(पारीत व्दारा श्री. नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक–29 जानेवारी, 2020)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 विरुध्द दोषपूर्ण वाहना बाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याने विरुध्दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेता याचे कडून दिनांक-29 नोव्हेंबर, 2017 रोजी टाटा एस मेगा एक्सल हे वाहन खरेदी केले असून सदर वाहनाची डिलेव्हरी त्याला भंडारा येथे देण्यात आली. सदर वाहनाचा नोंदणी क्रं-एम.एच.-36/एए-0504 असा आहे. वाहन खरेदीचे वेळी विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी वाहना बद्दल वॉरन्टी असल्या बाबत खात्री दिली होती. तक्रारकर्त्याने सदर वाहन खरेदीसाठी बॅंक ऑफ इंडीया शाखा डोंगरी (बुर्जूग) यांचे कडून कर्ज घेतले होते आणि सदर कर्ज खात्याचा क्रमांक-922172310000003 असा आहे.
त्याने पुढे असे नमुद केले की, वाहन खरेदी केल्या नंतर काही दिवसातच वाहनामध्ये बिघाड निर्माण झाला, त्या संबधीची सुचना वि.प.क्रं 1 वाहन विक्रेत्याला देण्यात आली असता त्याने सदरचे वाहन त्याची प्राधिकृत कार्यशाळा म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 2 याचेकडे नेण्यास सुचित केले. त्यानुसार त्याने सदरचे वाहन वि.प.क्रं 2 चे कार्यशाळेत दिनांक-27.06.2018 रोजी निरिक्षणा करीता नेले, तेंव्हा वि.प.क्रं 2 यांनी सांगितले की, सदर वाहनाचे रेडीएटर मध्ये ऑईल जात असल्यामुळे त्यात बिघाड निर्माण झाला. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने यापूर्वीच एक महिन्या आधी म्हणजे दिनांक-25 मे, 2018 रोजी वि.प.क्रं 2 चे कार्यशाळेत सदर वाहनाची सर्व्हीसिंग केली होती, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी वाहनातील निर्माण झालेला बिघाड दुरुस्त झाल्याचे सांगून सदर वाहन तक्रारकर्त्यास दिनांक-05 जुलै, 2018 रोजी परत केले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर वाहनाची दुरुस्ती झाल्या नंतर सुध्दा पुन्हा त्यात बिघाड निर्माण झाल्याने त्याने सदरचे वाहन दिनांक-18 जुलै, 2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्याचे वर्कशॉप मध्ये नेले असता त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्याने सदरचे वाहन दुरुस्त झाले असल्याचे सांगून तक्रारकर्त्याचे ताब्यात दिले. त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वाहनाची दुरुस्ती योग्य प्रकारे केली नाही आणि वाहन दुरुस्तीचे दरम्यान त्यांनी वाहनामध्ये बिघाड निर्माण केल्याने त्याचे वाहन शेवट पर्यंत दुरुस्त होऊ शकले नाही आणि ही विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे सेवेतील त्रृटी आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वाहनातील दोष दुरुस्त करण्याऐवजी सदर वाहनामध्ये दोष निर्माण केलेत. शेवटी दिनांक-23 जुलै, 2018 रोजी जायका मोटर्स येथील तंत्रज्ञानी त्याचे घरी येऊन सदर वाहनाची तपासणी केली व ते वाहन टोचन करुन दिनांक-28 जुलै, 2018 रोजी जायका मोटर्स येथे दुरुस्ती करीता नेण्यात आले असता तेथील तंत्रज्ञानी वाहनाचे इंजिन मध्ये ऑईल गळीती होत असल्याने ते इंजिन क्षतीग्रस्त झाल्याचा निष्कर्ष काढून सदरचे इंजिन बदलावे लागेल असे सुचित केले.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचेकडे वाहन सर्व्हीसिंग करीता टाकले असता त्यांचेच चुकीमुळे सदर वाहना मध्ये वारंवार बिघाड निर्माण झाला असल्याने त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- वि.प.क्रं 1 व 2 यांचे दोषपूर्ण वाहनाचे सर्व्हीसिंगमुळे त्याचे वाहनाचे इंजिन क्षतीग्रस्त झाले आणि त्यांनी दोषपूर्ण सेवा तक्रारकत्या्रला दिली. करीता वि.प.क्रं 1 व 2 हे तक्रारकर्त्याचे वाहनामध्ये झालेल्या बिघाडास जबाबदार आहेत असे घोषीत करण्यात यावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रुपये-5,00,000/- आणि सदर वाहनाचे दुरुस्तीसाठी आलेला खर्च रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-5,20,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी देण्याचे आदेशित व्हावे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी तक्रारकर्त्याला नविन वाहना ऐवजी जुने बिघाड असलेले वाहन पुरविले करीता तक्रारकर्त्याला नविन वाहन पुरविण्याचे वि रुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याला आदेशितव्हावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांना ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्याला ग्राहक मंचाव्दारे रजि. पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही तो ग्राहक मंचा समोर उपस्थित न झाल्याने त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-07 जानेवारी, 2019 रोजी पारीत केला. विरुध्दपक्ष क्रं 2 ला सुध्दा ग्राहक मंचाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही तो सुध्दा ग्राहक मंचा समोर उपस्थित न झाल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-25 फेब्रुवारी, 2019 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत अक्रं 1 ते 8 दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने वाहन खरेदी केल्या बाबत दिनांक-29.11.2017 रोजीचे बिल, वाहनाचे नोंदणी व विम्याचा दस्तऐवज, वाहन विरुध्दपक्षाकडे सर्व्हीसिंगला टाकल्या बाबत दिनांक- 19 मार्च, 2018 व दिनांक-25 मे, 2018 जॉब कॉर्डच्या प्रती, दिनांक-05 जुलै, 2018 रोजीची डिलेव्हरी चालानची प्रत, वाहन दुरुस्तीच्या दिनांक-18 जुलै, 2018 रोजीच्या दोन पावत्यांच्या प्रती, वाहन दुरुस्ती संबधाने जायका मोटर्सची दिनांक-28 जुलै, 2018 रोजीची पावती व टोचन पावती अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने पुराव्या दाखल सादर केलेल्या दसतऐवजाच्या प्रती इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले . तक्रारकर्त्याचे वकील श्री मोटवानी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा दोन्ही विरुध्दपक्षांचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | दोन्ही विरुध्दपक्षांनी त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब तक्रारकर्त्याने पुराव्यानिशी सिध्द केली काय? | -होय- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
06. तक्रारकर्त्याने पान क्रं 12 वर त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून वाहन खरेदी केलेल्या बिलाची दिनांक-29 नोव्हेंबर, 2017 रोजीची प्रत दाखल केली त्यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो ही बाब सिध्द होते त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. तसेच तक्रारकर्त्याचे वाहन हे विमाकृत असल्या बाबत पान क्रं 15 वरती टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स बाबत दस्तऐवज दाखल केला आहे त्यामुळे ही बाब सुध्दा नाकारता येत नाही की, तक्रारकर्त्याचे वाहन विमाकृत होते व वॉरन्टी पिरीएड मध्ये सुध्दा होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन पृष्ट क्रं 14 वरील वाहनाचे फीटनेस सर्टीफीकेट प्रमाणे वाहन दिनांक-06 डिसेंबर, 2017 पासून ते दिनांक-06 नोव्हेंबर, 2019 पर्यंत फीट होते असे कागदपत्रावरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारी सोबत वाहन दुरुस्ती करीता वेळोवेळी विरुध्दपक्ष यांचेकडे नेल्या बाबतच्या जॉब कॉर्डसच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केल्यात, यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे वाहन विरुध्दपक्षांनी योग्यप्रकारे दुरुस्त न केल्याने त्याला सदरचे वाहन वारंवार दुरुस्ती करीता विरुध्दपक्षाकडे न्यावे लागले व या करीता त्याला खर्च करावा लागला. उपरोक्त दस्तऐवजी पुराव्या वरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याचे वाहन वेळोवेळी दुरुस्ती करीता टाकूनही ते विरुध्दपक्षांनी योग्य प्रकारे दुरुस्त केलेले नाही. करीता विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याचे क्षतीग्रस्त झालेल्या वाहनाचे इंजिन बदलवून देऊन त्याऐवजी नविन इंजिन लावून संपूर्ण वाहनाची दुरुस्ती करुन व त्या बाबत वाहनाचे फीटनेस सर्टीफीकेट देऊन चालू स्थिती मधील वाहन त्याला दयावे असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- दयावा असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.
07. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: अंतिमआदेश ::
01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) प्राधिकृत अधिकारी, नांगीया मोटर्स, हिंगणारोड, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) प्राधिकृत अधिकारी, गोयल मोटर्स कार्यशाळा बेला, भंडारा, तालुका-जिल्हा भंडारा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
02) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याचे क्षतीग्रस्त झालेल्या वाहनाचे इंजिन बदलवून त्याऐवजी नविन इंजिन लावून संपूर्ण वाहन दुरुस्ती करुन व त्या बाबत वाहनाचे फीटनेस सर्टीफीकेट देऊन चालू स्थितीमध्ये ते वाहन तक्रारकर्त्याला दयावे व असे दुरुस्त झालेले वाहन मिळाल्या बाबत तक्रारकर्त्याची लेखी पोच घ्यावी.
03) विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना असे आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावा.
04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
05) सर्व पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
06) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.