूण-09 बॅग्स, एकूण रुपये-5580/- एवढया किमतीत नगदी विकत घेतल्यात.
तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख याने असे नमुद केले की, सन-2016 च्या पावसाळयात त्याने धानाच्या शेती करीता लागणारे बियाणे विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र, आसगाव, तहसिल पवनी जिल्हा भंडारा या बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-03/06/2016 रोजी पावती क्रं 662 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-1) प्रथम बायोटेक लिमिटेड निर्मित प्रथम धानाचे बियाणे ज्याचा लॉट क्रं-1617/23 असा आहे, प्रतीबॅग वजन-08 किलो प्रमाणे प्रतीबॅग किम्मत रुपये-620/-अनुसार एकूण-12 बॅग्स, एकूण रुपये-7440/- एवढया किमतीत नगदी विकत घेतल्यात.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड या बियाणे कंपनी निर्मित धानाचे बियाणे आप-आपल्या शेतात वाफे करुन माहे जून मध्ये प-हे टाकले आणि जुलै मध्ये रोवणी केली. उभय तक्रारदारांनी जुलै-2016 मध्ये योग्य प्रमाणात खताची मात्रा दिली तसेच किटकनाशाची फवारणी केली. पेरणी केलेल्या प्रथम धानाच्या वाणाला चांगली पालवी आली. तसेच योग्य ती मशागत करुन वेळेवर फवारणी करुन खताची मात्रा पिकाला दिली तसेच धान पिकातील तण निंदण करुन काढले व पुन्हा खताची मात्रा दिली. अशाप्रकारे उभय तक्रारदारांनी सरासरी एकरी 14 ते 15 हजार रुपये मशागतीसाठी खर्च केला. तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे एकरी सरासरी 30 पोते धानाचे (मंचा व्दारे येथे एका पोत्यामध्ये जवळपास 65 किलो धानाचे पिक बसते असे गणना करण्यात येते) अपेक्षीत उत्पादन येते आणि ते धानाचे उत्पादन रुपये-2300/- ते 2400/- खंडी प्रमाणे (मंचा तर्फे एक खंडी म्हणजे जवळपास १६० किलो एवढे उत्पादन गणना केल्या जाते) विक्री केल्यास रुपये-35,000/- ते रुपये-40,000/- एकरी उत्पन्न येते.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी आप-आपल्या शेतात धानाचे बियाण्यांची पेरणी केल्या नंतर व योग्य ती खताची मात्रा दिल्या नंतर व मशागत केल्या नंतर काही धानाची रोपे निसवले व तर काही धानाची रोपे गर्भात होती तर काही धान फुलो-यावर होता. अशारितीने तीन प्रकारे धानाचे पिक आले. काही धानाची निसवण तर काही धानाची रोपे भरण्यास विलंब होत होता त्यामुळे परिपक्व झालेल्या धानाचे पिकाची गळती सुरु होऊन नुकसान झाले तर काही धानाचे पिक 160 दिवसा पर्यंत परिपक्व झाले नाही. त्यामुळे त्यांना धानाचे अपेक्षीत उत्पादन आले नाही तसेच धानाचे पिक वेळेवर न आल्याने अन्य पिके चना, गहु, उडीद, मुंग इत्यादीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या असे लक्षात आले की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित कंपनीच्या धानाचे विकत घेतलेले बियाणे हे भेसळ व दोषयुक्त आहे म्हणून त्यांनी योग्य त्या चौकशीसाठी तालुका कृषी अधिकारी, पवनी तसेच अन्य संबधित अधिका-यांकडे विनंती अर्ज सादर केलेत. तक्रारदारांनी विकत घेतलेल्या धानाचे बियाण्याचे पिशवी वर जो कस्टमर केअर क्रं-09404584789 नमुद होता, त्यावर दुरध्वनी करुन तक्रारी नोंदविल्या असता उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आलीत. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडे लेखी तक्रारी सुध्दा केल्यात परंतु योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित बियाण्याची खोटी जाहिरात प्रसिध्द करुन तक्रारदार शेतक-यांची फसवणूक तर केलीच तसेच अनुचित व्यापारी पध्दतीचा सुध्दा अवलंब केला. दोषयुक्त बियाण्यांमुळे तक्रारदारांचे अपेक्षीत धानाच्या पिकाचे आर्थिक नुकसान झाले तसेच त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख याचे तक्रारी नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी निर्मित धानाचे वाण हे भेसळयुक्त व निम्न दर्जाचे असल्याने काही धानाची रोपे 120 ते 130 दिवसात तर काही रोपे 140 ते 145 तर काही रोपे 160 ते 165 दिवसात निघालीत आणि त्यामुळे परिपक्व झालेल्या धानाची मोठया प्रमाणात गळती होऊन नुकसान झाले तर काही धानाची रोपे खराब झालीत. त्यामुळे तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख याचे धानाचे एकूण 09 एकर क्षेत्रा करीता एकरी उत्पन 40,000/- प्रमाणे एकूण रुपये-3,60,000/- एवढया अपेक्षीत उत्पनाचे नुकसान झाले.
तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख याचे तक्रारी नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 कंपनी निर्मित धानाचे वाण हे भेसळयुक्त व निम्न दर्जाचे असल्याने तक्रारकर्ता क्रं 2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख याचे धानाचे एकूण 12 एकर क्षेत्रा करीता एकरी उत्पन 40,000/- प्रमाणे एकूण रुपये-4,80,000/- एवढया अपेक्षीत उत्पनाचे नुकसान झाले.
उभय तक्रारदार यांनी पुढे असे नमुद केले की, दोषपूर्ण बियाण्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी वकीला मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही तर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी नोटीस स्विकारली नाही. शेवटी त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा हे अध्यक्ष असलेल्या तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार केली असता तक्रारदार आणि ईतर 10 शेतक-यांच्या शिवनाळा येथील शेताला तक्रार निवारण समिती तर्फे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करुन मौका पंचनामा करुन अहवाल तयार केला. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने अन्य शेतकरी श्री दिपक सावरबांधे आणि तक्रारदारांसह अन्य शेतकरी ईतर-10 असा एकत्रित पंचनामा दिनांक-25/03/2016 रोजी तयार केला. सदर समितीचे पाहणीचे वेळी विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे प्रतिनिधी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता उपस्थित होते व त्यांनी निरिक्षण अहवालावर सहया केलेल्या आहेत. सदर अहवालात 34 टक्के धान निसवला असून बाकी धान निसवत असल्याचे नमुद आहे. तक्रार निवारण समितीने दिलेल्या अहवालाची कल्पना असतानाही विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दिलेली नसल्याने दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला.
म्हणून उभय तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागणी केली-
(01) विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी, धानाचे पिकाचे अपेक्षीत उत्पननाचे नुकसानी पोटी तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख याला रुपये-3,60,000/- तर तक्रारकर्ता क्रं-2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख याला रुपये-4,80,000/- नुकसान भरपाई देण्याचे आदेशित व्हावे.
(02) विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी, उभय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-50,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-20,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय मंचाव्दारे उभय तक्रारदारांचे बाजूने योग्य ती दाद देण्याचे आदेशित व्हावे.
03. ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनीला रजिस्टर पोस्टाने नोटीस तामील झाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 यांना ग्राहक मंचाची रजि.नोटीस मिळूनही ते ग्राहक मंचा समक्ष हजर न झाल्याने वि.प.क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात मंचाव्दारे पारीत करण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2 विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र, आसगाव, तहसिल पवनी जिल्हा भंडारा तर्फे प्रोप्रायटर श्री हिरालाल तुकाराम खोब्रागडे याने ग्राहक मंचा समोर उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता याने आपल्या लेखी उत्तरात थोडक्यात असा बचाव घेतला की, त्याने तक्रारदारांना कधीही विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे बियाणे विकत घेण्यास सांगितलेले नाही मात्र तक्रारदारांनी त्याचे कडून विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित बियाणे विकत घेतल्याची बाब मान्य केली. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेली अन्य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्याने तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदारांचे एकरी 40,000/- प्रमाणे धानाचे अपेक्षीत उत्पादनाचे नुकसान झाल्याची बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्याचा काहीही दोष नसल्याने त्याने तक्रारदारांचे रजि. नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. बियाण्यातील भेसळी संबधात विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्याचा कोणताही संबध येत नाही कारण धान बियाण्याचे पॅकींग हे श्री नितीन मार्केटींग सर्व्हीसेस भंडारा यांचे कडून करण्यात येते व त्यांचे कडून सिलबंद पॅक केलेले बियाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता याने घेतलेले आहे. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे भेसळयुक्त बियाण्याशी विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याचा कोणताही संबध येत नसल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. उभय तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्टयर्थ पान क्रं 08 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण-16 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख यांनी पंचायत समिती पवनी येथे केलेली तक्रार, तक्रारकर्ता क्रं-2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांनी पंचायत समिती पवनी येथे केलेली तक्रार, दोन्ही तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 2 श्री गुरुदेव कृषी सेवा केंद्र आसगाव यांचे कडून खरेदी केलेल्या बियाण्यांचे बिल, उभय तक्रारदार यांचे कुटूंबाचे शेतीचे 7/12 उतारे, तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांना पाठविलेला निरिक्षण अहवाल, विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे धान बियाण्याचे माहितीपत्रक, तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजि.पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस, वि.प.क्रं 1 व 2 यांना नोटीस मिळाल्या बाबत रजि. पोच, विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे कडून परत आलेले नोटीसचे पॉकीट अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्ता तक्रारकर्ता क्रं-2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख याने आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच अन्य शेतकरी श्री एकनाथ रामचंद्र वैद्य आणि श्री भास्कर श्रावण देशमुख यांची शपथपत्रे दाखल केलीत.
06. उभय तक्रारदारां तर्फे वकील श्री अनिल कांबळे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हे मौखीक युक्तीवादाचे वेळी गैरहजर होते.
07. तक्रारदाराची तक्रार, शपथेवरील पुरावा, तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारांचे वकीलांचा आणि मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक मंचाचा निषकर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारदारां तर्फे दाखल 7/12 उता-या पमाणे तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख यांचे वडील श्री देशमुख अंबादास हरबा यांचे नावे मौजा शिवनाला, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-426/1, 426/2 आणि भूमापन क्रं 427 अशी अनुक्रमे 0.51 हेक्टर आर, 0.50 हेक्टर आर आणि 0.38 हेक्टर आर (एकूण 139 आर) (2.5 एकर म्हणजे एक हेक्टर तसेच 40 आर म्हणजे एक एकर या प्रमाणे मोजमाप लक्षात घेता) असे मिळून एकूण क्षेत्र 3 एकर 20 आर जवळपास साडेतीन एकर म्हणजेच 1 हेक्टर 39 आर एवढे क्षेत्र या वर्णनाची शेती असल्याची बाब सिध्द होते.
09. तक्रारदारां तर्फे दाखल 7/12 उता-या पमाणे तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांचे वडील श्री देशमुख रामदास वासुदेव यांचे नावे मौजा शिवनाला, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-186/1, क्षेत्र-0.54 हेक्टर आर आणि भूमापन क्रं-260, क्षेत्र 1.62 हेक्टर आर (2.5 एकर म्हणजे एक हेक्टर तसेच 40 आर म्हणजे एक एकर या प्रमाणे मोजमाप लक्षात घेता) असे मिळून एकूण क्षेत्र 5 एकर 16 आर (जवळपास साडे पाच एकर) म्हणजेच 2 हेक्टर 16 आर या वर्णनाची शेत जमीन असल्याची बाब सिध्द होते. उभय तक्रारदारांची शेती ही एकाच मौज्यामध्ये असल्यामुळे त्यांनी प्रस्तुत तक्रार एकत्रितरित्या दाखल केलेली आहे.
10. तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख याने सन-2016 च्या पावसाळयात धानाच्या शेती करीता लागणारे बियाणे विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र, आसगाव, तहसिल पवनी जिल्हा भंडारा या बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-05/06/2016 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-1) प्रथम बायोटेक लिमिटेड निर्मित प्रथम धानाचे बियाणे ज्याचा लॉट क्रं-RP-16-1723 असा आहे, प्रतीबॅग वजन-08 किलो प्रमाणे प्रतीबॅग किम्मत रुपये-620/-अनुसार एकूण-09 बॅग्स, एकूण रुपये-5580/- एवढया किमतीत नगदी विकत घेतल्याची बाब प्रकरणात दाखल बिलाचे प्रतीवरुन सिध्द होते.
11. तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख याने सन-2016 च्या पावसाळयात धानाच्या शेती करीता लागणारे बियाणे विरुध्दपक्ष क्रं-2) श्री गुरुदेव कृषी केंद्र, आसगाव, तहसिल पवनी जिल्हा भंडारा या बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-03/06/2016 रोजी पावती क्रं 662 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-1) प्रथम बायोटेक लिमिटेड निर्मित प्रथम धानाचे बियाणे ज्याचा लॉट क्रं-1617/23 असा आहे, प्रतीबॅग वजन-08 किलो प्रमाणे प्रतीबॅग किम्मत रुपये-620/-अनुसार एकूण-12 बॅग्स, एकूण रुपये-7440/- एवढया किमतीत नगदी विकत घेतल्याची बाब प्रकरणात दाखल बिलाचे प्रतीवरुन सिध्द होते.
12. तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख यांनी तसेच तक्रारकर्ता क्रं-2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांनी कृषी अधिकारी, पंचायत समिती पवनी यांचेकडे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे बियाणे दोषयुक्त असल्याने झालेल्या आर्थिक नुकसानी बाबत केलेल्या तक्रारींच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत.
13. तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांना लिहिलेल्या दिनांक-03.10.2016 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल आहे ज्यामध्ये अन्य एक शेतकरी श्री दिपक देवचंद्र सावरबांधे यांची धान पिकात भेसळी बाबत केलेल्या तक्रारअर्जाची प्रत पत्रा सोबत पाठवित असल्याचे नमुद आहे.
14. उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांनी मा.मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अन्य एक शेतकरी श्री दिपक देवचंद सावरबांधे आणि इतर शेतकरी यांचे तक्रारी संबधात तालुका निवारण समितीने प्रत्यक्ष दिनांक-21.10.2016 रोजी केलेला मोका पाहणी अहवाल दिनांक-25.10.2016 रोजीचे पत्रान्वये सादर केल्याचे पत्राचे प्रतीवरुन दिसून येते व सदर पत्र अभिलेखावर दाखल आहे.
15. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने दिनांक-21.10.2016 रोजी उभय तक्रारदारांची शेती असलेल्या भागातील अन्य एक शेतकरी श्री दिपक देवचंद सावरबांधे यांचे शेताची प्रत्यक्ष मोका पाहणी करुन दिलेला अहवाल अभिलेखावर दाखल आहे, त्या अहवाला नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनी निर्मित बियाणे खरेदी करुन वापरल्याचे नमुद आहे. ज्यामध्ये पिक व वाण या मध्ये धान प्रथम लॉट असे नमुद आहे सदर अहवालात खत दिल्याचे तसेच कोळपणी, खुरपणी आणि तणनाशक दिल्याचे नमुद आहे. कंपनीने शिफारस केलेल्या पेरणीचा कालावधी 135 ते 140 दिवस नमुद केलेला आहे. शिफारस प्रमाणे आवश्यक बियाणे 50 किलोग्रॅम प्रतीहेक्टर असे नमुद आहे. पुढे अहवालात 34 टक्के धान भेसळयुक्त असून भेसळीचे कारण सदोष बियाणे असल्याचे स्पष्ट नमुद केलेले आहे. सदर अहवालात बियाणे हे हिरालाल तुकाराम खोब्रागडे याचे कडून विकत घेतल्याचे विक्रेत्याने मान्य केलेले असून सही केलेली आहे. समितीच्या निरिक्षणा मध्ये लागवड केलेल्या धानामध्ये हलक्या प्रतीचे 34 टक्के धान निसवत झालेले आहे व उर्वरीत धानाचे वाण आता निसवत होत आहे दाणे भरण्यास 30 ते 40 दिवस अजून कालावधी लागणार असल्याचे अहवालात नमुद आहे.
16 विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनीचे माहितीपत्रक तक्रारदारांनी पुराव्यार्थ दाखल केले, त्यामध्ये 08 ते 10 किलो प्रतीएकर बियाणे लागते आणि पिकाचा कालावधी हा 130 ते 135 दिवस तसेच एका लोंबात 400 ते 450 बारीक दाणा आणि अपेक्षीत उत्पन्न 35 ते 40 क्विंटल प्रतीहेक्टर असे नमुद केलेले आहे तसेच द्दावयाची खताची मात्रा, पिक सरंक्षण इत्यादी माहिती नमुद केलेली आहे.
17. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजिस्टर पोस्टाने भेसळयुक्त धानाचे पिकामुळे झालेल्या नुकसानी बाबत दिनांक-14.12.2016 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसची प्रत पुराव्यार्थ दाखल केली तसेच वि.प.क्रं 1 व 2 यांना नोटीस मिळाल्या बाबत रजि.पोस्टाच्या पोच, वि.प.क्रं 1 यांनी नोटीस अस्विकार केल्याने परत आलेला लिफाफा प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल केली. तसेच तक्रारकर्ता क्रं 2 याने स्वतःचे शपथपत्र पुराव्यार्थ दाखल केलेले आहे. अशाप्रकारे दोन्ही तक्रारदारांनी आपआपल्या तक्रारीचे समर्थनार्थ पुराव्या दाखल दस्तऐवज दाखल केलेत.
18. ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीला तामील झाल्या बाबत पुराव्यार्थ पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा तक्रारदारांनी त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारी या अंशतः मंजूर होण्यास पात्र आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्याचा एवढाच बचाव आहे की, त्याने बियाणे विकलेले असून तो विक्रेता आहे, बियाणे निर्माता नसल्यामुळे भेसळयुक्त बियाण्याशी त्याचा कोणताही संबध येत नाही, त्याने सिलबंद बियाणे ठोक विक्रेत्याकडून विकत घेतलेले आहे. उभय तक्रारदारांना विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड निर्मित धानाचे 34 टक्के भेसळयुक्त बियाणे विकले असल्याने दोन्ही तक्रारदारांना शेतीमध्ये योग्य ती मशागत करुन व योग्य मात्रेत खत देऊन सुध्दा अपेक्षीत उत्पन्न आले नाही त्यामुळे उभय तक्रारदारांचे अपेक्षीत उत्पन्नाचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे कंपनी निर्मित भेसळयुक्त बियाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता याने तक्रारदारांना विकून दोषपूर्ण सेवा दिली तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते.
19. विरुध्दपक्ष क्रं 1 प्रथम बायोटेक लिमिटेड या धान निर्माता कंपनीचे माहितीपत्रका नुसार प्रतीहेकटर प्रथम धान वाणाचे प्रतीहेक्टर 35 ते 40 क्विंटल अपेक्षीत उत्पन्न येते. ग्राहक मंचा तर्फे प्रतिहेक्टर 35 क्विंटल एवढे अपेक्षीत उत्पन्न हिशोबात धरण्यात येते, त्याप्रमाणे एका एकरा मध्ये 14 क्विंटल अपेक्षीत उत्पन्न हिशोबा प्रमाणे येते.
20. तक्रारदारां तफे दाखल केलेल्या 7/12 उता-या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-1) श्री.भगवान अंबादास देशमुख यांचे वडीलांचे नावे मौजा शिवनाला, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-426/1, 426/2 आणि भूमापन क्रं 427 अशी अनुक्रमे 0.51 हेक्टर आर, 0.50 हेक्टर आर आणि 0.38 हेक्टर आर असे मिळून एकूण क्षेत्र 3 एकर 20 आर म्हणजेच 1 हेक्टर 39 आर एवढे क्षेत्र (साडे तीन एकर ) या वर्णनाची शेती असल्याचे सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ता क्रं-1 श्री.भगवान अंबादास देशमुख यांचे प्रतीएकर 14 क्विंटल अपेक्षीत उत्पन्न या प्रमाणे 03 एकर 20 आर (साडेतीन एकर) क्षेत्रा करीता एकूण 49 क्विंटल धानाचे अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे सिध्द होते.
21 तक्रारदारां तफे दाखल केलेल्या 7/12 उता-या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांचे वडीलांचे नावे मौजा शिवनाला, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-186/1, क्षेत्र-0.54 हेक्टर आर आणि भूमापन क्रं-260, क्षेत्र 1.62 हेक्टर आर (एकूण 216 आर) असे मिळून एकूण क्षेत्र 5 एकर 16 आर (जवळपास साडे पाच एकर) म्हणजेच 2 हेक्टर 16 आर या वर्णनाची शेत जमीन असल्याचे सिध्द होते. प्रतीएकर 14 क्विंटल धानाचे अपेक्षीत उत्पन्ना प्रमाणे तक्रारकर्ता क्रं 2 यांचे 05 एकर 16 आर (जवळपास साडेपाच एकर कारण 20 आर म्हणजे अर्धा एकर) एकरासाठी 77 क्विंटल धानाचे अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे सिध्द होते.
22. अशाप्रकारे वर नमुद केल्या प्रमाणे दोन्ही तक्रारदार अनुक्रमे श्री.भगवान अंबादास देशमुख यांचे 49 क्विंटल तर 2) श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांचे 77 क्विंटल अपेक्षीत उत्पन्नाचे 100 टक्के नुकसान झाल्याची बाब सिध्द होते याचे कारण असे की, संपूर्ण पिक एकाच वेळी आणि विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीने दिलेल्या विहित मुदतीत कापणीस तयार न झाल्याने आलेला फुलोरा सुध्दा गळून पडला आणि संपूर्ण पिक एकाच वेळी न आल्यामुळे संबधित तक्रारदार शेतक-यांना त्याची कापणी सुध्दा करता आलेली नाही या बाबी लक्षात घेता आलेले धानाचे बिया असलेले काही कणस सुध्दा गळून पडलेली आहेत असे दिसून येते.
23. प्रस्तुत तक्रारी मध्ये अन्य शेतकरी श्री एकनाथ रामचंद्र वैद्य आणि श्री भास्कर श्रावण देशमुख यांची शपथपत्रे दाखल केलेली आहेत, त्यामध्ये सन 2016 चे हंगामात जे धानाचे उत्पादन झाले ते धान शासकीय विक्री केंद्रात अंदाजे प्रतीक्विंटल रुपये-1650/- प्रमाणे मिळाले असून त्यावर शासना कडून त्या वर्षा करीता प्रतीक्विंटल रुपये-200/- बोनस मिळालेला आहे असे नमुद केलेले आहे.यानुसार प्रतिक्विंटल दर आणि बोनस हिशोबात घेतले तर प्रतीक्विंटल दर 1850/- एवढे येते. त्या हिशोबा नुसार तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख यांना 49 क्विंटलसाठी रुपये-90,650/- आणि तक्रारकर्ता क्रं 2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांना 77 क्विंटलसाठी रुपये-1,42,450/- एवढी नुकसान भरपाई अपेक्षीत उत्पन्नासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीकडून मंजूर करणे योग्य व वाजवी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित दोषपूर्ण बियाण्याची विक्री, विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांनी केलेली असल्याने उभय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-10,000/- प्रमाणे एकूण रुपये-20,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च प्रत्येकी रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या उभय तक्रारदार यांना अदा करावेत असे मंचाचे मत आहे, त्यावरुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
- उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे विरुध्द खालील प्रमाणेअंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं (1) प्रथम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या धान निर्माता कंपनीने धानाचे अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानीपोटी तक्रारकर्ता क्रं 1 श्री.भगवान अंबादास देशमुख यांना 49 क्विंटलसाठी रुपये-90,650/-(अक्षरी रुपये नव्वद हजार सहाशे पन्नास फक्त) आणि तक्रारकर्ता क्रं 2 श्री देवेन्द्र रामदास देशमुख यांना 77 क्विंटलसाठी रुपये-1,42,450/-(अक्षरी रुपये एक लक्ष बेचाळीस हजार चारशे पन्नास फक्त) एवढी नुकसान भरपाई तक्रार दाखल दिनांक-12.05.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के व्याज दरासह अदा करावेत.
- विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) अनुक्रमे बियाणे निर्माता कंपनी व बियाणे विक्रेता यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या उभय तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रुपये-10,000/- प्रमाणे एकूण रुपये-20,000/- (अक्षरी एकूण रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च प्रत्येकी रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-10,000/- (अक्षरी एकूण रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी अंतिम आदेशात नमुद केल्या प्रमाणे प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- सदर अंतिम आदेशातील मुद्या क्र. 2 मधील धानाचे अपेक्षीत उत्पन्नापोटी नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्द पक्ष क्रं. 1 बियाणे निर्माता कंपनीने उभय तक्रारदारांना विहीत मुदतीत न दिल्यास, विरुध्द पक्ष क्रं. 1 निर्माता कंपनी ही नमुद नुकसान भरपाईच्या रकमा मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्याजासह येणा-या रकमा उभय तक्रारदारांना अदा करण्यास जबाबदार राहिल.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.