जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ११७/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०१/०४/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २३/०५/२०१३
राजाराम साहेबराव पाटील. ----- तक्रारदार.
उ.व.४०,धंदा-शेती.
रा.मु.पो.दभाशी,ता.शिंदखेडा,जि.धुळे.
विरुध्द
१)मुख्याध्यापक साो, ----- सामनेवाले.
आर.सी.पटेल मराठी मा.शाळा सावळदे,
ता.शिरपूर,जि.धुळे.
२)प्रशासकीय अधिकारी,
दि.न्यु इंडिया इंन्शुरन्स कं.लिमिटेड
पहली मंजील,कपाडिया कमर्शियल कॉम्प्लेक्स,
स्टलींग मोतर के पास कालिका मंदिर के सामने,
जुना आग्रा रोड,नाशिक-४२२००२.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.ए.निंबाळकर.)
(सामनेवाले नं.१ तर्फे – वकील श्री.सी.बी.अगरवाले.)
(सामनेवाले नं.२ तर्फे – वकील श्री.ए.एम.हातेकर.)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचा मुलगा अंबालाल राजाराम पाटील हा सामनेवाले नं.१ या शाळेत शिकत असून, सामनेवाले नं.१ यांनी त्यांच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थांचा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अन्वये सामनेवाले नं.२ यांच्याकडे विमा क्लेम काढलेला आहे. तक्रारदारांचा मुलगा दि.१३-१०-२००६ रोजी शाळेत परिक्षेकरिता जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर गाडी वाहनातून पडून अपघात झाला. त्यात त्याच्या तोंडाच्या जबडयास व डोळयास गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यामुळे त्यास “Mild mental Retardations” अशा स्वरुपाचे ५० ते ७० टक्के अपंगत्व आले आहे. त्याकामी तक्रारदारांना औषधोपचारासाठी खर्च करावा लागत आहे. याकामी झालेला औषधोपचाराचा खर्च विमा क्लेम अंतर्गत मिळावा म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. परंतु सामनेवाले नं.२ यांनी अपघाताच्या वेळेस विद्यार्थी ट्रकमध्ये प्रवास करणे हे कायद्याचे विरुध्द आहे, यामुळे विमा दावा देय नाही असे सबळ कारण न देता क्लेम रद्द केलेला आहे. सबब तक्रारदारांना प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, अपघातामधुन झालेल्या अपंगत्वाकरिता नुकसारन भरपाई म्हणून रक्कम रु.७५,०००/-, वैद्यकीय उपचाराकरिता झालेला खर्च रु.१,५०,०००/-, शारीरिक व मानसिक ञासासाठी रु.५०,०००/- व सदर तक्रार अर्जाचा खर्च रु.१,५००/- सामनेवाले यांच्याकडून मिळावेत.
(३) सामनेवाले नं.१ यांनी नि.नं.१० वर त्यांची कैफीयत व शपथपञ दाखल केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, शासनाचे परिपञका प्रमाणे शालेय शाळा व महाविद्यालय या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना विमा योजना शासनाने लागू केली आहे. ही विमा योजना सामनेवाले नं.२ यांच्याकडे उतरविलेली आहे. या योजनेतील नियमा प्रमाणे सदर विद्यार्थांच्या अपघातानंतर सात दिवसांचे आत अपघाताची सूचना देऊन, सामनेवाले नं.२ यांच्याकडे सर्व बाबींची पुर्तता करुन क्लेम फॉर्म पाठविला आहे. तक्रारदारांचा मुलगा गाडीतून पडून अपघात होऊन त्यास अपंगत्व आले याच्याशी सामनेवाले नं.१ यांचा काही एक संबंध नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची त्यांची जबाबदारी नाही. म्हणून सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद् करावा अशी विनंती केली आहे.
(४) सामनेवाले नं.२ यांनी नि.नं.२१ वर त्यांची लेखी कैफीयत व नि.नं.२१ वर शपथपञ दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या मुलाचा, राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत, या विमा कंपनीने क्लेम उतरविलेला आहे. सदर मुलास अपघातामुळे आलेले अपंगत्व हे सौम्य मानसिक अडथळा (“Mild mental Retardations”) असे नमूद केले आहे. ते विमा पॉलिसीच्या लाभामध्ये समाविष्ठ केलेले नाही. तसेच प्रपञ “ई” मध्ये नमूद असलेल्या “विमेधारक विद्यार्थ्याचा एखाद्या बेकायदेशीर कृत्यामध्ये असलेला सहभाग” अटी प्रमाणे, तक्रारदाराच्या मुलाने कायदेशीर तरतुदींचा भंग करुन ट्रक मधून प्रवास केलेला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ तक्रारदारास मिळू शकत नाही. म्हणून सामनेवाले यांनी क्लेम नाकारलेला आहे. सबब सामनेवालेंच्या सेवेत ञृटी नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(५) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.७ वर एकूण १ ते १४, तसेच सामनेवाले नं.१ यांचे म्हणणे नि.नं. १०, शपथपञ नि.नं.११ व सामनेवाले नं.२ यांचे म्हणणे नि.नं. २०, शपथपञ नि.नं.२१ पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)तक्रार अर्ज मुदतीत आहे काय ? | : होय. |
(क)सामनेवाले नं. २ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(ड)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – सामनेवाले नं.१ व २ यांनी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता विमा पॉलिसी उतरविली होती. त्या पॉलिसी अंतर्गत तक्रारदारांच्या मुलाचा समावेश होता हे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. याचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी मुळ तक्रार अर्जासोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे. यामध्ये सदर तक्रार दाखल करण्यास एक वर्षाचा विलंब झालेला आहे तो माफ होऊन मागितला आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, तक्रारदार यास मुलाचे वैद्यकिय उपचाराकरिता बाहेरगांवी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे सदर तक्रार करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे तो माफ होऊन मागितला आहे.
तक्रारदारांच्या अर्जातील कारणांचा विचार होता व त्या सोबत त्यांनी दाखल केलेले शपथपञ, मुलाचे वैद्यकिय उपचाराकामी दाखल कागदपञे पाहता तक्रारदाराचे कारण योग्य व रास्त वाटत असल्याने आम्ही सदर अर्जास झालेला विलंब माफ करावा या निर्णयाप्रत आलेलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे क्लेम केला असता सामनेवाले नं.२ यांनी सदरचा क्लेम दि.१५-०७-२००७ च्या पञाने नाकारला आहे. सदर पञ नि.नि.७/१ वर दाखल आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसते की, प्रपञ ई/११ प्रमाणे विद्यार्थी ट्रकमधून प्रवास करीत होता त्यावेळी अपघात झाला आहे. ट्रकमधून प्रवास करणे हे कायद्याचे विरुध्द आहे, त्यामुळे पॉलिसी अंतर्गत दावा देय नाही, या कारणाने सदर क्लेम नाकारलेला दिसत आहे. या कामी सामनेवाले यांनी या योजने अंतर्गत कोणत्या बाबींचा समावेश असणार आहे हे दाखविणेसाठी प्रप्रञ ई नि.नं.३३/३ वर दाखल केले आहे. सदर प्रपञ ई मधील कलम ११ – मध्ये “विमाधारक विद्यार्थ्यांचा एखाद्या बेकायदेशीर कृत्यामध्ये असलेला सहभाग ” या कारणाने विमा लाभात समावेश होणार नाही असे नमूद आहे. सदर मुलागा हा अपघाताचे वेळी ट्रक मधून प्रवास करीत होता व अशा प्रकारे वाहनात बसून प्रवास करणे हे कायद्याचा भंग करणारे आहे. तक्रारदारांच्या मुलाने कायदेशीर तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे सदर क्लेम देय नाही, असा सामनेवाले यांनी बचाव घेतला आहे. परंतु आमच्यामते सदर कलम ११ हा विमे धारकाचा बेकायदेशीर कृत्यामध्ये असलेला सहभाग या संदर्भात आहे. सदर तक्रारदारांचा मुलगा हा अपघाताचे वेळी ट्रकने केवळ प्रवास करीत होता. त्याचा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभाग असलेला दिसत नाही. याचा विचार होता सदर मुलगा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी नाही. त्यामुळे कलम ११ हा सदर प्रकरणी लागू होत नाही. सबब सामनेवाले यांच्या बचावात तथ्य नाही हे स्पष्ट होते.
तसेच तक्रारदारांच्या मुलाचा दि.१३-१०-२००६ रोजी शाळेत परिक्षेसाठी जात असतांना गाडी वाहनातून पडून अपघात झाला आहे. त्या अपघातामधून झालेल्या जखमेमुळे त्यास कायम स्वरुपी सौम्य मानसिक अडथळा (“Mild mental Retardations”) स्वरुपाचे अपंगत्व आले आहे. या बाबत तक्रारदाराने दस्तऐवजाचे यादी सोबत नि.नं.७/११ वर मुलाचे अपंगत्वाचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. सदर प्रमाणपञ पाहता ते मेडिकल बोर्ड, सिव्हील हॉस्पिटल धुळे यांनी दिलेले असून त्याप्रमाणे सदर मुलास “Mild mental Retardations” असे कायम स्वरुपी ५० ते ७० टक्के अपंगत्व आलेले आहे असे नमूद केले आहे. याकामी सामनेवाले यांनी असा बचाव घेतला आहे की, अपंगत्वाच्या दाखल्याप्रमाणे “Mild mental Retardations” म्हणजे सौम्य मानसिक अडथळा असे नमूद आहे. परंतु अशा प्रकारचे अपंगत्व विमा पॉलिसीच्या लाभात समाविष्ठ होत नाही. या कामी सामनेवाले यांनी विमा पॉलिसीअंतर्गत मिळणारे लाभ प्रपञ “ड” नि.नं.३३/२ वर दाखल केले आहे ते खालील प्रमाणे आहे.
प्रप्रञ- ड |
अ.नं. | बाब | रक्कम रुपये |
१ | अपघाती मृत्यू | रु.३०,०००/- |
२ | कायमचे अपंगत्व ( अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अगर एक डोळा व एका पायाचे पूर्ण नुकसान ) | रु.५०,०००/- |
३ | अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी | रु.२०,०००/- |
४ | अपघातामुळे उदभवलेला वैद्यकीय खर्च | रु.२,०००/- अधिकतम किरकोळ उपचारासाठी ) रु.१०,०००/-अधिकतम |
५ | अपघातात पुस्तके हरविल्यास | रु.३५०/- अधिकतम |
६ | अपघातामुळे विद्यार्थी परिक्षेत बसू न शकल्यास परिक्षा शुल्काची प्रतिपूर्ती | रु.६५०/- अधिकतम |
७ | अपघातामुळे सायकल चोरी गेल्यास किंवा संपूर्ण नुकसान झाल्यास. | रु.१,५००/- अधिकतम |
८ | अपघातामुळे चष्मा हरविल्यास | रु.७५०/- अधिकतम |
या प्रपञा प्रमाणे “Mild mental Retardations” सौम्य मानसिक अडथळा अशा प्रकारचे अपंगत्व सदर योजनेमध्ये अंतर्भुत केलेले दिसत नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदार हे या प्रकारच्या अपंगत्वाखाली विमा योजने अंतर्गत लाभधारक होऊ शकत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची मागणी योग्य वाटत नाही.
तक्रारदार यांनी वैद्यकिय खर्चाची मागणी केलेली आहे. या बाबत या प्रपञाचा विचार करता यातील कलम ४ प्रमाणे अपघातामुळे उदृभवलेल्या खर्चाकामी रक्कम रु.२,०००/- अधिकतम (किरकोळ उपचारासाठी ) व रु.१०,०००/- अधिकतम (शस्ञक्रियेसाठी ) लाभ मिळूशकतो असे दिसत आहे. तक्रारदारांच्या मुलास अपघातामुळे वैद्यकिय खर्च करावा लागलेला आहे. त्या बाबत त्यांनी वैद्यकिय बिले दाखल केलेली आहे. ती पाहता तक्रारदारांना भरपूर खर्च करावा लागलेला दिसत आहे. परंतु सदर अटी-शर्ती प्रमाणे खर्चाची मर्यादा ही रु.२,०००/- एवढी आहे. या व्यतिरिक्त जास्तीच्या रकमेचा लाभ तक्रारदारास होणार नाही. तक्रारदाराच्या मुलावर कोणतीही वैद्यकिय शञक्रिया केलेली दिसत नाही. याचा विचार होता तक्रारदारास या योजने अंतर्गत रु.२,०००/- चा लाभ मिळू शकतो असे आमचे मत आहे.
सदरची रक्कम ही या सामनेवाले यांनी वेळेत देणे आवश्यक होते. परंतु ती दिलेली नसल्याने सामनेवालेंच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत आहे. सदर रक्कम मिळण्यास तक्रारदार हे पाञ आहेत व ही रक्कम मिळण्याकामी तक्रारदारांना सदर तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे आणि त्यासाठी अर्जाचा खर्च व मानसिक ञास देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत हे स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. “क” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) सामनेवाले नं.१ यांचा लेखी खुलासा पाहता त्यावरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले नं.१ यांची जबाबदारी केवळ या योजने प्रमाणे विमेधारकाचा क्लेम फॉर्म भरुन सर्व बाबींची पुर्तता करुन सामनेवाले नं.२ यांच्याकडे क्लेम फॉर्म पाठविणे एवढीच दिसत आहे. तसेच सामनेवाले नं.१ यांनी हप्ता स्वीकारलेला नसल्यामुळे विमा क्लेम देण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे सामनेवाले नं.१ यांच्या विरुध्दचा अर्ज नामंजूर करावा असे आमचे मत आहे.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व कारणांचा विचार होता, तक्रारदारांचा तक्रार अर्जातील वैद्यकीय खर्च मिळावा ही विनंती मंजूर करावी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(क) सामनेवाले नं.१ यांच्या विरुध्दचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ड) सामनेवाले नं.२ यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारांना त्यांच्या मुलाचे वैद्यकिय खर्चाकामी रक्कम २,०००/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) दि.१५-०३-२००७ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारांना मानसिक ञासापोटी रक्कम २,०००/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः २३/०५/२०१३
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.