न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. वि.प. क्र.2 यांचेकडून तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेला ट्रॅक्टर मॉडेल 960 एफई दि.7/9/2016 रोजी खरेदी केलला होता. सदरचा ट्रॅक्टर चांगला चालेल अशी हमी दिलेली असताना सुध्दा ट्रॅक्टरमध्ये दि. 14/4/2017 रोजी ट्रॅक्टरच्या वॉरंटी पिरेडमध्ये Noise in transmission मध्ये दोष निर्माण होवून तो बंद पडला व तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे रिपेअरीसाठी दिला असता त्यांनी जुजबी दुरुस्त करुन दिला. मात्र त्यानंतर वारंवार सदरचा ट्रॅक्टर बंद पडू लागल्यामुळे तक्रारदार यांचे रक्कम रु.4,21,378/- इतके नुकसान झाले आहे व वि.प. यांचेकडे वारंवार मागणी करुन देखील सदरची मागणी वि.प. यांनी मान्य केलेली नाही. याकरिता प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. क्र. 1 ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प. क्र.1 या कंपनीचे डीलर आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 या कंपनीने उत्पादित केलेले ट्रॅक्टर मॉडेल 960 एफई याचा चासीस नं. WYCV90930901518 Engine No 473052/SWA01407 चा ट्रक्टर वि.प. क्र.2 या डिलरकडून दि. 7/9/2016 रोजी रक्कम रु.7,65,000/- इतक्या रकमेस खरेदी केला होता व आहे. तक्रारदार यांनी ट्रॅक्टरची किंमत युनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा गडहिंग्लज यांचेकडून 7 लाखाचे कर्ज घेवून अदा केलेली आहे. तथापि ट्रॅक्टर खरेदी केलेपासून आजतागायत व्यवस्थित चालत नाही.
3. दि.14/4/2017 रोजी ट्रॅक्टरच्या वॉरंटी पिरेडमध्ये ट्रॅक्टरच्या Noise in transmission मध्ये दोष निर्माण होवून बंद पडला व त्यानंतर वि.प. यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला होता व त्याप्रमाणे वि.प. तर्फे मेकॅनिक यांनी वेळोवेळी सदर ट्रॅक्टरची जुजबी दुरुस्ती करुन दिली आहे. त्यानंतर दि.17/7/2017 रोजी पुन्हा वरील स्वरुपाची तक्रार येवून ट्रॅक्टर पुन्हा बंद पडलेमुळे यातील तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे रिपेअरी करुन देणेबाबत विनंती केली असता वि.प. तर्फै मॅकेनिक यांनी जुजबी दुरस्ती करुन दिली. तदनंतरही पुन्हा दि.1/9/2017 रोजी वरील स्वरुपाचीच तक्रार निर्माण होवून ट्रॅक्टर बंद पडला. त्यावेळीही तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे तक्रार केली असता त्यांचे तर्फे मॅकेनिक यांनी किरकोळ दुरुस्ती करुन ट्रॅक्टर तक्रारदार यांना दिलेला आहे. तदनंतर दि. 14/9/2017 रोजी वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना सदरच्या ट्रॅक्टरचा वॉरंटी पिरेड दि. 7/09/2019 पर्यंत वाढवून देण्यात आला व तसे पत्रही वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना देण्यात आले. तथापि पत्रामध्ये ट्रॅक्टर वेळोवेळी नादुरुस्त होवनू 875 तासानंतर बंद पडल्याचे नमूद करुन दिले आहे. त्यानंतर दि.14/5/2018 रोजी वि.प. यांचेकडून सदर ट्रॅक्टरचा नादुरुस्त पार्ट बदलून देणेत आला आहे. परंतु दि. 1/4/2018 पासून आजअखेर सदर ट्रॅक्टर, वरील नमूद तक्रारीमुळे बंद असल्यामुळे तक्रारदार यांचे मोठे नुकसान झाले आहे. वि.प. यांनी सदोष ट्रॅक्टर तक्रारदार यांना विक्री केलेमुळे तो वेळोवेळी बंद पडून तक्रारदार यांना मानसिक त्रास व बँक कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड सोसासा लागत आहे.
4. दि. 14/9/2017 पर्यंत 41 दिवस ट्रॅक्टर बंद पडून तक्रारदार यांचे दररोज रक्कम 4,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.1,64,000/- इतके नुकसान झालेले आहे. दि. 1/4/2018 पासून ते दि. 14/5/2018 पर्यंत म्हणजेच 44 दिवस ट्रॅक्टर बंद पडून दररोज रक्कम रु.4,000/- प्रमाणे रु.1,76,000/- इतके नुकसान झाले आहे व सदर सदोष ट्रॅक्टर वेळोवेळी बंद पडलेमुळे तक्रारदार यांना दुरुस्तीसाठी वि.प. यांचे कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागून मनःस्ताप झाला आहे. याकरिता रक्कम रु.60,000/- चे नुकसान झाले आहे व वेळोवेळी ट्रॅक्टर बंद पडलेमुळे तक्रारदार यांना बँक कर्जावरील व्याज दाखल रक्कम रु.21,378/- इतका भुर्दंड झाला आहे. असे एकूण रक्कम रु. 4,21,378/- इतके नुकसान तक्रारदार यांना सदोष ट्रॅक्टरमुळे सहन करावे लागले आहे. वि.प. क्र.1 व 2 हे अनुक्रमे ट्रॅक्टरचे उत्पादक व डिलर या नात्याने तक्रारदार यांना ग्राहक म्हणून चांगला व सुस्थितीतील ट्रॅक्टर विक्री करणेची जबाबदारी असताना त्यांनी सेवात्रुटी केली आहे. याकरिता ग्राहक या नात्याने मानसिक व शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागले कारणाने तक्रारदार यांचे रक्कम रु.4,21,378/- इतके नुकसान झालेले आहे व वि.प. क्र.1 व 2 हेच जबाबदार असलेने सदरची रक्कम त्यांचेकडून वसुल करुन मिळणेकरिता तक्रारअर्ज दाखल केला आहे. तसेच सदरचे रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाप्रमाणे मिळावे असे तक्रारदार यांचे कथन आहे.
5. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत ट्रॅक्टर खरेदीचे बिल, दुरुस्तीची जॉबकार्ड, वॉरंटी वाढून दिल्याचे वि.प. यांचे पत्र, वि.प. यांना पाठविलेली नोटीस व नोटीसची पोस्टाची पावती व पोहोच पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. वि.प.क्र.2 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
7. वि.प.क्र.1 यांना आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दखल केले. वि.प. क्र.1 यांनी दि. 1/2/2019 रोजी रक्कम रु. 500/- ची कॉस्ट तक्रारदार यांना अदा करुन नो से आदेश रद्दबातल करुन घेवून सदरचे म्हणणे दाखल केले. वि.प.क्र. 1 यांचे कथनानुसार तक्रारदार यांना सदरची तक्रार या मचासमोर दाखल करणेस कोणतीही Locus standi नाही. वि.प. क्र.2 यांचे कडून वि.प. क्र.1 यांनी उत्पादित केलेला ट्रॅक्टर हा खरेदी केलेला होता व सदरच्या ट्रॅक्टरमध्ये Noise in transmission हा दोष निर्माण होवून तो बंद पडला होता. मात्र तक्रारदार यांनी सदर ट्रॅक्टरविषयी प्रथम तक्रार ही ट्रॅक्टर खरेदी केलेनंतर 7 महिनेनंतर म्हणजेच दि. 14/4/2017 रोजी वि.प. क्र.2 यांचेकडे केलेली आहे. दि. 14/4/2017 रोजी पर्यंत सदर ट्रॅक्टर हा 593 तासापर्यत चालविला गेला होता व पुन्हा दि. 17/7/2017 रोजी ट्रॅक्टर दुरुस्तीकरिता वि.प. यांचेकडे देणेत आला. त्यावेळीही सदरचा ट्रॅक्टर हा 867 तास चालविला गेला होता. जर तक्रारदार यांचे म्हणणेनुसार सदरचा ट्रॅक्टर हा खरेदी घेतलेपासून व्यवस्थित चालू नव्हता तर खरेदी घेतलेनंतर लगेचच तक्रार का दाखल केली गेली नाही. प्रथम तक्रार नोंदविणेसाठी तक्रारदार यांनी 7 महिने का लावले यासंदर्भात कोणतेही सुयोग्य स्पष्टीकरण तक्रारदार यांनी अर्जात नमूद केलेले नाही. सबब, तक्रारदार हा या कोर्टासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. सदर ट्रॅक्टर दुरुस्ती करणेकरिता वि.प. यांचेकडे आणला. त्यावेळी वि.प. यांनी यातील तक्रारदार यांचे समाधान होईपर्यंत सदर ट्रॅक्टरची दुरुस्ती व देखभाल केलेली आहे. त्यामध्ये कोणतीही कसूर यातील वि.प. यांनी केलेली नाही. तक्रारदार यांनी दि. 1/9/2017 रोजी सदर ट्रॅक्टर दुरुस्ती करणेकरिता वि.प. यांचेकडे दिला असता सदर वि.प. यांनी त्यांचे समाधान होईपर्यंत ट्रॅक्टरची दुरुस्ती व देखभाल केलेली आहे व वि.प. यांनी गुडविल बेसीसवर तक्रारदार यांना सदर ट्रॅक्टरचा वॉरंटीचा कालावधी दि.7/9/2019 पर्यंत वाढवून दिलेला आहे. यावरुनही सदर वि.प. यांनी वेळोवेळी त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे हे स्पष्ट होते. वि.प. यांचेकडील दि.17/5/2018 रोजीचे जॉबकार्ड पाहता असे लक्षात येते की, सदर ट्रॅक्टर हा त्यावेळेपर्यंत म्हणजेच दि. 17/5/2018 पर्यंत 1220 तास चालला आहे. जर सदरचा ट्रॅक्टर म्हणतात त्या कालावधीत बंद होता तर सदरचा ट्रॅक्टर एवढे तास चाललाच कसे काय, सबब, वि.प. यांचे असे म्हणणे असे आहे की, यातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर हा ते म्हणतात, त्या कालावधीत कधीही बंद पडलेला नव्हता. तक्रारदार हे सदर ट्रॅक्टरचा वापर आजतागायत करीत आहेत व होते. त्यामुळे कोणतेही कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. केवळ वि.प. यांना त्रास देणेचे हेतूने सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. ट्रॅक्टर कधीही बंद पडला नसल्यामुळे नुकसानीची रक्कम देणेचा प्रश्नच उद्भवत नाही या कारणाकरिता तक्रारदार यांनी मागितलेली रक्कम रु.4,21,378/- ही वि.प. यांना मान्य व कबूल नाही. तसेच तक्रारदार हे ट्रॅक्टरचा वापर हा व्यावसायिक कारणाकरिता करत होते. सबब, याही कारणाकरिता सदरची तक्रार मंचासमोर चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांचे झालेले मानसिक व शारिरिक नुकसान हे वि.प. यांना मान्य व कबूल नाही. वि.प. यांनी सेवा बजावताना कोणतीही कसूर केलेली नसून कोणताही अनुचित व्यापार पध्दतीचे अवलंब केलेला नाही. तसेच सदरचा ट्रॅक्टर हा सदोष आहे या संदर्भात कोणताही योग्य व कुशल अशा तज्ञ व्यक्तीचा किंवा संस्थ्ेाचा अहवाल याकामी सादर केलेला नाही. सबब, या सर्व कारणांकरिता सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा व वि.प. यांनाच नुकसानीदाखल रु.10,000/- देणेचे आदेश व्हावेत असे म्हणणे वि.प. यांनी दिले आहे.
8. वि.प.क्र.1 यांनी या संदर्भात पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
9. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प.क्र.1 यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
10. वि.प. क्र. 1 ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प. क्र.1 या कंपनीचे डीलर आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 या कंपनीने उत्पादित केलेले ट्रॅक्टर मॉडेल 960 एफई याचा चासीस नं. WYCV90930901518 Engine No 473052/SWA01407 चा ट्रक्टर वि.प. क्र.2 या डिलरकडून दि. 7/9/2016 रोजी रक्कम रु.7,65,000/- इतक्या रकमेस खरेदी केला होता व आहे. तक्रारदार यांनी ट्रॅक्टरची किंमत युनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा गडहिंग्लज यांचेकडून 7 लाखाचे कर्ज घेवून अदा केलेली आहे. या संदर्भात उभय पक्षांमध्ये कोणताही उजर नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
11. तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज हा तक्रारदार यांचा ट्रॅक्टर हा खरेदी केले तारखेपासून म्हणजेच दि. 7/09/2016 रोजी बंद पडला होता असे कथन केले आहे. दि. 14/04/2017 रोजी ट्रॅक्टरच्या वॉरंटी पिरेडमध्ये Noise in transmission हा दोष निर्माण होवून बंद पडला होता व याकरिता तो वि.प. यांचेकडे दुरुस्तीसाठी दिलेला होता. मात्र तरीही तो जुजबी दुरुस्त करुन दिले कारणाने वारंवार बंद पडत होता असे तक्रारदार यांचे कथन आहे व त्याकरिता झालेली रक्कम रु.4,21,378/- इतकी नुकसान भरपाई वि.प. यांचेकडून मिळावी अशी तक्रारदार यांनी विनंती केलेली आहे.
12. तक्रारदार यांनी याकामी अर्जात नमूद वाहनाचा टॅक्स इन्व्हॉईस दाखल केला आहे म्हणजेच सदरचा ट्रॅक्टर हा रक्कम रु.7,65,000/- इतके किंमतीस खरेदी केला ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांनी सदर ट्रॅक्टर नादुरुस्त झालेनंतर केलेल्या किरकोळ दुरुस्तीबाबतचे जॉबकार्ड दाखल केलेले आहे व सदरचे जॉबकार्ड हे दि. 14/4/2017 रोजीचे दिसून येते. म्हणजेच सदरचा ट्रॅक्टर हा खरेदी केलेपासून सहा ते सात महिन्यांनी नादुरुस्त झालेची बाब स्वयंस्पष्ट आहे व सदरचा खर्चही या जॉबकार्डवरुन दिसून येतो. तसेच दि. 17/7/2017 रोजीही तक्रारदार यांनी त्यावेळचे जॉबकार्ड दाखल केलेले आहे. यावरुनही तक्रारदार यांना झालेला खर्च समजून येतो. तसेच दि. 1/9/2017 रोजीचेही जॉबकार्ड तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे व तोही खर्च या जॉबकार्डवरुन दिसून येतो. मात्र तक्रारदार यांनी जरी जॉबकार्ड दाखल करुन सदरचा ट्रॅक्टर हा नादुरुस्त असलेची असलेची बाब या आयेागासमोर आणली असली तरीसुध्दा सदरचा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर खरेदी केलेपासून म्हणजेच दि. 7/9/2016 पासून ते दि. 14/4/2017 पर्यंत ट्रॅक्टर हा सुस्थितीत होता व सदचा ट्रॅक्टर हा 1220 तसेच 867 तास चालला गेलेला आहे हीही बाब दाखल कागदपत्रांवरुन शाबीत होते. तक्रारदार यांनी आपल्या कथनाद्वारे सदरचे ट्रॅक्टरची तक्रार ही दि. 14/7/2017 रोजी सुरु झालेचे नमूद केले आहे म्हणजेच पहिले 7 महिने हा ट्रॅक्टर सुस्थितीत होता ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांनी यासंदर्भातील ट्रॅक्टर हा सदोष आहे असा कोणताही योग्य व कुशल अशा तज्ञ व्यक्तीचा किंवा संस्थेचा अहवाल या कामी दाखल केलेला नाही. सबब, सदरचा ट्रॅक्टर हा सदोष होता ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेला नाही. मात्र जरी असे असले तरीसुध्दा तक्रारदार यांनी तक्राअर्जाचे कामी ट्रॅक्टरची किंमत अगर सदरचा ट्रॅक्टर हा बदलून मिळणेकरिता सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी केवळ झालेले नुकसानीकरिता सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. याकरिता त्यांनी साक्षीदार श्री अमृतराव आप्पासाहेब भोसले यांचे प्रतिज्ञापत्रही दाखल केलेले आहे व या प्रतिज्ञापत्रानुसार सदरचे ट्रॅक्टर मध्ये अर्जात नमूद दोष म्हणजेच Noise in transmission हा दोष निर्माण होवून सदरचा ट्रॅक्टर बंद पडलेला होता व ट्रॅक्टर हा जुजबी स्वरुपात दुरुस्त करुन दिलेनंतर पुन्हा सदरचा ट्रॅक्टर नादुरुस्त झालेने तक्रारदार यांनी सदरचा ट्रॅक्टर हा अमृत आप्पासोब भोसले यांचेकडे जुलै 2017 चे दरम्यान दुरुस्तीसाठी आणला होता. मात्र सदरचे ट्रॅक्टरमध्ये दोष असलेने कंपनीला कळवा असे सांगितलेले होते असे कथन साक्षीदार यांनी केलेले आहे. मात्र असे जरी असले तरी उत्पादित दोष असलेचा कोणताही पुरावा या ओयागासमोर नाही. वि.प. क्र.1 यांनी हजर होवून आपले म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प.क्र.1 यांचेही कथनानुसार सदरचे ट्रॅक्टरची खरेदी केलेपासून 7 महिन्यानंतर दुरुस्ती केली आहे व पहिले कित्येक तास ट्रॅक्टर हा चालू स्थितीतच होता ही बाब सुध्दा स्पष्ट होते. तक्रारदार यांनी ट्रॅक्टरचे नुकसान झालेले आहे याचा कोणताही पुरावा या आयेागासमोर आणलेला नाही असे कथन वि.प.क्र.1 यांनी केलेले आहे. याचा विचार करता व तक्रारअर्जात मागितलेल्या मागणीचा विचार करता तक्रारदार यांचा ट्रॅक्टर हा नादुरुस्त होता ही बाब या आयोगासोर आहे. मात्र त्याचे प्रतिदिन किती नुकसान झाले याचा कोणताही पुरावा या आयोगासमोर तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी फक्त तक्रारअर्जात प्रतिदिन रु.4,000/- इतका खर्च असे नमूद केलेले आहे. मात्र आयोगासमोर निश्चित प्रतिदिन किती नुकसान झाले याचा कोणताही पुरावा नाही. तथापि तक्रारदार यांचे नादुरुस्त वाहनाचा विचार करता निश्चितच त्यांना याचा त्रास झालेला आहे अथवा खर्चही आलेला आहे यावर हे आयोग ठाम आहे. सबब, रक्कम रु. 1,00,000/- नुकसान भरपाईपोटी देणेचे आदेश वि.प. क्र.1 व 2 यांना करण्यात येतात. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखे पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच नोटीस व तक्रारअर्जाचा खर्चाचा विचार करता रक्कम रु.5,000/- इतका खर्च तक्रारदार यांना देणेचे आदेश वि.प. क्र.1 व 2 यांना करण्यात येतात. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखे पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.