नि का ल प त्र -
( दि.13-07-2018)
द्वारा : मा. श्री. शशांक श. क्षीरसागर, सदस्य.
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास सामनेवाला यांनी बांधकामासंदर्भात दिलेल्या सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी याबाबत दाखल केलेली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे-
तक्रारदार यांना गाव मौजे चिंचवली, ता. खेड, जि. रत्नागिरी या ग्रामपंचायत हद्दीत घर बांधणेचे होते. सामनेवाला हे बांधकाम व्यावसायिक (कॉन्ट्रक्टर) आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.14-05-2015 रोजी लेखी करार करणेत आला. त्यावेळी साक्षीदार म्हणून गणपत बाबाराम ढेबे, बाबाराम धाकु ढेबे व मोरे हे हजर होते. सदर करारानुसार सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकरिता 27 बाय 36 लांबी रुंदीचे घराचे संपूर्ण काम 6 महिन्यात पुर्ण करुन देणेचे ठरले असून सदर व्यवहार रक्कम रु. 10,00,000/- ठरलेली असून सदर व्यवहारापोटी रक्कम रु. 2,05,000/- तक्रारदाराने सामनेवालेस चेकने पोच केलेले आहेत. सदर काम जसेजसे होईल तसेतसे उर्वरीत रक्कम देण्याचे तक्रारदार व सामनेवाला यांच्यात ठरले होते.
3) सदर कराराप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे घराचे बांधकामास सहा महिन्यात सुरुवातही केलेली नाही. तक्रारदाराने बांधकामाबाबत विचारणा केली असता सामनेवालेनी स्विकारलेली रक्कम परत तक्रारदारास देण्याचे आश्वासन दिले. सामनेवालाने तक्रारदारास परत रक्कमेचे चेकही दिले होते. परंतु ते चेक वटलेले नाहीत. सदरहु रक्कम देणेस सामनेवालानी टाळाटाळ केली आहे.
4) सबब, तक्रारदार यांनी अॅड. मंदार मारुती बंडबे, खेड यांचेमार्फत सामनेवालेस दि. 25-11-2016 रोजी मागणी नोटीस पाठवली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतरही वा अदयाप सामनेवालाने आगाऊ बांधकामापोटी स्विकारलेली रक्कम रु. 2,05,000/- परत केलेली नाही म्हणून तक्रारदार यांनी सामनेवालाविरुध्द सदर आगाऊ दिलेली रक्कमेच्या वसुलीकरिता प्रस्तुतची तक्रार रक्कम रु. 2,05,000/- द. सा. द. शे.16 % व्याजाने तसेच नुकसानीबद्दल मानसिक, शारिरीक त्रासापोटी, रु.1,00,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावेत म्हणून दाखल केलेली आहे.
5) सामनेवाला यांना रजि. पोस्टाने मंचामार्फत नोटीस पाठविली. सामनेवाला यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिलेने सामनेवाला विरुध्द दि. 10-04-2017 रोजी 'एकतर्फा' आदेश पारीत करणेत आला.
6) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत नि. 5 वर सामनेवाला यांना वकिलामार्फत दि. 25-11-2016 रोजी पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती, सामनेवाला यांना नोटीस मिळाल्याची पोहच पावती, तक्रारदार व सामनेवाला यांच्यात घर बांधकामाचे दि.14-05-2015 रोजीचे करारपत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.11 वर तक्रारदाराचे पुराव्याचे० प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. नि.12 वर तक्रारदाराचा पुरावा संपल्याची पुरसीस दाखल दाखल केला आहे. तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकला. नि.14 वर तक्रारदाराने मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत त्याचे अवलोकन या मंचाने केले आहे.
7) तक्रारीचा आशय, पुरावा यांचे अवलोकन करता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय? | होय |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
3. | आदेश काय ? | अंतिम आदेशप्रमाणे. |
- का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1 -
8) तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेबरोबर घर बांधकामाबाबत दि.14-05-2015 रोजी करारपत्र केले. सदरचा व्यवहार रक्कम रु. 10,00,000/- एवढया रक्कमेस ठरला असून व्यवहारापोटी आगाऊ रक्कम रु. 2,05,000/- चेकने तक्रारदाराने सामनेवालास पोच केलेली आहेत. सबब, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण झालेले आहे हे सिध्द होते. यासाठी तक्रारदाराने मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे -
(1) 1994 SCC (I) 243 Lucknow Development Authority Vs. M.K. Gupta,
Decided on 5-11-1993
(2) Bunga Daniet Babu Vs. M/s. Shri Rasudeva Constructions And Ors
Decided on 22-07-2016
या न्यायनिवाडयांचा आधार घेतात. सदर न्यायनिवाडयामध्ये बांधकामाबाबत केलेला करार हा सेवा या व्याख्येत असे नमूद आहे. सबब, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 -
तक्रारदाराच्या म्हणणेनुसार सामनेवाला यांनी घर बांधणेचे काम कराराप्रमाणे सुरु केलेले नाही. नि. 5/4 वर दाखल केलेले करारपत्राचे अवलोकन करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना गाव मौजे चिंचवली, ता. खेड, जि. रत्नागिरी या ग्रामपंचायत हद्दीत 27 बाय 36 लांबी रुंदीचे घर संपुर्ण बांधकाम 6 महिन्यात पूर्ण करुन देणेचे ठरले असून व्यवहार रक्कम रु. 10,00,000/- ठरला असून व्यवहारापोटी रक्कम रु. 2,05,000/- चेकने सामनेवालास पोच केलेले आहत. सदर बांधकाम जसेजसे होईल तसेतसे उर्वरीत रक्कम देण्याचे उभयतामध्ये ठरले आहे. कराराप्रमाणे सामनेवाला यांनी 6 महिन्यात घराचे बांधकाम तक्रारदारास करु देणे बंधनकारक होते पण सामनेवाला यांनी अदयापर्यंत बांधकाम सुरु केलेले नाही. नि. 5/1 वर तक्रारदार तर्फे वकिलांची पाठविलेली कायदेशीर नोटीस मिळूनदेखील त्यांनी त्यास उत्तर दिलेले नाही अगर बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही तसेच मंचामार्फत पाठविलेली नोटीस स्विकारुनदेखील या मंचात हजर राहून तक्रारदाराचे कथन खोडून काढलेले नाही याचाच अर्थ असा होतो की, तक्रारदाराचे बांधकाम सामनेवाला यांनी रक्कम स्विकारुन देखील पूर्ण केलेले नाही. सामनेवाला यांना संधी असूनसुध्दा त्यांनी त्याचा लाभ घेऊन आपली बाजू मांडलेली नाही त्यामुळे तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल करुन त्यांची बाजू कायदयाने शाबीत केली आहे व त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 -
वर नमुद मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनानुसार सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द झाल्याने तक्रारदारांनी घरबांधकामासाठी सामनेवाला यांना दिलेली आगाऊ रक्कम रु. 2,05,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख पाच हजार फक्त) व त्यावर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी व सदोष सेवेबाबत रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा लाख फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.
- आ दे श -
1) तक्रारदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे घर बांधकामापोटी स्विकारलेली रक्कम रु. 2,05,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख पाच हजार फक्त) व त्यावर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द. सा. द. शे. 9 % व्याजासह अदा करावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी व सदोष सेवेबाबत नुकसान भरपाई रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-(रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावी.
4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी 45 दिवसांत करावी तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागु शकेल.
5) या निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य देण्यात
/पाठविण्यात याव्यात.