(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–20 जानेवारी, 2020)
01 तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष मशीन विक्रेता यांचे कडून तिने विकत घेतलेली हायड्रोजल मशीन दोषपूर्ण असल्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही उपरोक्त नमुद पत्त्यावर राहते. विरुध्दपक्ष हा त्याचे एजंटचे मार्फतीने हायड्रोजल वॉटर ट्रिटमेंट मशीन विकण्याचा व्यवसाय करतो. मार्च-2015 मध्ये तिने विरुध्दपक्षाचे एजंटचे मार्फतीने हायड्रोजल मशीन ती तुमसर येथे राहत असलेल्या तिचे राहते घरी रुपये-27,400/- एवढया किमती मध्ये विकत घेतली, त्यामुळे ती विरुध्दपक्षाची ग्राहक होते. तिने पुढे असे नमुद केले की, दिनांक-06 मे, 2015 रोजी सदर मशीन मध्ये बिघाड आल्याने त्याची सुचना तिने विरुध्दपक्ष एजंटचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिली असता विरुध्दपक्षाचे एजंटनी सदरची नादुरुस्त मशीन तिचे घरुन काढून नेऊन दुरुस्तीसाठी कंपनी कडे पाठविली आणि त्याऐवजी त्याच कंपनीची हायड्रोजल मशीन तिचे कडे लावून दिली. परंतु दिनांक-06.04.2017 रोजी बदलवून दिलेल्या दुस-या मशीन मध्ये तांत्रीक दोष निर्माण झाल्याने त्याची सुचना तिने त्वरीत विरुध्दपक्ष कंपनीला दिल्यावर, विरुध्दपक्ष कंपनीचे एजंटने बदलवून दिलेली दुसरी मशीन सुध्दा परत नेली परंतु त्या नंतर तिला कोणतीही हायड्रोजल मशीन दिल्या गेली नाही त्यामुळे तिने पुन्हा सप्टेंबर-2017 मध्ये विरुध्दपक्ष कंपनी कडे हायड्रोजल मशीन मध्ये असलेला तांत्रीक बिघाड दुरुस्त करुन देण्या बाबत तक्रार केली परंतु विरुध्दपक्षाने सदर तक्रारीला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा मशीन दुरुस्त करुन दिली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास दिला.
तिने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षा कडून विकत घेतलेली हायड्रोजल मशीन दुरुस्त करुन तिला परत करण्यात यावी अथवा त्याऐवजी त्याच कंपनीची नविन मशीन तिला देण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्षाकडे केली परंतु अनेकदा विनंती करुनही विरुध्दपक्षाने टाळाटाळ केली असल्याने शेवटी तिने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचात दाखल करुन त्याव्दारे खालील मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. तसेच विरुध्दपक्षाने तिचेकडे लावलेल्या हायड्रोजल मशीन मध्ये तांत्रीक दोष असल्याचे जाहिर करण्यात यावे. तिने विकत घेतलेल्या हायड्रोजल मशीन ऐवजी तिचेकडे त्याच कंपनीची नविन मशीन लावून वेळोवेळी देखरेख ठेवण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात यावे अथवा तिने विरुध्दपक्षाला हायड्रोजल मशीनपोटी दिलेली रक्कम वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तिला परत करण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे. या शिवाय तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई विरुध्दपक्ष यांचे कडून मिळावी तसेच तक्रारीचा खर्च मिळावा. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्षाचे नाव आणि पत्त्यावर ग्राहक मंचाव्दारे रजिस्टर पोस्टाने नोटीस संबधित दस्तऐवजासह पाठविण्यात आली. ग्राहक मंचाव्दारे पाठविलेली नोटीस विरुध्दपक्षाला मिळाल्या बाबतची पोच अभिलेखावरील पान क्रं 18 वर दाखल आहे परंतु विरुध्दपक्षाला सदर नोटीस मिळाल्या नंतरही तो ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्याने आपले लेखी निवेदन सादर केले नाही म्हणून त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-19 नोव्हेंबर, 2018 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्तीने पान क्रं 11 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण-02 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने तिने विकत घेतलेल्या हायड्रोजल प्लस (Hydro-Jal Plus) Owner’s Manual पान क्रं 12 व 13वर दाखल आहे. पान क्रं 14 वर विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी, नागपूर यांचे तर्फे निर्गमित टॅक्स इन्व्हाईस दाखल केले. तसेच पान क्रं 15 वर दिनांक-06 मे, 2015 रोजीचे तक्रारकर्तीचे नावे हायड्रोजलचे एकूण रुपये-27,400/- एवढया किमतीचे बिल दाखल असून त्यावर Paid असा शेरा नमुद आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 19 ते 21 वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले.
05. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री के.एस. मोटवानी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्तीची तक्रार, तिने दाखल केलेले शपथपत्र तसेच तिने प्रकरणात दाखल केलेले दस्तऐवज इत्यादीचे ग्राहक मंचाव्दारे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तक्रारकर्तीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद इत्यादी वरुन ग्राहक न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे व तिचे पुराव्या दाखल शपथपत्रा प्रमाणे तिने विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी, सिताबर्डी नागपूर यांचे कडून विरुध्दपक्षाचे एजंटचे मार्फतीने सन-2015 मध्ये हायड्रोजल मशीन विकत घेतली आणि सदर मशीन तिचे तुमसर येथील राहत्या घरी स्थापित केली. आपले या म्हणण्याचे पुराव्यार्थ तिने विकत घेतलेल्या हायड्रोजल प्लस (Hydro-Jal Plus) Owner’s Manual पान क्रं 12 व 13 वर दाखल केलेले आहे. तसेच पान क्रं 14 वर विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी, नागपूर यांचे तर्फे निर्गमित टॅक्स इन्व्हाईस दाखल केलेले असून त्याचे अवलोकन केले असता ते (तक्रारकर्तीचे नावे)Name-Sangita Meshram दिलेले असून सदर Invoice No.-MH-1001/MAR15//I-82 Date-10th March-2015 असा असून त्यावर Total Basic Value Rs.-20480/- Plus VAT Value Rs-2560/-, Total Value (Round off) Rs.-23040/- असे नमुद आहे. तसेच पान क्रं 15 वर दिनांक-06 मे, 2015 रोजीचे तक्रारकर्तीचे नावे हायड्रोजल मशीनचे एकूण रुपये-27,400/- एवढया किमतीचे बिल दाखल असून त्यावर Paid असा शेरा नमुद आहे. पान क्रं 14 वरील टॅक्स इन्व्हाईचे अवलोकन केले असता ते विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी नागपूर यांचे व्दारा निर्गमित केल्याचे दिसून येते तसेच पान क्रं 15 वर तक्रारकर्तीचे नावे दिलेल्या दाखल बिला वरुन दिनांक-06.05.2015 रोजी हायड्रोजल जल मशीन बाबत रुपये-27,400/- नगदी अदा केल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक होते.
08. विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी, नागपूर याला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही त्यांचे तर्फे कोणीही ग्राहक मंचा समोर उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदन दाखल केले नाही तसेच तक्रारकर्तीने तक्रारीतून विरुध्दपक्षा विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीची तक्रार ही तिने तक्रारीतून केलेले निवेदन, तिने दाखल केलेले दस्तऐवज आणि तिचे शपथेवरील पुराव्या वरुन गुणवत्तेवर निकाली काढण्यास आम्हाला काहीही अडचण नाही.
09. तक्रारकर्तीचे तक्रारी व शपथपत्रातील कथना प्रमाणे सन-2015 मध्ये विरुध्दपक्षाचे एजंटचे मार्फतीने तिचे तुमसर येथील राहते घरी हायड्रोजल मशीन स्थापीत करण्यात आली. त्यानंतर दिनांक-06 मे, 2015 रोजी सदर मशीन मध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने त्याची सुचना तिने एजंटचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिली असता एजंटचे मार्फतीने नादुरुस्त मशीन काढून ती दुरुस्ती करीता पाठविण्यात आली व त्या मोबदल्यात तात्पुरती सोय म्हणून त्याच कंपनीची दुसरी हायड्रोजल मशीन तिचे कडे लावून देण्यात आली. परंतु दिनांक-06 एप्रिल, 2017 रोजी तात्पुरती सोय म्हणून लावून दिलेल्या दुस-या हायड्रोजल मशीन मध्ये सुध्दा तांत्रीक बिघाड झाल्याने त्याची सुचना तिने विरुध्दपक्षाचे एजंटला दिली असता त्याने दुसरी लावून दिलेली मशीन सुध्दा काढून नेली व त्यानंतर तिचेकडे आज पर्यंत तिने विकत घेतलेली मशीन लावून देण्यात आलेली नाही. तिने या बाबत वारंवार विरुध्दपक्ष व त्याचे एजंटकडे पाठपुरावा केला परंतु तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेवटी तिने ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल केली असल्याचे तिचे म्हणणे आहे.
10. तक्रारकर्तीचे तक्रारीतील आणि शपथपत्रातील कथना वरुन तिने मार्च, 2015 मध्ये मशीन विकत घेतल्या नंतर लगेच एक महिन्यात म्हणजे दिनांक-06 मे, 2015 रोजी सदर मशीनमध्ये तांत्रीक बिघाड निर्माण झाला आणि त्याची सुचना एजंटचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिल्या नंतर विकत घेतलेल्या मशीन ऐवजी तात्पुरती सोय म्हणून तिचेकडे त्याच कंपनीची दुसरी मशीन लावून देऊन विकत घेतलेली मशीन दुरुस्ती करीता पाठविली. परंतु पुढे दुस-या मशीन मध्ये सुध्दा तांत्रीक बिघाड आल्या नंतर त्याची सुचना एजंटला दिल्यावर त्याने दुसरी मशीन सुध्दा तिचे घरातून काढून नेली आणि आज पर्यंत तिला तिने विकत घेतलेली मशीन पुरविण्यात आलेली नाही. करीता तिने तक्रारीतून विरुध्दपक्षाने हायड्रोजल नावाची नविन मशीन तिला पुरवावी किंवा असे करणे विरुध्दपक्षाला शक्य नसल्यास तिने विरुध्दपक्षाला दिलेली रक्कम व्याजासह परत करावी अशी मागणी केलेली आहे.
11. तक्रारकर्तीची तक्रार, तिने दाखल केलेले दस्तऐवज आणि तिने पुराव्या दाखल केलेले शपथपत्र पाहता तसेच विरुध्दपक्षाला ग्राहक मंचाची रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही वा त्याने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारकर्तीने तक्रारीतून आणि शपथपत्रातून विरुध्दपक्षा विरुध्द केलेले कथन योग्य त्या पुराव्याव्दारे खोडून काढलेले नाही. अशापरिस्थतीत तक्रारकर्तीची विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे, त्यामुळे तक्रारकर्तीला तिने विरुध्दपक्षाला मशीनपोटी अदा केलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बदद्ल रुपये-3000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी सिताबर्डी नागपूर आणि तिचा प्राधिकृत अधिकारी याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
02) विरुध्दपक्षाला असे आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्ती कडून दिनांक-06 मे, 2015 रोजीचे बिला नुसार हायड्रोजल मशीनपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-27,400/- (अक्षरी रुपये सत्ताविस हजार चारशे फक्त) तक्रारकर्तीला परत करावी.
03) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये- 3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला दयावेत.
04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष स्वदेशी शॉपी सिताबर्डी नागपूर आणि तिचा प्राधिकृत अधिकारी याने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत विरुध्दपक्ष फर्म आणि तिचा प्राधिकृत अधिकारी याने आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-02 प्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला परत करावयाची रक्कम रुपये-27,400/- प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.6% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला परत करण्यास विरुध्दपक्ष फर्म आणि तिचा प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहिल.
05) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
06) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.