जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/196 प्रकरण दाखल तारीख - 11/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.प्रभाकर ऊर्फ धनंजय पि.धोंडोपंत हळदेकर, वय वर्षे 34, धंदा शिकवणी-हळदेकर संस्कृत क्लासेस, रा.फरांदेनगर,नांदेड. अर्जदार. विरुध्द. प्रसार अडव्हरटाईज, प्रोप्रा.रतन दिलीपराव रणशुर, गैरअर्जदार द्वारा – जाधव सर तुकाई अंकुरनगर, पोष्ट ऑफिस समोर, भावसार चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अनुप बी पांडे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड. बी.एन.वाघमारे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख, सदस्या) अर्जदार हे नांदेड येथील फरांदेनगरचे रहिवाशी आहेत व ते संस्कृत विषयाचे वर्ग घेऊन ते आपली उपजिवीका करतात. अर्जदार हे गेल्या 13 वर्षापासुन नांदेड येथे फरांदेनगर, विद्यानगर, गणेशनगर भागात शिकवणी घेत असून त्यांच्याकडे पुरेसे विद्यार्थी शिकवणीसाठी येतात. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याशी संपर्क साधुन नांदेड शहरात होर्डींगद्वारे जाहीरात लावण्यासाठी चर्चा केली त्यानुसार अर्जदाराच्या सुचनेप्रमाणे गैरअर्जदार यांनी 8 X 16 चे होर्डींग लावण्याचे ठरले. त्यासाठी अर्जदाराने रु.15,000/- किंमत सदरचे होर्डींगची ठरविली. दि.25/06/2010 रोजी अर्जदार यांनी रु.15,000/- गैरअर्जदार यांना दिल्याबद्यलची पावती अर्जदार यांनी दाखल केली. त्यानुसार गैरअर्जदार यांना शहरामध्ये होर्डींग उभे केले. सदरील होर्डींग अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात ठरल्याप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीसाठी लावावयाचे होते परंतु गैरअर्जदार यांनी सदरचे होर्डींग फक्त 2-3 दिवसच ठेवून काढुन टाकले म्हणुन अर्जदारास सदरची तक्रार घेऊन या मंचात यावे लागले. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, स्वतःच्या उपजिवेकेसाठी अर्जदार संस्कृत विषयाचे शिकवणी घेत असत व त्याची जाहीरात करण्यासाठी म्हणुन अर्जदाराने होर्डींग लावण्याचे ठरविले होते त्यासाठी त्यांनी प्रसार अडव्हरटाईज नांदेड यांचेकडे संपर्क साधुन व त्यांना आवश्यक होते तेवढया आकाराचे होर्डींग रु.15,000/- चे 8 x16 चे होर्डींग नांदेड शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी लावण्याचे ठरविले. सदरील होर्डींग हे एक महिन्याचे कालावधीसाठी अर्जदाराचे जाहीरात करण्या करीता होते. या होर्डींगसाठी विविध कार्यालयातुन लागणारी कायदेशिर परवानगी गैरअर्जदारांना घ्यावयाची होती व त्यासाठी अर्जदाराने दिलेल्या रक्कमेत गैरअर्जदारांनी ही परवानगी घेण्याचे ठरले होते रु.15,000/- अर्जदाराने दि.25/06/2010 रोजी गैरअर्जदारास दिले व त्याबद्यलची पावती घेतली. सदरील पावती अर्जदाराने मंचासमोर दाखल केली आहे जे की, रु.15,000/- ची आहे. सदरचे होर्डींगची मुळ किंमत ही पावतीप्रमाणे रु.18,000/- दर्शविलेली आहे व त्यामध्ये रु.3,000/- ची सवलत दिलेली आहे, असे एकुण रु.15,000/- ची पावती अर्जदाराने दाखल केलेली आहे. ठरल्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी काबरानगर, छत्रपतीनगर, आय.टी.आय.पंचशील ड्रेसेसच्या बाजूस श्रीनगर, अशोकनगर येथे अर्जदाराच्या जाहीरातीचे फलक उभे केले परंतु सदरचे फलक हे एक महिना ठेवावयाचे होते जे 2-3 दिवसांच्या आंत काढून टाकले तसेच सहा ठिकाणी होर्डींग उभे करण्याचे ठरले असतांना देखील गैरअर्जदारांनी पाचच ठिकाणी व अगदी कमी कालावधीसाठी होर्डींग उभे केले ही गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली त्रुटीची सेवा होती, असे अर्जदार यांनी स्पष्ट केले आहे. सदरील घटना घडल्यामुळे अर्जदार यांनी दि.12/07/2010 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदारांना नोटीस दिली ज्यामध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारांना नुकसान भरपाई म्हणुन रु.80,000/-, जाहीरातीसाठी देण्यात आलेली रक्कम रु.16,000/- व दावा खर्च असे एकुण रु.1,00,000/- रक्कम आठ दिवसांच्या आंत जर गैरअर्जदार यांनी अर्जदारास न दिल्यास ते न्यायालयामध्ये कार्यवाही करतील. त्यानंतरही आजपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास ते नोटीसचे प्रतीउत्तरही दिले नाही व त्यामुळे अर्जदाराने दि.10/08/2010 रोजी गैरअर्जदार यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. दि.16/10/2010 रोजी गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल करण्या करीता वेळ मागीतला त्यांना संधी देऊनही त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले नाही. म्हणुन दि.25/10/2010 रोजी त्यांचे विरुध्द नो से चा आदेश झाला व प्रकरण युक्तीवादसाठी ठेवण्यात आले. अर्जदाराचा युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे एक महिना सदरील होर्डींग जर उभे केले असते तर अर्जदारास जाहीरात करण्याचा फायदा झाला असता, पुर्ण महिन्याचे जाहीरातीचे पैसे घेऊनही गैरअर्जदार यांनी केवळ 2-3 दिवसच फलक उभे केले व त्यामुळे अर्जदाराकडे जे नवीन विद्यार्थी येणार होते ते आले नाही. पर्यायाने अर्जदाराचे नुकसान झाले अशा प्रकारचे वक्तव्य अर्जदाराने वकीला मार्फत केले आहे. गैरअर्जदारांनी आपले कुठलेही म्हणणे स्पष्टपणे न मांडल्यामुळे त्यांनी हे फलक एक महिना लावायचे होते ते 2-3 दिवसा करीता लावले, या अर्जदाराच्या म्हणण्यात तथ्य वाटत आहे. अर्जदार हा शिकवणी घेण्याचे काम करीत असल्यामुळे ठराविक महिन्यात त्याची जाहीरात होणे हे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक होते व गैरअर्जदार यांनी सदरचे होर्डींग जाहीरातीची फिस घेऊनही काम केले नाही, ही सेवेतील त्रुटी अर्जदाराने सिध्द केली आहे. अर्जदाराने आपल्या अर्जामध्ये रु.16,000/- ही होर्डींगची फिस दिलेली आहे परंतु प्रत्यक्षात गैरअर्जदार यांनी दिलेली पावती पाहीली असता, त्यावर रु.15,000/- असल्यामुळे या ठिकाणी अर्जदारांनी गैरअर्जदार यांना रु.15,000/- दिले असे स्पष्ट होते. अर्जदार यांनी मानसिक त्रास आर्थीक नुकसान भरपाई म्हणुन रु.1,00,000/- मागीतले आहे परंतु त्यांचे रु.1,00,000/- चे नुकसान कसे झाले याबद्यलचा कुठलाही पुरावा अर्जदार यांनी मंचा समोर दाखल केलेला नाही. म्हणुन अर्जदार गैरअर्जदार यांनी होर्डींगची फिस म्हणुन घेतलेले रक्कम रु.15,000/- वापस मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्याच्या आंत जाहीरात फिस रु.15,000/- वापस करावे असे न केल्यास त्यावर 9 टक्के व्याज रक्कम फिटेपर्यंत द्यावे. मानसिक त्रास व शारीरिक त्रासाबद्यल गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.5,000/- तसेच नुकसान भरपाई म्हणुन रु.5,000/- व न्यायालयीन खर्च म्हणुन रु.2,000/- एक महिन्याचे आंत द्यावे असे न केल्यास संपुर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत अर्जदारास गैरअर्जदार यांनी द्यावे. 3. उभय पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |