--- आदेश ---
(पारित दि. 02-02-2007 )
द्वारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार श्री. रंजीत साधुजी रामटेके यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. गैरअर्जदार क्रं. 2 हे टीव्ही, फ्रिज , वॉशिंग मशीन इ. इलेक्ट्रॉनिक /इलेक्ट्रीक वस्तुंचे निर्माता असून गैरअर्जदार क्रं. 1 हे त्यांचे अधिकृत विक्रेता आहेत.
2. अर्जदार यांनी दि. 13.11.03 रोजी 21 इंची रंगीत दुरदर्शन संच मॉडेल नं. 5438 व्हीडीओकॉन वाझुंबा हा गैरअर्जदार क्रं.1 यांच्या शोरुम मधून रु.12,990/- या किंमतीत विकत घेतला. दुरदर्शन संच खरेदी करते वेळी त्याचा हमी कालावधी हा पाच वर्षाचा आहे असे गैरअर्जदार क्रं.1 यांनी अर्जदार यांना सांगितले.
3. सदर दूरदर्शन संच हा जाने.2006 या कालावधीपर्यंत चांगल्या स्थितीत होता.मात्र जाने.2006 मध्ये दूरदर्शन संचात दोष निर्माण झाला व त्यामधील चित्रेही स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे अर्जदार यांनी दि. 25.01.06 व 08.08.06 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली. नंतरही अनेकदा तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा दूरदर्शन संचातील बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले नाही.
4. अर्जदार व त्यांच्या परिवारातील सदस्यांना दुरदर्शन संच बंद असल्यामुळे मनस्ताप झाला. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे त्यासाठी रु. 5,000/- अशी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
5. अर्जदार यांनी मागणी केली आहे की, त्यांना गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचेकडून रु.5000/- नुकसान भरपाई मिळावी, अर्जदार यांना त्याच मॉडेलचा दुसरा दुरदर्शन संच बदलून देण्यात यावा व ग्राहक तक्रारीचा खर्च हा गैरअर्जदार यांचेवर लादण्यात यावा.
6. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना विद्यमान न्यायमंचाचा नोटीस मिळूनही ते विद्यमान न्यायमंचापुढे हजर झाले नाही किंवा त्यांनी ग्राहक तक्रारीचे उत्तरही दिले नाही. त्यामुळे त्यांचे विरोधात दि. 23.01.07 रोजी प्रकरण एकतर्फी चालवण्याचा आदेश पारित करण्यात आला.
7. गैरअर्जदार क्रं. 1 यांच्या प्रकाश ट्रेडर्स सर्विस सेंटरच्या कंप्लेंट रेकॉर्डच्या प्रती रेकॉर्डवर आहेत. त्यावरुन असे निदर्शनास येते की, दि. 25.01.06 व दि. 08.08.06 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दुरदर्शन संच बरोबर दिसत नसल्याची व व्हीडीओ सॉकेट बरोबर नसल्याची तक्रार केली होती..
8. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदार यांना दिलेल्या डिलीव्हरी चालानची प्रत रेकॉर्डवर आहे. त्यावरुन असे दिसून येते की, दुरदर्शन संच याची किंमत रु.12,990/- अशी असून अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि. 13.11.03 रोजी रु.4,500/- तर दि. 16.11.03 रोजी रु.1000/- हे दिलेले आहेत. अर्जदार यांच्यावर रु.7,490/- हे बाकी असल्याचे निदर्शनास येते.
9. अर्जदार यांनी संपूर्ण किंमत अदा करुन दूरदर्शन संच गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडून घेतल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे दुरदर्शन संच यात बिघाड निर्माण झाला असला तरी अर्जदार यांची दूरदर्शन संच बदलून द्यावा ही मागणी मान्य करता येत नाही.
10. अर्जदार यांनी वारंटी कार्डची प्रत रेकॉर्डवर दाखल केलेली आहे. त्यावरुन हमी कालावधी हा 3 वर्षाचा आहे असे दिसून येते व अर्जदार यांच्या दूरदर्शन संचामध्ये तीन वर्षाच्या आत बिघाड निर्माण झाला याबद्दल वाद नाही.
अशा स्थितीत सदर आदेशपारितकरण्यातयेतआहे.
आदेश
1 गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदार यांचा दुरदर्शन संच एका महिन्याचे आत दुरुस्त करुन द्यावा.
2 गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आदेशाचे पालन आदेशाचे तारखेपासून एका महिन्याचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार क्रं. 1 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.
3 खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.