नि. २२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा. सदस्या - सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ९३/२०१०
-----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - १६/०२/२०१०
तक्रार दाखल तारीखः - १७/०२/२०१०
निकाल तारीखः - २०/१०/२०११
--------------------------------------------
श्री कांतीराम नामदेव माने,
वय वर्षे – ४५, धंदा – शेती
रा.मु.पो. निमसोड (महादेव मळा), ता.खटाव
जि.सातारा ..... तक्रारदार
विरुध्द
प्रणव कोल्ड स्टोअरेज प्रा.लि. तर्फे
१. चेअरमन
श्री विद्याधर दत्तात्रय पाटील, व.व.सज्ञान
धंदा – व्यापार, ऑफिस प्रणव कोल्ड स्टोअरेज
प्रा.लि. तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता.तासगांव जि. सांगली
२. संचालक
श्री जनार्दन कृष्णराव खराडे, व.व.सज्ञान
धंदा – व्यापार, ऑफिस प्रणव कोल्ड स्टोअरेज
प्रा.लि. तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता.तासगांव जि. सांगली
३. संचालक
श्री प्रकाश अरुण खराडे, व.व.सज्ञान
धंदा – व्यापार, ऑफिस प्रणव कोल्ड स्टोअरेज
प्रा.लि. तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता.तासगांव जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.पी.एन.पाटील
जाबदार क्र.१ ते ३ – नो से
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांनी जाबदार क्र.१ ते ३ यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये बटाटा ठेवला होता. सदरहू बटाटा जाबदारांनी योग्य ती काळजी न घेतल्याने पूर्णपणे नासून व कुजून गेला. याबाबतची नुकसान भरपाई तक्रारदारांनी जाबदारांकडे मागून देखील जाबदारांनी ती दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदार हे मौजे निमसोड ता.खटाव जि.सातारा या गावचे रहिवासी असून तिथे त्यांची वडिलार्जित मालकीहक्काची शेतजमीन आहे. या जमीनीचा गट नं.४१०२/१ असा असून या जमीनीतील जवळपास ४० आर क्षेत्रामध्ये तक्रारदारांनी बटाटा बियाणाची लागवड करुन बटाटयाचे १०० पोत्यांचे उत्पादन घेतले होते. यातील काही बटाटयांचा पुन्हा बियाणे म्हणून वापर करुन जून २००९ मध्ये पिक घेण्याचे तक्रारदारांनी ठरविले. म्हणून त्यांनी याबाबत जाबदार क्र.१ ते ३ यांचेशी चर्चा करुन ६४ पोती बटाटा दि.२/२/२००९ रोजी जाबदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. याकरिता दरमहा प्रति किलो ३० पैसे प्रमाणे रु.३००/- टन भाडे असे ठरलेले होते. हा बटाटा जवळपास ७ महिने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणेचा होता व या ७ महिन्यांचे होणारे भाडे तक्रारदार जाबदारांना देणार होते. या ६४ पोत्यांतील प्रत्येक पोते हे ५० किलोचे होते. हा माल तक्रारदारांनी एम.एच.१० ए – ५३३० या ट्रकमधून जाबदारांच्या कोल्डस्टोरेजमध्ये नेला होता. तक्रारअर्जदार व जाबदार यांचेमध्ये याबाबतचा करारही झालेला होता. या कराराच्या वेळी साक्षीदारही उपस्थित होते. या करारानुसार जून-जुलै २००९ चे दरम्यान सदरचा माल जाबदारांनी तक्रारदारांचे ताब्यात देवून त्याचे होणारे भाडे तक्रारादारांकडून स्वीकारुन हा व्यवहार पूर्ण करायचा असे ठरले होते. सदरहू माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेनंतर तक्रारदार वारंवार या मालाच्या सुस्थितीबाबत व सुरक्षिततेबाबत जाबदारांशी फोनवरुन संपर्क साधून चौकशी करीत होते व त्यावर सदरहू माल व्यवस्थित असल्याचे जाबदारही प्रत्येकवेळी तक्रारदारांना सांगत होते असे तक्रारदारांनी कथन केले आहे. तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, ठरावात ठरल्याप्रमाणे व तक्रारदारांना बटाटा पिकाची पुन्हा लागवड करायची असल्याकारणाने दि.५/६/२००९ रोजी तक्रारदार जाबदारांकडे त्यांनी ठेवलेला माल परत घेण्यासाठी गेले असता सदरहू माल नासून गेला असल्याची माहिती जाबदारांनी तक्रारदारांना दिली व ठराविक मुदतीत झालेले नुकसान भरुन देण्याचे जाबदारांनी मान्य केले. परंतु त्यानंतरही तक्रारदारांकडून अनेकवेळा मुदतवाढ घेवून देखील जाबदारांनी तक्रारदारांना बटाटयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही अशी तक्रारदारांनी जाबदारांविरुध्द तक्रार केली आहे. जाबदारांनी दिलेल्या या दूषित सेवेमुळे तक्रारदारांचे अतिशय मोठया प्रमाणात नुकसान झाले तसेच त्यांना मानसिक धक्काही बसला आणि म्हणून या सर्व नुकसानीची व त्याअनुषंगे झालेल्या त्रासाची भरपाई मिळणेकरिता तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला.
तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये खालीलप्रमाणे नुकसान भरपाई जाबदारांकडून मिळावी अशी विनंती केली आहे.
प्रतिक्विंटल २१०० रु. दराने एकूण ३२ क्विंटलचे - रु.६७,२००/-
जुन २००९ ते फेब्रुवारी २०१० अखेर एकूण
९ महिन्यांचे १५ टक्के व्याज - रु. ७,५६०/-
मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास व
तक्रारअर्जाचा खर्च - रु. २५,०००/-
----------------------------------------------------------------------------------------------
एकूण रु. ९९,७६०/-
तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्वये एकूण १० कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार क्र.१ ते ३ यांचेवर झाल्यावर ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नि.१ वर नो से आदेश करणेत आले.
३. तक्रारदारांतर्फे प्रस्तुत प्रकरणी लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकून प्रकरण निकालासाठी नेमणेत आले.
४. तक्रारदारांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे साकल्याने अवलोकन करता प्रस्तुत प्रकरणी खालील मुद्दे (Points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मंचाचे मुद्दे व त्याची उत्तरे खालीलप्रमाणे –
मुद्दे उत्तरे
१. तक्रारदारांनी त्यांच्या वडिलार्जित मिळकतीमध्ये
बटाटयाचे पिक घेतले होते ही बाब शाबीत होते का ? होते.
२. वादातील प्रत्येकी ५० किलो प्रमाणे ६४ पोती बटाटा
तक्रारदारांनी जाबदार क्र.१ ते ३ यांचे कोल्ड
स्टोरेजमध्ये ठेवला होता ही बाब शाबीत होते का ? होते.
३. जाबदार क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारांना दूषित सेवा
दिली ही बाब शाबीत होते का ? होते
४. कोणता आदेश ? अंतिम आदेशानुसार.
विवेचन
मुद्दा क्र.१ व २
मुद्दा क्र.१ व २ हे एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे एकत्रित विवेचन खालीलप्रमाणे-
तक्रारदारांनी जाबदार क्र.१ ते ३ यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये बटाटयाची ६४ पोती ठेवली होती. ज्यावेळी तक्रारदारांना या बटाटयांची गरज भासली आणि म्हणून ते सदरहू बटाटे घेण्यासाठी जाबदारांकडे गेले तेव्हा त्यांना सदरहू बटाटे नासून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांचे अत्यंत नुकसान झाले. आणि ही नुकसान भरपाई जाबदारांनी तक्रारदारांना अद्यापही भरुन दिलेली नाही अशी तक्रारदारांची जाबदारांविरुध्द तक्रार आहे. या तक्रारीच्या अनुषंगे प्रथम तक्रारदार कथन करतात त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मिळकतीत बटाटयाची लागवड केली किंवा कसे हे पाहणे महत्वाचे आहे असे मंचास वाटते. त्या अनुषंगे मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे –
प्रस्तुत प्रकरणी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता मंचास असे दिसून येते की, तक्रारदारांनी नि. १५/१, १५/२ व १५/३ अन्वये दाखल सात-बाराचे उतारे दाखल केले आहेत. तक्रारदारांनी या मिळकतीत बटाटयाची लागवड केली होती हे नि.१५/२ व १५/३ अन्वये दाखल सात-बाराच्या उता-यावरुन दिसून येते. हे दोनही सात-बाराचे उतारे तक्रारदारांच्या वडिलांच्या नावचे आहेत. तक्रारअर्जात तक्रारदारांनी त्यांच्या स्वत:च्या व वडिलार्जित मिळकतीच्या शेतजमीनीत बटाटयाचे पिक घेतले होते असे शपथेवर नमूद केलेले आहे. तसेच ही बाब नि.५/१० अन्वये दाखल श्री जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रातही नमूद आहे. जाबदारांनी हजर होवून ही बाब नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदारांनी त्यांच्या वडिलार्जित मिळकतीत बटाटयाचे पिक घेतले होते हे तक्रारदारांचे कथन प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो तक्रारदारांनी जाबदारांच्या कोल्ड स्टोअरेज मध्ये वादातील बटाटा ठेवला होता किंवा कसे या बाबतचा. तक्रारदारांनी त्यांचा बटाटा हा प्रणव कोल्ड स्टोरेजमध्ये दि.२/२/२००९ रोजी ठेवला होता असे तक्रारअर्जामध्ये कथन केलेले आहे. नि. १५/४ अन्वये दाखल प्रणव कोल्ड स्टोरेज प्रा.लि., वासुंबे यांच्या आवक चलनाचे अवलोकन करता “आज रोजी आपणाकडून ट्रक नं.एमएच १० ए-५३३० मधून खालील तपशीलाप्रमाणे माल मिळाला” अशी नोंद आहे. तसेच त्यावर तक्रारदार नमूद करतात त्यादिवशी त्यांनी ६४ गोणी बटाटा त्यांचेकडे ठेवला होता असे नमूद केलेले आहे. या आवक चलनावरती मॅनेजर / मॅनेजिंग डायरेक्टर यांची सही असून या चलनाचा क्र.११२९४ असा आहे. याच चलनामध्ये “ एकूण वजन ” या मथळयाखाली ५० केजी असेही नमूद केल्याचे दिसून येते. या चलनामुळे तक्रारदारांचे, त्यांनी प्रणव कोल्ड स्टोरेजमध्ये प्रत्येकी ५० किलो प्रमाणे एकूण ६४ पोती बटाटा दि.२/२/२००९ रोजी ठेवला हे प्रस्तुत प्रकरणी सिध्द होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.३
तक्रारदारांनी विश्वासाने त्यांचा बटाटा जाबदारांचे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले. परंतु त्याची काळजी न घेतल्याने तो सर्व नासून गेला व त्याची नुकसान भरपाई अद्यापी जाबदारांनी दिलेली नाही. अशा रितीने जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली अशी तक्रारदारांनी जाबदारांविरुध्द शपथेवर तक्रार केली आहे. तक्रारदारांनी त्यांच्या या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.५/१० अन्वये श्री माणिकराव मारुती जाधव या नगरसेवकाचे प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये तक्रारदारांनी ठेवलेला माल खराब होवून गेला त्यामुळे त्यांच्या बटाटा मालाचे नुकसान झाले असे नमूद केलेले आहे. सदरहू श्री जाधव हे तक्रारदार व जाबदार यांचेत करार होतेवेळीही उपस्थित होते असे तक्रारअर्जात नमूद आहे व त्यांचे प्रतिज्ञापत्रातही नमूद आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या या तक्रारीबाबत शंका घेण्यास कोणतेही कारण मंचास दिसून येत नाही. जाबदारांनी हजर होवून तक्रारदारांच्या या तक्रारीबाबत आक्षेपही घेतला नाही अथवा त्यांच्या तक्रारीचे खंडन केले नाही. या वस्तुस्थितीवरुन तक्रारदारांनी जाबदार कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांचा जो माल ठेवला होता, योग्य त्या काळजीअभावी तो नासून गेला हे प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते असा मंचाचा प्रतिकूल निष्कर्ष (Adverse inference) निघतो.
यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तक्रारदारांच्या नुकसान झालेल्या मालाची नुकसान भरपाई जाबदारांनी तक्रारदारांना अदा केली किंवा कसे याबाबतचा. या अनुषंगे तक्रारअर्जाचे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता असे दिसून येते की, तक्रारदारांची मूळ तक्रार ही नुकसान भरपाईसाठीचीच आहे. याबाबत तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये त्यांनी जाबदारांशी वेळोवेळी संपर्क साधून तसेच नुकसान भरपाईकरिता त्यांना अनेक मुदती देवून देखील जाबदारांनी त्यांना खराब झालेल्या मालाची नुकसानभरपाई दिली नाही असे कथन केले आहे. या कथनास देखील नि.५/१० अन्वये दाखल नगरसेवक श्री जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राने पुष्टी मिळते. मंचास इथे पुन: नमूद करावेसे वाटते की, जाबदारांना संधी असून देखील त्यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारलेली नाही व तिचे खंडनही केलेले नाही. यावरुन जाबदारांनी तक्रारदारांना त्यांनी ठेवलेला माल सुरक्षित आहे व्यवस्थित आहे असे खोटे सांगून, तो माल परत घेणेसाठी गेले असता, नासल्याचे सांगितले व त्याची नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली ही तक्रारदारांची तक्रार स्पष्टपणे शाबीत होते. व पर्यायाने जाबदारांनी तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याचे सिध्द होते असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष निघतो व त्यास अनुसरुन मुद्दा क्र.३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.४
तक्रारदारांनी नुकसान भरपाईची मागणी करताना प्रत्येक बटाटयाचे पोते हे ५० किलोचे असून अशी एकूण ६४ पोती त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली होती असे कथन केले आहे व ते शाबीतही झाले आहे. तक्रारदारांनी सन २००९ मध्ये त्यांनी प्रतिक्विंटल २१०० रुपये दराने ६४ पोती खरेदी केल्याचे नमूद केले आहे व त्याचा एकूण दर रु.६७,२००/- इतका होता असेही नमूद केले आहे. व त्या पुष्ठयर्थ नि. १५/१२ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज ता. खटाव जि. सातारा येथील मे.सावंत ट्रेडर्स यांचे तक्रारदारांचे नावचे बटाटा खरेदीचे बिल प्रस्तुत प्रकरणी दाखल केले आहे. याचा विचार करता तक्रारदारांनी कोल्ड स्टोरेजमध्ये जी ६४ पोती ठेवली होती ती नासून गेल्यामुळे त्यांचे रक्कम रु.६७,२००/- चे नुकसान झाले हे प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते. त्यामुळे तक्रारदारांची बटाटयांच्या किंमतीची रक्कम रु.६७,२००/- ची मागणी मान्य करणे अत्यंत योग्य व न्याय्य होईल असे मंचास वाटते. वास्तविक जेव्हा माल नासून गेला हे तक्रारदारांना जाबदारांनी सांगितले तेव्हाच त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. तथापि तसे झाले नाही. या बाबीची दखल घेवून या मंजूर रकमेवर दि.५/६/२००९ रोजीपासून म्हणजेच ज्या दिवशी तक्रारदारांना त्यांचा माल नासून गेला आहे हे समजले तेव्हापासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत ९ टक्के व्याज मंजूर करणेत येत आहे.
जाबदारांनी तक्रारदारांना त्यांचा माल व्यवस्थित आहे असे खोटे सांगून जी गंभीर स्वरुपाची दूषित सेवा दिली तसेच त्यांच्या मालाची व्यवस्थित काळजी न घेवून बटाटयाच्या नुकसानीस कारणीभूत ठरले व त्यामुळे तक्रारदारांचे जे अपरिमित नुकसान झाले याची दखल घेवून तक्रारदारांना झालेल्या शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी म्हणून रक्कम रु.१०,०००/- मंजूर करणेत येत आहेत. तर तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.३,०००/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहेत.
तक्रारदारांनी ट्रकच्या भाडयाची देखील मागणी प्रस्तुत प्रकरणी केलेली आहे. परंतु स्वतंत्रपणे ती मंजूर न करता शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी म्हणून जी रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्यातच तिचाही समावेश करणेत आलेला आहे.
जाबदार क्र.१ हे प्रणव कोल्ड स्टोरेजचे चेअरमन असून जाबदार क्र.२ व ३ हे संचालक आहेत. सबब जाबदार क्र.१ ते ३ यांना प्रस्तुत प्रकरणी सदोष सेवेसाठी जबाबदार धरण्यात येत आहे.
वर नमूद विवेचन व निष्कर्षावरुन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतात.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. यातील जाबदार क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारांना रक्कम रु.६७,२००/- (अक्षरी रुपये सदुसष्ट हजार दोनशे फक्त) दि.५/६/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याजदराने अदा करावी.
२. यातील जाबदार क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी म्हणून रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून रक्कम रु.३,०००/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र.१ ते ३ यांनी दि.५/१२/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींअंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दि.२०/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११