निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 07/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 19/11/2013
कालावधी 06 महिने. 12 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
विष्णु पिता जैवंतराव टेकाळे. अर्जदार
वय वर्षे. धंदा.शेती. अॅड.ज्ञानेश्वर घुले पाटील.
रा. आळंद ता.जि. परभणी.
विरुध्द
प्रगत कृषी विकास केंद्र. गैरअर्जदार.
नवा मोंढा,कोतवाली पोलिस स्टेशन समोर, अॅड.व्ही.पी.चोखट.
परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे आळंद ता.जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यास स्वतःची 1 हे 60 आर जमीन आहे ज्याचा गट क्रमांक 109 आहे.अर्जदाराचे म्हणणे आहे की, दिनाकं 12/01/2013 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडून शेतात टरबुज व खरबुज लागवण करावयाची असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरुन खरबुजाचे बियाणे विकत घेतले. सदरचे खरबुजाचे बियाणे खरबुज केसर 7 नग एकुण 2450/- रु.अर्जदाराने गैरअर्जदारास देवुन विकत घेतले.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, सदरचे खरबुजाचे बियाणे खरेदी केल्यानंतर जमिनीची योग्य ती मशागत करुन ठिबक सिंचनव्दारे पाणी देवुन खरबुजाची लागवड केली, त्यानंतर अर्जदारास असे आढळून आले की, सेमीनीस कंपनीच्या हायब्रीड स्वीट मिलॉंन कंपनीचे केसर खरबुजाच्या वेलास आलेली फळे ही वेलासच फुटतात, चिरतात, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारास जावुन तक्रार केली व माझे झोलेले 1 एकराचे नुकसान भरपाई द्या. अशी दिनांक 20/03/2012 रोजी विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने तक्रार ऐकुन घेतली नाही, त्यानंतर अर्जदाराने झालेल्या फसवणुकी बाबत जिल्हा कृषी अधीकारी परभणी व तालुका कृषी अधिकारी यांना व तहसिल कार्यालयास लेखी तक्रार दिली. सदरची तक्रार जिल्हा अधिकारी परभणी यास देखील लेखी तक्रार दिली, परंतु गैरअर्जदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्या संगनमताने खोटा पंचनामा केला,
गैरअर्जदाराने झालेली नुकसान भरपाई देण्यास स्पष्टपणे नकार दिला, त्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारास असा आदेश करावा की, त्याने अर्जदारास झालेल्या टरबुज केसरच्या नुकसानी बद्दल 3,00,000/- रु. देण्यात यावे व तसेच खर्चापोटी 1,00,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. व गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी 20,000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 6 वर 23 कागदपत्रे दाखल केली आहे. ज्यामध्ये सेमीनीस कंपनीचे खरबुज बियाचे 6 रिकामे पॉकेट, प्रगत कृषी केंद्र याची 12/01/2013 ची पावती, आदर्श फार्म याची 23/02/2013 ची पावती, आदर्श फार्म याची 23/02/2013 ची पावती प्रगत कृषी केंद्र याची दिनांक 14/02/2013 ची पावती प्रगत केंद्राची 04/02/2013 ची पावती, प्रगत कृषी केंद्र यांची दिनांक 30/01/2013 ची पावती, नृसिंह डिजीटल यांची दिनांक 14/03/2013 ची पावती, प्रगत कृषी केंद्र याची दिनांक 19/02/2013 ची पावती, आदर्श फार्म यांची 04/03/2013 ची पावती, प्रगत कृषी यांची 16/03/2013 ची पावती व शेतीचे फोटो दाखल केले आहे व तसेच 7/12 उतारा, अर्जदारानी पोलिस स्टेशन, तहसलिदार, कृषी अधिकारी यास केलेल्या अर्जाची प्रती दाखल केले आहेत.
लेखी जबाब सादर करणेसाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदाराने दिनांक 12/01/2013 रोजी टरबुज व खरबुजाचे बियाणे खरेदी केले होते हे मान्य केले आहे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरचे बियाणे कोणत्या तारखेस लागवड केली व कोणते खत वापरले या बाबत अर्जदाराने कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही, तसेच अर्जदाराने सेमीनीस कंपनीला पार्टी केले नाही, म्हणून तक्रार खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदार हा फक्त विक्रेता आहे. अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी परभणी यांना तक्रार अर्ज केल्यानंतर दिनांक 05/04/2013 रोजी संबंधीत अधिका-याने पाहाणी करुन पंचनामा केला व अभिप्राय दिला की, खरबुजाची लागवड व सिंचन व्यवस्थापन योग्यरित्या झाल्याचे दिसून आले नाही, सदर पिकास नागआळी कीडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे गैरअर्जदार जबाबदार नाहीत व अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि. 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व नि.क्रमांक 14 वर दोन कागदपत्रांच्या यादीसह दोन कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये तालुका कृषी अधिकारी परभणी यांचे सेमीनीस कंपनीस लिहीलेले पत्र व पहाणी पंचनामाची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेमीनीस कंपनीचे केसर खरबुजाचे
सदोष बियाणे असलेले 7 पॉकीटचे विक्री करुन नुकसान केले
हे सिध्द होते काय व सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 12/01/2013 रोजी सेमिनीस कंपनीचे खरबुजाचे सेमिनीस हायब्रीड स्विट मिलन केअर टी एम हे 7 पॉकीटे प्रत्येकी 350/- रु. प्रमाणे एकूण 2450/- रु. चे खरेदी केले होते की बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे व नि.क्रमांक 6/7 वर दाखल केलेल्या पावती वरुन दिसून येते. सदरचे बियाणे खरेदी केल्यानंतर खरबुज हे चिरत आहेत व फुटतात या बद्दल अर्जदाराने पोलीस स्टेशन दैठणा येथे तक्रार दिली होती हे नि. क्रमांक 6/28 वर दाखल केलेल्या तक्रार अर्जावरुन दिसून येते. तसेच अर्जदाराने सदरची तक्रार कृषी अधिकारी परभणी यांना केली होती हे नि.क्रमांक 6/29 वर दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन दिसून येते नंतर तालुका कृषी अधिकारी परभणी यांनी अर्जदाराच्या शेतात जावुन पहाणी पंचनामा केला ही बाब नि.क्रमांक 14 वर दाखल केलेल्या पहाणी पंचनाम्या वरुन दिसून येते व त्यात तालुका कृषी
अधिका-यानी अभिप्राय दिला की, करपा रोग आढळून आला व सिंचन पध्दत योग्य नाही व फक्त 10 टक्के पेक्षा जास्त तडकण्याचे प्रमाण नाही, असा अभिप्राय दिला हे देखील नि.क्रमांक 14 वरील कागदपत्रा वरुन दिसून येते. अर्जदाराने सदरचे बियाणे खराब होते, म्हणून नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदारा विरुध्द कायदेशिर दाद मागीतल्या नंतर बियाणे सदोष आहे हे सिध्द करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारावरच येते आणि बियाणांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतील निष्कर्शा खेरीज तो सदोष अथवा निकृष्ट होते हे कायदेशिररित्या ग्राहय धरता येत नाही. तोच एकमेव सबळ पुरावा ठरतो.या संदर्भात
1) Reported Case (अ) 2007 (2) CPJ पान 148 ( राष्ट्रीय आयोग )
(ब) 2008 CPR पान नं. 193 ( राष्ट्रीय आयोग)
When these was no laboratory testing report then complainant was liable to be dismissed.
2) रिपोर्टेड केस 2003 (3) CPJ पान नं. 628 या प्रकरणात देखील महाराष्ट्र राज्य आयोगाने वरील प्रमाणेच मत व्यक्त केले आहे.
3) रिपोर्टेड केस 2009 (1) CPR पान 182 ( राष्ट्रीय आयोग)
Question of quality of seeds is to be determined procedure contemplated u/s 13 (1) (&) of C.P. Act and not in the basis of assumption or presumption सदरची निकालपत्रे या प्रस्तुत केसला तंतोतंत लागु पडतात.
अर्जदाराने मंचासमोर निकृष्ट बियानामुळे त्याचे नुकसान झाले बाबत कोणताही ठोस पुरावा आणला नाही, त्यामुळे अर्जदार कोणतेही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही. अर्जदार हा आपली तक्रार सिध्द करणेस पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.