Rajendra S/o Dattatray Wable filed a consumer case on 11 Feb 2015 against Prasad Deshpande in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/285 and the judgment uploaded on 17 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-285/2014
तक्रार दाखल तारीख :-10/06/2014
निकाल तारीख :- 11/02/2015
__________________________________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
________________________________________________________________________________________________
राजेंद्र पि. दत्तात्रय वाबळे,
रा. राहता ता. राहता जि.अहमदनगर …….. तक्रारदार
विरुध्द
1. श्री.प्रसाद देशपांडे,
रा. 9/10 द्वारका रेजीम, चुन्नीलाल पेट्रोल पंपाचे बाजुला
अदालत रोड, औरंगाबाद
2. कॉक्स अँड किंग लि.,
टरनर मोरीसन बिल्डींग, 16
बँक स्ट्रीट, फोर्ट मुंबई-01 ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. पी.आर.अडकीने
गैरअर्जदार 1 तर्फे – एकतर्फा आदेश
गैरअर्जदार 2 तर्फे – अॅड. भुषण कुलकर्णी
________________________________________________________________________________________________
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी ‘दुनिया देखो’ या योजनेखाली अद्वितीय युरोप आनंद यात्रा समर 2013 या परदेश यात्रेचे बूकिंग केले. गैरअर्जदाराने सांगितले की, सदर युरोप यात्रेकरिता प्रति व्यक्ति रु.1,80,000/- इतका खर्च येईल. त्याकरिता तक्रारदाराने तो स्वतः, त्याची पत्नी व 2 मुले यांच्या करिता रु.40,000/- booking amount दिले. गैरअर्जदाराने तक्रारदाराचे व्हिसा , विमानाची तिकिटे आणि hotel booking ची जवाबदारी घेतली. टुर ची तारीख 19 मे 2013 ठरली. तक्रारदाराने व्हिसा करिता लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदाराकडे सोपवली. गैरअर्जदार क्रं 1 यांनी व्हिसा मिळवण्याकरिता आवश्यक असलेल्या योग्य त्या कागदपत्रांची शहानिशा न करता सदर कागदपत्रे व्हिसा मागणी करिता सादर केली त्यामुळे तक्रारदाराचा UK ला जाण्यासाठीचा visa नाकारला गेला. त्यामुळे तक्रारदाराची मुंबई-लंडन विमानाची तिकिटे रद्द करावी लागली. परंतु तिकीट रद्द झाल्यामुळे तिकीटाची रक्कम refund मिळाली नाही. ही बाब गैरअर्जदार क्रं 1 यांनी टूर सुरू होण्याच्या 15 दिवस आधी तक्रारदारास सांगितली . टूर रद्द केल्यावर रक्कम परत मिळणार नाही असे गैरअर्जदाराने सांगितले. गैरअर्जदाराच्या सांगण्यानुसार जर 8 लाख रुपये save करायचे असतील आणि लंडन सोडून बाकी युरोप टुर करायचा असेल तर ‘schengan visa’ घेण्याशिवाय दूसरा पर्याय तक्रारदारासमोर नव्हता. टूर सुरू होण्याकरिता फक्त 5 दिवस शिल्लक होते. त्यामुळे वेळेच्या आत सदर व्हिसा मिळवण्याकरिता गैरअर्जदाराने प्रती व्यक्ति रु. 20,000/- प्रमाणे रु. 80,000/- घेतले. व्हिसा करिता लागणारी कागदपत्रे तक्रारदाराने पुन्हा पाठवली. व्हिसा बद्दल पूर्ण माहिती घेण्या आधीच गैरअर्जदार क्रं 1 याने दि.21/5/13 या तारखेचे मुंबई ते पॅरिस हे तिकीट book केले. गैरअर्जदाराच्या सांगण्यावरून तक्रारदार Swiss Consulate मध्ये दि.20/5/13 रोजी गेले परंतु Swiss Consulate ने सांगितले की, दि.22/5/13 या तारखेचे मुंबई पॅरिस तिकिटाचे confirmation दिले तरच व्हिसा मिळू शकतो. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदाराच्या मुंबई येथील कार्यालयातील श्री नीरज रामडू यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारास सांगितले की, व्हिसा करिता आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यास विलंब झाल्यामुळे व्हिसा मिळालेला नाही. त्याने तक्रारदारास रु.66500/- भरण्यास सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार क्रं 1 यांनी दि.22/5/13 ची तिकिटे book केली. दि.21/5/13 रोजी पासपोर्ट आणि व्हिसा मिळाल्यानंतर तक्रारदाराने त्याच्या कुटुंबासहित दि.22/5/13 रोजी परदेश यात्रेला प्रारंभ केला. परंतु त्याला UK चा व्हिसा न मिळाल्यामुळे त्याला लंडन येथे जाता आले नाही. अशा रीतीने गैरअर्जदाराच्या दुर्लक्षित कारभारामुळे UK चा व्हिसा मिळाला नाही. Swiss Consulate कडून पासपोर्ट आणि व्हिसा मिळालेला नसताना देखील मुंबई ते पॅरिसची तिकिटे काढावयास लावली व व्हिसा तात्काळ न मिळाल्यामुळे ती तिकिटे रद्द करून जास्तीचे रु.66500/- देऊन पुन्हा तिकिटे काढण्यास भाग पाडले. दि.30/7/13 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटिस दिली. त्या नोटिसद्वारे तक्रारदाराने ठरलेल्या रकमेपेक्षा रु.3,70,321/- जास्त घेतल्यामुळे ते परत देण्याची मागणी केली. त्यापैकि रु.1,46,500/- ही रक्कम दोन वेळा तिकिटे रद्द केल्याची, लंडन येथे sight seeing करिता घेतलेली रक्कम रु.1,00,000/- तसेच जादा युरो फरकाचे घेतलेले रु.16,727.60 या रकमेची मागणी केली आहे. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने 10 नोव्हेंबर 2013 रोजी त्याच्या पर्यटनाचे बूकिंग केले. त्या तारखेनंतर गैरअर्जदाराने वारंवार मागणी करून देखील तक्रारदाराने व्हिसासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वेळेच्या आत पाठवली नाहीत. मार्च 2013 च्या शेवटच्या आठवड्यात कागदपत्रे पाठवली. UK चा व्हिसा मिळण्याकरिता दि.5 एप्रिल 2013 रोजी interview ठरला होता. दि.25/4/13 रोजी व्हिसा नाकारला गेला. व्हिसा नाकारल्या गेल्याचे पत्र तक्रारदाराच्या पत्यावर गेले होते. त्यामुळे टुर सुरू होण्याच्या 15 दिवस आधी प्रस्तुत गैरअर्जदाराने व्हिसा मिळाला नसल्याचे तक्रारदारास सांगितले. दि.7/5/13 रोजी तक्रारदाराने दि.19/5/13 ची तिकिटे रद्द न करण्यास व लंडन वगळून इतर युरोप पाहण्याकरिता Schengan Visa घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे पुन्हा दि.21/5/13 रोजीचे बूकिंग केले. तक्रारदाराने दि.8/5/13 पर्यन्त पाठवलेली कागद पत्रे अपूर्ण होती. कागदपत्रांचा संपूर्ण संच दि.13/5/13 रोजी मिळाला. त्यामुळे दि.14/5/13 रोजी Schengan Visa करिता अर्ज केला. Swiss Consulate कडून दि.20/5/13 रोजी तक्रारदाराचा इंटरव्ह्यु ठरला. Swiss Consulate ने तक्रारदारास सांगितले की, travel date दि. 21/5/13 नंतरची असेल तरच Schengan Visa मिळू शकतो. त्यामुळे दि.21/5/13 ची तिकिटे रद्द करून दि.22/5/13 ची तिकिटे book करावी लागली. प्रत्येक वेळेस तक्रारदाराने त्याच्या मर्जीने तिकिटे रद्द करून पुढील तारखेचे बूकिंग करण्यास सांगितलेले आहे व त्याकरिता भरावी लागणारी रक्कम भरताना देखील त्याने कोणतीही तक्रार केली नव्हती. तक्रारदाराचा व्हिसा नाकारल्या जाण्यात गैरअर्जदाराचा दोष नाही. लंडन वगळून इतर युरोप पाहण्याची इच्छा पुर्णपणे तक्रारदाराची होती. संपूर्ण टुर करिता ठरवलेली रक्कम रु.9,46,319/- होती आणि तक्रारदाराने एकूण रु.9,40,000/- भरलेले होते. तक्रारदाराने पाठवलेल्या नोटिसमध्ये त्याने एकूण रु.11,29,237/- इतकी रक्कम भरल्याचे नमूद केले होते. त्या नोटिसला उत्तर देताना प्रस्तुत गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून रु.10,06,910/- मिळाल्याचे चुकून नमूद केले होते. प्रत्यक्षात तक्रारदाराकडून प्रस्तुत गैरअर्जदारास संपूर्ण टुरचे रु.9,40,000/- मिळाले आहेत. तक्रारदाराच्या दुर्लक्षित व्यवहारामुळे विमानाची तिकिटे रद्द करावी लागली आणि rebooking करताना भराव्या लागलेल्या supplement charges रु.1,46,500/- करिता गैरअर्जदार जवाबदार नाही. रु.16727.16 ही जादा युरो फरकाची रक्कम करारानुसार घेतली होती. गैरअर्जदाराने प्रत्येक गोष्ट वेळेवर केली होती परंतु तक्रारदाराने कागदपत्रे वेळेवर न दिल्यामुळे तिकिटे रद्द करावी लागली. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रती:- दि.20/5/13 रोजी दिलेल्या रु.66500/- ची पावती, दि.10 मे 2013 रोजी तक्रारदारच्या नावे असलेली रु.4,78619/- ची पावती, सुमन वाबळे यांच्या नावे असलेली रु.23930 9/- ची पावती, निखिल वाबळे यांच्या नावे असलेली रु.2,29,309/- ची पावती अद्वितीय युरोप आनंद यात्रा समर 2013 चे माहिती पत्रक व सदर टूर विषयी दैनंदिनी, दि.17 मे 2013 चे Swiss consulate चे पत्र, तक्रारदाराने दि.18/5/13 रोजी Swiss consulate ला लिहिलेले पत्र दि.15 मे 2013 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास पाठवलेले पत्र, तक्रारदाराने गैरअर्जदारास पाठवलेली नोटिस व त्याचे गैरअर्जदाराने दिलेले उत्तर.
गैरअर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रती:- booking form, कंपनीचे terms and condition, तक्रारदाराचा पासपोर्ट व तक्रारदाराचा व्हिसा नाकारल्याची प्रत.
तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेल्या पावतीवरून असे दिसून येते की, त्याने दि.10 मे 2013 रोजी रु.4,78619/-, रु.2,39,309/- आणि रु.2,29,309 भरल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. तसेच दि.20/5/13 रोजी रु.66,500/- भरल्याची पावती दाखल केली आहे.
गैरअर्जदाराने आयोजित केलेल्या अद्वितीय युरो आनंद यात्रा समर 2013 करिता दि. 30 नोव्हेंबर 2012 रोजी तक्रारदाराने बूकिंग केले. गैरअर्जदाराने तक्रारदारास कळवले की, प्रति व्यक्ति रु.1,80,000/- व युरो रेट फरकाची रक्कम असा एकूण खर्च राहील, असे कळवले. त्यानुसार तक्रारदाराने तो स्वत, त्याची पत्नी व दोन मुले असे 4 जणांसाठी डिसेंबर 2012 मध्ये रु.40,000/- advance booking ची रक्कम जमा केली. सदर रकमेमध्ये रु.20,000/- बूकिंगची रक्कम होती. उर्वरित रु.17,500/- ही कागदपत्रांसाठी व रु.3000/- reservation fees होती. सदरील रक्कम स्वीकारून गैरअर्जदाराने व्हिसा, विमानाची तिकिटे व हॉटेलचे बूकिंग करण्याची जवाबदारी स्वीकारली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने सर्व कागदपत्रे दिलेली होती परंतु गैरअर्जदाराने संपूर्ण कागदपत्रांची शहनिशा न करता UK च्या व्हिसा करिता अर्ज केला. कागदपत्रांच्या त्रुटी मुळे तक्रारदाराचा व्हिसा नाकारला गेला. सदर बाब गैरअर्जदाराने टुरच्या 15 दिवस आधी कळवली. प्रत्यक्षात व्हिसा नाकारल्याचे पत्र एप्रिल मध्येच गैरअर्जदारास मिळाले होते. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार सदर टपाल तक्रारदाराच्या पत्यावर गेले होते. त्यामुळे तक्रारदाराने कळवल्यावरच त्यांना ही बाब समजली. आम्ही गैरअर्जदाराने दाखल केलेल्या व्हिसा नाकारल्याच्या पत्राचे अवलोकन केले. तक्रारदाराचा व्हिसा दि.24/4/13 रोजी नाकारलेला आहे. तक्रारदाराचा व्हिसा अपूर्ण कागद्पत्रांमुळे नव्हे तर त्यांच्या बँक Account Statement मधील अपूर्ण माहितीमुळे नाकारला गेला. सदर पत्र गैरअर्जदाराने दाखल केले आहे. त्यावरून सदर पत्र त्यांच्या पत्यावर गेले असावे, असे आम्ही गृहीत धरतो.
गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी जवाबात ही बाब कबुल केली आहे की, दि.7/5/13 रोजी तक्रारदाराचा UK चा व्हिसा नाकारल्या गेला आणि तक्रारदाराने Schengan Visa करिता प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय कळवला. त्या अनुषंगाने तक्रारदाराने दि.8/5/13 रोजी जरूरी कागदपत्रे देखील पाठवली. दि.10/5/13 रोजी टुर करिता ठरलेली पूर्ण रक्कम देखील भरली. दि.8/5/13 रोजीच Schengan Visa मिळवून देण्याकरिता ताबडतोब प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदाराने दि.15/5/13 रोजी Schengan Visa च्या प्रक्रियेला सुरुवात केली.
तक्रारदाराचा UK ला जाण्याचा व्हिसा नाकारला गेल्यानंतर तक्रारदाराने Schengan Visa मिळवण्याकरिता तयारी असल्याचे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने व्हिसा करिता 8/5/13 पर्यन्त कागदपत्रे पाठवली. परंतु ती कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे परत संपूर्ण कागदपत्रे दि.15/5/13 तारखेला Swiss Consulate मध्ये पाठवले. तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला गैरअर्जदार क्रं 2 यांच्या मुंबईच्या ऑफिस मधील अधिकारी श्री नीरज रामडू यांच्यामार्फत या गोष्टीची माहिती मिळाली होती की, गैरअर्जदार क्रं 1 यांना दि.8/5/13 रोजीच तक्रारदाराचा ई-मेल आणि कागदपत्रांचा संच मिळाला होता. परंतु गैरअर्जदार क्रं 1 यांनी म्हटले आहे की, दि.8/5/13 रोजी अपूर्ण कागदपत्रे मिळाली होती व संपूर्ण कागदपत्रांचा संच दि.15/5/13 रोजी मिळाला. गैरअर्जदाराच्या या कथनामध्ये तथ्य आढळून येत नाही. याचे कारण असे की, व्हिसा मिळवून देण्याची जवाबदारी त्यांची होती. त्याकरिता त्यांनी तक्रारदाराकडून रक्कम देखील घेतलेली होती. तक्रारदाराकडून आवश्यक कागदपत्रे मागवताना अपूर्ण माहिती दिल्या गेली असेल किंवा गैरअर्जदाराकडूनच व्हिसा मिळवण्याकरिता अर्ज उशीरा दाखल करण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Swiss Consulate मधून व्हिसा मिळण्यासाठी लागणारा वेळ व प्रक्रिया गैरअर्जदारास माहीत असणे गृहीत आहे, कारण हा त्यांचा दैनंदिन व्यवहार आहे . गैरअर्जदार क्रं 1 यांनी Swiss Consulate मध्ये इंटरव्ह्यु ची तारीख दि.20/5/13 ही ठरली असताना अतिशय घाई करून दि.21/5/13 ची तिकिटे काढून ठेवण्याची गरज नव्हती. Swiss Consulate ने तक्रारदारास संगितले की, दि.21/5/13 नंतरचे तिकीट confirmation आणले तर Schengan Visa मिळू शकतो. त्यामुळे दि.21/5/13 चे तिकीट रद्द करून दि.22/5/13 रोजीचे rebooking करावे लागले व supplement charges चा आर्थिक भुर्दंड तक्रारदारास सहन करावा लागला.
तक्रारदाराने त्याला UK चा व्हिसा न मिळाल्यामुळे लंडन वगळून इतर युरोप पाहण्याची तयारी दाखवली. तक्रारदाराने तोवर टुर ची पूर्ण रक्कम तक्रारदारास दिलेली होती. याचा अर्थ लंडन पर्यटनाची रक्कम देखील गैरअर्जदारास मिळाली होती. लंडनला जाण्याचा व्हिसा नाकारला गेल्यानंतर ती रक्कम गैरअर्जदाराने refund करणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या terms and conditions मधील unutilized services मध्ये सदर बाबीचा समावेश नाही, त्यामुळे तक्रारदार सदर रक्कम refund मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदाराने लंडन पर्यटन रद्द झाल्यामुळे त्याने टुर करिता भरलेल्या एकूण रकमेतून रु.1,00,000/- refund मागितली आहे. गैरअर्जदाराने लेखी जवाबात लंडन पर्यटनासाठी नेमकी किती रक्कम घेतली होती याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम आम्ही ग्राह्य धरतो.
युरोची जादा फरकाची घेतलेली रक्कम प्रवाश्यांना price fluctuation ची झळ लागू नये या दृष्टीने टुर सुरू होण्याधीच घेतलेली आहे. तसेच ती रक्कम मे महिन्यात टुर सुरू होण्याआधी जो rate of exchange होता त्यानुसार घेतलेली आहे.
गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जवाबात म्हटले आहे की, त्यांना तक्रारदाराकडून प्रत्यक्षात रु.9,40,000 मिळालेले आहेत. आम्ही तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांचे निरीक्षण केले. तक्रारदाराने टुर करिता रु.9,47,237/- इतकी रक्कम दिली होती. दि.20/5/13 रोजी रु.66500/- ही रक्कम विमानाचे तिकिटाचे rebooking करावे लागले. त्याकरिता दिलेले cancellation charges ची ती रक्कम होती. अशा रीतीने तक्रारदाराने एकूण रु.10,13,737/- इतकी रक्कम गैरअर्जदारास दिली होती.
वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदाराचा UK ला जाण्याचा व्हिसा नाकारल्या गेल्याचे गैरअर्जदारांना एप्रिल 2013 च्या शेवटच्या आठवड्यात कळले होते. परंतु त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तक्रारदाराकडून दि.8/5/13 रोजी कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर देखील गैरअर्जदाराने Schengan Visa करिता अर्ज करण्यास दिरंगाई केली. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून लंडन पर्यटनाकरिता घेतलेली रक्कम परत करणे गरजेचे होते. त्याबाबतीत गैरअर्जदाराने समाधानकारक खुलासा केलेला नाही. यावरून असे दिसून येते की, ती रक्कम तक्रारदारास परत न देता तक्रारदाराची आर्थिक लुबाडणूक केली आहे. तसेच दि.21/5/13 ची तिकिटे काढण्याची विनाकारण घाई केल्यामुळे तक्रारदारास जास्तीची रक्कम मोजावी लागली. व्हिसा मिळवताना त्याच्या प्रक्रियेबद्दल आणि त्यासाठी लागणार्या कालावधीबद्दल परदेश पर्यटन ठरवणार्या कंपनीस माहीत असणे आवश्यक आहे. त्यांच्या terms and conditions मधील ‘ Visa’ विषयी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, व्हिसा मिळवण्याकरिता लागणार्या प्रक्रियेसाठी व अर्ज सादर करण्याकरिता गैरअर्जदार कंपनी पुर्णपणे सहकार्य करेल आणि त्यासाठी त्यांनी charges पण ठरवले आहेत. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारून त्याला त्रुटीची सेवा दिली आहे. तक्रारदाराने युरोपला जाण्याकरिता कुटुंबासहित सर्व तयारी केली होती. ऐन वेळेवर त्याला UK ला जाण्याकरिता व्हिसा मिळाला नाही, या करिता तक्रारदाराने संपूर्ण टुर रद्द न करता लंडन वगळून इतर युरोप पाहण्याची इच्छा दर्शवली. परंतु गैर अर्जदाराने तक्रारदारास पुर्णपणे सहकार्य दिलेले नाही. त्याला Schengan Visa मिळवण्याकरिता अनावश्यक विलंब केला. त्यामुळे तक्रारदारास दुसर्यांदा विमानाची तिकिटे रद्द करून rebooking करावे लागले. गैरअर्जदाराच्या निष्काळजी व दुर्लक्षित व्यवहारामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले व मनस्ताप देखील झाला. त्यामुळे तक्रारदार हा लंडन पर्यटनाकरिता भरलेली रक्कम व त्याने दुसर्यांदा काढाव्या लागलेल्या विमानाच्या तिकिटाच्या cancellation charges च्या नुकसान भरपाईस पात्र आहेत.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.