निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार अशिक्षीत असून नांदेड येथील रहिवाशी आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून HP कंपनीचा Slate 6, Voice Tab ज्याचा EMI No. 358949050097282 आहे. तो असून रक्कम रु. 17,000/- देवून दिनांक 06.10.2014 रोजी खरेदी केला. सदर टॅब मध्ये खरेदी केल्या तारखेपासून दोष आढळल्यामुळे अर्जदाराने वारंवार टॅब विक्रेत्यास तोंडी तक्रार केली. तक्रारीत अर्जदाराने टॅब मधील दोष आणि इंटरनेट सेवेबद्दल, डाऊनलोडींग प्रॉब्लेम व इतर तक्रारी गैरअर्जदारासमोर मांडल्या. शेवटी सदरील टॅब दिनांक 15.12.2014 ला दुरुस्तीसाठी एच.पी. सर्व्हीसिंग केअर सेंटर औरंगाबाद येथे पाठविण्यात आला. सदर HP टॅबचा बॉक्स, वॉरंटी कार्ड, चार्जर व हेड फोन इत्यादी साहित्यासह पाठविण्यात आला. गैरअर्जदार 1 यांनी सदरी टॅब दुरुस्ती होवून 15 दिवसात येईल असे तोंडी आश्वासन दिले. परंतू 15 दिवसांनी गैरअर्जदार 1 यंच्याकडे टॅब दुरुस्त होवून आला का याची विचारपूस केली असता सदरील टॅब हा प्रवासात चोरी किंवा गहाळ झाला असावा असे कारण सांगितले व 15 दिवसांचा वेळ मागितला. परत दिनांक 26.1.2015 ला अर्जदार गैरअर्जदार 1 यांना भेटले असता टॅब चोरीस गेलेला आहे त्यामुळे दुसरा टॅब देण्यात येईल व त्यास आणखी 15 दिवसांचा वेळ लागेल असे उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यानच्या काळात अर्जदारास दिनांक 05.01.2015 ते 07.01.2015 पर्यंत इयत्ता 9 वी साठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित विशेष प्रशिक्षण इंग्रजीसाठी घेण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी टॅबचा काहीही उपयोग झाला नाही व सदर टॅब जवळ नसल्यामुळे त्या प्रशिक्षणाचा अर्जदारास व्हावा तसा उपयोग घेता आलेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शिकवणीवर झाला. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आले. दुस-या शिबीरासही सदर टॅबचा उपयोग करता आलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे वारंवार सदर टॅबची किंमत परत देण्याबाबत पाठपुरावा केला तसेच कस्टमर केअर येथे देखील कॉल करुन त्याबाबत विचारणा केली परंतू अर्जदारास त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. शेवटी गैरअर्जदार यांच्या मनमानीपणास कंटाळून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा देवून अर्जदारास निकृष्ट दर्जाचा टॅब विकून अर्जदाराची फसवणूक केल्याबद्दल सदर टॅबची किंमत रक्कम रु. 17,000/- गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास परत देण्याचा आदेश करावा. अर्जदाराच्या आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु. 25,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्च रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले.
4. गैरअर्जदार 3 यांना नोटीस प्राप्त होवूनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
5. तक्रारदाराने HP कंपनीच्या मोबाईल टॅबमध्ये दोष असल्याबाबत गैरअर्जदार 1 यांना सांगितले. त्यावरुन गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास सदर मोबाईल टॅब वॉरंटी कालावधी मध्ये असल्यामुळे HP कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरला संपर्क करुन दुरुस्ती करुन घ्यावी असे सांगून कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर हे औरंगाबाद येथे असल्याचे सांगून तेथील पत्ता तक्रारदारास दिला. परंतू अर्जदाराच्या विनंतीवरुन गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास नेहमीच्या परिचयाचा असल्याने चांगल्या भावनेने व सहानूभूतिपूर्वक विचार करुन सदर मोबाईल औरंगाबाद येथील कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटर येथे दुरुस्तीसाठी जमा केला व जमा केल्याची पावती गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास दिली व सर्व्हीस सेंटरशी संपर्क करुन त्यात दुरुस्ती नंतर प्राप्त करुन घेण्यास सांगितले. दिनांक 07.01.2015 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांना सांगितले की, मोबाईल टॅब दुरुस्त झालेला आहे. तुम्ही किंवा तुमचे इतर कोणी कामासाठी औरंगाबाद येथे गेले असता माझा टॅब आणून दयावा अशी विनंती केली. त्यावेळी गैरअर्जदाराने अर्जदार यास स्पष्ट नकार दिला होता. त्याच वेळी एक तिसरी व्यक्ती ज्याचे नांव गिरीष होते व जो गैरअर्जदार 1 यांच्या मित्राच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात त्यांनी गप्पाच्या ओघात उदया औरंगाबाद येथे गाडी सर्व्हीसींगसाठी जात असल्याचे सांगितले व गैरअर्जदार 1 यांना काही काम असल्यास सांगा असे म्हणाले. त्यावेळी अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यास विनंती केली की, श्री गिरीष यांनी सदर टॅब आणण्यास सांगा असे सांगितले. गैरअर्जदार 1 यांनी श्री गिरीष यांना विचारले असता त्यांनी होकार दिला व तक्रारदाराने सर्व्हीस सेंटरची मुळ पावती श्री गिरीष यांच्या सूर्पूद केली. दिनांक 08.01.2015 रोजी श्री गिरीष यांनी तक्रारदाराचा मोबाईल सर्व्हीस सेंटर मधून स्विकारला व त्याच्या गाडीचे काम झाल्यानंतर नांदेड येथे परत येत असतांना औरंगाबाद येथेच सदरील मोबाईल टॅब चोरी किंवा गहाळ झाल्याचे कळविले. त्यानंतर गैरअर्जदार 1 यांनी गिरीष यांना औरंगाबाद येथे थांबण्यास सांगून स्वतः दिनांक 09.01.2015 रोजी औरंगाबाद येथे जावून श्री गिरीषसह औरंगाबाद येथील पोलीस स्टेशन वाळूज येथे मोबाईल टॅब चोरी गेल्याची तक्रार दिली. परंतू ठाणे अंमलदार यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. सदरील घटना गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास सांगितली असता अर्जदाराने दुस-या व्यक्तीवर विसंबून राहून चुक केल्याचे मान्य केले. त्यानंतर गैरअर्जदार 1 यांना जिल्हा मंचामार्फत नोटीस मिळाली. वरील सर्व माहिती वरुन हे स्पष्ट होते की, मोबाईल हरवण्यास गैरअर्जदार 1 यांचा कसलाही संबंध नाही. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास कोणत्याच प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही. उलट मर्यादेपलीकडे उत्कृष्ट सेवा दिली म्हणून गैरअर्जदार 1 हे अर्जदारास काहीही देणे लागत नाहीत. गैरअर्जदार 1 यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार 1 व 2 विरुध्द फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
6. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडून टॅब खरेदी केलेला नाही त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार 2 यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडे स्वतः टॅब दुरुस्तीसाठी आणलेला नाही. सदर टॅब गैरअर्जदार 1 यांच्याकडून पांडूरंग नावाच्या व्यक्तीने दुरुस्तीसाठी दिनांक 24.12.2014 रोजी दिला. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार 2 यांचा ग्राहक नसून गैरअर्जदार 1 हे गैरअर्जदार 2 यांचे ग्राहक आहेत. सदर टॅब गैरअर्जदार 1 यांच्याकडून दुरुस्तीसाठी आला होता तो गैरअर्जदार 1 यांनी दुरुस्ती करुन गैरअर्जदार 1 यांच्याकडून गिरीष नावाच्या व्यक्तीकडे परत दिला. कारण त्याने सर्व्हीस रिशिप्ट सोबत आणली होती. तरी पण गैरअर्जदार 2 यांनी गैरअर्जदार 1 यांना कॉल करुन खात्री करुन घेतल्यावरच गिरीष नावाच्या व्यक्तीस सदरचा टॅब देवून त्याची सही घेतलेली आहे. सदर वाद हा गैरअर्जदार 3, गैरअर्जदार 1 व अर्जदार यांच्यामधील आहे. त्यात गैरअर्जदार 2 यांचा काहीही संबंध नाही. गैरअर्जदार 1 हे आमचे ग्राहक आहेत. आम्ही त्यांना चांगली सेवा दिलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार 2 यांचा काहीही एक संबंध येत नाही त्यामुळे अर्जदाराच्या कुठल्याच प्रकारच्या नुकसानी बाबत गैरअर्जदार 2 हे जबाबदार नाहीत.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
8. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या टॅबच्या दिनांक 06.10.2014 च्या पावतीवरुन स्पष्ट आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता अर्जदाराने HP Slate 6, Voice Tab हा 17000/- रुपये देवून गैरअर्जदार यांच्याकडून खरेदी केलेला दिसून येतो. अर्जदाराच्या मोबाईलमध्ये बिघाड झाला होता हे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या दिनांक 24.12.2014 च्या Service Call Report वरुन स्पष्ट आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात मान्य केलेले आहे की, अर्जदाराने सदर टॅबमध्ये दोष असल्याचे गैरअर्जदारास सांगितले.
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून सदर कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे व त्यामुळे मोबाईल नादुरुस्त झाल्यास अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 यांचा ग्राहक या नात्याने गैरअर्जदार 1 यांच्याकडेच तक्रार करील. तसे अर्जदाराने केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांचे सर्व्हीस सेंटर नांदेड येथे नाही व ते औरंगाबाद येथे आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांची ही जबाबदारी आहे की, तो मोबाईल औरंगाबाद येथे सर्व्हीस सेंटरला पाठवून दुरुस्ती करुन अर्जदारास देणे. कारण अर्जदाराने सदर मोबाईलची किंमत अगोदरच मोजलेली आहे. नंतर दुरुस्तीसाठीचा खर्च अर्जदारावर टाकणे हे अन्यायकारक आहे कारण सदर मोबाईल हा वॉरंटीच्या काळात नादुरुस्त झालेला आहे. अर्जदाराचा मोबाईल घेतल्यानंतर लगेचच नादुरुस्त झालेला आहे पण गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्याची दखल घेतलेली नाही. गैरअर्जदार 1 हे जी कोणती वस्तु विकत आहेत ती योग्य क्वालिटीची आहे व त्यात कसलाही दोष नाही याची खात्री करुनच ग्राहकांना विकण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र. 1 यांची आहे. विकलेली वस्तु बिघाड झाल्यास त्यास उत्पादक जबाबदार आहे असे म्हणून गैरअर्जदार क्र. 1 यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या म्हणण्यात अर्जदार हा त्याचा ग्राहक नसल्याचे म्हटले आहे. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर मोबाईल हा गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीस पाठवलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदरचा मोबाईल दुरुस्त करुन गैरअर्जदार क्र. 1 यांच्या माणसाकडे त्याची फोनवर खात्री करुन दिलेला आहे जे गैरअर्जदार क्र. 1 यांना मान्य आहे. नंतर सदर मोबाईल गहाळ झालेला आहे, हे देखील गैरअर्जदार क्र. 1 यांना मान्य आहे. यावरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे रक्कम रु. 17,000/- चे नुकसान झालेले आहे व अर्जदारास मानसिक त्रासही झालेला आहे. या सर्वास गैरअर्जदार क्र. 1 हेच जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास रक्कम रु. 17,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
4. दावा खर्चाबाबत आदेश नाही.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.