(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 20/12/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.10.02.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत
तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत तक्रारीनुसार तक्रारकर्ता हा मार्च-2008 पासुन गैरअर्जदार क्र.1 यांचा क्रेडीट कार्डधारक असला तरी तक्रारकर्त्याने त्याचा उपयोग कधीही केला नाही. गैरअर्जदार क्र.2 ही गैरअर्जदार क्र.1 ची उपशाखा (सिस्टर कन्सर्न) आहे.
3. गैरअर्जदार क्र.2 बँकेने टेलिफोनच्या माध्यमातुन आरोग्य विमा पॉलिसी घेण्याबाबत तक्रारकर्त्याला गळ घातली, परंतु तक्रारकर्ता पुर्वीपासुनच पॉलिसीधारक असल्यामुळे तक्रारकर्त्याने वरील पॉलिसी संदर्भात गैरअर्जदारांशी संपर्क साधला नाही. परंतु संबंधीत कंपनीने संबंधीत पॉलिसी संदर्भात माहिती देण्यासाठी गळ घातली व त्यासंदर्भात कुठलेही चार्जेस लागणार नाही, असे सांगितल्यावर तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी पाठवण्याबाबत संमती दिली.सदर दस्तावेज प्राप्त झाल्यावर त्याची पाहणी केल्यावर तक्रारकर्ता सदर पॉलिसी घेण्यास उत्सुक नसल्यामुळे तक्रारकर्त्याने ‘पॉलिसीची गरज नाही’ असा शेरा मारुन दि.24.07.2008 रोजी अक्षयगंगा कुरियर व्दारे गैरअर्जदार क्र.2 ला आंतरक्रिया नं. (आय.डी.) 2818059142810601 ला पाठविली. त्यानंतर जुलै-2008 मध्ये पत्राव्दारे कळविले. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांच्या कॉल सेंटर नंबर 9890478000 ला कळवुनही गैरअर्जदारांनी सदरची पॉलिसी रद्द केली नाही, उलट क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये पॉलिसी झाल्याचे दर्शविले आहे. वास्तविक सदर पॉलिसी तक्रारकर्त्याने घेतली नव्हती व क्रेडीट कार्डचा तक्रारकर्त्याने कधीही उपयोग केलेला नव्हता.
4. गैरअर्जदार क्र.1 ने दि.17.09.2010 रोजी दिलेल्या कायदेशिर नोटीसमध्ये दर्शविलेली रक्कम रु.29,774.73/- देण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची नाही, कारण गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना तक्रारकर्त्याने सदर पॉलिसीची आवश्यकता नाही, असे कळविल्यावरही त्यांनी सदरची पॉलिसीची रक्कम तक्रारकर्त्याचे क्रेडिट कार्डवर दाखविलीय ही गैरअर्जदार क्र.1 व 2 ची कृति सेवेतील कमतरता आहे.
5. मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता तो मिळाल्याची पोच प्रकरणात दाखल आहे, गैरअर्जदार क्र.2 यांनी संधी देऊनही लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यांचा पुकारा केला असता ते गैरहजर असल्यामुळे मंचाने दि.26.09.2011 रोजी त्यांचे विरुध्द प्रकरण ‘विना लेखी जबाब’, चालविण्याचा आदेश पारित केला.
6. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे म्हणने नाकारले आहे. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता हा गैरअर्जदार बँकेचा गुन्हेगार असुन बॅंकेचे पैसे न भरता उलट बँकेवर दावा केला आहे. तक्रारकर्त्याने सदरची खोटी तक्रार दाखल केली असुन ती खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
7. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.12.12.2011 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द ‘विना लेखी जबाब’, आदेश पारित. तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
9. सदर प्रकरणातील दोन्ही पक्षांचे म्हणणे, दाखल दस्तावेज पाहता या मंचाच्या विचारार्थ खालिल मुद्दे होते...
गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास आरोग्य विमा पॉलिसी त्याची संमती न घेता देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला का ?
तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथन तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे, दोन्ही पक्षात झालेला पत्रव्यवहार बघता या मंचाच्या असे निदर्शनांस येते की, गैरअर्जदारांनी टेलिफोनव्दारे तक्रारकर्त्यास सदर पॉलिसी घेण्याबाबत विचारणा केली होती. तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरुन असे दिसते की, गैरअर्जदारांच्या विनंतीवरुन तक्रारकर्त्याने संबंधीत पॉलिसीचे दस्तावेज बघीतले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.24.07.2008 रोजी अक्षयगंगा कुरियरव्दारे गैरअर्जदार क्र.2 यांना सदर पॉलिसीची आवश्यकता नाही असे प्रथमतः कळविले होते व त्यानंतरही वारंवार कळविल्याचे तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन दिसुन येते. या तक्रारकर्त्याच्या म्हणण्याविरोधी गैरअर्जदारांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही. उलट गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तावेज क्र.13 वरील पुरसीसवरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी क्रेडिट कार्डवर दाखविलेले (रु.29,774/-) पूर्ण dues weave off करुन zeroes केल्याचे दिसुन येते. म्हणजेच तक्रारकर्त्याने संमती न देता गैरअर्जदारांनी सदरची पॉलिसी तक्रारकर्त्याचे नावे निर्गमीत केली व त्या संदर्भातील रक्कम तक्रारकर्त्याचे क्रेडिट कार्डवर credit केलेली होती.
10. तक्रारकर्त्याच्या शपथपत्रावरुन व दाखल दस्तावेजांवरुन सदर पॉलिसी संदर्भातील तक्रार तक्रारकर्त्याने दि.24.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे प्रथमतः केल्याचे दिसुन येते. दस्तावेजे क्र.13 वरील पुरसिसवरुन दि.24.07.2008 रोजी गैरअर्जदारांनी क्रेडिट कार्डवर दाखविलेले dues weave off केल्याचे दिसुन येते. तक्रारकर्त्याचे संमतीशिवाय त्याचे नावे पॉलिसी निर्गमीत करणे ही गैरअर्जदारांची कृति निश्चितच अनुचित व्यापारी पध्दत आहे. तसेच गैरअर्जदारांच्या सदरच्या कृतिमुळे निश्चितच तक्रारकर्त्यास मानसिक त्रास झालेला आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे नुकसान जरी झाले असले तरी तक्रारकर्त्यांचे हक्काला बाधा न येऊन त्यांचे संरक्षण होणे महत्वाचे आहे.
वरील सर्व वस्तुस्थिती पाहता हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास वैयक्तिक वा संयुक्तिकपणे नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
3. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची साक्षांकीत प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.