निकाल (घोषित दि. 27.10.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदाराने सदोष बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार प्रगत शेतकरी केंद्र यांचेकडून दिनांक 22.04.2010 रोजी रुपये 1,850/- किंमतीचे पपई बियाणे खरेदी केले होते. सदर बियाण्यापासून रोपे तयार करण्यासाठी त्याने दिनांक 26.04.2010 रोजी पिशव्यांमधे माती भरुन प्रत्येक पिशवीमधे एक बी टोकण पध्द्तीने लावले. परंतू वेळोवेळी पाणी देऊनही बियाणे उगवले नाही. म्हणून त्याने गैरअर्जदारास बियाणे उगवत नसल्याबाबत माहिती दिली. त्यावर गैरअर्जदाराने बियाणे कंपनीचे माणसे येऊन बियाणाची पाहणी करतील असे सांगितले. परंतू अनेक दिवस वाट पाहूनही बियाणे कंपनीचे कोणीही प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी आले नाही. गैरअर्जदाराने पपईचे बोगस बियाणे दिले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई व बियाणाचा खर्च रुपये 1,850/- देण्यात यावा. गैरअर्जदार प्रगत शेतकरी केंद्राने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यांच्याकडून खरेदी केलेले पपईचे बियाणे दिनांक 26.04.2010 रोजी पिशव्यांमधे लावल्याबाबत कोणताही पुरावा नाही. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले बियाणे चांगल्या दर्जाचे असून तक्रारदाराने बियाणे उत्पादक कंपनीला या तक्रारीमधे समाविष्ट केलेले नाही. तक्रारदाराने दाखल केलेला पंचनामा दिनांक 30.06.2010 रोजीचा असून सदर पंचनामा नियमानुसार केलेला नसून तो खोटा आहे. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार योग्य नसून फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदाराने विक्री केलेले बियाणे सदोष असल्याचे तक्रारदार सिध्द् करु शकतो काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड. पी.के.देशमुख आणि गैरअर्जदाराच्या वतीने अड.एस.एम.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले पपईचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् करण्यासाठी नि. 4/4 वर पंचनामा सादर केलेले आहे. सदर पंचनामा पंचायत समितीच्या कृषी अधिका-याने केलेला असून पंचनाम्यामधे कृषी अधिका-याने कोठेही पपईचे बियाणे सदोष असल्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच सदर पंचनामा जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने केलेला नाही. त्यामुळे या पंचनाम्यावरुन गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले पपईचे बियाणे सदोष असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी केलेल्या पंचनाम्यामधे केवळ पपईच्या बियाणाची उगवण झाली किंवा नाही या अनुषंगानेच चर्चा करण्यात आलेली आहे. परंतू बियाण्यातील दोषाबाबत काहीही मत किंवा निष्कर्ष नोंदविण्यात आलेला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले पपईचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् करण्यास तक्रारदार असमर्थ ठरलेला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
सौ. ज्योती ह. पत्की डी.एस.देशमुख सदस्या अध्यक्ष
| | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |