1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे आहे.. 2. तक्रारकर्त्याने दिनांक 25/09/2017 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे ऑर्डर देऊन सोफा सेट व टी टेबल विकत घेतला. तेव्हा वि.प.ने सदर सोफा सेट व टी टेबल हे दिनांक 10/10/2017 ला देण्याचे वचन दिले. तक्रारकर्त्याने दिनांक 25/9/2017 व दिनांक 5/10/2017 रोजी अनुक्रमे रू.10,000/- व रू.10,000/- असे एकूण रू.20,000/- सदर सोफा सेट व टी टेबल ची अॅडव्हान्स रक्कम म्हणून वि.प.ला दिली. 3. तक्रारकर्त्याच्या पुतण्याचे दिनांक 13/10/2017 रोजी लग्न असल्याने त्यांना दिनांक 10/10/2017 पर्यंत सोफा हवा होता. परंतु वि.प.नी दिनांक 10/10/2017 पुर्वी तक्रारकर्त्याला सोफा सेट व टी टेबल ची डिलीव्हरी दिली नाही. तक्रारकर्त्याने वि.प.ला दोनवेळा लेखी पत्र पाठवून सदर सोफासेटची मागणी केली परंतु वि.प.नी प्रतीसाद दिला नाही. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या पुतण्याच्या लग्नापूर्वी दिनांक 10/10/2017 पर्यंत सोफासेट न दिल्याने तक्रारकर्त्यास त्याचा वापर करता आला नाही तसेच तक्रारकर्त्यास ख्रिसमस आणी नवीन वर्षाच्या कार्यक्रमाकरीतासुध्दा सदर सोफा सेट व टी टेबल न मिळाल्याने वापरता आला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची समाजात मानहानी झाली तसेच तक्रारकर्त्याचे पुतण्याच्या लग्नाकरीता रू.10,000/- ख्रिसमस व नवीन वर्षाच्या समारंभाचे वेळी व इतर खर्च अनुक्रमे रू.15,000/-,रू.10,000/- व रु.10,000/- चे नुकसान झाले. वि.प.नी अॅडव्हान्समध्ये सोफा सेट व टी टेबलची रक्कम घेवूनही दिनांक 10/10/2017 रोजी सोफा सेट व टी टेबल न देवून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दिल्याने तक्रारकर्त्याने वि.प.विरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, वि.प.यांनी सोफा सेट व टी टेबल तक्रारकर्त्याला द्यावा तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानासाठी नुकसान भरपाई रु. 45,000/- त्यावर 9 टक्के व्याज आणी तक्रार खर्च देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 4. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्षाला मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. ने मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. तक्रारकर्त्याने वि.प.कडे सोफा सेट व टी टेबल बनविण्याची ऑर्डर दिली होती व सदर सोफा सेट व टी टेबल रू.28,500/- मध्ये बनविण्याचे ठरलेले होते व त्याकरीता तक्रारकर्त्याने रू.20,000/- वि.प.कडे अॅडव्हान्स रक्कम जमा केली आहे ही बाब वि.प.नी लेखी उत्तरात मान्य केली असून तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता हे वि.प.कडे उर्वरीत रक्कम रू.8,500/- न देताच सदर सोफा सेट व टी टेबलची डिलीव्हरी मागत आहे. वि.प. यांनी ऑर्डरप्रमाणे सदर सोफा सेट व टी टेबल दिनांक 10/10/2017 पासून तयार करुन ठेवले. त्याकरिता स्वतःजवळची रक्कम गुंतविली तसेच परिश्रम घेतले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला उर्वरीत रक्कम जमा करून सोफासेट घेवून जाण्यांस फोन करून वारंवार सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम देवून सोफा सेट व टी टेबल अजुनपर्यंत नेला नाही. वि.प.यांनी तक्रारकर्त्यास योग्य सेवा दिली असुन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 5. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, वि.प. यांचे लेखी कथन, लेखी कथनालाच वि.प.यांचे पुरावा शपथपत्र समजण्यांत यावे अशी नि.क्र. 12वर पुरसीस दाखल, तसेच तक्रारकर्ता व वि. प यांचे तोंडी युक्तिवाद आणी परस्परविरोधी कथनावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. वि.प. तक्रारकर्त्याप्रती सेवेत कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 2. आदेश काय ? अंशतःमान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 व 2 बाबत :- 6. तक्रारकर्त्याने दिनांक 25/09/2017 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे ऑर्डर देऊन सोफा सेट व टी टेबल विकत घेतला, वि.प.ने सदर सोफा सेट व टी टेबल ची डिलीव्हरी दिनांक 10/10/2017 द्यावयाची होती व त्याकरीता तक्रारकर्त्याने अॅडव्हान्स रक्कम म्हणून दिनांक 25/9/2017 व दिनांक 5/10/2017 रोजी अनुक्रमे रू.10,000/- व रू.10,000/- असे एकूण रू.20,000/- वि.प.ला दिली याबाबत वाद नाही. 7. तक्रारकर्त्याने सोफा सेट व टी टेबल साठी दिलेल्या ऑर्डरच्या प्रकरणात दाखल पावतीनुसार सदर सोफा सेट व टी टेबल रू.28,500/- मध्ये बनविण्याचे ठरलेले होते. मात्र सदर मुदतीत वि.प.ने सोफासेट व टी टेबल बनवून दिले नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. यावर सदर सोफा सेट व टी टेबल ऑर्डरप्रमाणे दिनांक 10/10/2017 पासून वि.प. यांनी तयार करुन ठेवले व उर्वरीत रक्कम रू.8,500/- जमा करून सदर सोफा घेवून जाण्यांस तक्रारकर्त्यास सुचीत केले होते असे वि.प.चे लेखी उत्तरात कथन आहे. परंतु त्यांनी सदर कथन दस्तावेजांसह सिध्द केलेले नसल्याने ग्राहय धरण्यायोग्य नाही. उलटपक्षी तक्रारकर्त्याच्या पुतण्याचे दिनांक 13/10/2017 रोजी लग्न होते तसेच तक्रारकर्ता हा पास्टर असून त्याच्याकडे त्यानंतर ख्रिसमस व नवीन वर्षांचा कार्यक्रम होता व त्याकरीता सुध्दा सदर सोफा सेट व टी टेबल न मिळाल्याने त्याला वापरता आला नाही व तक्रारकर्त्याने लेखी पत्राद्वारे विरूध्द पक्षाकडे सदर सोफासेटची दोनदा मागणी करूनसुध्दा त्यांनी दिलेल्या मुदत दिनांक 10/10/2017 चे आंत व त्यानंतरही आजतागायत सदर सोफासेट व टी टेबल दिलेला नाही हे तक्रारकर्त्याने नि.क्र.9 वर लग्नाची पत्रीका, पास्टर म्हणून मान्यता दिल्याबाबतचे प्रमाणपत्र व नि.क्र.2,3,4 व 5 वर नोटीस व इतर दस्तावेज दाखल करून सिध्द केलेले आहे. वि.प.ने तक्रारकर्त्यास मुदतीत सोफा तयार करून न देवून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दिली व त्यामुळे तक्रारकर्त्यास समारंभाचे वेळी सदर सोफा वापरता न आल्यामुळे तक्रारकर्त्याची समाजात मानहानी होवून त्याला शारिरीक व मानसीक त्रास झाल्याने वि.पक्ष हे तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. परंतु असे असले तरी आज रोजी तक्रारकर्ता सदर सोफ्याची उर्वरीत रक्कम रू.8,500/- वि.प.स देणे लागतो ही बाब विचारात घेवून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 59/2018 अंशतः मान्य करण्यात येते. 2. तक्रारकर्त्याने प्रस्तूत आदेश पारीत झाल्यापासून 15 दिवसांचे आंत विरुद्ध पक्षांस उर्वरीत रू.8,500/- दिल्यास वि.प.ने तक्रारकर्त्यास सोफासेट व टी टेबल द्यावा. अथवा वरील मुदतीत तक्रारकर्ता विरूध्द पक्षास उर्वरीत रक्कम रु.8500/- देण्यांस असमर्थ ठरल्यांस वि.प.ने तक्रारकर्त्याची आगाऊ घेतलेली रक्कम रू.20,000/- आदेशाचे दिनांकापासून 45 दिवसांचे आत परत करावे. 3. वि.प.ने तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रीत रू.1000/- द्यावे. 4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. |